Monday 25 June 2018

कलंक


मुंबईतल्या एका उच्चभ्रू भागातल्या एका टोलेजंग इमारतीच्या १६ व्या मजल्यावर राहणारी सोनाली आपल्या दिवाणखान्याचा गच्चीकडे उघडणारा दरवाजा उघडते आणि बाहेर येते. सकाळचे १० वाजून गेलेले असतात आणि सोनाली नुकतीच उठलेली असते. सोनाली एक लेखिका. कुठे जंगलात कुठे एखाद्या गावात कुठे आडनिड्या ठिकाणी ही फिरत असते आणि त्यावर लिहीत असते. एखाद्या दुर्मिळ प्राण्याचं निरीक्षण करत दिवस दिवस ती एकाच ठिकाणी बसून राहील आणि मग आपण काय अनुभवलं हे लिहून काढील. हेच तिचं काम, निसर्गात फिरायचं. नुकतीच दोन महिने ती छत्तीसगडच्या एका आदिवासी जंगलात भटकून आली. त्यामुळे आता दोन आठवडे आराम करण्यासाठी ती सुट्टीवर आहे. हिचे लेख मासिके, वर्तमानपत्रे यात नेहमी छापून येतात, ती यांच्यासाठीच काम करते. आता आरामाचे दिवस त्यामुळे ती सकाळी जेव्हा जाग येईल तेव्हा झोपेतून उठत आहे. 

इतके तास वातानुकुलीत यंत्रणेत झोपल्यावर अचानक गच्चीत आल्याने सोनालीला एकदम गरम व्हायला लागतं. दिवसही उन्हाळ्याचे आणि सूर्यही आपल्या तीव्र किरणांनी तिथे हजर असल्याने तिला उकाड्याचा त्रास व्हायला लागतो. तेवढ्यात शेजारच्या गच्चीतून तिच्या शेजारी राहणाऱ्या बाई तिची विचारपूस करू लागतात. ती त्यांच्याशी चार शब्द बोलते आणि तशीच गच्चीतून खाली आजूबाजूला बघायला लागते. तेवढ्यात तिला जाणवतं की गार वाऱ्याची झुळूक अंगावर येत आहे. तिला एकदम बरं वाटतं आणि तिच्या चेहऱ्यावर मंद स्मित फुलतं. ती सहज शेजारच्या बाईंकडे बघते तर त्या उकाड्याने बेजार होत हातातल्या पुस्तकाने वारा घेताना तिला दिसतात. तिला हा प्रकार पटकन समजत नाही. दोन शेजारी घरं, एका घरात समोरून गार वारं येत आहे आणि दुसऱ्या घरात मात्र उकडत आहे ! हा काय प्रकार !

गोंधळलेल्या स्थितीत ती आत घरात येते. सकाळचे विधी वगैरे आटपून स्वयंपाकघरात कॉफी करण्यासाठी जाते. दोन महिने जंगलात काढल्याने तिला तिचे आवडीचे पदार्थ, भाज्या खायला मिळालेल्या नसतात. त्यामुळे आदल्या दिवशी संध्याकाळी तिने तिची आवडती भाजी आणून ठेवलेली असते. ती भाजी सोनाली फ्रिजमधून बाहेर काढते आणि कॉफी करायला लागते. सोनालीच्या घरी आई, बाबा आणि एक मोठा भाऊ. मोठा भाऊ सध्या कामानिमित्त परदेशी आहे आणि आईवडीलही सध्या त्याच्याकडेच गेलेले आहेत. त्यामुळे मुंबईत सोनाली एकटीच. स्वयंपाकाला घरी बाई येतात पण आज त्या सुट्टीवर असल्याने सोनालीच तिची आवडीची भाजी करणार असते. सोनाली कॉफी घेऊन बाहेर येते. टीव्ही लावते. तिचा आवडीचा सिनेमा टीव्हीवर नुकताच सुरु झालेला असतो, तो ती बघायला लागते.

दुपारचा एक वाजत येतो आणि तिच्या लक्षात येतं की आपण टीव्ही बघत बसलो आणि आपली भाजी करायची राहिली. तिला खूप कंटाळा आलेला असतो. ती विचार करते की आत्ता मॅगी करावी आणि भाजी रात्री करावी. असा विचार करत ती टीव्हीसमोरच बसून राहते. सिनेमा संपतो. ती भाजी सोनाली परत फ्रिजमध्ये ठेवते आणि अंघोळीला जाते. अंघोळ करून परत ती हॉलमध्ये येते. एक प्रकारचा शीण जाणवत असल्याने ती हॉलमध्ये येऊन परत पाय पसरून बसून राहते. तेवढ्यात तिचं लक्ष घड्याळाकडे जातं. दुपारचे दोन वाजून गेलेले असतात आणि भूकही लागलेली असते. इच्छा नसली तरी आता मॅगी करायला उठावं या विचारात ती असतानाच तिला स्वयंपाकघरातून छानसा वास यायला लागतो. नुकत्याच तव्यावरून काढलेल्या पोळ्या आणि तिच्या त्या आवडीच्या भाजीचा खमंग वास. एक क्षण तिची भूक चाळवते. तोंडाला पाणी सुटतं. भूक तर प्रचंड लागलेली असतेच. पण दुसऱ्या क्षणाला ती सावध होते आणि हळूहळू स्वयंपाकघरात जायला लागते. आत टेबलावर भाजी आणि पोळी तयार असते. ते दोन्ही तयार पदार्थ ती डोळे फाडून बघते. मगाशी आत ठेवलेली भाजी बघण्यासाठी ती फ्रीज उघडते तर आत भाजी नसते. सोनाली भित्री नसते, उलट जंगलात राहून, इकडे तिकडे निसर्गात भटकून ती चांगली तयार झालेली असते पण या भाजीच्या प्रसंगाने ती थोडी सावध होते. तिला हे ही आठवतं की एवढं कडक ऊन असताना, शेजारच्या बाई उकाड्याने बेजार असताना मगाशी आपल्यावर मात्र गार वाऱ्याची झुळूक येत होती. काहीतरी गडबड आहे.

ती भाजी आणि त्या पोळ्या सोनाली प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून केराच्या टोपलीत टाकून देते. दोन्ही भांडी वरचेवर पाण्याने विसळून घासायला ठेवून देते. ती त्या भाजीला किंवा पोळ्यांना हातही लावत नाही. आपापली मॅगी करते आणि खायला लागते. तिच्या डोक्यात हेच चालू असतं, हा सगळा प्रकार काय ! मॅगीची ताटली हातात घेऊन ती हळूहळू दबक्या पावलांनी सगळं घर नजरेखालून घालायला लागते. कुठे काही विचित्र प्रकार तर दिसत नाहीये ना ! याच शोधात ती सगळं घर पिंजून काढते. संशयास्पद असं तिला काहीच आढळत नाही. ती भाजी पोळी तिथे आली कशी ? फ्रिजमधून भाजीही गायब ! कोणी केली भाजी पोळी ? एवढ्या उकाड्यात आपल्या अंगावर गार वाऱ्याची झुळूक कशी काय आली ? प्रश्न बरेच पण सगळेच अनुत्तरीत.

तिची मॅगी खाऊन होते. ती स्वयंपाकघरातून बाहेर दिवाणखान्यात येते आणि तिथल्या एका खुर्चीवर बसते, आपल्याच घराला प्रश्नार्थक चेहऱ्याने न्याहाळायला लागते. या दोन प्रसंगांनी तिला आपलं घर थोडं अनोळखी वाटायला लागतं. तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की आपल्याला बाहेर जायचं आहे. मनातून थोडी घाबरलेली सोनाली तिथून उठते आणि आवरून बाहेर जाण्यासाठी निघते. थोड्या धडधडत्या छातीने आपल्या हॉलकडे एक कटाक्ष टाकते आणि दरवाजा लावून घेत सोनाली घराबाहेर पडते. या सगळ्या भानगडीत तिला निघायला उशीर झालेला असतो, त्यामुळे बराच उशीर झाला या विचारातच ती लिफ्टपाशी येते तर लिफ्ट ३५ व्या मजल्यावर असते. ३५ आकडा बघून वैतागतच ती लिफ्टची कळ दाबते आणि दुसऱ्या क्षणाला लिफ्ट ३५ व्या मजल्यावरून वरून थेट १६ व्या मजल्यावर येते. आपण आत्ता बटण दाबलं आणि त्या क्षणी लिफ्ट समोर ! ३५ ३४ ३३.... असा एकेक मजला खाली न येता लिफ्ट ३५ वरून थेट १६ ! ती डोळे फाडून त्या लिफ्टच्या बटणाकडे बघायला लागते आणि तेवढ्यात समोर आलेल्या लिफ्टचा दरवाजा उघडतो. दुसऱ्या क्षणाला तिच्या कानावर एक गदारोळ ऐकू यायला लागतो. तिच्या इमारतीतली लोकं अचानक ३५ व्या मजल्यावर दोन्ही लिफ्ट्स बंद पडल्या... करत ओरडायला लागलेली असतात. तिच्या लक्षात येतं की परत काहीतरी आपल्याबरोबर विचित्र घडलंय. समोर उघडी असलेली लिफ्ट तशीच ठेवून ती जिने उतरत खाली जायला निघते. तेवढ्यात तिची शेजारची बाई बाहेर येते. लिफ्टकडे बघते आणि सोनालीला म्हणते, “लिफ्ट्स बंद पडल्या, आता तुला उतरत जावं लागणार.” हे ती ऐकते आणि चमकून त्या बाईंकडे बघायला लागते कारण १६ व्या मजल्यावर सताड उघडा असलेला दोनपैकी एका लिफ्टचा दरवाजा तिला दिसत असतो. इतका वेळ होऊनही तो दरवाजा आपापला बंद न होता तसाच उघडा असतो. हे सोनालीला दिसत असतं पण तिच्या शेजारच्या बाईला मात्र हे दिसत नसतं. या प्रसंगाने सोनाली घाबरते पण आपली ही अवस्था त्या शेजारच्या बाईला न दाखवता तिच्याकडे बघून होकारार्थी मान हलवत ती तिथून पुढे जाऊ लागते. घाबरलेल्या स्थितीतच सोनाली इमारतीच्या पायऱ्या उतरत असते. कोणी बघितलं आणि बघून हसलं तर हसायचं नाहीतर उतरत रहायचं असं करत करत लिफ्टविषयी कोणाशीही काहीही न बोलता ती इमारतीच्या खाली येते. सोनाली इमारतीतून बाहेर आल्यावर परत एकदा इमारतीतून आवाज येऊ लागतो. आता परत काय झालं हे बघण्यासाठी ती परत इमारतीत जाते तर दोन्ही लिफ्ट्स सुरु झालेल्या असतात आणि मगाशी १६ व्या मजल्यावरचं लिफ्टचं बटण दाबलेलं असल्याने दोन्ही लिफ्ट्स ३५ ३४ ३३ ३२.... करत १६ व्या मजल्यावर येऊन थांबलेल्या असतात. आता लिफ्ट्स सुरु झाल्या, असं काय झालं अचानक की लिफ्ट्स बंद पडल्या आणि अचानकच सुरु झाल्या... करत इमारतीतले लोक चर्चा करायला लागलेले असतात. तिच्या लक्षात येतं की आपण इमारतीच्या बाहेर पडलो आणि लगेच लिफ्ट्स सुरु झाल्या. या विचारातच ती बाहेर रस्त्यावर येते. आपल्याला फारच उशीर झालाय, आता रिक्षा लगेच मिळणार का... अशा विचारात ती असतानाच तिला समोरच उभी असलेली रिक्षा दिसते. अरे वा.. समोरच रिक्षा असं मनात म्हणतच सोनाली पटकन रिक्षेत बसते.

रिक्षेत बसल्यावर तिच्या लक्षात येतं की आपल्याला लगेच रिक्षा मिळाली आणि इतक्या आडनिड्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तिकडे यायला हा रिक्षेवाला तयारही झाला ! आपल्या इमारतीच्या खालच्या रस्त्यावर कधीही रिक्षा लगेच मिळत नाही. बाहेर मुख्य रस्त्यापर्यंत चालत यायला लागतं आणि जणू काही आपल्यासाठीच ही रिक्षा थांबली असावी अशी आपल्याला रिक्षा मिळाली. आपल्याला जिथे जायचं आहे तिथे कुठलेच रिक्षेवाले सहजपणे यायला तयार होत नाहीत आणि हा रिक्षेवाला लगेच तयार झाला ! तिला सकाळपासून तिच्याबरोबर घडलेल्या सगळ्या विचित्र घटना आठवतात आणि आता त्यात भरीस भर हे, त्यात आपण आता एका अनोळखी व्यक्तीच्या रिक्षेत आहोत. मगाशी आपल्या घरात, इमारतीत तरी होतो. हा रिक्षेवाला कोण असेल ! मगाशी आपल्याला लिफ्ट दिसत होती आणि आपल्या शेजारी बाईंना ती दिसत नव्हती. हे असंच काही या रिक्षेचंही तर नसेल ! सोनाली आता खूप घाबरते. पण घाबरून उपयोग नाही तर आपल्याला धीराने घ्यायला पाहिजे हे तिच्या लक्षात येतं आणि म्हणून ती सगळी रिक्षा नजरेखालून घालायला लागते. तिच्या समोरच त्या रिक्षेवाल्याचं ओळखपत्र असतं. त्यावर RTO अधिकाऱ्याचा सही शिक्काही असतो. ती त्यावरचा त्या रिक्षेवाल्याचा फोटो नीट बघते आणि आता ती ठरवते की सध्या जो रिक्षा चालवत आहे त्याचा चेहरा काहीही करून बघायचाच. तिला यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि आरशात तिला त्याचा चेहरा लगेच दिसतो. चेहरा तोच असतो. तिला जरा बरं वाटतं. मनातून भीती गेलेली नसली तरी तिचं मन थोडं हलकं होतं. तेवढ्यात तिला जिथे जायचं असतं ते ठिकाण येतं. ती रिक्षेतून उतरते आणि पैसे देऊन जायला लागते. तिची पाठ फिरते आणि त्याच वेळी त्या रिक्षेवाल्याला अजून एक ओळखीचा रिक्षेवाला भेटतो. हे बघून तिला एक गोष्ट नक्की समजते की आपण केलेला हा रिक्षा प्रवास आपल्यासाठी एक आभास नव्हता. तिला बरं वाटतं.    

थोड्यावेळाने सोनाली बाहेरून घरी परत येते, दार लावते आणि थेट स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी जाते. दिवाणखान्यात येते, कोचावर आरामात बसते आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की आपण पंखाच लावला नाहीये. उकाडा आणि त्यात दमून भागून परतलेली सोनाली वैतागते की, पंखा लावण्यासाठी उठायचं..... आणि तेवढ्यात त्या दिवाणखान्यातला पंखा आपोआप सुरु होतो. सोनाली काय समजायचं ते समजते. तडक उठते, पंखा बंद करते आणि दिवाणखान्यातील वातानुकुलीत यंत्रणा सुरु करते. थोडा वेळ तशीच शांत बसून राहते आणि बसल्या जागी आपल्याच घराच्या आठही दिशांचं अवलोकन करायला लागते. सोनाली धीट असते. आपल्याबरोबर जे काही घडत आहे त्याची थोडीशी भीती जरी तिच्या मनात निर्माण झालेली असली तरी धीटपणे त्या रिकाम्या भासणाऱ्या खोलीत ती प्रश्न विचारायला लागते, “कोण आहे ? कोण आहे इथे ? सकाळपासून माझ्याबरोबर कोण खेळत आहे ? असं अदृश्य राहण्यापेक्षा जे कोण असेल त्याने समोर या.” तिचं हे वाक्य संपतं आणि तिच्यासमोर एक पन्नाशीतला माणूस प्रकट होतो. सोनाली एकदम दचकते. दोन क्षण त्या माणसाकडे निरखून बघते आणि त्याला विचारते, “कोण तुम्ही ? तुम्ही हे सगळं का करत आहात ? मला तर तुम्ही आठवत नाही. आपली ओळख होती ? आधी गार वारं मग पोळीभाजी मग लिफ्ट मग रिक्षा आणि आता हा पंखा... का हे सगळं ?

तो दृश्य स्वरुपात आल्यावर तिच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसलेला असतो आणि तिचे ते प्रश्न ऐकून काहीतरी विचार करत इकडे तिकडे बघायला लागतो. तो काहीच उत्तर देत नाहीये हे बघून सोनाली त्याला परत प्रश्न विचारणारच असते तेवढ्यात तो म्हणतो, “मी विलास... म्हणजे खरं तर हे माझं ते नाव आहे जेव्हा मी या जगात अस्तित्वात होतो.” हे वाक्य ऐकून सोनाली एकदम दचकते आणि खरं तर मनातून घाबरते पण आपली मनातली भीती चेहऱ्यावर न दाखवता विलास पुढे काय बोलत आहे हे नीट लक्ष देऊन ऐकू लागते.

विलास पुढे बोलू लागतो, “मी वसईचा. ५ वर्षांपूर्वी हे जग सोडून गेलो. मला एक भाऊ आहे आणि तो सध्या कारागृहात आहे. एका हत्येच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा झालीय. ही हत्या त्याने केलेली नाही. त्याची एवढीच चूक होती की ही घटना जेव्हा घडली तेव्हा तो तिथे होता. मला त्याला सोडवायचं आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे.”

सोनाली म्हणते, “मी आणि तुम्हाला मदत करू... का ? माझा आणि तुमचा काय संबंध ? मी तुम्हाला आणि तुमच्या भावालाही ओळखत नाही. माझा जन्मात कधी वसईशी संबंधही आलेला नाही. आणि सर्वात महत्वाचं मी कोणी पोलीस वगैरे नाही हो... जी तुम्हाला यात मी मदत करू शकेन.”  

विलास – पोलीस (म्हणत हसायला लागतो). त्यांनीच तर अडकवलं आहे त्याला. तुझा आणि माझा काहीच संबंध नाही ते बरोबर पण आता मदत मात्र तुलाच करावी लागेल.

सोनाली – पण का ? का करायची मी मदत ? पोलिसांनी अडकवलं आहे तर मी त्याला कसं काय एवढ्या मोठ्या गुन्ह्यातून बाहेर काढणार ? नाही मला काही हे जमणार नाही.

विलास – मी आहे ना, मी पूर्ण मदत करीन  

विलास काही पुढे बोलणार तितक्यात सोनाली म्हणते की “नाही म्हटलं ना... तुम्ही इथून जा आता.” विलास त्या क्षणी गायब होतो. सोनालीला तिथेच झोप लागते. संध्याकाळी उशिरा तिच्या दारावरची घंटा वाजते तेव्हा ती जागी होते. स्वयंपाक करणाऱ्या मावशी आलेल्या असतात. “आज पूर्ण दिवस तुम्ही येणार नव्हतात ना, मग आत्ता कशा काय आलात...” या अशा दोघींच्या गप्पा सुरु होतात आणि गप्पा मारता मारता त्या कामाला सुरुवात करतात. सोनाली तिच्या शयनकक्षाच्या न्हाणीघरात जाते आणि काही कारणासाठी तिथला नळ सोडते आणि, ईईईई... करत जोरात ओरडायला लागते. तिचा आवाज ऐकून त्या मावशी भराभरा तिथे “काय झालं....” करत येतात. तर सोनाली म्हणते की, “हे बघा नळातून हिरवं पाणी येत आहे...”. पाण्याकडे बघत मावशी म्हणतात, “हिरवं ! अहो ताई काय झालं तुम्हाला पाणी तर नेहमीसारखंच दिसत आहे. हिरवं कुठे...!” हे मावशींचं वाक्य ऐकून सोनाली त्या पाण्याकडे बघतच बसते. तिच्या डोक्यात एक विचारचक्र सुरु होतं. मावशी पुढे म्हणतात, “ताई तुम्ही ते जंगलात आणि कुठे कुठे फिरून आलात ना इतक्यात, त्यामुळे तुम्हाला सगळीकडे हिरवं हिरवं दिसायला लागलंय बहुतेक. तुम्हाला जरा आरामाची गरज आहे. तुमच्या आई इथे नाहीत आत्ता तुमची काळजी घ्यायला पण तुम्ही आता जरा आराम करा.” सोनालीचं तिच्या बोलण्याकडे फारसं लक्ष नसतं. ती, “अं.... हो...” असं म्हणते. सोनाली पाणी बंद करून बाहेर यायला लागते आणि तेवढ्यात तिचं लक्ष खालच्या बादलीकडे जातं. खालच्या बादलीत इतकावेळ जे हिरव्या रंगाचं पाणी दिसत होतं ते अचानक नेहमीच्या पाण्याच्या रंगासारखं दिसायला लागलेलं असतं. ती एकटक त्या पाण्याकडे बघायला लागते. त्या पाण्याकडे बघत तिची तंद्री लागलेलीच असते तितक्यात तिला मावशी हाक मारायला लागतात आणि म्हणून ती तिथून बाहेर स्वयंपाकघराकडे जाते. आपल्याबरोबर हे काय घडून गेलं, याची तिला अगदी नीट जाणीव होते आणि त्याच विचारात तिचा तो दिवस संपतो.

दुसऱ्या दिवशी सोनाली आरामात १० वाजता उठते. सकाळीच तिच्या खास मित्राचा विवेकचा फोन येतो आणि दोघे बाहेर भेटण्याचं ठरवतात. सोनालीने गेल्या दोन महिन्यांत दक्षिणी पदार्थ खाल्लेले नसल्याने ते दोघे एका उडपी उपाहारगृहात भेटतात. सकाळी सकाळी सोनालीचा मूड फारसा चांगला नसतो. कालच्या दिवसाचा खूपच परिणाम तिच्या मूडवर झालेला असतो. दोघे भेटतात, त्यांच्या गप्पा सुरु होतात पण बोलत मात्र एकटा विवेकच असतो आणि सोनाली मात्र नुसती, हं.... हु... करत असते. एरवी नुसती बडबड करणारी, हसणारी खिदळणारी सोनाली आज मात्र एकदम शांत असते, चेहरा पडलेला असतो. विवेक तिला विचारतो, “काय झालं ? आज एकदम गप्प आहेस, मीच एकटा बोलतोय आणि मूड पण ठीक दिसत नाहीये...” सोनाली म्हणते, “काही नाही...”. विवेक म्हणतो, “काहीतरी नक्की झालंय. तुला मी ही अशी या आधी कधीच पाहिलेली नाही. दमली आहेस का खूप ? यावेळी फार दगदग झाली का जंगलात ?” सोनाली काहीच उत्तर देत नाही. सोनाली काहीच बोलत नाहीये हे बघून विवेक तिचा मूड बदलण्यासाठी तिच्या अगदी आवडीच्या पदार्थांची ऑर्डर देतो. सोनालीही स्वतःला सावरते आणि हळूहळू विवेकशी गप्पा मारायला लागते. आदल्या रात्री आईचा फोन येऊन गेलेला असतो. त्याबद्दल ती विवेकला सांगायला लागते. “हळूहळू का होईना सोनाली गप्पा मारायला तर लागली”, हे बघून विवेकला बरं वाटतं आणि “या जंगल सहलीत बिचारी फारच दमलीय...” असा विचार करत तो तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागतो.

पहिल्यांदा त्या दोघांसाठी इडलीच्या दोन प्लेट्स येतात. विवेक खायला सुरुवातही करतो पण सोनालीची मात्र बडबड सुरु असते. तिच्या त्या गप्पा मध्येच तोडत विवेक तिला म्हणतो, “अगं खायला सुरुवात कर... इथे माझ्या दोन्ही इडल्या संपतीलही नेहमीसारख्या आणि तू मात्र नेहमीप्रमाणे फक्त बडबड करत बसशील. खा खा... मस्त इडली आहे.” अं... हो... करत बडबड करतच सोनाली इडलीचा पहिला घास तोडते आणि तो तोंडात घालते. तोंडात घातल्या घातल्या तिच्या त्या बडबडीला अचानक ब्रेक लागतो आणि ती “ईईईई.....” करत खाकरायला लागते आणि जोरात म्हणते, “ही तुला मस्त वाटते इडली. केवढी खारट आहे. किती ते मीठ...” विवेक म्हणतो, “मीठ आणि जास्त ! काहीही काय ! उलट किंचित मीठ कमीच आहे.” सोनाली अतिशय त्रासिक चेहरा करून बसल्या जागी शांत बसून राहते. तिचा जरा कुठे बरा झालेला मूड परत एकदा बिनसतो. विवेक तिला पाणी प्यायला देतो. ती पाण्याचं भांड तोंडाला लावणार तेवढ्यात घाबरून म्हणते, “नाही नको पाणी नको म्हणते...” तिला ते पाणी प्यायलाही भीती वाटते. दोनेक मिनिटांनी विवेक तिला म्हणतो, “अगं मीठ जास्त नाही. तुला अचानक काय झालं ? तुझं आज नक्की काहीतरी बिनसलंय. आधी कमालीची शांत शांत होतीस आणि आता हे असं अचानक...” सोनाली यावर काहीच बोलत नाही आणि घाबरत घाबरत इडलीचा अजून एक घास तोंडात घालते, यावेळी मात्र तिला मीठ जास्त वाटत नाही. पुढे शांतपणे सोनाली इडली संपवते. एव्हाना तिच्या डोक्यात एक विचारचक्र सुरु झालेलं असतं, “काल हिरवं पाणी, आत्ता खारट इडली... आता पुढे काय ? आणि हे आपल्याला कुठे घेऊन जाणार ?” तिच्या डोक्यात एकदा विचार येतो की हे सगळं विवेकला सांगावं पण त्याला काय सांगणार की एक भूत मला असा त्रास देत आहे कारण त्याचं एक काम मी करावं यासाठी...? सोनाली हा विचार सध्या बाजूला ठेवते आणि शांतपणे विवेकशी गप्पा मारू लागते. नेहमीप्रमाणे ती गप्पा मारत नसली तरी अगदी घुम्यासारखी ती तिथे बसून राहत नाही.

त्यानंतर दोघे आपापल्या घरी परत येतात. संध्याकाळ होते, सोनाली घरातून बाहेर न पडता घरीच सिनेमा बघत बसते. हळूहळू रात्रही होते आणि ती दूरचित्रवाणी संच बंद करून आपल्या दिवाणखान्याच्या गच्चीत येते. छान वारं सुटलेलं असतं त्यामुळे ती तिथेच बराच वेळ उभी राहते. तिने लावलेली झाडं असतात, त्या झाडांकडे बघत ती गच्चीतच रेंगाळत राहते. तेवढ्यात तिचं लक्ष समोरच्या इमारतीकडे जातं त्या इमारतीच्या गच्चीवर विवेक उभा असतो. सोनालीला वाटतं की विवेक इथे काय करतोय, समोरच्या इमारतीत हा कसा काय आला आणि हा इमारतीच्या वरती का गेलाय ! हा असा विचार करत असतानाच विवेकचं लक्ष सोनालीकडे जातं, तो तिच्याकडे बघून मंद स्मित करतो. सोनाली त्याला हात दाखवते आणि पुढे ती, “तू इथे काय करत आहेस”, हे असं विचारणार तितक्यात विवेक त्या इमारतीच्या गच्चीच्या कठड्यावर चढतो. ती अरे... करणार तितक्यात तो वरून म्हणजेच साधारण १९-२० व्या मजल्यावरून खाली उडी मारतो. हे सगळं सोनालीच्या समोर घडतं. हे अचानक काय घडलं तिला काही समजत नाही. ती प्रचंड घाबरते, तिचं हृदय धडधडायला लागतं. ती खाली बघते तर खाली रक्ताच्या थारोळ्यात विवेक पडलेला असतो. ती “विवेक...” करून किंचाळायला लागते, जोरजोरात रडायला, ओरडायला लागते आणि त्यातच तिचे हात पाय लटपटायला लागतात आणि तिला एकदम शक्तिपात झाल्यासारखा होतो. ती स्वतःला सावरतच असते आणि तितक्यात तिच्या हातातला मोबईल वाजायला लागतो. ती मोबईलकडे बघते तर विवेकचा फोन असतो. तिचं हृदय प्रचंड धडधडत असतं, ती रडत असते आणि दुसरीकडे फोन वाजत असतो. तिला काय करावं समजत नाही आणि तशातच ती तो फोन उचलते. “हॅलो...” म्हणते. समोरून विवेकचा आवाज ऐकू येतो. प्रचंड घाबरलेल्या, रडवेल्या स्थितीत तिने तो फोन उचललेला असतो त्यामुळे तिचा आवाजही तसाच येतो. समोरून विवेकचा आवाज एकून सोनाली अक्षरशः चक्रावून जाते, तिला थोडीशी घेअरी येते आणि स्वतःला सांभाळत ती समोरच्या इमारतीच्या खाली जिथे विवेक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो तिकडे बघते, तर खाली काहीही नसतं. विवेक नाही, रक्त नाही काही नाही. तिची आता संपूर्ण बोबडी वळते. फोनवर विवेक “सोनाली सोनाली...” करत असतो आणि सोनाली मात्र अजिबात बोलण्याच्या मनःस्थितीत नसते. तेवढ्यात तिला समोरच्या इमारतीच्या बाहेर हवेत अधांतरी तरंगताना विलास दिसतो. तो तिच्याकडे बघून हात हलवत असतो. ती काय ते समजून जाते पण यावेळी मात्र तिची अवस्था अतिशय वाईट झालेली असते. हिरवं पाणी, इडली हे प्रसंग तिने धीटपणे घेतले पण हे आत्ता जे काही घडलं त्याने मात्र ती अंतर्बाह्य हादरून गेलेली असते. अतिशय धीट मुलगी तेवढ्या वेळासाठी का होईना घाबरलेली असते आणि इकडे विवेक फोनवर सारखा “सोनाली सोनाली” करत असतो. ती मोबईल कानाला लावते आणि हळुवारपणे हॅलो... म्हणते. समोरून विवेक म्हणतो, “सोनाली, काय झालं तुला ? तू एवढी का घाबरलेली आहेस ? तू काही मला ठीक वाटत नाहीयेस...”. सोनाली म्हणते, “काही नाही अरे स्वप्न पडलं होतं, भूताचं स्वप्न आणि तेवढ्यात तुझा फोन वाजला ना म्हणून....” विवेक हसायला लागतो आणि म्हणतो, “ तू आणि भूतांना घाबरतेस ? भूतं तुला घाबरतील. चल शांतपणे झोप आता. आपण उद्या बोलू.” सोनाली हो... म्हणत फोन बंद करते आणि तिथेच कोसळते. ती या धक्क्यातून सावरलेली नसते. बराच वेळ ती तशीच बसून राहते.

थोड्या वेळाने स्वतःला सावरत ती तिथून उठते, तिच्या घराच्या गच्चीतून चहूबाजूला दृष्टीक्षेप टाकते आणि मन खंबीर करत आत दिवाणखान्यात येते. तिथल्या कोचावर बसते, दोन मिनिटे तशीच शांत बसून “विलास...” अशी एक हाक मारते. पहिल्या हाकेलाच विलास तिथे दृश्य स्वरुपात येतो. यावेळी मात्र त्याला बघितल्यावर सोनाली दचकत नाही.

सोनाली – तू (आता तुम्ही नाही, बेधडक तू) मला का त्रास देत आहेस ? मी तुझं किंवा तुझ्या भावाचं काय वाकडं केलं की तू मला असा त्रास देत आहेस ?
विलास – मी काय ते कालच सांगितलं आहे. मला माझ्या भावाला तुरुंगातून बाहेर काढायचं आहे आणि यासाठी मला तुझी मदत हवी आहे.
सोनाली – माझ्या मदतीची तुला काय गरज ? तू काय हवं ते करू शकतोस. मग सोडव भावाला.
विलास – नाही. काही गोष्टी मी करू शकणार नाही कारण माझ्याकडे शरीर नाही. मी सगळ्यांना दिसू शकत नाही.
सोनाली – म्हणजे मलाच दिसतोस फक्त ?
विलास – सध्यातरी हो....
सोनाली – का हे असं ? आणि मीच मदत मागायला तुला का मिळाले ? एवढ्या मोठ्या जगात मीच का ?
विलास – याचं उत्तर माझ्याकडेही नाही. त्या दिवशी भावाला यातून बाहेर कसं काढावं, यासाठी कोणाची मदत घ्यावी आणि कशी याच विचारात इथून जात असताना मी या घराच्या दिशेने ओढला गेलो. तिथे तू गच्चीत उभी होतीस, तेव्हाच मला समजलं की याचा अर्थ आपल्याला जर कोणी मदत करू शकणार असेल तर ती तूच.
सोनाली – काय संबंध ? काहीही काय ?
विलास – हो हे असंच असतं. या गोष्टी तुला समजणार नाहीत.

सोनाली यापुढे काहीच बोलत नाही आणि आपल्या जागी शांत खाली जमिनीकडे एकटक बघत तशीच बसून राहते. बराच वेळ झाला ही काहीच बोलत नाहीये हे बघून विलास तिला विचारतो, “मग करणार ना मदत ?” ती यावर काहीच बोलत नाही, फक्त त्याच्याकडे बघते आणि थोड्यावेळाने त्याला विचारते की, “मी जर नाही म्हणाले तर माझ्याबरोबर या ज्या विचित्र घटना घडत आहेत त्या अशाच चालू राहणार ?” विलास म्हणतो, “हो... मला माझ्या भावाला तुरुंगातून बाहेर काढायचं आहे. त्याच्याकडे फार दिवस नाहीत. चारेक महिने आहेत फार फार तर. पण मरण्यापूर्वी त्याच्यावर जो हत्येचा “कलंक” लागलेला आहे, तो मला पुसायचा आहे. तो मारताना त्याच्या आत्म्यावर असा कुठला डाग राहू नये असं मला वाटतं.”

हे एकून सोनाली म्हणते, “चार महिने ?” विलास म्हणतो, “हो... आणि म्हणूनच माझा हा सगळा खटाटोप चालू आहे आणि यात तुला मला मदत ही करावीच लागणार आहे.”

सोनाली वैतागते आणि एक मोठा उसासा टाकत त्याला म्हणते, “माझ्यासमोर पर्यायच शिल्लक नाही. बरं समजा मी तुला मदत करायला हो म्हटलं आणि मदत करायलाही लागले आणि कुठे अडकले तर ? कारण शेवटी हत्येचा आरोप आहे.” विलास म्हणतो, “याची तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझ्या अवतीभवती तुझं रक्षण करायला किंवा तू संकटातच अडकू नयेस यासाठी म्हणून नेहमी प्रयत्नशील असेन.” सोनाली म्हणते, “एवढा विश्वास कसा ठेवू ? एखाद्या बिकट प्रसंगी तू आलाच नाहीस मदतीला तर ? तर मी काय करायचं ? नाही मला नाही जमणार...” विलास म्हणतो, “असं होणार नाही कारण तू माझं खूप मोठं काम करणार आहेस. तेव्हा तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर. तू अगदी निश्चिंत रहा. मी जे करू शकणार नाही ते तुझ्याकडून करून घेईन आणि एकदा काम झालं की तुला मी कधी दिसणारही नाही.” सोनाली म्हणते, “नको नको” विलास “ओके” म्हणतो आणि पुढे जशी तुझी इच्छा असं म्हणणार तितक्यात सोनाली म्हणते की, “ पण.... तू मला सुखाने जगू देणार नाहीस. त्यामुळे माझ्याकडे पर्याय नाही. तुला मला मदत करावीच लागणार. ठीक आहे, काय झालं होतं त्यावेळी की तुझा भाऊ या केसमध्ये अडकला, हे सांग मला आणि हे ही सांग की तुला माझ्याकडून कुठली मदत हवी आहे.”

विलास तिला त्या रात्री काय आणि कसं घडलं हे सांगू लागतो, “फोर्टच्या डी. एन. रस्त्यावर एका मोठ्या नेत्याच्या मुलाने दारूच्या नशेत एका माणसाला गाडीखाली चिरडून मारलं. त्याला जेव्हा हे कळलं की तो माणूस जागच्या जागी ठार झालाय तेव्हा त्याने तेथून पळ काढला. नेमका त्याच वेळी तिथे विलासचा भाऊ विकास आपल्या गाडीतून येतो. अपघात झालाय हे कळल्याने तो गाडीतून उतरून त्या माणसाला बघायला जातो. त्याच वेळी तिथे पोलीस येतात आणि तो भाऊ या खटल्यात अडकतो. त्याच दिवशी दुपारी विकासची गाडी एके ठिकाणी धडकलेली असते त्यामुळे गाडीला पुढून थोडे पोचे पडलेले असतात. पोलीस हे न्यायालयात सिद्ध करतात की हे पोचे त्याच रात्रीचे आहेत जेव्हा विकासने त्या माणसाला आपल्या गाडीने उडवले होते. त्यावेळी गाडीचा ताबा सुटल्याने गाडी तिथे एके ठिकाणी धडकली आणि तेव्हा हे पोचे पडले... आणि आता विकासला जन्मठेप झालेली आहे.”

यावर सोनाली म्हणते की, “पण मग आता त्याला निर्दोष कसं सिद्ध करणार ? तुमच्याकडे काही पुरावा आहे का ?

विलास म्हणतो, “पुरावा आहे पण या लोकांनी तो गायब केलाय. त्याच रस्त्यावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळतात, तिथला एक दुकानदार कुठला एक नवीनच आलेला कॅमेरा घेऊन तिथे व्हिडीओ घेत होता, फोटो काढत होता. त्याच वेळी ही घटना घडली. त्याच्या कॅमेऱ्यात ती पूर्ण घटना अगदी नीट टिपली गेली आहे. त्यात त्या नेत्याच्या मुलाचा चेहराही असावा असा मला दाट संशय आहे. हे त्या लोकांना कळलं असणार आणि म्हणूनच त्यांनी त्या दुकानदाराला त्याच्या कॅमेऱ्यासकट गायब केलं आहे. त्याला शोधावं लागेल.”

सोनाली त्याला विचारते, “त्याला कोण मी शोधायचं आणि कसं ? आणि त्याचा कॅमेरा ?” यावर विलास म्हणतो की, “नक्की त्याचं काय झालेलं आहे हे मी बघतो पण त्याला तो असेल त्या स्थितीतून इकडे आणायला मला तुझी मदत हवी आहे. त्याला तुलाच आणावं लागेल कारण शरीराने मी अस्तित्वात नाही. मी सध्या जातो इथून आणि त्याचा ठावठिकाणा शोधून परत येतो.”

सोनाली होकारार्थी हलवायची म्हणून मान हलवते आणि विलास तिथून गायब होतो. त्यानंतर सोनाली या सगळ्याचा खूप विचार करते. एखाद्या सिनेमात शोभेल अशी कथा आहे आणि आधी हे असं विलासचं असणं हे सुद्धा चित्रपटासारखंच. आता याबद्दल कोणाला काही सांगावं का, का नको याचाही ती विचार करते. आपल्यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही आणि आपल्याला आरामाची गरज आहे असे सल्लेच उलट आपल्याला दिले जातील. पण आहे जे काही आहे ते थरारक, चित्तवेधक आहे. सोनालीला थरार आवडत असतो आणि ती खूप धीट मुलगी असते त्यामुळे तिला हे सगळं फार आवडतं. पुढे दिवसामागून दिवस जायला लागतात. सोनाली आपल्या रोजच्या आयुष्यात मग्न असते. या काळात विलास तिला कुठलाही त्रास द्यायला येत नाही की भेटायलाही येत नाही. बरेच दिवस जातात, विलास हे एक काल्पनिक पात्र आहे असं वाटावं इतका विलास या दिवसांत सोनालीपासून दूर असतो. पंधरा दिवस होऊन जातात आणि सोनाली विचार करायला लागते की हा आलाच नाही ! काय झालं असेल ! तो साक्षीदार तर त्याला मिळाला असेल ना !    

एक महिना होतो. सोनाली आपल्या छत्तीसगडच्या सहलीची माहिती लिहिण्याच्या तयारीला लागलेली असते. फोटो एकत्र करणे. काय आणि कसं लिहायचं हे ठरवत तिचं लिखाण सुरूही झालेलं असतं. एकदा असंच दुपारी ती तिच्या लॅपटॉपवर तिचं हेच काम करत असताना तिथे अचानक विलास येतो. थेट तिच्या शेजारीच येऊन उभा राहतो. सोनाली आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडे चमकून बघत एकदम ओरडते, “विलास.... किती दिवसांनी ! इतके दिवस कुठे होतास ? काही थांगपत्ता लागला त्याचा ? कॅमेरा मिळाला ? काय झालं पुढे ?” विलास काहीच बोलत नाही. नुसताच विचार करत तिथेच एका खुर्चीवर जाऊन बसतो. बराच वेळ झाला हा काहीच बोलत नाहीये हे बघून सोनाली लॅपटॉप बंद करते आणि तिथेच दुसऱ्या खुर्चीवर बसत त्याला विचारते, “काय झालं ? नाही मिळाला ? मारून तर नाही टाकलं त्याला ?” विलास म्हणतो, “नाही अजून तरी मारलेलं नाहीये पण ज्या अवस्थेत तो सध्या तिकडे आहे, ते बघता म्हणावं लागेल की तो आपला जिवंत आहे म्हणून आहे. फार वाट लावली आहे त्याची.” “आणि कॅमेरा ?, सोनाली पुढे विचारते. विलासच्या हातात अचानक एक कॅमेरा प्रकट होतो, तो कॅमेरा दाखवत विलास तिला म्हणतो, “या कॅमेऱ्यामुळेच माझा खूप वेळ गेलाय. आधीच माझ्या हातात फार दिवस नाहीत आणि त्यात महिन्याच्या वर काळ हा असाच गेला. आतलं सगळं नष्ट करून हा कॅमेरा समुद्रात फेकून दिलेला होता. भरपूर भरपूर शोधला तेव्हा कुठे मिळाला. समुद्रातून बाहेर काढला, त्याला सुरु केला, नष्ट केलेलं परत आणलं.” असं म्हणून तो त्या कॅमेऱ्यातले एकेक फोटो बघायला लागतो. व्हिडीओ सुरु करतो. सोनालीही तो कॅमेरा बघायला मागते. ती ही फोटो, व्हिडीओ सगळं बघते. व्हिडीओ बघत असताना म्हणते, “हा जबरदस्त पुरावा आहे. यात त्या मंत्र्याच्या मुलाचा चेहराही स्पष्ट दिसतोय. तुमच्या भावाला शिक्षा व्हायला नको होती. बरं पण तो साक्षीदार, त्याचं काय ?

विलास म्हणतो, “चीन सीमेवर एक खूप धोकादायक जागा आहे. तिथे नेऊन टाकलाय त्याला. मोठ्या लोकांची ही अशी अडचणीची लोकं तिथे आहेत. त्यांना घातक औषधं, नशिले पदार्थ देऊन त्यांना बेशुद्धावस्थेत ठेवलं जातं. तिथे इतर कोणी येऊन त्यांना सोडवू नये म्हणून तिथे सुरक्षा रक्षक तैनात आहेत. एकंदर अतिशय खतरनाक जागा आहे आणि बाहेरचं कोणी त्यांच्या हाताला लागलंच तर त्याची खैर नाही. अरुणाचल प्रदेशात ही जागा अशा ठिकाणी आहे, तिथे नैसर्गिकरीत्या चढण आणि उतार आहेत. खडकाळ भागही आहेत. एके ठिकाणी चढण आणि खडकाळ भाग असं दोन्ही आहे तिथे ही सुरक्षा थोडी कमी आहे, तिथे बाहेरून सहजपणे त्या भागात शिरता येतं. भौगोलिक दृष्ट्या जरा कठीण भाग असल्याने तिथे सुरक्षा बेताची आहे. तिथे छुपे भागही आहेत. खडकांच्या मागे सहज लपता येतं. त्या भागात जर आपला साक्षीदार असेल तर त्याला आपल्याला तिथून बाहेर आणता येईल.”

सोनाली म्हणते, “बापरे.... आणि तिथे तो नसेल तर ? आणि तो तर नशेत असेल मग त्याला बाहेर कसं आणणार ?” त्यावर विलास हसत म्हणतो, “मी आहे ना.... आणि तिथे अंशू नावाचा एक खेडूत आहे. तिथल्याच शेजारच्याच गावात राहतो. तो करेल मदत.” यावर सोनाली म्हणते, “तू कसा ठाम की तो आपल्याला मदत करेलच ?” यावर विलास म्हणतो, “तो त्या अड्ड्यावरच्या लोकांना सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. त्याची इतरही मदत होईल आपल्याला.”

यावर सोनाली म्हणते, “इंटरेस्टिंग.... थरारक आहे हे सगळं. मला हे असलं फार आवडतं.” विलास म्हणतो, “जंगलात फिरायला आवडतं ना.... तिकडे जंगलच जंगल” सोनाली “वॉव” करते आणि पुढे विचारते, “आता पुढे कसं आणि काय करायचं ?

विलास म्हणतो, “आता लवकरात लवकर अरुणाचल प्रदेश गाठायचा आणि त्यासाठी आधी विमानाचं एक तिकीट काढायचं” सोनाली विचारात पडते आणि म्हणते, “या सगळ्याला किती दिवस लागतील ? माझ्या आईचा, विवेकचा कोणाचा फोन येऊ शकतो. तेव्हा मी त्यांना काय उत्तर देऊ ?” विलास म्हणतो, “आपल्याला साधारण एक आठवडा लागेल असं धरून चल. आई, विवेक यांची काळजी तू करू नकोस. ते तुला फोन करणार नाहीत. जाण्यापूर्वी दोघांना किंवा अजून कोणी असेल तर त्यांना तूच फोन कर म्हणजे मग लगेच ते कोणी तुला फोन करणार नाहीत. विवेकला मी कामात गुंतवून ठेवतो, त्यामुळे तुला फोन करायचा आहे हे त्याच्या डोक्यातून जाईल आणि आईचं पण असंच काहीतरी करतो. तू घरची काळजी करू नकोस. तू आत्ता लगेच बघ विमान तिकीट कधीचं मिळत आहे ते.”

सोनाली लॅपटॉप उघडून विमान तिकीट कुठलं मिळत आहे हे बघायला लागते. दुसऱ्याच दिवशीचं तिकीट ती विलासला सांगून पक्कं करते. ती अर्थातच online तिकीट book करते आणि त्यामुळे तिच्या खात्यातून तेवढे पैसे वजाही होतात, घरच्या मुद्रकावर (प्रिंटर) ती त्याची एक प्रतही घेते. तिकीट काढून झाल्यावर ती तिच्या online खात्यावर जाते आणि online खात्याच्या खिडकीवर डोळे फाडून बघतच बसते. तिच्या खात्यात जेवढे पैसे असतात त्यातून या तिकिटाचे पैसे वजा होत उरलेली रक्कम खात्यावर दिसायला हवी होती पण तसं न घडता अजून ३०,००० रुपये जमा झालेले तिला दिसतात. हा तिला बसलेला एक छोटासा झटका असतो. ती काही विचारायच्या आत विलास तिला म्हणतो, “आता यापुढे विकासला सोडवण्यास जो काही पैसा खर्च होईल त्यात एक रुपयाही तुला खर्च करावा लागणार नाही. प्रवासात किंवा कुठेही तुझा जो काही खर्च असेल तो ही तुला करावा लागणार नाही. त्यासाठीच ३०,००० रुपये आगाऊच तुझ्या खात्यावर मी टाकून ठेवलेले आहेत. पुढे अजून लागले तर अजून टाकीन. हे तुला अर्थातच तुझ्या बँक statement मध्ये दिसणार नाहीत पण ते तुझ्याकडे असतील हे नक्की.”

सोनाली अगदी बधीर होत त्याचं हे सगळं बोलणं ऐकत असते आणि मग विचारते, “परत कसं यायचं ? त्याला घेऊन यायचं असेल ना... कसं आणायचं त्याला इकडे ? विमान की रेल्वे ? आणि ओळखपत्र लागेल त्याचं. नाहीतर त्याला इकडे आणता येणार नाही.” विलास म्हणतो, “रेल्वेने वेळ लागेल. विमानानेच आणावं लागेल. त्याची खोली आहे तिकडे फोर्टमध्ये, तिकडे त्याचं काही ओळखपत्र मिळत आहे का हे बघतो मी, काहीतरी मिळेल त्याच्या घरात. आणि परतीचं आपण नंतर ठरवू, त्याची एकंदर अवस्था बघून.” असं म्हणून विलास तिथून गायब होतो.

सोनाली रात्री जाण्याची तयारी करते. तिच्या मनात एकाच वेळी एक प्रकारचा उत्साह कारण काहीतरी थरारक अनुभवायला मिळणार आणि त्याच वेळी एक अनामिक भीती असते कारण शेवटी हे सगळं एका अशा माणसाच्या जिवावर, ज्याचं या जगात अस्तित्वच नाही. या जगासाठी हा माणूस कधीचाच मेलेला आहे. सोनाली धीराची त्यामुळे ती आपल्या आजूबाजूला असणाऱ्या या भुताच्या वावराला कोणालाही कल्पना न देता तोंड देऊ शकत असते. आई किंवा घरचे कोणीही, विवेक यांना ती याबद्दल काहीही सांगत नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी ती विमानतळावर जाण्यासाठी निघते. टॅक्सीत बसल्यापासूनच विलास तिच्याबरोबरच असतो. चालकाच्या शेजारच्या आसनावर जगासाठी अदृश्य आणि सोनालीसाठी दृश्य रुपात असणारा विलास बसतो आणि मागच्या आसनावर सोनाली, असा घर ते विमानतळ प्रवास झाल्यावर दोघेही टॅक्सीतून उतरतात आणि आत जाऊ लागतात. आत जात असताना विलास सोनालीला सांगतो की, “कुठलीही प्रतिक्रिया न देता ऐक, त्या साक्षीदाराचं नाव संतोष आहे. त्याचं आधार कार्ड आणि वाहन परवाना मिळालेला आहे, त्यामुळे त्याला परत आणताना त्रास होणार नाही.” सोनाली काहीच न बोलता आपलं सामान ट्रॉलीवर टाकून सगळ्या औपचारिकता पूर्ण करायला सुरुवात करते. आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे याचा विचार करणं आता एव्हाना तिने सोडून दिलेलं असल्याने तिला कशाचंच काही वाटत नाही. तिच्याबरोबर विलास चालत असतो पण ती त्याच्याकडे वळूनही बघत नाही. सोनाली सगळे सोपस्कार पूर्ण करून विमानाच्या दिशेने जाण्यासाठी वाट बघत असणाऱ्या लोकांमध्ये जाऊन बसते. तेवढ्यात एक बाळ जोरजोरात रडायला लागतं. आता कधीही इथून उठून विमानाच्या दिशेने जावं लागेल आणि त्यातच हे रडायला लागलं त्यामुळे त्याची आई बेचैन होते. ती खूप प्रयत्न करते त्याचं रडणं थांबवायचा पण त्याचं रडणं काही थांबत नाही. पण अचानक काहीतरी घडतं आणि बाळाचं रडणं एकदम थांबतं, ते खिदळायला लागतं. अचानक असं काय झालं या विचाराने सोनाली त्या बाळाच्या दिशेने बघते तर विलासने त्या बाळाला शांत केलेलं असतं आणि बाळ विलासकडे बघून हसत खिदळत असतं. सोनालीला ते बघून खूप मजा वाटते आणि इतका वेळ मख्खासारखी बसलेली सोनाली मंदपणे हसायला लागते.

विमानात शिरल्यावर सोनाली आपल्या आसनावर बसते. तिचं आसन खिडकीच्या जवळच असतं. तिथेच एका वयस्क बाईंना वर सामान ठेवण्याच्या जागेत काहीतरी ठेवायचं असतं पण त्यांचा तिथपर्यंत हात पोहोचत नसतो. हवाई सुंदरीही तिथे आसपास नसते. पण अचानक त्या वृद्धेचा हात वरच्या कप्प्यापर्यंत पोहोचतो. त्या बाईंना काही पटकन समजतच नाही की आपण थोडे वर कसे काय उचलले गेलो ! अतिशय गोंधळलेल्या मनःस्थितीत ती खाली जागेवर बसते पण ते दृश्य पाहून सोनाली मात्र हसायला लागते कारण तिथली विलासची उपस्थिती तिला दिसलेली असते.

हवाई सुंदरी येते आणि विमान उडण्यापूर्वी जरुरी असलेल्या सूचना प्रवाश्यांना द्यायला लागते; त्याच वेळी विलास गायब होतो. मग विमान आकाशात भरारी घेतं, प्रवास सुरु होतो पण विलास कुठे दिसत नाही. सोनाली इकडे तिकडे खूप बघते पण तो काही तिला दिसत नाही आणि अचानक तिचं लक्ष खिडकीतून बाहेर जातं. तिच्या खिडकीतून विमानाचे पंख दिसत असतात आणि विलास त्या पंखांवर बसलेला असतो. त्याला पाहून सोनाली एकदम दचकते. तिचं हे दचकणं तिच्या शेजारी बसलेल्या माणसाच्या लक्षात येतं आणि तो तिला विचारतो, “सगळं ठीक ना ? काही प्रॉब्लेम ?” त्यावर “नाही नाही” म्हणत सोनाली वेळ मारून नेते. जरा वेळाने सोनालीला झोप लागते. थोड्या वेळाने ती झोपेतच थोडीशी जागी होते तिचं डोकं खिडकीच्या दिशेला असतं. तिचं लक्ष त्या खिडकीतून बाहेर जातं तर तिला बाहेर विलासचा फक्त चेहरा दिसत असतो. ती अर्धवट झोपेत असल्याने त्याचा तो फक्त चेहरा बघून ती पटकन दचकते, यावेळचं तिचं दचकणं थोडं जोरात असतं. त्या शेजारच्या माणसाचं परत तिच्याकडे लक्ष जातं आणि तो परत विचारतो, “खरंच काही त्रास नाही ना ?” सोनाली परत वेळ मारून नेत म्हणते, “झोपेत होते, काहीतरी स्वप्न पडलं. त्रास काहीच नाही.” आता मात्र सोनाली पूर्ण जागी होते आणि सजग राहून बसून राहते.

विमान इप्सित स्थळी पोहोचतं. तिथून मजल दरमजल करत सोनाली त्या अंशूच्या गावात येते. गाव खूप सुरेख असतं. जणू हिरव्या गालिच्यावर सजवलेलं. बाकी निसर्गही मोहक. सोनाली म्हणते, “मी इथे परत एकदा येणार...” विलास यावर काहीच बोलत नाही. म्हणता म्हणता अंशूचं घरही येतं. अगदी तिथल्या गावात शोभेल असं घर. घराचा दरवाजा बंद असतो. सोनाली दार ठोठावते. एक बाई येऊन दरवाजा उघडते. दरवाजा उघडताच सोनाली विचारते, “अंशू... अंशू आहे ?” ती बाई सोनालीला बघते आणि तिच्या लक्षात येतं की ही मुलगी इथली नाही. ती म्हणते, “नाही ते बाहेर गेले आहेत. तुम्ही ?” “मी सोनाली. मुंबईहून आले आहे. त्यांच्याकडे एक खूप महत्वाचं काम होतं. खरं तर त्यांची मदत हवी होती.”, सोनाली तिला सांगते. मुंबईहून आली आहे म्हटल्यावर ती बाई तिला तिथेच बाहेर पडवीत असलेल्या बसायच्या जागी बसायला सांगते आणि म्हणते, “तुम्ही बसा. लांबचा प्रवास करून आला आहात. ते येतीलच.” असं म्हणत ती आत जाते. सोनाली आपलं सामान ठेवते आणि तिथे बसते. बसल्या बसल्या तिचं लक्ष बाहेरच्या छान निसर्गाकडेच असतं. तेवढ्यात एक छोटी मुलगी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन येते आणि तिच्यासमोर ते भांड धरते. सोनाली “अं...” करायला लागते तितक्यात तिथूनच विलास तिला “घे की” अशी खूण करतो. सोनाली पाणी घेते आणि त्या पडवीत फिरत बाहेर इकडे तिकडे बघायला लागते. थोड्या वेळात परत तीच मुलगी हातात काहीतरी घेऊन येते. ते काय आहे ते सोनालीच्या लक्षात येत नाही म्हणून सोनाली तिला विचारते, “हे काय आहे ?” ती मुलगी म्हणते, “चहा”. गडद तपकिरी रंगाचं पाणी म्हणजे तो चहा बघून सोनाली तो घेऊ की नको असा विचार करायला लागते. तेवढ्यात तिथे विलास येतो आणि त्या चहाला सोनालीला आवडेल असा चहा बनवतो. त्या छोट्या मुलीला हे समजत नाही पण सोनालीला मात्र तो बदललेला चहा दिसतो. सोनाली हसत तो चहा घेते. त्या मुलीने बिस्किटे आणलेली असतात, ती ही घेते. चहाचा एक घोट घेतल्यावर सोनाली विलासला म्हणते, “चहा छान झालाय विलास...” विलास म्हणतो, “चहा तर तोच आहे मी फक्त त्यात थोडं दूध घातलं आणि इथले मसाले जे त्यात घातले होते, त्यांची तीव्रता कमी केली.”

सोनालीला येऊन तीन तास होऊन जातात पण अंशू काही येत नाही. हे बघून सोनाली त्या मगाचच्या बाईला विचारते, “अजून नाही आले ?” ती बाई त्या अंशूची बायको असते. ती अंशूची पत्नी म्हणते, “ते शेजारच्या शहरात गेले आहेत. येतील.” तीनचे पाच तास होतात आणि नंतर अंशू येतो. घरी आल्या आल्या पडवीत बसलेली सोनाली त्याला दिसते. बायको लगेच बाहेर येते आणि त्यांच्या भाषेत सोनालीबद्दल त्याला सांगते. पुढे सोनालीच त्याला सांगू लागते, “मी सोनाली. मुंबईहून आले आहे. आमचे एक ओळखीचे आहेत, त्यांना एका खोट्या हत्येच्या खटल्यात अडकवलं आहे आणि त्या घटनेच्या प्रमुख साक्षीदाराला इथे चीन सीमेवरच्या अड्ड्यात आणून टाकलं आहे. त्याला मला तिथून सोडवायचं आहे. त्यासाठी तुमची मदत हवी आहे. कराल प्लीज...?

अंशू म्हणतो, “तुमची नक्की खात्री आहे की तो इथल्या त्या अड्ड्यावर आहे ? म्हणजे तुम्हाला मिळालेली माहिती खात्रीची आहे ना ?” सोनाली म्हणते, “हो...” अंशू म्हणतो, “अच्छा... तो अड्डा फारच खतरनाक आहे. तिथे आत शिरणं कठीण. आपल्याला हवा असलेला तो माणूस जर त्या अड्ड्याच्या बाहेरच्या बाजूला असेल तर काहीतरी आशा आहे. तिथे उंच सखल भाग आहे. तिथे जर तो असेल तर आपल्याला त्याला बाहेर काढणं कठीण नाही. तिथल्या लोकांना कायम अमली पदार्थ देत देत त्याच नशेत ठेवलं जातं. त्यांना आपण काय करतोय कुठे जातोय याचं भान नसतं त्यामुळे ते जे कोणी आपल्याला हवे आहेत ते त्या अड्ड्यात कुठेही असू शकतात. ठीक आहे आपण जाऊ. इथल्या जंगलात काही वनस्पती आढळतात त्याचं एक शस्त्र बनवतो आम्ही. एक छोटी बंदूक पण त्यात त्या वनस्पतीच्या अर्कापासून बनवलेला रस भरला जातो. चाप ओढला की तो रस त्या समोरच्या माणसाच्या अंगात जातो आणि तो माणूस लगेच बेशुद्ध होतो. आपण त्याला किती सौम्य किंवा तीव्र बनवतो त्यावर त्या माणसाची बेशुद्धीत राहण्याची वेळ ठरते, अर्धा तास ते चार पाच तास...” हे सगळं ऐकून सोनाली चकित होते आणि तसे भाव आपल्या चेहऱ्यावर दाखवते. अंशू पुढे म्हणतो, “इथली अजून काही स्थानिक हत्यारंही आपल्याला बरोबर नेता येतील. पण उद्या आपल्याला जाता येणार नाही. उद्या इथे कुठलातरी राजकीय कार्यक्रम आहे तेव्हा इथली सुरक्षा व्यवस्था उद्या कडक असेल. आपण परवा जाऊ. अगदी पहाटे, उजाडायच्या आत. त्यावेळी तिथली सुरक्षा व्यवस्था एवढी कडक नसते. ते रक्षक म्हणजे थोडक्यात गुंडच ते थोडे झोपाळलेले असतात.” सोनालीच्या सामानाकडे बघून तिथल्याच एका घराकडे बोट दाखवत अंशू म्हणतो, “तुम्ही तिथे राहू शकता. आमचीच आहे ती जागा आणि कोणाला गरज असेल तर तिथे आम्ही त्यांना उतरवतो. परवा लवकर निघावं लागेल तेव्हा तुम्ही तिथेच राहिलेलं बरं. उद्या इथे आजूबाजूला फिरा हवं तर. परवा जाऊ तिकडे.” यावर सोनाली “ठीक आहे” म्हणते. तेवढ्यात अंशू अजून बोलायला लागतो, “तिथे असणारी लोकं चांगल्या स्थितीत नसतात. त्यामुळे नंतर एक दोन दिवस तरी तुम्हाला इथेच रहावं लागेल, त्याची स्थिती सुधारल्यावर मग त्याला तुम्ही परत मुंबईला नेऊ शकाल.” ही अशी सगळी माहिती अंशू सोनालीला देतो आणि तिथलाच एक किल्लीचा जुडगा घेत शेजारचं घर उघडून सोनालीला तिथे मुक्काम करायला सांगतो.

सोनाली आत त्या घरात जाते, तिथेच असलेल्या खुर्चीवर बसते आणि काहीतरी विचार करायला लागते. ती धीट असते पण तरीही मनातून थोडी घाबरलेली असते. आपल्याला या सगळ्यात ओढलं गेलंय आणि ते ही बळजबरीने, हे असे विचार तिच्या मनात यायला लागतात आणि एकेक करत तिला सगळे हे विचित्र घटनाक्रम आठवायला लागतात. आपण या जगासाठी अस्तित्वात नसलेल्या एका माणसाला मदत करण्यासाठी इतक्या लांब आलो आहोत आणि ती ही खूप मोठी जोखीम पत्करून. काय चाललंय आपल्या आयुष्यात आणि का ? अशा बऱ्याच विचारांच्या कोलाहलात असतानाच विलास तिथे येतो आणि तिला म्हणतो, “नको एवढा विचार करू. तुला काहीही होणार नाही. आपण एक थरारक अनुभव घेत आहोत असा विचार कर.” सोनाली हे ऐकते पण त्यावर काहीच बोलत नाही. विलासही तिथून निघून जातो. सोनाली बराच वेळ तिथे बसून राहते.

दुसऱ्या दिवशी सोनाली त्या गावात बरीच हिंडते. तिथलं जंगल, तिथला निसर्ग सगळं मस्त फिरते. दुसऱ्या दिवशी पहाटे पावणेचार चारला त्या अड्ड्यावर जाण्यासाठी निघायचं ठरलेलं असतं. संध्याकाळ सरून रात्र होत आलेली असते आणि सोनाली त्या घराच्याच बाहेर पडवीत उभी असते आणि तितक्यात तिला कोणा लहान मुलीचा रडण्याचा आवाज येतो. त्या आवाजाच्या दिशेने ती जाते तर एक छोटी मुलगी पाठमोरी उभी असते आणि जोरजोरात रडत असते. सोनाली बघते पण तिच्याकडे दुर्लक्ष करते आणि आत घरात येऊन बसते. लगेचच रडण्याचा आवाज बंद होतो पण थोड्या वेळाने परत तसाच रडण्याचा आवाज यायला लागतो. बराच वेळ आवाज येत आहे हे बघून सोनाली बाहेर येते तर तीच मुलगी तिथेच उभी राहून रडत असते. सोनाली त्या मुलीच्या दिशेने जात तिच्या मागे जाऊन उभी राहते. कोणाच्या बरोबर ती आली आहे का हे बघावं म्हणून सोनाली आजूबाजूला नजर टाकते तर तिथे कोणीच नसतं. मग शेवटी सोनालीच त्या मुलीच्या पाठीमागून तिला विचारते, “अगं काय झालं, एवढी का रडत आहेस ?” ती मुलगी काहीच उत्तर देत नाही. सोनाली परत एकदा विचारते पण समोरून काहीही उत्तर नाही आणि रडणंही तसंच चालू म्हणून मग शेवटी सोनाली त्या लहान मुलीच्या खांद्यावर हात ठेवत तिला विचारते, “काय झालं...का रडत आहेस ?” सोनालीचं हे वाक्य बोलून संपतं आणि तिचं रडणं थांबतं. आणि तेवढ्यात ती मुलगी अचानक जोरात मान फिरवते.

तिचा चेहरा बघून सोनाली जोरात ओरडते. त्या मुलीचा चेहरा उलटा असतो म्हणजे कपाळ, डोळे हे सगळं खाली आणि हनुवटी, ओठ हे वरती. सोनाली तो चेहरा बघत बघतच एकेक पाऊल मागे यायला लागते. ती मुलगी रडण्याचे आवाज काढत एकेक पाऊल पुढे टाकत सोनालीकडे येत असते आणि सोनाली एकेक पाऊल मागे जात असते. तेवढ्यात ती मुलगी गायब होते आणि रडण्याचा आवाज मागून यायला लागतो. सोनाली मागे वळून बघणार तितक्यात ती कोणाला तरी धडकते. मागे तीच मुलगी असते, सोनाली वळून तिच्याकडे बघते तर अचानक रडणारी मुलगी हसायला लागते आणि तेवढ्यात सर्रकन ती मुलगी आपल्या चेहऱ्याची दिशा बदलते. आता तिचा चेहरा सरळ होतो. जे मगाशी कपाळ डोळे वगैरे खाली असतात ते वर येतात आणि ओठ, हनुवटी खाली जातात. चेहरा नेहमीसारखा होतो आणि आता ती जोरजोरात हसायला लागते. तिचा चेहरा बघू सोनालीच्या हे लक्षात येतं की ही मुलगी त्या अंशूची मुलगी आहे. पण ही अशी कशी हा विचार ती करतच असते तोपर्यंत तिला तिथेच एक बाई उभी असलेली दिसते. केस बांधलेली ती बाई अरुणाचली पेहरावात उभी असते. तिचे डोळे कोरडे असतात, एकदम निष्प्राण आणि ती अगदी स्तब्ध उभी असते, जणू एखादी मृत बाई उभी असावी अशी. सोनाली तिच्याकडे निरखून बघायला लागते तशी ती तिच्या तोंडातले सुळे बाहेर काढत तिच्याकडे बघून हसते. ते सुळे बघून सोनाली खूप घाबरते पण तेवढ्यात तिला शंका येते की ही बाई तर अंशूची बायको आहे. याची खात्री करण्यासाठी सोनाली त्या बाईच्या जवळ जायला लागते. ती नीट तिच्याकडे बघते आणि तिची खात्री पटते की ही अंशूचीच बायको आणि तेवढ्यात ती हडळ तिच्या मृतप्राय डोळ्यांतून पाण्याचे दोन फवारे सोनालीच्या दिशेने टाकते. त्यातलं थोडं पाणी सोनालीच्या पायावर उडतं. ते पाणी भयंकर गरम असतं आणि त्या पाण्याचा सोनालीच्या पायांना चटका बसतो. सोनाली पटकन पाय बाजूला करते आणि हळूहळू मागे मागे जाऊ लागते. ती हडळही सोनालीच्या दिशेने पुढे पुढे येत अजून दोन फवारे सोनालीच्या दिशेने टाकते. यावेळी त्या फवाऱ्यांचं पाणी बर्फासारखं थंडगार असतं.

सोनाली खूप घाबरते. तिच्या लक्षात येतं की आपण इथे कुठल्यातरी जाळ्यात अडकलो आहोत. अंशूची बायको, मुलगी या आपल्यासमोर हडळीच्या रुपात आहेत. याचा अर्थ इथे काहीतरी भयंकर गडबड आहे. आपल्याला इथेही एका भूतानेच आणलं आहे, आपण त्याच्या जाळ्यात पुरते अडकलो आहोत आणि ते ही मुंबईपासून इतकं दूर. काय माहीत आपण कुठे आहोत ते, विलासच्या कुठल्या मायावी दुनियेतही आपण असू शकतो. या दोघी दिसल्या, आता अंशूही दिसणार आणि कदाचित वरून कुठूनतरी विलास पण दिसेल. आपलं आता काही खरं नाही. हा विचार तिच्या डोक्यात येतो आणि तेवढ्यात तिला समोर कोणीतरी उभं असल्याचं दिसतं. कोणी पुरुष सोनालीकडे पाठ करून उभा असतो. सोनाली अशा ठिकाणी असते जिथे दोन रस्ते गर्द झाडीत जात असतात, एक रस्ता त्या दोन हडळींकडे आणि चौथा त्या माणसाच्या दिशेला. सोनालीकडे पळण्यासाठी कुठलाच रस्ता शिल्लक नसतो. सोनाली त्या पुरुषाच्या दिशेने हळूहळू जायला लागते. तिचं हृदय प्रचंड धडधडत असतं. पुढे जात जात सोनाली त्या माणसाच्या अगदी जवळ येते आणि तिथेच थांबते. तसा तो माणूस सोनालीकडे बघण्यासाठी एकदम मान फिरवतो. सोनाली त्याला बघते आणि तिच्या अंगातली शक्तीच गेल्यासारखी होते. त्या माणसाला एकच डोळा असतो आणि तो उघडझाप होणारा नाही तर संपूर्ण उघडा असतो. तो डोळा एकटक सोनालीकडे बघत असतो आणि सोनाली त्या डोळ्याकडे. तेवढ्यात त्या डोळ्यातून तो हिरवं पाणी खाली जमिनीवर टाकतो. ईईई... करत सोनाली तिथून पटकन बाजूला होते. तेवढ्यात ती छोटी मुलगी रडायला लागते आणि ती हडळ डोळ्यांतून फवारे बाहेर टाकायला सुरुवात करते. हे तिघेही हे प्रकार एकदमच करायला लागतात. तेवढ्यात तो माणूस सोनालीच्या जवळ येतो. तो त्याच्या डोळ्यातून हिरवं पाणी सोनालीच्या अंगावर टाकणार, तितक्यात सोनाली “नाही....” करत ओरडायला लागते.

तशीच खाडकन सोनाली उठते. तिच्या अंगावर पांघरूण असतं. त्या गावात चांगलाच गारवा असताना तिला मात्र दरदरून घाम फुटलेला असतो. तिचं हृदय प्रचंड वेगाने धडधडत असतं. तिचा श्वासोच्छवास तिलाच जोरजोरात ऐकू येत असतो. ती तिच्या जवळचा मोबईल हातात घेते आणि बघते तर रात्रीचा दीड वाजलेला असतो. सोनाली मोबईलची दिवटी (torch) चालू करते आणि त्या खोलीचा दिवा लावते. इतकं भयंकर स्वप्न बघितल्याने सोनाली खूप घाबरलेली असते. आपण एका भुताच्या भरवश्यावर इथे आलो आहोत. विलासचे मायावी खेळ तिने या आधीही अनुभवलेले असतात आणि त्यामुळे ती जास्तच घाबरलेली असते. अंशूचं घर एकदा बघावं म्हणून ती खिडकी थोडीशी उघडून अंशूच्या घराकडे बघते, बाकी परिसर बघते. बाहेर सगळं नेहमीसारखंच असतं. पण सोनाली मात्र फार घाबरलेली असते. सोनालीच्या डोक्यात विचारांनी थैमान घातलेलं असतं. “हे सगळं मायावी असेल तर ?” हा एक विचार तिला पूर्णपणे भंडावून सोडतो आणि ती काहीतरी मनाशी ठरवते.

आपल्या सामानाची ती बांधाबांध करते आणि ठरवते की इथून निघायचं. इतक्या रात्री ? तर हो जसं जमेल तसं इथून बाहेर जायचं आणि लवकरात लवकर घर गाठायचं. तशी दरवाजा उघडून ती बाहेर येते तर समोर विलास असतो. ती सामान घेऊन जाताना बघून तिला विचारतो, “कुठे ? परत मुंबईला ?” “मी आता इथे थांबणार नाही”, सोनाली उत्तर देते. विलास म्हणतो, “तुझ्याकडे पर्याय आहे ? नीट विचार करून बघ” सोनाली म्हणते, “तू मायावी खेळ्या खेळतोस. हे सगळं मायावी कशावरून नाही ? तो अंशू, त्याचं घर, त्याचं कुटुंब, तो साक्षीदार आणि अगदी तुझ्या भावाची कहाणीही हे सगळं खरं कशावरून ? नाही मला इथे रहायचंच नाहीये.” विलास म्हणतो, “मायावी ? काहीही काय आणि तुझ्याकडे माझं ऐकण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. तेव्हा आत जा आणि झोप. चार वाजता निघायचं आहे. सोनाली आत जाते. रात्रीचे तीन वाजलेले असतात. सोनाली झोपत नाही, त्या स्वप्नानंतर तिला झोपच लागत नाही.

साडेतीन वाजताच सोनाली अड्ड्यावर जाण्यासाठी तयार होऊन बसते. बरोबर पावणेचार वाजता त्या घराच्या दारावर थाप पडते. सोनाली जागीच असते. ती हळूच दरवाजा उघडते. समोर अंशूची बायको असते. तिला बघताच सोनालीला स्वप्नातली मृत डोळ्यांची ती अंशूची हडळ बायको आठवते. सोनाली त्या बायकोकडे बघतच बसते. तेवढ्यात ती बायको विचारते, “उठलात ना ?” “अं...” करत सोनाली थाऱ्यावर येते आणि तिला म्हणते, “हो... मी तयार आहे.” अंशूची बायको चहा आणि बिस्किटे घेऊन आलेली असते. ते ती बाहेर पडवीतच सोनालीला देते आणि म्हणते, “हा तुमच्यासारखा चहा आहे. तुम्ही आमच्यासारखा चहा पीत नसाल ना. चहा-बिस्कीट घ्या.” एवढं बोलून ती निघून जाते. सोनाली भीत भीतच चहाचा कप हातात घेते. चहा प्यावा की न प्यावा हे सांगायला कुठे विलास दिसत आहे का हे बघण्यासाठी ती सगळीकडे नजर फिरवते पण विलास कुठेच नसतो. भीत भीतच ती तो चहाचा कप तोंडाला लावते. चहा खूप छान असतो. सोनालीला फार आवडतो. तिचं चहा बिस्कीट खाऊन होतं आणि तितक्यात तिथे अंशू व त्याची बायको दोघे येतात. त्यांच्या हातात काही गोष्टी किंवा साधनं असतात.

बेशुद्ध करणारी बंदूक, छोटा तिकडचा सुरा अशा काही गोष्टी स्वतःच्या संरक्षणासाठी आणि वेळ पडल्यास वार करण्यासाठी त्यांनी आणलेल्या असतात. त्या सगळ्या गोष्टी सोनाली घेते आणि लगेचच अंशू व सोनाली अंशूच्या जीपमधून निघतात. अंशूचा अजून एक साथीदार पुढे अड्ड्यापाशी त्यांना येऊन मिळणार असतो. सोनाली मागे आणि अंशू पुढे असे जीपमधून निघतात, तेवढ्यात विलास येतो आणि अंशूच्या शेजारच्या आसनावर बसतो. विलास सोनालीकडे मागे वळून बघतही नाही. संपूर्ण अंधार आणि जवळजवळ जंगलातून जात ते दोघे विलाससह अड्ड्याजवळ जाऊन पोहोचतात. त्यांचा साथीदार आधीपासूनच तिथे पोहोचलेला असतो. अड्ड्याच्या त्या खडकाळ भागाजवळ हे सगळे येतात आणि एका मोठ्या खडकाच्या मागे दबा धरून बसतात. तिथे एकच सुरक्षा रक्षक असतो आणि तो ही पेंगुळलेल्या स्थितीत असल्याचा यांना दिसतो. अंशू आणि साथीदार दब्या पावलांनी आत अड्ड्यात शिरतात. हळूहळू तिथल्या कैदी लोकांना एकेक करत बघायला लागतात पण संतोष काही कुठे दिसत नाही. एका टप्प्याच्या पुढे आत अड्ड्यात शिरणं त्यांच्यासाठी धोकादायक असल्याने ते दोघे मधूनच परत येतात आणि पुढे काय करावं याची चर्चा करू लागतात.

तिथे वाट बघत थोडा वेळ थांबणे याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसल्याचं त्यांच्या लक्षात येतं कारण ही लोकं अतिशय खतरनाक आणि त्यांना हे तिघे नक्कीच पुरेसे पडू शकणार नाहीत. बराच वेळ होतो. आता झुंजूमुंजू होणार आणि उजाडायला लागणार आणि त्यानंतर त्यांना तिथे थांबणं शक्य होणार नाही. यांना बहुतेक हात हलवतच तिथून जावं लागणार असंच दिसायला लागतं. काय करावं निघावं का अशी कुजबुज त्यांची सुरु होते आणि इकडे विलासचा जीव वरखाली व्हायला लागतो. तो सोनालीला म्हणतो, “५-७ मिनिटं थांबायला सांग त्यांना मी त्या संतोषला इकडे घेऊन येतो.” हे ऐकून सोनाली म्हणते, “आपण एक पाच मिनिटं वाट बघुयात ना...” “ठीक आहे...” करत ते सगळे तिथेच थांबतात. विलास आत जातो. संतोषला शोध शोध शोधतो पण तो काही कुठे दिसत नाही. शेवटी एके ठिकाणी संपूर्ण बेशुद्धावस्थेत पडलेला संतोष त्याला दिसतो. त्याला नुकताच नशेच्या पदार्थांचा एक डोस दिलेला असतो त्यामुळे त्याची अवस्था भयंकर बिकट झालेली असते. विलास त्याला उठून उभं करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला ते ही शक्य नसतं. विलास खूप प्रयत्न करतो पण सगळे प्रयत्न व्यर्थ. शेवटी विलास त्याला उचलतो आणि सोनाली, अंशू हे सगळे थांबलेले असतात तिथे नेऊन टाकतो. या सगळ्यांच्या पुढ्यात त्या संतोषला टाकलेलं असतं पण या लोकांचं तिकडे लक्षही नसतं. शेवटी विलास सोनालीला हाक मारतो आणि संतोष त्यांच्यासमोरच असल्याचं तिला दाखवतो.

सोनालीला पटकन काहीच समजत नाही आणि अचानक काहीतरी गवसल्याचा आभास होऊन सोनाली त्या दोघांना म्हणते, “अरे... हा बघा संतोष” ते दोघे चक्रावून जातात. आपण आत जाऊन बघून आलो. इतका वेळ इथेच आहोत, हा कुठे दिसला नाही आणि हा असा अचानक कुठून आला. अंशूचा साथीदार म्हणतो, “हा अचानक इथे कसा आणि कुठून आला, जादू वगैरे झाली की काय !” अंशू म्हणतो, “कसा काय जाऊदेत, मिळाला ना. त्याला पटकन उचलुयात आणि इथून लवकरात लवकर सटकू”. नशेच्या औषधांनी आणि एकंदर हाल अपेष्टांनी संतोष खूप बारीक झालेला असतो त्यामुळे त्या दोघांना सहजपणे त्याला उचलता येतं. संतोषला दोघे गाडीत घालतात आणि गाडी सुसाट वेगाने त्या अड्ड्यापासून दूर नेतात.

मध्येच एके ठिकाणी गाडी थांबवत अंशू आणि त्याचा मित्र अरुणाचली भाषेत काहीतरी चर्चा करतात. सोनाली नुसती त्या दोघांकडे बघत असते. पाचेक मिनिटांनी अंशू सोनालीला म्हणतो, “याला थोडं तरी ठीक व्हायला चार दिवस आरामात लागतील. इथून मुंबईपर्यंतचा प्रवास करणं याला जमलं तर पाहिजे ! अवस्था काही याची चांगली नाही. इथल्या जंगलात काही वनस्पती आहेत, त्यांच्यापासून आम्ही औषधं बनवतो. या औषधांनी खूप वेगाने तब्येत सुधारते. या वनस्पतींचे उपचार याच्यावर आपण करू. पण यासाठी त्याला या माझ्या मित्राकडे न्यावं लागेल. तो यात अगदी तरबेज आहे. स्वतः वैद्य आहे. आत्ता संतोषला याच्याकडे सोडू आणि मग आपण घरी जाऊ. चालेल ?

सोनाली विलासकडे बघते. विलास होकारार्थी मान हलवतो. मग सोनालीही अंशूला “ठीक आहे..” असं उत्तर देते. त्यानंतर जीप त्या मित्राच्या घराकडे वळवली जाते. घराच्या जवळच या मित्राचा छोटा दवाखाना असतो. तिथे संतोषला नेतात आणि त्याला तिथेच ठेवून अंशू व सोनाली अंशूच्या घरी परत येतात. तीन दिवस असेच जातात आणि चौथ्या दिवशी संध्याकाळी अंशू सोनालीला म्हणतो की “संतोष आता बराच बरा आहे. तो बोलू शकत आहे, चालू फिरू शकत आहे. तुम्ही आज त्याला भेटायला चला. उद्या तुम्हाला इथून परत मुंबईला जाता येईल. तुम्हाला परतीची तिकिटं आता काढायला हरकत नाही.

सोनाली संध्याकाळी संतोषला भेटायला जाते. संतोषला काय घडत आहे काहीच समजत नसतं. आपल्याला कोणी आणि का बरं केलं, असे कितीतरी प्रश्न त्याच्या मनात असतात. सोनाली दिसताच संतोष सोनालीला विचारतो, “तुम्ही मला बरं केलंत ? का ? आणि तुम्ही कोण ?

सोनाली त्याचा कॅमेरा बरोबर घेऊन आलेली असते. तो कॅमेरा आणि त्यातले ते व्हिडीओ, फोटो त्याला दाखवत सोनाली म्हणते की हा माणूस हत्येच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे. खरं तर तो निर्दोष आहे. मला त्याला सोडवायचं आहे आणि त्यासाठी तुमची मला यात मदत हवी आहे.”

तो कॅमेरा, ते फोटो, व्हिडीओ बघून संतोष गंभीर होतो आणि सांगायला लागतो, “हो हा माणूस निर्दोषच आहे. माझ्यासमोर हे सगळं घडलं. तेव्हा ही लोकं निघून गेली पण दुसऱ्या दिवशी या लोकांनी मला गाठलंच. त्यांना हे कसं कळलं की मी हे सगळं पाहिलं आहे हे मला माहीत नाही पण नंतर या लोकांनी मला उचलून इथे टाकलं आणि नंतर माझी जी काही अवस्था झालीय....” असं म्हणत संतोष रडायला लागतो. सोनाली त्याला शांत करते आणि उद्या आपण इथून निघायचं आहे असं सांगत त्याचा निरोप घेते.

दुसऱ्या दिवशी अंशू आणि त्याचं कुटुंब, त्याचा मित्र या सगळ्यांचा निरोप घेत सोनाली आणि संतोष निघतात. रस्त्यातच विलास तिला म्हणतो की मुंबईला गेल्यावर थेट हेमंत वकिलांकडे जाऊ, विकासचा खटला तेच लढवत होते. त्यांनी फार प्रयत्न केले विकासला सोडवायचे पण... त्यांच्याकडे या संतोषला घेऊन जाऊ आणि याला त्यांच्या स्वाधीन केलं की मग  तुझं काम संपलं. सोनाली म्हणते, “ते ठेऊन घेतील ? आणि ते मला १०० प्रश्न विचारतील की तुला कसं कळलं की हा तिकडे आहे, तू हे सगळं एकटीने कसं केलंस, वगैरे... काय सांगू विलासच्या भूताने हे सगळं करवून घेतलं ?” यावर विलास काहीच बोलत नाही पण दोन मिनिटांनी म्हणतो, “हो सांग असंच.... कारण ते हे सगळे प्रश्न विचारणारच. ते आमचे फॅमिली फ्रेंड, त्यामुळे या खटल्यात त्यांचे भावनिक बंधही आहेत. माझ्याबद्दल त्यांना सरळ सगळं सांगून टाक.”

ठरल्याप्रमाणे मुंबईला पोहोचल्यावर सोनाली संतोषला घेऊन हेमंत वकिलांकडे जाते. संतोष हा मुख्य साक्षीदार, फोटो, व्हिडीओ हे पुरावे हे सगळं ते वकील बघतात आणि हे सगळं तुम्हाला कसं कळलं अशा आशयाचे बरेच प्रश्न ते सोनालीला विचारतात. ठरल्याप्रमाणे सोनाली विलासबद्दल त्यांना सांगते आणि कसं त्याने हे सगळं करवून घेतलं हे ही सांगते. ते हळवे होतात आणि तिला म्हणतात की “तू धीट आहेस, तुझं विशेष कौतुक.” आणि पुढे विचारतात, “विलास आत्ता इथे आहे ?” विलास तिथेच उभा असतो. सोनाली म्हणते, “हो.... तुमच्या शेजारीच उभा आहे.” ओल्या डोळ्यांनी ते त्यांच्या शेजारी बघतात आणि आपल्या भावना आवरत सोनालीला म्हणतात, “भूत वगैरे यांना कायद्यात स्थान नाही पण या पुराव्यांना आहे आणि हे पुरावे विकासला सोडवण्यासाठी पुरेसे आहेत. मी उद्याच वरच्या न्यायालयात त्याच्या शिक्षेविरोधात याचिका दाखल करतो. आणि आता संतोषला इथेच ठेवा, आता पुढे काय ते मी बघतो.”

या खटल्याचं पुढे काय होत आहे हे मला नक्की सांगा करत सोनाली तिथून निघते. “सुनावणी असेल तेव्हा इच्छा असल्यास तू न्यायालयात येऊ शकतेस”, असं हेमंत वकील सोनालीला सांगतात. सोनाली तिथून आपलं सामान घेऊन बाहेर पडते. विलासही तिच्या मागोमाग येतो आणि तिला म्हणतो, “माझ्यासाठी तू जे काही केलंस यासाठी खूप आभार. मला तुला खूप त्रास द्यावा लागला पण माझा नाईलाज होता. विकासचे आता फार दिवस नाहीत. त्याच्या आत्म्यावर कुठला “कलंक” लागायला नको, एवढीच माझी इच्छा होती. आता मी तुला कधीही कुठेही दिसणार नाही. परत एकदा धन्यवाद.”

हेमंत वकील या खटल्याला प्रथम प्राधान्य देत पुढच्या कारवाया सुरु करतात आणि हा खटला वरच्या न्यायालयात सुनावणीसाठी येतो. साक्षी, पुरावे इतके बळकट असतात की विकास या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्त होतो. न्यायालयाचे न्यायाधीश हा खटला बेजबाबदारपणे हाताळल्याबद्दल पोलिसांना चार शब्द ऐकवतात आणि पुढील तपासाची जबाबदारी पोलिसांकडे सोपवतात. सोनालीही न्यायालयात हजर असते आणि आपल्या या सगळ्या खटाटोपाला अखेर यश आलं म्हणून ती खूप खुश होते.

पुढे दोन महिने असेच जातात. सोनाली आपल्या कामात व्यस्त होते. तिचे आई वडील भाऊ सगळे मुंबईला एव्हाना परतही येतात. हे कुटुंब पूर्ण आपल्या रोजच्या दिनक्रमात असतानाच एके दिवशी दुपारी दारावरची घंटा वाजते. सोनालीच दार उघडते. कुठलं कुरियर आलेलं असतं. ते ती घेते आणि ते काय आहे ते बघत दिवाणखान्यात येऊन बसते. सोनालीच्या वडिलांची एक वडिलोपार्जित स्थावर-जंगम मालमत्ता असते आणि त्याचा एक खटला जवळ जवळ १२ वर्षांपासून चालू असतो. त्या खटल्याचा निकाल लागलेला आहे आणि एक खूप मोठी कोटींच्या घरात असणारी रक्कम त्यांना मिळालेली आहे, हे आणि या खटल्याच्या निकालाची विस्तृत माहिती सांगणारं पत्र आत असतं. सोनालीला खूप आनंद होतो पण हा एक अतिशय क्लिष्ट खटला आणि तो असा अचानक कसा काय मार्गी लागला, हा खूप मोठा प्रश्न सोनालीला पडतो. याचाच विचार करत असताना तिचं लक्ष खिडकीतून बाहेर जातं आणि तिला एक चांगलाच धक्का बसतो. बाहेर आकाशात विलास आणि विकास दोघे उभे असतात. सोनाली विलासकडे बघते आणि हातातल्या न्यायालयाच्या पत्राकडे बघते. हे बघून विलास हसतो. सोनालीला तिच्या प्रश्नाचं काय ते उत्तर मिळतं. विकासलाही विलासबरोबर बघून सोनाली थोडी गंभीर होते. दोन महिन्यातच हे घडलं तर, पण एक बरं आहे विकासच्या आत्म्यावरचा “कलंक” तरी पुसला गेला... हे असे विचार ती करतच असते तेवढ्यात तिच्या आईची हाक तिच्या कानावर येते. विलास आणि विकास तिला अच्छा करत तिथून निघून जातात आणि सोनाली ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी म्हणून आई.... बाबा... अशा जोरात हाका मारतच आतल्या खोलीत निघून जाते.

समाप्त 

- मंजुषा जोगळेकर