Wednesday 24 May 2017

हिमाचल गाथा - भाग १४



दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच सिमल्याहून निघालो. एक तर सिमला-चंदीगड अडीच एक तासांचा प्रवास आणि विमान प्रवास म्हटल्यावर लवकर पोहोचणं गरजेचं. हॉटेलची टेकडी शेवटची उतरली आणि निघालो परतीच्या प्रवासाला. सिमल्याला थंडी नाही थंडी नाही असं ऐकलं होतं पण आम्हाला सिमल्यात चांगलीच थंडी अनुभवायला मिळाली. थंडी तर मनालीतही होती, अगदी -५ अंश सेल्सियसपर्यंत तापमान खाली उतरायचं पण तिकडची थंडी प्रेमळ होती. सिमल्याच्या थंडीला प्रेमाचा ओलावा अजिबात नाही. सिमल्याची थंडी भयंकर बोचरी. पण सिमला मला आवडलं. या छोट्या शहराची ऐट आवडली. छोटेखानी, ऐटदार असं हे शहर भले पर्यटकांना भरगच्च पर्यटन देत नसेल पण त्या शहराचं सौंदर्य मोहवून टाकतं. त्या शहराच्या ऐटीच्याही आपण नकळत प्रेमात पडतो. आम्ही परत फिरत होतो तेवढ्यात तिथली स्थानिक बस मला दिसली. छोटी आणि फारशी सुखकारक नसलेली ती बस पाहून मला मुंबईची बेस्ट आठवली आणि डोक्यात आलं इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारशी प्रगत नाही. इतके दिवस मुंबई ? हे काय असतं असं म्हणणाऱ्या मला सिमल्यातली बस बघून मुंबईची बेस्ट आठवली आणि इथूनच खऱ्या अर्थाने मुंबईच्या ओढीने माझा परतीचा प्रवास सुरु झाला.



हळूहळू आम्ही सिमल्यातून बाहेर येऊ लागलो. शेवटचा तो उंच मारुती पाहिला, तसेच देवदार वृक्षांचाही आम्ही निरोप घेतला. देवदारांनी साथ सोडली आणि तिथला हिरवा निसर्गही आमच्यापासून दूर झाला. अगदी रुक्ष अशा भागातून आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. कधीकधी मी बाहेर डोकावून दुकानांच्या पाट्या बघायचे आणि खरंच हिमाचलचा भाग आहे का याची खात्री करून घ्यायचे. अशा रुक्ष भागातून जात जात आम्ही हरयाणात प्रवेश केला. जसजसे आम्ही उंच भागावरून सखल भागावर आलो तशी थंडीही गायब झाली आणि हरयाणाने तर आमचं कडक उन्हात स्वागत केलं. हरयाणात आल्यावर इतक्या दिवसांनी आम्ही दृतगती मार्ग पाहिला आणि नेहमीच्या शहरी भागात आपण आलो याची जाणीव झाली. हरयाणा सोडत आम्ही पंजाबमध्ये प्रवेश केला आणि हिंदीची भाषेची जागा पंजाबीने घेतली. या पंजाबातून प्रवास करत करत आम्ही चंदीगड विमानतळाच्या दिशेने जाऊ लागलो. जसजसं चंदीगड जवळ येऊ लागलं तसतसा आमचा ड्रायव्हर शांत शांत होऊ लागला. त्याची बोलण्याची पद्धत बदलली. इतक्या दिवसांची साथ आता संपणार होती, त्यामुळे तो थोडा भावुक झाला होता. विमानतळावर आम्ही त्याचा निरोप घेतला आणि आम्ही विमानतळाच्या इमारतीच्या दिशेने जाऊ लागलो. 

वेळेच्या बरंच आधी आम्ही विमानतळावर दाखल झालो होतो. इतक्या लवकर विमान कंपनी आमचं सामान ताब्यात घेईल का हा खरं तर प्रश्नच होता पण कंपनीने सामान ताब्यात घेतलं. सगळे सोपस्कार पार करून आम्ही आमच्या विमानाच्या गेटजवळ जाऊन बसलो. दोन तास आता आम्हाला तिथेच चंदीगड विमानतळावर घालवायचे होते. वाताकुलीत यंत्रणा फारशी कार्यरत नसल्याने विमानतळावर गरम व्हायला लागलं आणि त्यात भर दुपारची वेळ. आम्ही जिथे बसलो होतो तिथे बरोब्बर समोर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, लाला लजपतराय अशा क्रांतिकारकांचे सोनेरी मुखवटे लावलेली भव्य भिंत होती. विमानतळावर हे असं क्रांतीकारकांना बघून खूप मस्त वाटलं. थोडा वेळ तर हे मुखवटे बघण्यातच गेला. त्यात इतर विमानांची लोकं यायची जायची आणि मी या लोकांना वाचण्याचं काम करायचे. त्यांच्याकडे बघून ही लोकं कुठे चालली असावीत याचा अंदाजही बांधायचे आणि बहुतांश वेळेला तो खराही ठरायचा. हे विमानतळ छोटंसंच आहे आणि वेळ घालवण्यासाठी इथे मुंबई विमानतळासारखी फार जागाही नाही पण इकडे तिकडे बघत वेळ गेला आणि आमचीच विमानात चढण्याची वेळ येऊन ठेपली. आमच्याच विमानाचे प्रवासी असणारं एक वयस्कर जोडपं तिथे माझ्याशी आपणहून गप्पा मारायला लागलं त्यामुळे शेवटचा अगदी विमानात चढण्यापूर्वीचा वेळही छान गेला.



शेवटी ती घटिका आली आणि आमच्या सहलीचा शेवटचा बिंदू असलेल्या चंदीगड विमानतळाचाही निरोप घेण्याची वेळ समोर येऊन ठेपली. आम्ही विमानात जाऊन बसलो. खिडकीत न बसता मी मधल्या खुर्चीवर बसले. माझ्या शेजारी एक वयस्कर शीख गृहस्थ येऊन बसले आणि त्यांची बायको आमच्या पुढच्या ओळीत त्यांच्याच पुढच्या खुर्चीवर बसली. आत शिरलेले सगळे प्रवासी आपापल्या जागेवर स्थिरस्थावर होतच होते आणि तेवढ्यात मी माझ्या पुढची खिट्टी उघडून प्लास्टिकची फळी खाली घेतली. बराच वेळ हातात पर्स होती, दोन मिनिटं पर्स खाली ठेवावी या विचाराने मी त्या फळीवर ठेवली. तेवढ्यात माझ्या शेजारून आवाज आला की विमान उडताना ही फळी वरच असली पाहिजे असं या पुस्तकात लिहिलंय. मी चमकून शेजारच्या त्या सरदाराकडे बघितलं आणि म्हणाले की हो मी उचलणार आहे. दोनच मिनिटं ठेवली होती आणि अजून विमान उडायला वेळ आहे, असं म्हणत मी ती पर्स त्या फळीवरून काढली. शेजारच्या त्या शीख माणसाने मला तिथल्या माहिती पुस्तकात हे कुठे लिहिलंय हे दाखवलं आणि म्हणाला की आम्ही पहिल्यांदाच विमान प्रवास करत आहोत म्हणून जरा माहिती वाचत होतो. नंतर हवाई सुंदरी आली विमान सुरु व्हायच्या आधीची माहिती सांगू लागली. ती माहिती हे शीख गृहस्थ अगदी लक्ष देऊन ऐकत होते. हा प्रवास त्यांच्यासाठी नवीन होता पण अगदी शांतपणे ते सगळं समजून घेत होते, कुठे गडबड नाही काही नाही. या विमानात मराठी भाषेत संपर्क साधण्याचीही सोय होती. बहुतेक करून हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा हवाई सुंदरींशी बोलताना वापरल्या जातात पण या विमानात मराठीही संपर्क भाषा म्हणून उपलब्ध होती. 

आमचं विमान सुरु झालं. ते अगदी उडण्याच्या बेतातच होतं आणि माझ्या शेजारच्या सरदारजींचा मोबईल वाजला. सगळी लोकं त्यांच्याकडे बघायला लागली. मी म्हणाले फोन बंद करा. फोन एक तर फ्लाईट मोडमध्ये ठेवा नाहीतर स्वीच ऑफ करा, विमानात फोन बंद ठेवायचा असतो. त्यांचा मुलगा मुंबईत असतो आणि ते मुलाकडे चालले होते, त्या मुलाचाच फोन होता. त्याने घाईघाईने फोन बंद केला आणि तो फोन ते स्वीच ऑफ करायला लागले पण तो काही त्यांना जमेना. मग आम्ही त्यांना फोन बंद करून दिला. लगेच त्याने बायकोचा मोबईलही दिला, तो फ्लाईट मोडला केला. हे असं घडलेलं बघून ते सरदार थोडे खजील झाले. पण मला एक बरं वाटलं, आयुष्यात काही अनोळखी सरदार लोकांनी आम्हाला निरपेक्षपणे मदत केलेली आहे आणि कधीही कुठेही ही लोकं नाराज करत नाहीत. या लोकांनी केलेल्याची परतफेड नाही पण आपल्यालाही सरदार लोकांना आणि ते ही वयस्कर अशा, मदत करण्याची संधी मिळत आहे हे बघून बरं वाटलं. विमानात काय काय कसं मिळतं, खाण्यापिण्याला पैसे असतात का वगैरे त्यांनी विचारलं. पाण्याला पैसे नाहीत म्हटल्यावर त्यांनी विमानात पाणी घेतलं. विमानात कधी कसं वागायचं असतं, यासाठी ते माझं निरीक्षण करायचे. काही वाटलं तर विचारायचे. 

हळूहळू बाहेर मुंबईचे वेध लागायला लागले. डाव्या हाताला न्हावा शिवा दिसायला लागलं आणि तमाम पंजाबी लोकं डाव्या दिशेला बघायला लागली. विमानांची खिडकी खूप छोटी असते आणि विमान उतरायच्या वेळी कमरेला सुरक्षा पट्टे बांधलेले असतात, त्या अशा अवस्थेत त्या एवढ्या छोट्या खिडक्यांमधून हे पंजाबी तो समुद्र बघण्यासाठी आतुर होते. ते बघून वाटलं, या लोकांना या समुद्राचं एवढं अप्रूप आणि आपल्याला जेव्हा इच्छा होईल तेव्हा समुद्रावर जाता येतं. मुंबईला थंडी नाही म्हणून मी हळहळ व्यक्त करत होते पण मुंबईला समुद्र किनारा तरी आहे, जो या लोकांकडे नाही. त्या लोकांना काय किंवा मला काय दोन्ही गोष्टी मिळणार नाहीत. चला जे आहे ते चांगलं आहे, असा विचार करत असतानाच विमान जमिनीवर उतरलं आणि समुद्राच्या जवळ येत आमची सहलही संपली. उतरताना ते सरदार गृहस्थ म्हणतात की आमच्या दोन बॅगा आहेत. त्या कुठे मिळतील. मी त्यांना म्हणाले, तुम्ही चला आमच्याबरोबरच... सामान पट्ट्यावर सामान घ्यायला आम्ही एकत्रच गेलो. सामान घेऊन बाहेरही एकत्रच पडलो. बाहेर पडत असताना माझं लक्ष तिथल्याच एका सामान पट्ट्यावर गेलं. तिथे परदेशी बायकांचा एक समूह आपलं सामान घेत होता. मला वाटलं की या बहुदा गोव्याहून आल्या असाव्यात. पण त्या वाराणसीहून आल्या होत्या. ते पाहिलं आणि मनाला एक क्षण हळहळ वाटली. मी आत्तापर्यंत काशीबद्दल एवढं वाचलंय, लिहिलंय पण कधीही काशीला भेट देण्याचा योग आला नाही आणि या बायका भारताबाहेरून येऊन काशीला जाऊन आल्या. पण दुसऱ्या क्षणी मनानेच मनाला समजावलं की प्रत्येक सहल धार्मिक कारणासाठीच व्हायला हवी असं कुठे आहे आणि मनाला सुखावणारी सहल घडलेली असल्याने मनाला हे लगेच पटलं.



सहल संपताना आपल्या हातून कोणालातरी मदत घडली याचं खूप समाधान मनात होतं आणि त्यात सरदार, ज्यांच्यासाठी मला आत्तापर्यंत कधीच काहीच करण्याची संधी मिळाली नव्हती असे... आम्ही टॅक्सी केली आणि सामान आत ठेवतच होतो तितक्यात ते सरदार कुटुंब दिसलं. त्या वयस्क माणसाने आमच्याकडे बघत निरोपाचा हात हलवायला सुरुवात केली. आम्ही त्यांच्या चांगल्या ओळखीचे आहोत अशा अविर्भावात ते गृहस्थ आमचा निरोप घेत होते. छान हसत आम्ही अगदी दिसेनासे होईपर्यंत त्यांनी हात हलवत आमचा निरोप घेतला. आम्ही विमानतळातून बाहेर पडलो आणि आमची टॅक्सी वाहतुकीत मध्येच थांबली. आपलं शहर आपली माणसं दिसली. इतके दिवस डोळ्यांना न दिसलेली गर्दी दिसली, या गर्दीचा त्रास न वाटता आपल्या शहरात परत आल्याचा आनंद मनाला जाणवला आणि त्याच वेळी खऱ्या अर्थाने आम्ही हिमाचल सहल संपवून मुंबईत परतलो...



चला, आता मी सगळ्यांचा निरोप घेते. माझी हिमाचल गाथा सध्या तरी इथेच संपली पण तिच्यासमोर अजून पूर्णविराम देण्यात आलेला नाही. देवभूमी हिमाचलचा अगदी छोटा भाग या गाथेत गुंफलेला आहे आणि जेव्हा जेव्हा या देवभूमीला भेट देता येईल तेव्हा या गाथेतले नवनवीन अभंग त्या त्या वेळी लिहिले जातील.



पण तूर्तास इथेच थांबते.



असाच लोभ असूद्यात... 

- मंजुषा जोगळेकर 

                                                                                                                  


                                                                                                              

           

                                                                                                                                        

No comments:

Post a Comment