Tuesday 5 July 2016

व्यास पौर्णिमा / व्यास पूजन / व्यास जयंती



आज महर्षी वेदव्यास यांची जयंती. महर्षी व्यास हे सत्यवती आणि ऋषी पराशर यांचे पुत्र. महर्षी व्यास अमर आहेत. त्यांना विष्णूच्या २४ अवतारांपैकी एक मानलं जातं. महर्षींचं खरं नाव ‘कृष्णद्वैपायन’. व्यासांचा जन्म यमुना नदीच्या एका द्वीपावर झाला, म्हणून ‘द्वैपायन’ आणि त्यांचा रंग सावळा होता, म्हणून ‘कृष्ण’. म्हणून सत्यवती-पराशर यांच्या मुलाचं नाव ‘कृष्णद्वैपायन’ ठेवण्यात आलं. व्यासांना हिंदू धर्माचे आद्य पुरुष तसेच आद्य गुरुही म्हटलं जातं.  

आपल्या वेदांचं वेळोवेळी विभाजन करण्यात आलंय. एकूण २८ वेळा वेदांचं विभाजन झालंय. द्वापरयुगात विष्णू अवतारातल्या कृष्णद्वैपायन यांनी वेदांचे चार भाग केले म्हणून त्यांना द्वापारयुगातील ‘वेदव्यास’ (वेदांचे विभाजन करणारे) म्हटलं जातं. हे चार भाग म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. व्यासांनी १८ महापुराणं, श्रीमद्भागवत, ब्रह्मसूक्त, महाभारत यांचीही रचना केली.

द्वापरयुग संपता संपता व्यासांना अनुभूती झाली की कलियुगात मानवाचं आयुष्य खूपच कमी असेल तसेच त्याची शारीरिक आणि बौद्धिक शक्तीही खूप कमी होईल. तेव्हा मानवाला वेदांचा अभ्यास करणं आणि त्यांना समजून घेणं कठीण जाईल, म्हणून कलियुगातल्या मनुष्यासाठी व्यासांनी ‘महाभारत’ ग्रंथाची निर्मिती केली. चारही वेदांचं सार आणि धर्म, नीति, उपासना, विज्ञान, ज्ञान अशी शिकवण या ग्रंथात आहे.

व्यासांनी आपल्या चार शिष्यांना एकेक वेद शिकवला. मुनी पैल यांना ऋग्वेद, वैशंपायन यांना यजुर्वेद, जैमिनी यांना सामवेद, यांना अथर्ववेद शिकवला आणि पाचवे शिष्य लोमहर्ष यांना महाभारत हा ग्रंथ शिकवला. हे पाचही शिष्य जेव्हा आपापल्या ग्रंथांमध्ये निपुण झाले, तेव्हा आपल्या गुरुचे आभार मानण्यासाठी या पाचही शिष्यांनी ‘आषाढ पौर्णिमे’ला गुरु वेदव्यास यांचं पूजन करून आभार व्यक्त केले. तेव्हापासून आजच्या दिवशी हिंदू धर्मात गुरु पूजनेच्या प्रथेला सुरुवात झाली.

आदिगुरु शंकराचार्य यांनी चार दिशांना चार मठ स्थापन करून या गुरु-शिष्य परंपरेला पुनरुज्जीवित केलं.  

    

   

गंगा तलाव, मॉरीशस



एकदा शंकर आणि पार्वती पृथ्वी भ्रमणाला निघाले होते. शंकर पार्वतीला पृथ्वीवरची सुंदर ठिकाणं दाखवत होते.
 
गंगा जेव्हा पृथ्वीवर यायला निघाली होती तेव्हा तिच्या पाण्याला प्रचंड वेग होता. त्या वेगात जर गंगा पृथ्वीवर आली असती तर पृथ्वीवर हाहाकार माजला असता म्हणून महादेवांनी गंगेला आपल्या जटेत धारण केलं होतं.
 
शंकर आणि पार्वती जेव्हा पृथ्वी भ्रमण करत होते तेव्हा गंगा शंकरांच्या जटेतच होती. सुंदर ठिकाणं बघता बघता हे दोघे मॉरिशसला आले आणि त्यावेळी जटेतून थोडं पाणी जमिनीवर सांडलं आणि वाहू लागलं. या पाण्याचंच रुपांतर पुढे तलावात झालं. हा तलाव "गंगा तलाव" या नावाने प्रसिद्ध आहे.
भारताबाहेरच्या प्रमुख हिंदू श्रद्धास्थानांमध्ये मॉरिशसच्या या गंगा तलावाचा समावेश होतो.
 
सध्या पंतप्रधान मॉरिशसमध्ये आहेत, तिथेही ते गंगेला विसरले नाहीत. आज गंगा तलाव येथे मोदींनी विशेष पूजा केली.


गंगा दशमी



आज ‘गंगा दशहरा’ किंवा ‘गंगा दशमी’. राजा भागीरथाच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन गंगा आजच्या दिवशीच पृथ्वीवर आली. आजच्या दिवसाला ‘गंगेचा जन्मदिवस’ही म्हणतात.

गंगेचा प्रचंड वेग पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून साक्षात महादेवांनी गंगेला आपल्या जटांमध्ये धारण केलं. म्हणजे आता गंगेचा पुढचा पृथ्वीपर्यंतचा प्रवास महादेवांच्या जटांमधून होणार होता. साक्षात महादेवांच्या जटा छेदत ती पृथ्वीकडे झेपावणार होती आणि याचाच तिच्या मनात गर्व निर्माण झाला. तिच्या या गर्वाचं तिला फळ मिळालं. जटेत धारण केलेली गंगा अनेक वर्ष जटांमध्येच फिरत बसली. तिला बाहेर येण्याचा मार्गच सापडेना.

आता राजा भागीरथाला काळजी वाटायला लागली. त्याने परत शंकराची घोर तपश्चर्या करायला सुरुवात केली. या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शंकरांनी गंगेला मुक्त करण्याचा वर दिला.

शंकरांनी आपली एक बट सोडली आणि गंगेची धार पृथ्वीकडे येऊ लागली. सर्वप्रथम गंगेची धार हिमालयातील ब्रह्मा निर्मित ‘बिंदुसर सरोवरा’त पडली. तिथे तिचं रुपांतर सात धारांमध्ये झालं. तिथून पुढे, पुढे राजा भागीरथाचा रथ आणि मागे गंगेच्या सात धारा असा प्रवास सुरू झाला.

पण गंगा पृथ्वीवर येताच हाहाकार माजला. ती ज्या मार्गाने पृथ्वीवरून जात होती त्या मार्गात महर्षी जहु यांचा आश्रम होता आणि तिथेच हे महर्षी तपस्या करत होते. आपल्या तपस्थळी मधून गंगेचं मार्गक्रमण होणं हे एक विघ्न आहे असं समजून महर्षी जहुंनी गंगेला पिऊन टाकलं. हे दृश्य पाहताच सगळे देवता जहु ऋषींच्या आश्रमात आले. देवतांनी विनवणी केल्यावर गंगेला ऋषींच्या जांघेतून काढण्यात आलं. तेव्हापासून गंगेचं नाव ‘जाह्नवी’ही पडलं.

अशा प्रकारे अनेक ठिकाणांहून येत येत ही जाह्नवी कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली. तिथे राजा सगरच्या साठ हजार पुत्रांचे भग्नावशेष होते. त्यांना जाह्नवीने पावन करत मुक्ती दिली. तेव्हा तिथे ब्रह्मा प्रकट झाले आणि भागीरथाच्या कठीण तपामुळे सगरच्या साठ हजार पुत्रांना अमर होण्याचा आशीर्वाद दिला. तसेच भागीरथालाही आशीर्वाद दिला की तुझ्या नावावरूनच गंगेला ‘भागीरथी’ म्हणून ओळखलं जाईल, आणि आता तू अयोध्येला जाऊन आपलं राज्य सांभाळ.

जेव्हा गंगेला विष्णूंनी पृथ्वीवर जाण्याची आज्ञा दिली होती. तेव्हा गंगेनी विष्णूंना विचारलं होतं की भागीरथाच्या वंशजांना मुक्ती दिल्यानंतर मी स्वर्गलोकी परतायचं का ? तेव्हा विष्णूंनी गंगेला सांगितलं होतं की कलियुगात जेव्हा मनुष्याची पापं वाढतील त्यावेळी त्यांच्या पापांचा नाश करण्याचं काम तुला करायचं आहे, त्यामुळे तुला आता नदीरुपात पृथ्वीवरच रहायचं आहे. त्याप्रमाणे युगानुयुगे मनुष्याच्या पापक्षालनाचं कार्य ही गंगा नदी करत आहे.

गंगा नदी ही पृथ्वीवरील सर्वात पवित्र नदी आहे. गंगा दशहरा हा हिंदूंचा एक मुख्य सण आहे. गंगेच्या सर्व घाटांवर हा सण उत्साहात साजरा केला जातो. आजच्या दिवशी गंगा स्नानाला, गंगा पूजनाला आणि दानाला महत्त्व आहे.