Showing posts with label गंगा मैय्या. Show all posts
Showing posts with label गंगा मैय्या. Show all posts

Tuesday, 5 July 2016

गंगा तलाव, मॉरीशस



एकदा शंकर आणि पार्वती पृथ्वी भ्रमणाला निघाले होते. शंकर पार्वतीला पृथ्वीवरची सुंदर ठिकाणं दाखवत होते.
 
गंगा जेव्हा पृथ्वीवर यायला निघाली होती तेव्हा तिच्या पाण्याला प्रचंड वेग होता. त्या वेगात जर गंगा पृथ्वीवर आली असती तर पृथ्वीवर हाहाकार माजला असता म्हणून महादेवांनी गंगेला आपल्या जटेत धारण केलं होतं.
 
शंकर आणि पार्वती जेव्हा पृथ्वी भ्रमण करत होते तेव्हा गंगा शंकरांच्या जटेतच होती. सुंदर ठिकाणं बघता बघता हे दोघे मॉरिशसला आले आणि त्यावेळी जटेतून थोडं पाणी जमिनीवर सांडलं आणि वाहू लागलं. या पाण्याचंच रुपांतर पुढे तलावात झालं. हा तलाव "गंगा तलाव" या नावाने प्रसिद्ध आहे.
भारताबाहेरच्या प्रमुख हिंदू श्रद्धास्थानांमध्ये मॉरिशसच्या या गंगा तलावाचा समावेश होतो.
 
सध्या पंतप्रधान मॉरिशसमध्ये आहेत, तिथेही ते गंगेला विसरले नाहीत. आज गंगा तलाव येथे मोदींनी विशेष पूजा केली.


गंगा दशमी



आज ‘गंगा दशहरा’ किंवा ‘गंगा दशमी’. राजा भागीरथाच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन गंगा आजच्या दिवशीच पृथ्वीवर आली. आजच्या दिवसाला ‘गंगेचा जन्मदिवस’ही म्हणतात.

गंगेचा प्रचंड वेग पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून साक्षात महादेवांनी गंगेला आपल्या जटांमध्ये धारण केलं. म्हणजे आता गंगेचा पुढचा पृथ्वीपर्यंतचा प्रवास महादेवांच्या जटांमधून होणार होता. साक्षात महादेवांच्या जटा छेदत ती पृथ्वीकडे झेपावणार होती आणि याचाच तिच्या मनात गर्व निर्माण झाला. तिच्या या गर्वाचं तिला फळ मिळालं. जटेत धारण केलेली गंगा अनेक वर्ष जटांमध्येच फिरत बसली. तिला बाहेर येण्याचा मार्गच सापडेना.

आता राजा भागीरथाला काळजी वाटायला लागली. त्याने परत शंकराची घोर तपश्चर्या करायला सुरुवात केली. या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शंकरांनी गंगेला मुक्त करण्याचा वर दिला.

शंकरांनी आपली एक बट सोडली आणि गंगेची धार पृथ्वीकडे येऊ लागली. सर्वप्रथम गंगेची धार हिमालयातील ब्रह्मा निर्मित ‘बिंदुसर सरोवरा’त पडली. तिथे तिचं रुपांतर सात धारांमध्ये झालं. तिथून पुढे, पुढे राजा भागीरथाचा रथ आणि मागे गंगेच्या सात धारा असा प्रवास सुरू झाला.

पण गंगा पृथ्वीवर येताच हाहाकार माजला. ती ज्या मार्गाने पृथ्वीवरून जात होती त्या मार्गात महर्षी जहु यांचा आश्रम होता आणि तिथेच हे महर्षी तपस्या करत होते. आपल्या तपस्थळी मधून गंगेचं मार्गक्रमण होणं हे एक विघ्न आहे असं समजून महर्षी जहुंनी गंगेला पिऊन टाकलं. हे दृश्य पाहताच सगळे देवता जहु ऋषींच्या आश्रमात आले. देवतांनी विनवणी केल्यावर गंगेला ऋषींच्या जांघेतून काढण्यात आलं. तेव्हापासून गंगेचं नाव ‘जाह्नवी’ही पडलं.

अशा प्रकारे अनेक ठिकाणांहून येत येत ही जाह्नवी कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली. तिथे राजा सगरच्या साठ हजार पुत्रांचे भग्नावशेष होते. त्यांना जाह्नवीने पावन करत मुक्ती दिली. तेव्हा तिथे ब्रह्मा प्रकट झाले आणि भागीरथाच्या कठीण तपामुळे सगरच्या साठ हजार पुत्रांना अमर होण्याचा आशीर्वाद दिला. तसेच भागीरथालाही आशीर्वाद दिला की तुझ्या नावावरूनच गंगेला ‘भागीरथी’ म्हणून ओळखलं जाईल, आणि आता तू अयोध्येला जाऊन आपलं राज्य सांभाळ.

जेव्हा गंगेला विष्णूंनी पृथ्वीवर जाण्याची आज्ञा दिली होती. तेव्हा गंगेनी विष्णूंना विचारलं होतं की भागीरथाच्या वंशजांना मुक्ती दिल्यानंतर मी स्वर्गलोकी परतायचं का ? तेव्हा विष्णूंनी गंगेला सांगितलं होतं की कलियुगात जेव्हा मनुष्याची पापं वाढतील त्यावेळी त्यांच्या पापांचा नाश करण्याचं काम तुला करायचं आहे, त्यामुळे तुला आता नदीरुपात पृथ्वीवरच रहायचं आहे. त्याप्रमाणे युगानुयुगे मनुष्याच्या पापक्षालनाचं कार्य ही गंगा नदी करत आहे.

गंगा नदी ही पृथ्वीवरील सर्वात पवित्र नदी आहे. गंगा दशहरा हा हिंदूंचा एक मुख्य सण आहे. गंगेच्या सर्व घाटांवर हा सण उत्साहात साजरा केला जातो. आजच्या दिवशी गंगा स्नानाला, गंगा पूजनाला आणि दानाला महत्त्व आहे.


गंगा सप्तमी



आज वैशाख शुद्ध सप्तमी म्हणजेच ‘गंगा सप्तमी’. काही ठिकाणी हा दिवस ‘गंगा जयंती’ म्हणूनही साजरा केला जातो.

आपल्या पूर्वजांना कपिल मुनींच्या शापापासून मुक्त करून त्यांच्या आत्म्यांना शांती लाभण्यासाठी कठोर तप करून ‘भगीरथा’ने गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणलं. पण स्वर्गातून पृथ्वीवर येण्याच्या मार्गात एक अडथळा होता. “माझ्या पाण्याचा वेग प्रचंड आहे. या धारांच्या वेगाने पृथ्वी फाटून माझं पाणी पाताळात शिरेल आणि, पृथ्वी आणि पाताळ एक होतील”, असं सांगून गंगा भागीरथला म्हणाली, जर तुझी इच्छा पूर्ण व्हावी असं तुला वाटत असेल तर या अडथळ्याला दूर कर.

तेव्हा यावर विष्णूंनी महादेवांना यासाठी मदत करायला सांगितली. अती वेगवान गंगेच्या धारा आपल्या जटांमध्ये बांधायला सांगितल्या, त्यामुळे गंगेचा वेग कमी होऊन पृथ्वी पाताळात धसणार नाही.

यासाठी महादेव आनंदाने तयार झाले. गंगा जलधारांच्या रुपात पृथ्वीवर जाण्यास तयार झाली. पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू करता क्षणी त्या धारांचा वेग प्रचंड वाढला. ढग गडगडू लागले. महाप्रलयासारखी परिस्थिती निर्माण झाली. गंगेचा भयंकर वेग पाहून पृथ्वी घाबरली. थरथर कापू लागली.

आणि त्याच वेळी महादेव गंगेच्या मार्गात आले, भयंकर वेगात गंगा महादेवांच्या जटेत जाऊन बसली. तो दिवस होता वैशाख शुद्ध सप्तमी, वेळ मध्यान्हीची. हा दिवस गंगेच्या सर्व काठांवर उत्साहाने साजरा केला जातो. गंगेची याच दिवशी स्वर्गातून जलधारांच्या रुपात उत्पत्ती झाली म्हणून काही ठिकाणी आजच्या दिवशी गंगा नदीचा जन्मोत्सवही साजरा केला जातो. आजच्या दिवशी गंगा स्नान, गंगा पूजन आणि दानाचं महत्त्व आहे.

गंगा सप्तमीला गंगा महादेवांच्या जटेत जाऊन बसली. त्यानंतर, महादेवांनी आपल्या बांधलेल्या जटांपैकी एक जटा / बट सोडून गंगेची जलधारा पृथ्वीवर सोडली. गंगेची धार अतिशय मंद गतीने पृथ्वीवर पडू लागली, वेग कमी असल्याने पृथ्वी पाताळात धसण्यापासून वाचली.