Showing posts with label काही खास अनुभव. Show all posts
Showing posts with label काही खास अनुभव. Show all posts

Monday, 20 June 2016

आजही जिवंत असलेला प्रामाणिकपणा



...काल रात्री माटुंग्याला "रामा नायक"मध्ये मस्तपैकी दाक्षिणात्य पदार्थांचा आस्वाद घेतला. उत्कुष्ट चवीचे पदार्थ खाल्ल्याच्या समाधानात शेजारी इरण्याच्या आइसक्रीम पार्लरमध्ये आइसक्रीम खाऊन झालं. रविवारच्या सुट्टीचा एक मस्त शेवट झाला या समाधानात आम्ही टॅक्सीने घरी आलो.
 
घरी आलो तर नवऱ्याच्या लक्षात आलं की आपण मोबाईल टॅक्सीतच विसरलो... लगेच टॅक्सी कुठे दिसत आहे का हे बघण्यासाठी नवरा घराबाहेर पडला. बरंच शोधलं पण टॅक्सी काही मिळाली नाही. कधीही असं होत नाही, टॅक्सी किंवा कुठलंही सार्वजनिक ठिकाण सोडताना आपण सगळं बरोबर घेतलंय ना याची खात्री करूनच तो नेहमी ते ठिकाण सोडतो. पण काल मोबाईल हरवायचा म्हणून तो काल टॅक्सीत राहिला. नवीन चकचकीत फोन गहाळ झाला.
 
घरी आल्यावर त्या मोबाईलला बरेच बरेच फोन केले, पण कोणी फोन उचलेना. मग लक्षात आलं की फोन बहुतेक सायलेंटवर आहे. अनेक अनेक फोन केले पण काही उपयोग नाही. दोन सिमवाला फोन होता, आधी दोन्ही फोन बंद केले, इंटरनेटही बंद केलं. फक्त एका नंबरचं incoming चालू ठेवलं, कारण एक आशा होती की कदाचित कोणीतरी फोन उचलेल. तो उद्या टॅक्सी बाहेर काढण्यापूर्वी कदाचित स्वच्छ वगैरे करेल किंवा त्याच्या कुठल्या प्रवाशाला फोन मिळेल. टॅक्सीचा चालक मुसलमान होता हे मला माहीत होतं आणि या लोकांच्या प्रामाणिकपणाचा अनुभव असल्याने फोन परत मिळण्याची मनात कुठेतरी आशा वाटत होती. पण शेवटी चांगली, वाईट लोकं सगळीकडेच असतात. आम्ही फोन करत होतो करत होतो. रात्र बरीच झाली होती आणि आता कोणी फोन उचलेल ही आशाही धूसर झाली. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांत त्या फोनवर संदेश पाठवले. लोकांना लाखो करोडोंचे दागिने परत मिळतात, म्हणजे परत मिळणार असेल तर वस्तू कशीही परत मिळते आणि जर मिळणं नशिबात नसेलच तर नाही तर नाही मिळणार...
 
क्राईम पॅट्रोल हा कार्यक्रम लोकांना खरंच सतर्क करतो. आपला हरवलेला मोबाईल गुन्हेगारांकडून वापरला जाऊ शकतो आणि पोलीस तपास करत करत मोबाईलच्या मूळ मालकाकडे येतात, हे त्या कार्यक्रमात नेहमी दाखवलं जातं. त्यामुळे आधी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमचा फोन हरवला आहे याची नोंद करणं गरजेचं होतं. त्यामुळे सकाळीच पोलीस स्टेशन गाठलं. आत पोलीस ठाण्यात जायची ही माझी पहिलीच वेळ. अधूनमधून त्या मोबाइलला फोन करणं चालू होतं. पोलिसांना काही झेरॉक्स काढून हव्या होत्या म्हणून बाहेर आलो होतो, तेवढ्यात मी फोन करण्याचा प्रयत्न करायला लागले. दोन वेळा प्रयत्न केल्यावर तिसऱ्यांदा फोन उचलला गेला. तो टॅक्सीवालाच होता. तुम्ही आम्हाला काल रात्री सोडलं होतंत आणि आमचा फोन टॅक्सीत राहिला आहे असं म्हटल्यावर त्याने हो हो म्हटलं... आणि पुढे म्हणाला की टॅक्सीत खाली पडला होता, एका प्रवाश्याने दिला. आम्ही म्हटलं की आम्ही फोन घ्यायला कुठे येऊ सांगा, तर म्हणाला की नको मीच येतो एक तासाभरात तिकडे, आणि मी येईन काळजी करू नका. माझ्या मनात काही असतं तर मी तुमचा फोनच उचलला नसता. त्याला सांगितलं की तुम्ही टॅक्सीचा मीटर पाडा आणि भाडं घ्या.



 
मला एवढं हलकं वाटलं ! वाटलं हल्लीचे दिवस चांगले नाही म्हणतात. फोन महाग होता, नवीन होता, म्हटलं तर त्याला तो ढापता आला असता पण नाही त्याने प्रामाणिकपणा दाखवला आणि वर हे ही की मीच येतो तुम्हाला मोबाईल द्यायला.
 
लगेच पोलीस स्टेशनमध्ये गेलो, काय काय झालं ते सगळं सांगितलं. तिथल्या लोकांनाही आश्चर्य वाटलं. प्रत्यक्ष मोबाईल हातात आला की आम्ही येऊन सांगतो असं सांगून तिथून निघालो.
बरोबर वेळेत तो टॅक्सीवाला आला. मला कसा आणि कुठे मोबाईल मिळाला हे त्याने सांगितलं. तुमचे फोन येत होते पण मला फोन receive करता येत नसल्याने तुमच्याशी फोनवर बोलता येईना. फोनची बॅटरी लो होती, थोडा फोन charge करून आणलाय. त्याच्याबरोबर एक मुलगा होता त्याने त्याच्यासाठी अगम्य असणारा फोन receive, charge करायला मदत केली होती. रात्री केलेले तिन्ही भाषातले संदेशही त्या मुलानेच वाचून दाखवले. त्याला गाडी स्वच्छ करण्यासाठी गाडी घेऊन जायची होती, ते सगळं बाजूला ठेवून तो आम्हाला फोन द्यायला आला.
 
त्याला म्हटलं, मी तुमचा फोटो काढते आणि तुमच्याबद्दल फेसबुकवर लिहिते. हा काढा की फोटो म्हणाला... फोटो काढायला लागले, पण हा गंभीर... म्हटलं, का गंभीर का तुम्ही हसा की जरा... तर म्हणतो की तुम्ही पोलिसांत तक्रार केलीय का ? म्हटलं, नाही नाही.... मग त्याला हायसं वाटलं आणि तो हसायला लागला. तशीही तक्रारीची प्रक्रिया तर पूर्ण झालेली नव्हतीच. मी त्याला नाव विचारलं, "मोहम्मद कल्लन". नंतर नवऱ्याला म्हणतो की मी मुस्लिम आहे.
 
पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळं कॅन्सल करून घरी परतलो. आजच्या काळातही हे असं घडू शकतं आणि ते आपल्याबरोबरही घडू शकतं याचं समाधान वाटलं. नवरा काल म्हणत होता की मी आत्तापर्यंत कोणाला एका पैशाला फसवलं नाही मग माझ्याबरोबर हे असं का घडावं ? कदाचित या प्रश्नाची दखल नियतीने घेतली आणि ही अशी क्वचित घडणारी घटना घडली...
 
जग कितीही वाईट होऊदेत पण अशी चांगुलपणा असणारी माणसं या जगात आहेत आणि कायम असतील. आता ती तुम्हाला भेटतील की नाही, हे तुमच्या नशिबावर आहे. या अशा चांगल्या लोकांच्या जोरावरच हे जग टिकून आहे आणि कायम राहील, हे नक्की....

Thursday, 16 June 2016

कान्हाची गाय



सकाळी साधारण ७.१५ - ७.३० ची गोष्ट. मी आमच्या इमारतीतून बाहेर पडून आमच्या गृहसंकुलात होते. तेवढ्यात समोरून एक गाय येताना दिसली, एकदम अस्सल देशी गाय. एकदम उंच, धिप्पाड. तिचे प्रत्येक आणि प्रत्येक अवयव एकदम भरलेले होते. एकदम लख्ख पांढरी स्वच्छ, नुकतीच सर्फच्या पाण्याने घासून स्वच्छ केल्यासारखी. कांती एकदम तेजस्वी, अशा तेजस कांतीची गौ मी पहिल्यांदाच पाहिली. कालपासून पाऊस पडत आहे, रस्ते ओलेचिंबं आहेत. रस्त्यांवर पाणी साठलंय, चिखल झालाय पण या गायीच्या अंगावर चिखलाचा एक पुसटसा डागही नाही. अगदी चारही पाय एकदम स्वच्छ.
 
तिचा चेहरा... एखादी सुंदर लावण्यवती समोरुन येत आहे, असा एक क्षणभर भास मला तिला पाहताच झाला. गाय, म्हैस हे प्राणी मला पहिल्यापासूनच आवडतात. अगदी काळ्या कुळकुळीत म्हशीच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य मी सहजगत्या टिपू शकते आणि ही तर साक्षात अप्रतिम लावण्य ल्यालेली सुंदर गाय होती. तिच्या चेहऱ्यावर एक शान होती, शालीनतेचे भाव होते. चांगला पौष्टीक आणि संतुलित आहार ज्याप्रमाणे आपली छाप एक प्रकारच्या तेजाने मनुष्याच्या चेहऱ्यावर आपले रंग रेखाटतो, अगदी तसंच श्रीमंती तेज त्या गाईच्या चेहऱ्यावर होतं. डोळे अगदी गडद काजळ लावल्यासारखे आणि मोहकही, निष्प्राण नाही तर पाणीदार. अगदी अस्सल गाईच्या शिंगांचा आकार पिरॅमिडसारखा असतो असं म्हणतात, एरवी हा आकार बघायला मिळतोच असं नाही पण आज पाहिलेल्या लावण्यवतीची पिरॅमिडसारखी शिंगं तिच्या एकूण सौंदर्यात भरच घालत होती. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात ही अशी तेजस्वी गाय कधीही पाहिली नाही, ना शहरात आणि ना खेड्यात. श्रीकृष्णाच्या बरोबर फोटोंमध्ये ज्या गाई दाखवतात त्या असतात अशा तेजस्वी, पण त्याही फोटोतच आपलं तेज दाखवणाऱ्या, प्रत्यक्षात नाहीच.
 
नेहमीच्या गाईंपेक्षा उंच, तेजस्वी, भारदस्त शरीरयष्टीची गाय आमच्या गृहसंकुलात ताडताड करत चालताना मला दिसली. आपल्या आजूबाजूला कोण आहे याची तमा न बाळगता बेधडकपणे तिला येताना पाहून आधी तिच्या त्या गोमत्वाने(हा शब्द 'व्यक्तिमत्व' याप्रमाणे घ्यावा) मला भारावून गेल्यासारखं झालं. सकाळी सकाळी या अशा अनुभूतीने आलेलं भारावलेपण मनाला फारच सुखावणारं होतं. या अचंबितपणातून थोडं बाहेर आल्यावर मला एक प्रश्न पडला, आमच्या घराच्या जवळपास कुठेही गाईम्हशींचा गोठा नाही, एका मंदिराच्या बाहेर गाई बांधलेल्या असतात पण अशी ही अस्सल लावण्यवती तिथली तरी नक्कीच नाही. गाई आमच्या इथल्या रस्त्यांवरही दिसत नाहीत मग ही गोमाता आली कुठून ? आणि चिखलात चालूनही ही एवढी स्वच्छ कशी

आपण आपल्या घरी परतावं तशीच ती अगदी सहजगत्या आमच्या गृहसंकुलात शिरलेली होती. मी आणि अजून दोघे हे सगळं ऑ... करत बघत होतो. माझ्या समोरुन ती आतल्या इमारतींकडे गेली आणि स्वतःच्या घरी जावं अशी ती आमच्या शेजारच्याच इमारतीत शिरली. (इथे एक स्पष्ट करावंसं वाटतं की आमच्या इथे कोणाच्याही घरी गाय नाही) ती दिसेनाशी होईपर्यंत मी आणि ती दोन माणसं तिच्याकडे बघत होतो. ती कुठे जात आहे हे बघण्यासाठी तिचा पाठलाग करण्याएवढा माझ्याकडे वेळ नव्हता. मी संकुलातून बाहेर पडले, त्यामुळे पुढे तिचं काय झालं हे काही माहीत नाही आणि परतले तेव्हाही काही विशेष हालचाली त्या शेजारच्या इमारतीत जाणवल्या नाहीत.
 
हिंदू गाईची पूजा करतात, तिला माता मानतात आणि आज अलौकिक अशी "गोमाता" आपल्याला आज अचानक दिसली अशा भावनेने मी घरी तरी परतले पण डोक्यातून ते तेजःपुंज गोमत्व काही जात नाहीये आणि कधी जाईल असं वाटतही नाहीये. दुःखी होण्यासारखं काही आज घडलंय अशातला भाग नाही पण त्या मातेच्या दर्शनाने मन मात्र एकदम हलकं, प्रफुल्लित झालं आहे; कुठलीतरी अतिशय चांगली अनुभूती मिळाल्यासारखं....!
 
ती कोण होती आणि कुठून आली हे असे प्रश्न तर आहेतच पण या अशा प्रश्नांपेक्षा तिने जो मानसिक अनुभव दिला तो जास्त महत्त्वाचा वाटतो.....!
 
॥ जय गोमाता ॥
॥ जय गोपाल ॥