Wednesday 29 June 2016

शोलेचा खरा शेवट.....खतरनाक



भारतातील आणीबाणी, या आणीबाणीचा परिणाम हिंदी चित्रपटांवरही झाला. त्यातलाच एक चित्रपट "शोले".
 
शोलेचा शेवट सेन्सॉरमुळे बदलावा लागला आणि आणीबाणी असल्यामुळे चित्रपट निर्मात्याच्या हातात फार काही नव्हतं. " सगळं झाल्यावर पोलीस आले आणि त्यांनी गुन्हेगाराला पकडलं " हा असा शेवट कित्येकदा हिंदी सिनेमांचा असतो. " रुक जाओ " म्हणत पोलीस येतात. असाच शोलेचाही शेवट आहे पण खरा शेवट असा नव्हता.
 
चित्रपट सेन्सॉरकडे गेल्यावर त्यांनी आक्षेप घेतला. चित्रपट फारच हिंसक आहे. पण रमेश सिप्पी म्हणाले, ुठे हिंसा आहे ? तुम्हाला रक्ताचा एक थेंब तरी दिसला ? अगदी ठाकूरचे हात छाटण्यावेळीही आम्ही शाल खाली पडताना दाखवली आहे. आम्हाला फक्त प्रसंगांचा परिणाम हवाय आणि इथेच सेन्सॉरने सिप्पींना शब्दात पकडलं. तरी पण सिप्पींनी वाद घातला पण त्याचा फार काही परिणाम झाला नाही. शेवट फारच हिंसक आहे म्हणून सेन्सॉरने चित्रपटाचा शेवट बदलायला सांगितला. इथे परत वादावादी झाली. ठाकूर फक्त आपल्या पायांनी बदला घेत आहे, असा खास शेवट होता. शेवटी सिनेमाच ठाकूरने घेतलेला बदला, यावर बेतलेला आहे !
 
सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख जवळ आली होती आणि सिप्पींनाही समजलं की जास्त वाद घालून उपयोग नाही. शेवट बदलला नाही तर चित्रपट प्रदर्शित करायला मान्यता मिळणार नाही. म्हणून शेवट बदलण्याचं ठरलं. सेन्सॉरवाल्यांनीच चित्रपटाचा शेवट कसा हवा हे सांगितलं.
 
मग परत सिनेमाचं युनिट बंगलोरला गेलं. सेट उभा केला. संजीव कुमार फिल्म फेस्टिव्हलसाठी रशियाला गेले होते. त्यांना तातडीने बोलावून घेण्यात आलं आणि चित्रपट प्रदर्शित होण्यास अगदी काही दिवस उरलेले असताना चित्रपटाचा शेवट पुनर्चित्रीत करण्यात आला. शेवटी पोलीस येतात आणि ठाकूरला म्हणतात की कायदा हातात घेऊ नका, ठाकूर स्वतः पोलीस खात्यातून निवृत्त झाले आहेत वगैरे वगैरे ठाकूरला आठवण करून देतात, असा चित्रपटाचा शेवट करण्यात आला.


हा चित्रपटाचा "खतरनाक" शेवट. शोले या चित्रपटाला शोभेल असाच आणि सोबतीला पंचमचं जबरदस्त संगीत. ब्रूस लीच्या enter the dragon ची आठवण होईल. 

सायना नेहवाल



हरियाणा राज्य...........अजूनही या राज्यातल्या काही गावांमध्ये मुलगी जन्माला आली की पाप समजतात. मग एक तर गर्भातच स्त्रीची हत्या होते किंवा मुलगी जन्मली की तिला मारून टाकलं जातं.

अशाच एका हरियाणवी गावात आजच्याच दिवशी १९९० साली एक कन्या जन्माला आली. पण ती जन्मलेली मुलगी त्या मुलीच्या आजीला नको होती. तिने जोर धरला की या  मुलीला मारून टाकू. हे काही तिथे नवीन नव्हतं .पण मुलीची आई खंबीर होती. या कुप्रथेच्या नावाखाली तिला आपल्या मुलीचा बळी द्यायचा नव्हता .तिने स्पष्ट नकार दिला, सासूविरुद्ध लढली पण आपल्या मुलीला तिने जगवलंच.

ही मुलगी म्हणजे आपल्या देशाचं नाव जगभरात मोठं करणारी बॅडमिंटनपटू "सायना नेहवाल".
तिच्याकडे असलेलं बॅडमिंटन कौशल्य तिच्या पालकांनी लहानपणीच जाणलं.  हरियाणात बॅडमिंटन प्रशिक्षणाची विशेष सोय नव्हती. तेव्हा आपल्या मुलीला चांगलं प्रशिक्षण मिळावं या हेतूने तिचे आईवडील तिला घेऊन हैदराबादला आले आणि तिकडेच स्थायिक झाले.

नेहवाल कुटुंबाचं नाव सायना मोठं करू लागलीही खरं तर अभिमानाची गोष्ट पण तरीही तिच्या आजीने तिला नात म्हणून स्वीकारलं नाही.

आज सायना आपल्या देशाचं नाव मोठं करत आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याची तिची मनीषा आहे .तिचं हे स्वप्न पूर्ण होवो. तिने तिच्या  क्षेत्रातली अनेक शिखरं पादाक्रांत करावीत आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं, हीच सदिच्छा .तिचं वैयक्तिक आयुष्यही सुखासमाधानाचं जावो.