Saturday 2 December 2017

कॉकटेल



सकाळची वेळ आणि स्थळ मुंबईचं वांद्रे टर्मिनस. दिल्लीला जाण्यासाठी एक आगगाडी फलाटावर उभी असते. मुंबईचाच हर्षद गाडीच्या एका वातानुकुलीत डब्यात चढतो. आगगाडीत एका बाजूला समोरासमोर एकेक अशा दोन जागा असतात, त्यातली एक जागा हर्षदची असते. समोरच्या जागेवर जे कोणी असतं ते त्यावेळी तिथे नसतं पण त्यांनी तिथे आपलं सामान ठेवलेलं असतं आणि सामानावरून समजत असतं की कुठल्यातरी मुलीची ती जागा आहे. केसाच्या पिना, हेअर बँड, डोक्याला बांधायचा रुमाल, छोटी बॅग हे सगळं आपलं सामान एकदम अस्ताव्यस्त पसरून बाईसाहेब तिथून गायब असतात. हर्षद आपलं सामान नीट ठेवतो आणि आपल्या जागी बसून राहतो. डब्यात इतर लोकं येत असतात, विक्रेते ये-जा करत असतात, अगदी नेहमीचं आगगाडीच्या डब्यातलं वातावरण तिथे आजूबाजूला असतं. गाडी सुटायची वेळ अगदी जवळ येऊन ठेपते, दोन मिनिटांत आता गाडी सुटणारच पण समोरच्या त्या मुलीचा काही पत्ताच नसतो. हर्षद विचार करतो, “कोण आहे या जागेवर काय माहीत ! आत्ता गाडी सुटेल, जेमतेम दोन मिनिटे उरली आहेत, सामान तर दिसतंय पण कोणाचा काही पत्ताच नाही...” हा विचार तो करतच असतो आणि तेवढ्यात त्याला जोरजोरात बोलण्याचा आवाज यायला लागतो.

कोणी एक मुलगी आणि एक माणूस एकमेकांशी तावातावाने बोलत असतात. हर्षद आवाजाच्या दिशेने जातो.

मुलगी : हो हो... माहीत आहे मला. मला सिव्हिक सेंस शिकवू नका
माणूस : हे बघा मी तुम्हाला काही शिकवत नाहीये. मी फक्त सांगितलं कारण आपला डबा वातानुकुलीत आहे, आत सगळीकडे वास सुटेल आणि हा वास सगळ्यांना सहन होईलच असं नाही.
मुलगी : (अजूनच चिडत)बाकीच्यांचं कशाला वकीलपत्र घेताय, तुम्ही तुमचं बोला हो... (एवढं बोलून ती हातातली पुदिन्याची गोळी, इतर अजून काही गोळ्या, बबलगम दाखवते) वास येऊ नये म्हणूनच हे सगळं मी जवळ ठेवते. अजून गुन्हा झाला नाही आणि पोलिसांनी गुन्हेगार म्हणून आत टाकावं, हे असंच झालं. (असं म्हणत ती एक बबलगम तोंडात टाकते)

तेवढ्यात हर्षद आणि अजून दोन चार लोकं तिथे जमतात आणि काय झालं विचारायला लागतात. ती मुलगी आणि तो माणूस आपल्याच मनाशी काहीतरी पुटपुटत तिथून निघून जातात. ती मुलगी आपल्या जागेवर येऊन बसते, हर्षदच्या समोरची जागा तिचीच असते. गाडी सुटते आणि ती वांद्रे टर्मिनस सोडते. आत वातानुकुलीत यंत्रणा असते पण तिचं डोकं घडलेल्या प्रकारामुळे गरम झालेलं असतं. ती काचेच्या खिडकीतून बाहेर बघत मनात सगळा राग त्या बबलगमवर काढत ते कचा कचा चावत शांतपणे बसलेली असते. पुढे अंधेरी येऊन जातं पण गाडी थांबली, गाडी सुटली याकडे तिचं काही लक्षच नसतं. आपल्याच नादात किंवा म्हणा आपल्याच रागात ती इतकी मग्न असते की आजूबाजूला काय चाललंय याचं तिला काहीच भान नसतं. पुढे बोरीवली स्थानक येतं, डब्यात लोकं चढायला लागतात आणि त्यामुळे लोकांचे ये-जा करण्याचे, बडबडण्याचे आवाज यायला लागतात आणि तिची ती रागीट समाधी भंग पावते. पहिल्यांदा तिचं लक्ष जातं हर्षदकडे कारण तो तिच्या समोरच बसलेला असतो. ती त्याच्याकडे एक कटाक्ष टाकते आणि मग आजूबाजूच्या आवाजाकडे बघायला लागते. मनातला राग अजून शांत झालेला नसला तरी मन आता त्या डब्यात, वास्तवात परतलेलं असतं. बोरीवलीहूनही गाडी सुटते आणि हळूहळू डब्यातले आवाजही बंद होतात.

ती समोर हर्षदकडे बघायला लागते. एक गोरा, उंच, अंगाने बलदंड असा हर्षद तिच्यासमोर बसलेला असतो. एक शान असावी अशी छान पिळदार अशी मिशी त्याने वाढवलेली असते. ती मिशी ती बघते आणि मनातल्या मनात म्हणते, “एरवी मिशी हा प्रकार मला अजिबात आवडत नाही, ईईई मिशी कसली...! पण याची मिशी रुबाबदार आहे आणि याच्या व्यक्तिमत्त्वालाही शोभतीय पण, दाढी !” हर्षदने थोडी दाढी वाढवलेली असते आणि ती तिला अजिबात आवडलेली नसते. टी शर्ट, जीन्सपण ओके आहे, डोक्यावर गॉगल लावलाय पण, दाढी ! हा ती विचारच करत असते आणि तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या हातातल्या पुस्तकाकडे जातं, ते पुस्तक बघून तिच्या लक्षात येतं की कुठलंतरी धार्मिक पुस्तक आहे हे आणि हे बघून तिला अजूनच वैतागायला होतं. ती पुस्तकाचं पुढचं पान बघायचा प्रयत्न करते पण ‘गीता प्रेस, गोरखपूर’ या व्यतिरिक्त तिला काहीच नीट वाचता येत नाही. दिसायला सुंदर पण जवळजवळ वाया गेलेली एक उनाड मुलगी, केस मोकळे सोडलेले आणि अधूनमधून डोळ्यांवर येणारे, अंगावर जरासा खोल गळ्याचा टी शर्ट आणि गुडघ्यापर्यंत असणारी अर्धी जीन्स घातलेली ती आणि तिच्यासमोर हा असा हर्षद बघून ती मनातून प्रचंड वैतागते. तिला तिच्या डिस्कमधली, पार्ट्यांमधली मुलं हर्षदला बघून आठवायला लागतात आणि आता इतके तास या धार्मिक पुस्तक वाचणाऱ्या मुलासमोर बसून काढायचे ही कल्पनाच तिला करवत नाही. आपल्या या दिल्लीपर्यंतच्या प्रवासाचं काही खरं नाही, सुरुवात भांडणाने झाली आणि आता समोर हा गीता प्रेसचं पुस्तक वाचणारा, गीता प्रेस ईईई नावच किती बोअरिंग आहे... कठीण आहे असा विचार करत चेहऱ्यावर आठ्या आणत खिडकीतून बाहेर बघत ती बसून राहते.

थोड्यावेळाने ती तिथून उठते, ते बबलगम जाऊन टाकते आणि पुदिन्याची गोळी चघळत परत येते. आपल्या जागेवर येऊन बसते पण सारखी चुळबुळ करायला लागते. कुठे पर्स उघड उगाच काहीतरी खुडखुड कर, छोट्या बॅगेचा इकडचा तिकडचा कप्पा उघड, इतका वेळ फारसं लक्ष न देणारा हर्षद आता मात्र तिच्या या चुळबुळीकडे बघायला लागतो. हर्षद आपल्याकडे बघतोय हे बघून ती म्हणते, “आपण सीट खाली घेऊयात का, बसून कंटाळा आलाय, जरा पाय पसरून बसता येईल..” तिच्या या बोलण्यात बेफिकिरी असते, माज असतो. माज दाखवण्याचं खरं तर काहीच कारण नसतं पण तरीही मी तुझ्याशी बोलतीय हे खरं तर तुझ्यावर उपकार आहेत असे भाव चेहऱ्यावर आणत ती हर्षदशी हे वाक्य बोलते. हर्षद तिच्या त्या चेहऱ्याकडे बघतो, त्या बोलण्यातलं, चेहऱ्यावरच्या भावांमधलं जे काही टिपायचं ते टिपतो आणि शांतपणे म्हणतो, “हो... चालेल ना..” हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर अगदी शांत, नम्र भाव असतात. ती चेहऱ्यावर आठ्या आणत उठते आणि सीट खाली करते, तो ही हेच काम अगदी शांत चेहऱ्याने करतो. कोणासमोर बसावं लागतंय अशा अविर्भावात ती तिथे पाय पसरून बसते, कानात इयरफोन घालून गाणी ऐकायला लागते. हर्षद फेसबुक, व्हॉट्सऍप उघडून बसतो. तेवढ्यात त्याला एक फोन येतो, तो ही एक दोन फोन करतो. राजकारण, कुठल्या संघटनेचं काम याबद्दलच त्याचं फोनवर बोलणं होतं. प्रत्येक फोनच्या वेळी ती गाणी बंद करायची आणि तो काय काय बोलतोय हे समोर बसून ऐकायची. राजकारण, संघटनेचं काम याबद्दल ऐकून तिला वाटायला लागतं की शी... कसले बोअरिंग विषय, आणि हे असले विषय चघळणारी लोकंही अजूनच बोअरिंग.

रात्र होते. आगगाडीतली लोकं झोपायला लागतात. हर्षद आणि तीही झोपतात. रेल्वेकडून उशी, अंथरूण पांघरूण मिळालेलं असतं ते अंथरून ती खालच्या बाकावर आणि हर्षद वरच्या बर्थवर झोपतात. मध्यरात्र केव्हाची उलटून जाते आणि हर्षदला जाग येते. तो उठतो आणि प्रसाधनगृहाकडे जातो. परत येतो आणि बघतो की अतिशय माज दाखवणाऱ्या आपल्या समोरच्या मुलीच्या पायांवरून पांघरूण सरकल्याने तिचे पाय उघडे पडलेत. तो आजूबाजूला इतर लोकांकडे बघतो आणि मग तिच्याकडे बघतो. तिला गाढ झोप लागलेली असते. मग तो तिचं ते सरकलेलं पांघरूण तिला नीट घालतो आणि मग तो वरच्या बर्थवर जाऊन झोपतो. एका सार्वजनिक ठिकाणी एका तरुण मुलीचे झोपेत असे उघडे पाय दिसत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करणे त्याला पटत नाही. तो पांघरूण घालतो आणि तेवढ्यात तिला याची जाणीव होते, आणि ती जागी होते. गालातल्या गालात हसतच ती वरच्या बर्थच्या दिशेने बघत परत एकदा हसते आणि झोपी जाते. कोणी परका मुलगा आपली अशी काळजी घेत आहे आणि ते ही रेल्वेत ही भावना तिला सुखावून जाते. या हास्यात माज नसतो, बेफिकिरीचा लवलेशही नसतो.

दुसरा दिवस उजाडतो. सकाळचे साडेआठ वाजून जातात पण ही झोपेतून उठत नाही. हर्षद केव्हाच उठून सकाळचे सगळे विधी उरकून वरती बर्थवर चहा पीत बसलेला असतो. तेवढ्यात ती उठते आणि खिडकीतून बाहेर बघते, बाहेर लख्ख उजेड दिसतो. आजूबाजूला बघते तर सगळे उठलेले असतात, मग ती वरच्या बर्थवर हर्षदकडे बघते आणि म्हणते,

ती – गुड मॉर्निंग.... किती वाजलेत ?
हर्षद – नऊ वाजायला आलेत
ती – बापरे... अहो मला उठवायचंत तरी. उगाच तुम्हाला वर बसायला लागलं
हर्षद – नाही ठीक आहे. कुठे झोपेतनं उठवायचं म्हणून नाही उठवलं.

तिचं हे सरळ साधं बोलणं ऐकून हर्षदला आश्चर्य वाटतं, कुठे कालची गुर्मीत बोलणारी ही आणि कुठे आज अगदी साधं बोलणारी ही ! हर्षद बसायला खाली येतो. थोड्यावेळाने तिथे एक कॉफीवाला येतो, ती त्याला थांबवते आणि त्याच्याकडून कॉफी घेते. हर्षदही कॉफी घेतो.

ती : तुम्ही आत्ताच घेतलात ना चहा का कॉफी काहीतरी, परत ?

खरं तर तिने हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नसते पण हर्षदशी काहीतरी बोलायला मिळावं म्हणून ती हा प्रश्न विचारते.

हर्षद : हो... चहा घेतला पण मला खरं तर मगाशीही कॉफीच हवी होती, मगाशी मिळाली नाही म्हणून आत्ता...
ती : अच्छा.... पण ही पेय जास्त पण चांगली नाहीत ना... पण एखाद्या वेळी ठीक आहे.

हर्षद काहीच बोलत नाही, फक्त हसतो. तिचं हे माज विरहीत बोलणं ऐकून त्याला आश्चर्य वाटतं, पण काल त्याचं पांघरूण घालणं तिला सुखावून गेलंय हे त्याला कुठे माहीत ! तेवढ्यात त्याला फोन येतो आणि त्याचं ते फोनवरचं बोलणं परत ती नीट ऐकायला लागते. कुठली मीटिंग, औषधं हे असं काहीतरी ऐकून परत ती गोंधळून जाते आणि मग त्यालाच विचारते.

ती : कामाचा फोन ?
तो : हो...
ती : तुम्हाला वाटेल की मी थेट विचारत आहे पण तुम्ही नक्की काय करता कारण काल तुम्ही कुठल्या संघटनेबद्दल फोनवर बोलत होतात, मग राजकारण आणि आज हे औषधं वगैरे...
तो : मी एका हिंदू संघटनेचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे माझा संबंध राजकारणाशीही येतो आणि माझी स्वतःची एक आयुर्वेदिक कंपनी आहे, मी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजेच वैद्यही आहे त्यामुळे माझा संबंध औषधांशीही येतो.
ती : बापरे... वैद्य आणि हिंदू संघटना पण राहणीमान मात्र तुमचं वेगळं आहे.

हे वाक्य ऐकून हर्षद हसायला लागतो आणि फोनमध्ये डोकं घालून कॉफी प्यायला लागतो. ती मात्र त्याच्या कपड्यांकडे, त्याच्याकडे बघायला लागते. त्याचे कपडे, बूट, मनगटावरचं घड्याळ, एवढंच काय काल तो डोक्यावर दिसलेला गॉगलही ब्रँडेड असतो. तिला हर्षदचं हे व्यक्तिमत्त्व इम्प्रेस करतं. ती अजून पुढे बोलणं वाढवते.

ती : मग तुम्ही दिल्लीला कुठल्या मीटिंगसाठी चालला आहात का ?
तो : दिल्लीला नाही, ऋषिकेशला..
ती : ओह्ह्ह... मी तुम्हाला एवढे प्रश्न विचारले पण स्वतःचं साधं नावही सांगितलं नाही, मी रॅश
तो : रॅश ??
ती : रश्मी.. मला माझे फ्रेंड्स रॅश म्हणतात.
तो : (तिचं आदल्या दिवशीचं सोंग आठवून) हो ते आलं लक्षात
ती : म्हणजे ?
तो : नाही काही नाही... मग दिल्लीला का असंच ? का काय ?
ती : अंअंअं... हो असंच, काही खास कारण नाही 

हर्षद अच्छा म्हणत परत आपल्या फोनमध्ये डोकं घालतो आणि रश्मी एकदा खिडकीबाहेर बघ आणि एकदा त्याच्याकडे बघ असं करत कुठल्यातरी विचारात मग्न होते. हर्षदने मध्यरात्री काळजीने घातलेलं पांघरूण, आपण कितीही उर्मट वागलो तरी त्याचं आपल्याशी अगदी नम्र वागणं, हे सगळं तिला वारंवार आठवत असतं. हाहा म्हणता आगगाडी दिल्लीच्या वेशीच्या जवळ येते आणि हे बघून हर्षद म्हणतो, “आलं दिल्ली, अर्ध्या पाऊण तासांत आपण नवी दिल्लीला पोहोचू.” हे वाक्य रश्मी ऐकते आणि तिच्या मनातलं वादळ तिच्या मनातल्या विचारांना अजूनच सैरभैर करतं. आत्ता दिल्लीला पोहोचू, काय करावं आता... वेळ खूपच कमी आहे असा विचार करत ती हर्षदला विचारते..

ती : तुम्ही काय आजच ऋषिकेशला जाणार ?
तो : (आता इतके तास एकत्र काढल्याने आणि सकाळपासून रश्मीचं अगदी साधं वागणं बघून बोलण्यातला अवघडलेपणा अजिबातच गेलेला असल्याने मोकळेपणाने हर्षद म्हणतो) नाही आज नाही, उद्या सकाळी जाईन. आज माझं दिल्लीत एक कामही आहे आणि हा एवढा प्रवास झाल्यावर अजून एक प्रवास, फार जास्त होईल.
ती : मी येऊ तुमच्याबरोबर... ऋषिकेशला ?
तो : काय ? तुम्ही आणि माझ्याबरोबर ? काय संबंध ? काही नको
ती : प्लीज प्लीज प्लीज.... येते ना
तो : पण का ? म्हणजे मला एक समजत नाहीये की तुम्ही मला हे विचारूच कसं शकता !
ती : प्लीज
तो : नाही.... आणि माझ्याबरोबर तर नाहीच पण एकंदरच ऋषिकेश ही तुम्ही जाण्याची जागा नाहीये. तिकडे मांसाहार मिळत नाही, पार्ट्या, दारू आणि हो ती सिगरेट पण नाही. ते एक धार्मिक नगर आहे, ती तुम्ही जाण्याची जागा नाही.
(हर्षद अगदी रोखठोक बोलतो)
ती : (हर्षदचं बोलणं ऐकून खजील होत) नाही मला यातलं काहीच नकोय, पण तुम्ही मला बरोबर घेऊन चला... (दोन सेकंद थांबत रश्मी म्हणते) तुम्ही सिगरेटबद्दल मुद्दाम अधोरेखित केल्यासारखं बोललात, म्हणजे तुम्ही काल...?
तो : हो.... काल तुम्ही अगदी गाडी सुटण्याच्या वेळेला आलात तेव्हा तुमची आणि त्या माणसाची कशावरून वादावादी चालली होती हे मला काल त्याचवेळी समजलं होतं.

हे ऐकून रश्मी काहीच बोलत नाही आणि सामानाची आवराआवरी करायला लागते. थोड्या वेळात नवी दिल्ली येतं, गाडी स्थानकात शिरते, आता उतरायचंच आणि तेवढ्यात रश्मी परत एकदा हर्षदला म्हणते, “प्लीज...” एकाही सेकंदाचा वेळ न घालवता हर्षद तिला ठामपणे उत्तर देतो, “नाही....” असं म्हणून तो गाडीतून उतरून जाऊ लागतो. रश्मीही त्याच्या मागोमाग जायला लागते. हर्षद रेल्वे स्थानकातून बाहेर येतो आणि टॅक्सी स्टँडकडे जायला लागतो पण तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की रश्मी आपल्या मागेमागेच येत आहे. टॅक्सी स्टँडवर तमाशा नको म्हणून तो मध्येच थांबतो, तेवढ्यात तिथे रश्मीही येतेच.

लगेच हर्षद तिला म्हणतो, “का येत आहात तुम्ही माझ्या मागे मागे ? हे बघ योगायोगाने आपण ट्रेनमध्ये समोरासमोरच्या बाकांवर होतो. एवढा मोठा प्रवास होता त्यामुळे आपण जास्त काळ एकत्र प्रवास केला. बास... एवढंच. ना मी तुम्हाला या आधी पाहिलं होतं आणि ना तुम्ही मला. प्रवासात सहप्रवासी भेटतात आणि प्रवास संपला की ते आपल्या मार्गाने निघून जातात.”
ती हे हर्षदचं बोलणं शांतपणे ऐकून घेते आणि म्हणते की “मला तुमच्याबरोबर ऋषिकेशला यायचंय. तिकडे मी कधीच गेलेले नाही. डिस्कव्हरीवर पाहिलंय एकदा राम झुला, लक्ष्मण झुला... आता तुम्ही म्हणाल की मग जा की पण माझ्याबरोबरच का ? तर तुम्ही अनायासे तिकडे जातच आहात तर तुमच्याबरोबर... मी तुम्हाला कुठलाही त्रास देणार नाही, डोंट वरी..”

हर्षद यापुढे काहीतरी बोलणार असतो, पण काहीच न बोलता तिकडून तो तडक टॅक्सी स्टँडकडे जातो. रश्मीही त्याच्या मागेमागे जाते. तो टॅक्सीवाल्याला सांगतो, “कॅनॉट प्लेस” आणि आत टॅक्सीत बसतो. मीटर पडतो, टॅक्सी तिथून निघते. रश्मी त्याच्या मागेच असते. ती त्याच्या मागची टॅक्सी पकडते आणि सांगते “कॅनॉट प्लेस आणि या टॅक्सीच्या मागे चला.” रश्मीचा टॅक्सीवाला म्हणतो, “पाठलाग ! मॅडम काय झालं ? पाठलाग का हो ? काही मॅटर झालंय का ? काही गडबड तर नाही ना ?” रश्मी म्हणते, “नाही हो, ते पुढच्या टॅक्सीत बसलेत ते माझे चांगले मित्र आहेत. आमचं भांडण झालंय. म्हणजे चूक माझीच आहे पण ते जरा रागावलेत.” टॅक्सीवाला म्हणतो, “अस्स होय... तुम्ही काही काळजी करू नका मॅडम, मी तुम्हाला कॅनॉट प्लेसला त्यांच्या मागे मागे बरोबर नेऊन सोडतो.” दोन्ही टॅक्सी इप्सित स्थळी पोहोचतात आणि हर्षदच्या लक्षात येतं की रश्मी आपला पाठलाग करत आता इथपर्यंत येऊन पोहोचली आहे.

हर्षद : तर तू ऐकणार नाहीस तर...
रश्मी : मला ऋषिकेशला यायचंच आहे आणि ते ही तुमच्याबरोबरच
हर्षद : पण का माझ्याबरोबरच का ? मी कोण लागून गेलोय तुझा ?
रश्मी : कोणी नाही पण एकटीने तिकडे जाण्यापेक्षा तुमच्याबरोबर गेले तर जरा चांगलं
हर्षद : का ? माझ्याबरोबर का चांगलं ? तू अशी मला किती ओळखतेस ?
रश्मी : (छोटंसं हास्य चेहऱ्यावर आणत) तुम्ही मला ते अहोजाहो करण्यापेक्षा एकेरीत संबोधायला लागला आहात ते एक बरं झालंय, मला ते तुम्ही, अहो हे फार जड वाटत होतं.
हर्षद : (चूक लक्षात आल्याने थोडं खजील होत) अर्रर्र हो... सॉरी पण सांगा ना किती ओळख आहे आपली अशी की तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवत आहात ते..

रश्मी : मी मुंबई-दिल्ली एकटीने प्रवास असाच नाही केलाय, माणसं ओळखू येतात मला. अगदी पूर्ण नसली तरी बऱ्यापैकी नक्कीच. कालपासून मी तुम्हाला बघत आहे, त्यातून तुम्ही कसे असाल याचा अंदाज आलाय आणि मध्यरात्री माझे पाय उघडे पडलेत म्हणून माझ्या अंगावरचं पांघरूण नीट करणारे असे फालतू वगैरे असणारच नाहीत. माझं जे जग आहे त्याच्या अगदी विरुद्ध जग ऋषिकेशला असेल, त्यामुळे या वेगळ्या ठिकाणी जाण्यास मी उत्सुक आहे आणि तुम्ही तिकडे जातच आहात म्हणून तुमच्याबरोबर मला यायचंय. (पुढे दोन क्षण थांबत लगेच रश्मी म्हणते) एक मिनिट, तुम्हाला असं तर वाटत नाहीये ना की मी कोणी चोर वगैरे असेन, तुम्हाला रस्त्यात लुबाडीन...

हर्षद : नाही नाही आणि असं काही तुझ्या डोक्यात जरी असलं तरी मी तुला तोंड द्यायला समर्थ आहे. ठीक आहे, आता तू माझं काही ऐकशील असं मला वाटत नाही, तेव्हा आता काय बोलणार... उद्या सकाळी साडेसातला मी इथून निघणार आहे. टॅक्सी करून थेट ऋषिकेश, दोन दिवस माझं काम आहे आणि एक दिवस तिथेच शांत ठिकाणी राहणार आहे. गंगेच्या काठीच एके ठिकाणी राहणार, जागा साधीच आहे पण तिथल्या खोल्यांच्या खिडकीतून थेट गंगेचं दर्शन होत असल्याने मला तिकडे रहायला आवडतं. तुला बरोबर यायचं असेल तर उद्या सकाळी बरोब्बर ७.३०ला तयार रहा. इथे समोरच एक फेमस पब आहे, तिकडे रात्री गेलीस तर उद्या तू इथे सकाळी वेळेवर येणं कठीण आहे.. (हे पबचं तो मुद्दामून बोलतो) सकाळी वेळेवर आली नाहीस तर मी इथून निघून जाणार...

रश्मी – डन... मी इथे शार्प ७.३०ला हजर राहते आणि समोरच्या हॉटेलमध्ये रूम मिळत आहे का ते बघते.
हर्षद – ठीक आहे. उद्या भेटू...

हर्षद आत हॉटेलमध्ये जातो आणि एक खोलीची किल्ली घेऊन खोलीवर जातो. रश्मी बरोबर समोरच्या हॉटेलमध्ये जाते आणि रस्त्याच्या बाजूलाच खोलीची खिडकी येईल अशी खोली स्वतःसाठी नक्की करते. रश्मी खोलीत आधी येऊन फ्रेश होते, आणि शांतपणे त्या खिडकीजवळच्या खुर्चीत बसून बाहेर बघत विचार करायला लागते. मुंबईला आगगाडीत बसल्यापासूनचे सगळे विचार तिच्या मनात डोकावायला लागतात आणि खास करून हर्षदचे विचार तिचं मन व्यापून टाकतात. त्याची योगायोगाने झालेली भेट आणि त्याचं ते उलगडत गेलेलं व्यक्तिमत्त्व याने तिचं मन भारावलेलं असतं. राहणीमान चांगलं, त्याच्या वस्तू, कपडे सगळं उंची म्हणजे एकंदर पैसेवाला वाटतो, पण व्यक्तिमत्त्व किती वेगळं ! श्रीमंत असूनही, ते नेहमीचं डिस्क आणि पार्ट्यावालं व्यक्तिमत्त्व नाही, हे असं कसं काय ! असं उत्सुकता वजा कुतूहल तिला हर्षदबद्दल वाटायला लागतं. तेवढ्यात तिचं लक्ष हर्षद थांबलेल्या त्या समोरच्या हॉटेलकडे जातं आणि त्या हॉटेलच्या एका खोलीत तिला हर्षदही दिसतो. रश्मी त्याला बघते आणि तिची चेहऱ्यावरची कळी एकदम खुलते.

मग तिच्या डोक्यात येतं की आता ऋषिकेशला कुठले कपडे घालायचे ! तिकडे नॉनव्हेज नाही, दारू नाही, सिगरेट नाही म्हणजे तिकडे कपडे पण वेगळे घालावे लागणार. आपण नेहमी घालतो तसे कमी उंचीचे घालून चालणार नाही, आणि हा विचार करत ती आपल्या दोन्ही बॅगा उघडते आणि त्यातले कपडे भराभरा बाहेर काढायला लागते. सगळे कपडे बाहेर काढून बघितल्यावर तिचा चेहराच पटकन उतरतो कारण तिच्याकडे कमी उंचीचेच कपडे जास्त असतात. कसेबसे दोन चार कपडे तिला असे मिळतात की ती ते तिकडे ऋषिकेशला घालू शकेल. काय करावं तीन चार दिवस कपडे कसे घालावेत हा विचार ती करायला लागते.

संध्याकाळ होते आणि हर्षद आपल्या दिल्लीतल्या कामासाठी बाहेर पडतो, रश्मी त्याला जाताना बघतेच. तिलाही खोलीत बसून बसून कंटाळा येतो म्हणून तीही हॉटेलच्या बाहेर पडते. जरा बाहेर भटकून येते आणि येताना शेजारच्या पबमधून चिल्ड बिअरही घेते. तिला सिगरेटची तल्लफ पण येते म्हणून ती सिगरेटही काढते. त्या पबच्या बाहेरच एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात बिअर, असं तिचं चालू होतं आणि मनात अखंड ऋषिकेश, हर्षद आणि ती स्वतः, हेच विचार. एक सिगरेट संपते आणि पहिली सिगरेट टाकून ती दुसरी पेटवायलाच लागते आणि नेमकं त्याच वेळेला हर्षद तिला पाहतो. तिचं लक्ष नसतं पण तिच्याबद्दल जो काही विचार करायचा तो करत तो त्याच्या हॉटेलच्या दिशेने निघून जातो.

रात्री लवकर रश्मी हॉटेलच्या खोलीतच जेवण मागवते आणि लवकर झोपावं या विचाराने झोपायची तयारी करायला लागते. सकाळी ७.३०ला खाली पोहोचायचं म्हणजे सकाळी ६.१५-६.३०ला उठावं लागणार, कसं जमणार ! एरवी रात्री उशिरा वाट्टेल त्या वेळेला झोपणारी आणि सूर्य डोक्यावर आला तरी न उठणारी ती सकाळी इतक्या लवकर कशी उठणार ! ती रिसेप्शनला फोन करून सकाळी ६ वाजता उठवायला सांगते आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करते. रात्रीचे १०.३० वाजलेले असतात आणि ही वेळ तिची रात्रीच्या जेवणाचीही नसते आणि ती त्या वेळी झोपी जाण्याचा प्रयत्न करत असते. रात्रीचे ११, १२, १, २ वाजून जातात पण तिला काही झोप येण्याचं नाव घेत नाही. सारखं डोक्यात हेच आपण सकाळी कसे उठणार ! रिसेप्शनचा फोन आल्यावरही आपण परत झोपलो तर ! हाच विचार चालू असताना अडीचच्या पुढे तिला झोप लागते पण झोप अतिशय सावध असते. झोपेतही तिच्या डोक्यात आपण कसे उठणार हेच असतं. सकाळी साडेपाचला तिला जाग येते, डोळ्यांवर झोप असते पण परत झोपावं असं तिला वाटत नाही. सांगितल्याप्रमाणे रिसेप्शनमधूनही ६ वाजता फोन येतो, फोनवर ती एक कॉफी पाठवायला सांगते आणि हे ही सांगते की माझा सगळा हिशोब करून ठेवा. मला हिशोबासाठी नंतर थांबता येणार नाही. ती कॉफी घेते, भराभरा स्वतःचं आवरते. सामान भरून बरोब्बर ७.१५ ला आपल्या खोलीतून बाहेर पडते आणि निघताना हॉटेलच्या खोलीच्या फ्रीजमध्ये ठेवलेले बिअरचे दोन कॅनही घेते. ऋषिकेशला हे असलं काहीही चालणार नाही हे हर्षदने बजावूनही ती आदल्या संध्याकाळी शेजारच्या पबमधून ऋषिकेशला घेऊन जाण्यासाठी बिअरचे हे कॅन बरोबर घेतेच. तिने अगोदर सांगितल्याप्रमाणे तिचा हॉटेलचा सगळा हिशोब तयार असतो, ती ते पैसे देऊन हॉटेलमधून बाहेर पडते आणि हर्षदच्या हॉटेलच्या बाहेर येऊन त्याची वाट बघत उभी राहते.

बरोबर ७.२५ ला हर्षदच्या हॉटेलच्या बाहेर त्याची वाट बघत उभी असलेली रश्मी ७.४५ होतात तरी तशीच उभी असते. ७.३० निघायचं आणि हर्षद अजून आला कसा नाही या विचाराने ती हर्षदच्या हॉटेलच्या बाहेर येरझारा घालायला लागते. येरझारा घालूनही कंटाळलेली रश्मी शेवटी शेजारच्या दुकानाच्या पायरीवर जाऊन बसते. ७.३० ला निघायचं आणि ८ वाजले पण या हर्षदचा पत्ता नाही म्हणून वैतागते आणि तिच्या डोक्यात येतं की हर्षद आपल्याला टाळून ऋषिकेशला निघून तर गेला नसेल ना ! नाहीतर आपल्याला सांगितलं ७.३० आणि हा ७ लाच गेला असायचा ! असा विचार करत असतानाच त्या हॉटेलच्या बाहेर एक टॅक्सी येते. रश्मीला आशा वाटते की कदाचित ही टॅक्सी हर्षदने बोलावली असेल ! त्या टॅक्सीकडे बघत रश्मी तिथेच बसून राहते आणि ८.१० ला हर्षद आपल्या सामानासह हॉटेलच्या बाहेर येतो. हर्षदला बघून रश्मीचा जीव भांड्यात पडतो. ती तिथून उठते आणि हर्षदच्या दिशेने जायला लागते, हर्षद तिला पाहतो आणि म्हणतो, “म्हणजे तुला माझ्याबरोबर यायचंच आहे तर !” रश्मी म्हणते, “म्हणजे काय, मी म्हणाले होते ना येते आणि मी ७.२५ पासून इथे उभी आहे. ७.३०ला निघायचं होतं ना !” हर्षद म्हणतो, “म्हणजे तू सांगितलेल्या वेळेला आलीस तर. चल.... आता मी तुला म्हणणार नाही की, मी तुला बरोबर नेणार नाही म्हणून आणि ते वेळेचं म्हणशील तर मीच मुद्दाम चुकीची वेळ सांगितली. थोडी आधीचीच... तू ऋषिकेशला येण्यासाठी किती गंभीर आहेस, हे मला बघायचं होतं. मी टॅक्सीला ८.१५ लाच यायला सांगितलं होतं. चल आता...” रश्मी हे ऐकून वैतागते पण पुढे काहीच न बोलता आपलं सामान घेऊन टॅक्सीकडे जायला लागते. टॅक्सीच्या डिकीत हर्षद आणि रश्मी आपलं सामान ठेवतात आणि आता टॅक्सीत बसणार तितक्यात हर्षदला रश्मीच्या हातातले बिअरचे कॅन दिसतात आणि तो विचारतो. “हे काय आहे ? सांगितलं होतं ना की हे असलं काही तिकडे चालणार नाही म्हणून...” रश्मी खजील होते आणि म्हणते, “आता काय करू ! मी हे तिकडे पोहोचायच्या आधी संपवून टाकीन...” आपण घातलेला टॉप कदाचित ऋषिकेशसारख्या ठिकाणी योग्य नसेल या विचाराने तिने स्वतःबरोबर एक पातळसर सुती कोट घेतलेला असतो. टॅक्सीत बसण्याआधी रश्मी तो आपल्या अंगात घालते. थंडी नसतानाही रश्मी अंगात कोट घालत आहे हे हर्षद बघतो आणि तिच्यातला हा चांगला बदल बघून सुखावतो. आगगाडीत भेटलेली ती मस्तवाल रश्मी त्याला आठवते आणि आत्ता आपल्याबरोबर आलीय ती तीच रश्मी आहे का हा त्याला प्रश्न पडतो, एवढा बदल आणि तो ही काही तासांत !

टॅक्सीत त्यांच्या हळूहळू गप्पा सुरु होतात. हर्षद हिंदू संघटनेचं काम करतो म्हणजे नक्की काय काय करतो हे रश्मी विचारते. त्याला आलेल्या अडचणी, कामातले अडथळे याबद्दलही ती जाणून घेते. स्वतःच्याच मस्तीत जगणाऱ्या रश्मीसाठी या गोष्टी अचंबित करणाऱ्या असतात. हर्षद एक वैद्य आहे हे जेव्हा तिला कळतं तेव्हा तिला कसं वाटलं हे ही ती त्याला सांगायला लागते, “वैद्य म्हणजे तर धोतर नेसलेले जुन्या काळातले म्हातारे वगैरे असतात आणि हा तर आजच्या काळातला दिसतोय ! हा तर एक धक्का होता माझ्यासाठी”, हे ही रश्मी सांगते. अशा गप्पा यांच्या सुरु होतात. दरम्यान त्याला दोन वेळा मोबईलवर फोन येतात. दुसरा फोन होतो आणि हर्षद रश्मीला विचारतो..

हर्षद : तू काय करतेस ? आणि तुला कधीच फोनवर बोलताना पाहिलं नाही, कालच्या एवढ्या मोठ्या प्रवासातही नाही. प्रवासात घरून फोन वगैरे आलाय असंही कधी दिसलं नाही.

रश्मी : फोन ना आहे ना... (म्हणत आपल्या पर्समध्ये फोन शोधायला लागते पण तो तिला मिळत नाही) बहुतेक बॅगेत राहिलाय...

हर्षद : मग टॅक्सी थांबवूयात का... कोणाचा फोन आला तर, घरून आला तर... घरचे काळजी करतील !
रश्मी : नको नको.... राहूदेत

हर्षद : बरं... पण तू करतेस काय ? कालपासून आपलं माझ्याबद्दलच बोलणं चालू आहे. जरा तुझ्याबद्दलही काही सांग..

रश्मी : मी MBA केलंय फायनान्समध्ये, आत्ताच झाले आणि आता नोकरी...
हर्षद : मग दिल्ली ? आणि अचानक ऋषिकेश ?

रश्मी : मला १ तारखेपासून नोकरीवर जायचंय म्हणून जरा हवाबदल म्हणून, मग काय एकदा रुटीन सुरु झालं की कुठलं जमायला...

हर्षद : पण तू काहीतरी ठरवून आली असशील किंवा दिल्लीला कोणाच्या घरी जाणार असशील, असं काहीतरी असेलच ना... आणि अचानक माझ्याबरोबर..?

रश्मी : सांगितलं ना... मी कधीच ऋषिकेशला गेले नाही, म्हणून.... आणि दिल्लीला मी मैत्रिणीकडे जाणार होते, तिला मी सांगितलं की माझा बेत थोडा बदललाय आणि मी तुझ्याकडे तीन चार दिवसांनी येते.

हर्षद : अच्छा... पण दिल्लीला आल्यावर बेत बदलला आणि ती यावर काहीच बोलली नाही, काही विचारलं नाही ?
रश्मी : माझा स्वभाव तिला माहीत आहे ना, तडकाफडकी माझे असे बेत बदलत असतात ते...

रश्मी आणि हर्षद यांच्या गप्पा चालू असतात आणि ऋषिकेश जवळ आल्याची हर्षदला चाहूल लागते आणि तो रश्मीला म्हणतो, “मी इथे आलो की नेहमी एकाच ठिकाणी उतरतो. अगदी साधी जागा आहे पण त्या विश्रामगृहाच्या खोल्या अशा आहेत की प्रत्येक खोलीतून गंगा नदी दिसते. गंगेच्या अगदी जवळ आहे ते विश्रामगृह. हायफाय वातावरण असं तिकडे काहीही नाही. चालेल का तुला ?” रश्मी बाहेरचे रस्ते, वातावरण बघण्यात इतकी दंग असते की हर्षद काय बोलत आहे ते ती नीट ऐकतही नाही आणि एवढंच म्हणते, “चालेल चालेल... तू जिथे राहशील तिथे चालेल..” आणि लगेच म्हणते, “कसलं अमेझिंग वाटतंय... एकदम प्युअर, ताजंतवानं... मी आयुष्यात पहिल्यांदा हे असं फील करत आहे..” हे बोलते आणि हर्षदकडे बघून हसते. एव्हाना रश्मी कुठल्या वातावरणातली आहे याचा थोडाफार अनुभव आलेला असल्याने तिचं हे वाक्य त्याला अती किंवा आश्चर्यकारक वाटत नाही.

आणि म्हणता म्हणता हे दोघे ऋषिकेशला त्या अतिशय साध्या विश्रामगृहापाशी येऊन पोहोचतात. हर्षद आत जातो, पाठोपाठ रश्मीही जाते. हर्षदला तिथल्या विश्रामगृहातले एक दोन जणं ओळखत असतात. त्यांच्याशी चार शब्द बोलून रश्मी आणि हर्षद आपल्या खोल्यांकडे जातात. दोघांना दोन खोल्या एकदम शेजारच्या असतात, गंगेचं खळाळतं पात्र थेट दिसेल अशा. खोलीत जाताना हर्षद रश्मीला म्हणतो, “मी उद्या आणि परवा कामासाठी बाहेर जाणार आहे. तेरवाचा एक दिवस इथे मस्त आराम करणार आणि मग परत. आत्ता थोड्यावेळाने बाहेर जाऊयात हवं तर, भूकही फार लागलीय आणि थोडं ऋषिकेश दाखवतो तुला” रश्मी मान हलवत चालेल म्हणते. दोघे आपापल्या खोल्यांमध्ये जातात. रश्मी आत खोलीत शिरते आणि सगळ्या खोलीला निरखून बघायला लागते. पलंग, मेज-खुर्ची आणि एकंदर सगळंच बघायला लागते. तिला हे सगळं बघताना आपली मुंबईतली खोली आठवत असते आणि तिच्या डोक्यात येतं की अशा ठिकाणी आपण जन्मात कधी येऊ असं स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. हा विचार तिच्या मनाला स्पर्शून जातो पण तिला त्या इतक्या साध्या वातावरणात असल्याचा पश्चात्ताप किंवा कुठून आलो इथे असं काहीही वाटत नाही. ती मनातून खुश असते. मग ती स्नानगृहात डोकावते, तेव्हाही तिला तिच्या घराची आठवण येते. ती बाहेर येते आणि तिथली खिडकी उघडते.

खिडकी उघडते आणि एकदम थंड थंड गार वारं तिच्या अंगावर येतं आणि जोराचा खळखळाट तिच्या कानावर येऊन धडकतो. तिच्यासमोर अगदी हाताच्या अंतरावर गंगा नदी वाहत असते. तिचं ते स्वच्छ पाणी बघून तिला आश्चर्य वाटतं कारण डिस्कव्हरीवर तिने काशीतली अस्वच्छ गंगा पाहिलेली असते आणि ही इथली ऋषिकेशमधली स्वच्छ गंगा बघून तिला थोडासा सुखद असा धक्काच बसतो. ती खिडकीत बसते, मनावरची अनेक जळमटं दूर व्हावीत असं तिचं मन शांत व्हायला लागतं. त्या मनोहर वातावरणात ती तिथेच बसून राहते. ते वातावरण आणि रात्रीची अत्यल्प झोप यामुळे खिडकीत बसल्या बसल्या तिला कधी डुलकी लागते हे तिलाही कळत नाही. खोलीच्या दारावर मारली गेलेली थाप तिच्या कानावर जाते तेव्हा ती त्या झोपेतून जागी होते आणि अर्धवट झोपेतच दरवाजा उघडते. समोर हर्षद असतो.

तिला पेंगुळलेल्या अवस्थेत बघून तो तिला म्हणतो, “झोपली होतीस बहुतेक... झोप झोप पण जेवणाचं काय ? भूक नाही लागली ?” रश्मी घड्याळ बघते आणि म्हणते, “बापरे एवढे वाजले... माझा डोळा कधी लागला हेच समजलं नाही. थांब मी येतेच पटकन...” “ये... मी इथेच बाहेर आहे”, हर्षद म्हणतो. रश्मी हो म्हणून दार लावते आणि आवरायला लागते. हर्षद आणि रश्मी यांच्या आपसातल्या संभाषणात अहो जाहो जाऊन अरे-तुरे अगं-तुगं कधी आलं हे कदाचित त्यांनाही कधीच समजलं नाही आणि शिवाय जाणीवही झाली नाही.

रश्मी आणि हर्षद बाहेर पडतात आणि हर्षद तिला एके ठिकाणी जेवणासाठी घेऊन येतो. छोटीशीच जागा असते, अगदी रस्त्यावरचं एखादं उपाहारगृह असावं अशी. तिथे दोघे पोहोचतात आणि हर्षद म्हणतो, “इथे पुरी भाजी फार चविष्ट मिळते. पुरीभाजी, गाजराचा हलवा आणि नंतर लस्सी. वाह..” तिथला परिसर बघून रश्मी म्हणते, “इथे खायचं ! बापरे...” हर्षद तिला बसायला सांगतो आणि दोघे एका टेबलखुर्च्यांवर बसतात. जिथे पुऱ्या तळत असतात, तिथे सहज ती नजर टाकते आणि विचित्र चेहऱ्याने हर्षदला म्हणते, “त्या पुऱ्या एवढ्या तेलात अक्षरशः तळून काढत आहेत !” हर्षद म्हणतो, “पुऱ्या तळणार नाहीत तर अजून काय करणार !” तेवढ्यात हर्षद त्याच्या पुरीभाजी आणि हलव्याची ऑर्डर देतो, रश्मी अजून काय खावं याच विचारात असते. हर्षदची ऑर्डर येते आणि त्या ताटल्यांकडे रश्मी बघायला लागते. परत एकदा तोंड वाकडं करत म्हणते, “त्या भाजीतही बघ किती तेल आहे आणि हलव्यावर तर तूप जमलंय. एवढं तेल तूप मी आयुष्यात नसेल खाल्लं आणि नंतर लस्सी म्हणजे त्यात मलई असणार भरपूर... यक्स” हर्षद म्हणतो, “तेल तुपाशिवाय जेवण कसं ? शरीराला प्रमाणात तेल आणि तुपाची आवश्यकता असते.” तेवढ्यात रश्मीला जवळच मॅगी आणि चाऊमीनची गाडी दिसते आणि ती बघून रश्मी म्हणते, “मी त्यापेक्षा तिकडे जाऊन खाते” हर्षद म्हणतो, “फास्ट फूड... शरीरात कचरा भरवायचा आहे ? त्यापेक्षा एक काम कर तू इथे परोठे खा, कमीतकमी तेल आणि तूप असलेले...” रश्मीला हा पर्याय पटतो आणि ती तिथे तेल तूप न लावलेले परोठे खाते. हर्षदने घेतलेल्या गाजराच्या हलव्याचे दोन घासही चव म्हणून अगदी तूप निथळून घेते. तिला हलवा आवडतो आणि असा चविष्ट हलवा मी पहिल्यांदाच खाल्ल्याचं ती हर्षदला सांगते. ते दोघे तिकडून निघतात आणि तेवढ्यात तिचं लक्ष तिथल्याच एका टेबलाकडे जातं. दोन परदेशी तिथे बसून पुरीभाजी खात असतात. ती त्यांच्याकडे बघतच बसते आणि रश्मी अवाक् झालेली बघून हर्षद तिला म्हणतो, “बघ ज्यांची नक्कल तुम्ही लोकं करता तेच इथे बसून खात आहेत. ही तर सुरुवात आहे अजून तुला इथे बरंच काही बघायचं आहे !”

दोघे तिथून निघतात. हर्षद रश्मीला ऋषिकेशच्या गल्लीबोळांमधून फिरवत असतो आणि रश्मी ते सगळं बघताना आजूबाजूला दिसणाऱ्या परदेशी नागरिकांकडेही बघत असते. हर्षद तिला काही योग केंद्रांचे भाग दाखवतो आणि म्हणतो, “उद्या परवा इथे येऊन बघ किती छान रमतात इथे ही परदेशी लोकं ते.. त्यांचं तिकडे आरामाचं, छानछौकीचं आयुष्य असतं पण तरीही इथे येतात, त्यांना इथे ते मिळतं जे त्यांना तिकडे मिळत नाही. मानसिक शांती, यासाठी ही लोकं इथे महिनोंमहिने राहतात. आता गंगा आरतीची वेळ झाली त्यामुळे आपण आता तिकडे जाऊ पण तू इथे फिर दोन दिवस, तुला बरं वाटेल.” रश्मी परदेशी लोकांकडे अगदी हरखून बघत असते आणि तिचं हर्षदच्या बोलण्याकडे फारसं लक्ष नसतं. दोघे गंगा घाटावर जातात आणि घाट येताच रश्मी “या गंगेची आरती !”, म्हणत छद्मीपणे हसायला लागते आणि पुढे म्हणते, “मी थांबते इथे, मला नाही यायचं या आरती बिरतीला...” रश्मीच्या या वागण्याचा हर्षदला राग येत नाही कारण रश्मी कुठल्या कौटुंबिक वातावरणातून आली आहे हे एव्हाना हर्षदला चांगलंच कळून चुकलेलं असतं. आरती सुरु होते आणि एक छानसं आध्यात्मिक वातावरण तिथे तयार होतं, त्यामुळे लांब थांबलेल्या रश्मीचं मनही सुखावतं. आरती होते आणि दोघे विश्रामगृहात परत येतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी हर्षद त्याच्या कामासाठी बाहेर पडतो. रश्मीची आदल्या रात्री नीट झोप झालेली नसल्याने ती सकाळी उशिरा उठते आणि आरामात आवरून बाहेर पडते. ऋषिकेशची योग केंद्रे, आश्रम वगैरे ठिकाणी फिरते आणि दुपारी उशिरा परत येते. आरामात तिच्या खोलीत गंगेचा तो प्रवाह बघत ती बसलेलीच असताना तिला बाहेरून कुठल्या बडबडीचे आवाज यायला लागतात. बाहेर हर्षद त्या विश्रामगृहाच्या स्वागतकक्षापाशी तिला दिसतो. हर्षद आलेला बघून ती आत खोलीत यायलाच लागलेली असते पण तेवढ्यात बाहेरच्या बडबडीचा रंग बदललेला तिच्या कानाला जाणवतो आणि तिच्या हे ही लक्षात येतं की बहुदा हे सगळं आपल्याबद्दलच चालू आहे. रश्मी त्या दिवशी बरीच उशिरा उठलेली असते त्यामुळे तिच्या खोलीची स्वच्छता बरीच उशिरा करावी लागते, तिचे पाश्चात्य कपडेही त्यांना खटकलेले असतात कारण त्या विश्रामगृहात असे कपडे म्हणजे ट्राऊझर, टॉपसारखे कपडे घालणारं कधीच कोणी आलेलं नसतं. म्हणजे आता अशी लोकं इथे येणार तर... करत तिथली लोकं हर्षदला थोडं ऐकवायला लागतात. हर्षद हे ऐकून चिडतो आणि त्यांना चार शब्द सुनावतो, “आता इथे येणाऱ्या लोकांनी किती वाजेपर्यंत झोपायचं हे ही तुम्हीच ठरवणार का आणि एवढं होतं तर तिच्या खोलीचं हाऊसकिपिंग करायला नको होतंत. त्यात एवढा काय इशू बनवत आहात आणि ज्या ऋषिकेशमध्ये पाश्चात्य देशाचे नागरिक येऊन महिनोंमहिने राहतात, अशा ऋषिकेशमध्ये पाश्चात्य कपडे खटकावेत... कमाल आहे ! तुमचं हे विश्रामगृह ऋषिकेशमध्येच आहे ना !”

हर्षद तिथल्या लोकांना चार शब्द ऐकवून त्याच्या खोलीकडे जायला लागतो. रश्मी तिथेच उभी असते. हर्षद तिला खुणेनेच “एवढं काही नाही, शांत रहा” असं सांगतो आणि आपल्या खोलीकडे जातो. संध्याकाळी गंगा आरतीला जाताना हर्षद रश्मीला विचारतो. रश्मीला त्या आरतीत फारसा रस नसतो पण संध्याकाळी तिथे जे वातावरण निर्माण होत असतं ते लांबूनच अनुभवण्यात तिला रस असल्याने ती हर्षदबरोबर आरतीला जाते.

दुसऱ्या दिवशी हर्षद कामासाठी सकाळी लवकरच बाहेर पडतो. रश्मीही फार वेळ झोपून न राहता सकाळीच ऋषिकेश फिरायला बाहेर पडते. तिला ऋषिकेशच्या काही जागा फार आवडतात, खळखळ करत वाहणारी गंगा तिला फार आवडलेली असते त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून गंगेला बघण्यात, एके ठिकाणी शांत बसून तिच्याकडे एकटक बघत बसण्यात ती बराच वेळ घालवते. तिने ऋषिकेशचं पुस्तकच बरोबर घेतलेलं असल्याने ती तिथल्या छोट्यातल्या छोट्या ठिकाणीही जाण्यास उत्सुक असते. ती खरेदीही करते आणि तिथलं स्थानिक जेवणही जेवते. या सगळ्यात तिचा दिवस कसा निघून जातो हे तिचं तिलाही कळत नाही. तिला एके ठिकाणी गंगेवर साहसी खेळ चालू असल्याचं दिसतं आणि तिलाही ते खेळ खेळण्यासाठी जावंसं वाटायला लागतं. दुपार जवळजवळ सरत आलेली असते आणि उजेडही लख्ख असतो, मग ती विचार करते की खोलीवर जावं, हातातलं सामान तिकडे ठेवावं आणि मग खेळ खेळायला जावं. निदान बघावं तरी काय प्रकार आहे. ती खोलीवर येते आणि जाताना त्या खेळाच्या ठिकाणी कुठून कसं जायचं हे विचारते आणि तिकडून निघते. बिनधास्त स्वभावाची रश्मी त्या खेळांमध्ये छान रमते.

जवळजवळ अंधार पडायला लागतो आणि हर्षद विश्रामगृहात परत येतो. आरतीसाठी उशीर होईल म्हणून भराभरा जायलाच लागलेला असतो आणि त्याचं लक्ष शेजारच्या रश्मीच्या खोलीकडे जातं. तिच्या खोलीला बाहेरून कुलूप असतं. तो स्वागतकक्षापाशी रश्मीबद्दल विचारतो कारण आता अंधारून आलेलं असतं आणि रश्मी तिथे अगदी नवखी असते. तिथे त्याला ती गंगेवर साहसी खेळ खेळायला गेलीय आणि अजून तिकडून खोलीवर परत आलेली नसल्याचं समजतं. हे समजल्यावर काळजीतच हर्षद तिथून बाहेर पडतो आणि थेट हे खेळ जिथे चालतात तिथे जातो. त्या खेळांची वेळ जवळजवळ संपलेली असते आणि रश्मी तिथे एवढी रमलेली असते की तिला वेळेचं काही भानच राहिलेलं नसतं. आता तिथे खेळ खेळणारेही फारसे उरलेले नसतात आणि एखादा अपवाद वगळता तिथे मुलीही नसतात. हर्षद भराभरा थेट रश्मीपाशीच जातो आणि काय खेळणं संपत आहे की नाही म्हणत तिला लगेच स्वतः बरोबर बाहेर घेऊन येत तिथून बाहेरही पडायला लागतो. तिची बॅगही घाईघाईत तोच उचलतो आणि दोघं तिथून जाऊ लागतात. हे अचानक काय चालू झालंय, हेच रश्मीला कळेनासं होतं आणि हे काय चाललंय, ही कसली बळजबरी आहे, असे प्रश्न ती हर्षदला विचारायला लागते. तो तिच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि तेवढ्यात तिचं लक्ष आजूबाजूला जातं. तिथे कोणीच नसतं, जणू ती तिथे तशी एकटीच असते आणि आजूबाजूला चार पुरुष संशयास्पद रितीने तिला तिथे वावरताना दिसतात. ते त्यांच्या अगदी जवळपासच असतात आणि आपलं सावज आपल्यासामोरून जाताना ते त्यांच्या डोळ्याने बघत असतात. तिला काय ते कळून चुकतं आणि ती भानावर येते. पुढे ती काहीच बोलत नाही. ते दोघे गर्दीच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर येतात आणि खजील झालेल्या चेहऱ्याने ती हर्षदची माफी मागते. हर्षद चिडलेला असतो पण रागावर नियंत्रण ठेवत तो तिला म्हणतो, “तुला काही कळतं ? काही अक्कल ?” रश्मी खाली मान घालून म्हणते, “सॉरी... मला खरं तर समजलंच नाही.” हर्षद म्हणतो, “ही मुंबई नाहीये, रात्री जागी असायला, आजूबाजूला भरपूर वर्दळ असायला... मला तू इकडे आहेस हे समजलं म्हणून तडक इकडे आलो, नाहीतर...!” रश्मी त्यावर काहीच बोलत नाही. हर्षद “चला आता...” म्हणतो म्हणून ती तिथून त्याच्याबरोबर जायला लागते.

तिच्या एक गोष्ट लक्षात येते की आरतीची वेळ होऊनही हर्षद गंगाकाठी न जाता विश्रामगृहाकडे निघालाय आणि म्हणून ती त्याला याबद्दल विचारते. तर हर्षद म्हणतो, “आता आज जाऊदेत... आरती सुरु झाली असेल.” रश्मी म्हणते, “ठीक आहे ना, जेवढी मिळेल तेवढी मिळेल. आपण तिकडेच जाऊ. चल चल..” दोघे गंगाकाठी जातात. आरती सुरु झालेली असते. गेल्या दोन संध्याकाळी आरतीच्या वेळी रश्मी ज्या ठिकाणी थांबत असते ती जागा येते आणि हर्षद रश्मीला म्हणतो, “चल... मी आलोच” रश्मी म्हणते, “मी आज इथे नाही थांबणार. मी ही येणार आज आरतीला...” हे वाक्य हर्षदला सुखावून जातं आणि दोघे आरतीच्या ठिकाणी जातात. हर्षद मनोभावे हात जोडून तिथे बसतो तर रश्मी तिथे बसल्या जागी आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करायला लागते. आत्ता नुकतीच घडलेली घटना तिच्या डोक्यातून जात नसते आणि देवदूतासारख्या धावून आलेल्या हर्षदने आता तिचं पूर्ण मन व्यापून टाकलेलं असतं. हर्षदबद्दल तिला वाटलेली एक प्रकारची ओढ तिला ऋषिकेशपर्यंत घेऊन आलेली असते आणि आता या प्रसंगानंतर मात्र हर्षदची जागा तिच्या मनात अजून घट्ट होऊन जाते. आरती संपते आणि दोघे परत जायला निघतात. गंगेची, एका नदीची आरती ! म्हणत ही गंगा आरती थोडी थट्टेवारी नेणारी रश्मी आज आरतीला आली म्हणून सुखावून गेलेला हर्षद रश्मीबद्दलच विचार करत असतो आणि रश्मीच्या मनात निर्माण झालेलं वादळ अजून शांत झालेलं नसल्याने दोघे रस्त्याने जाताना शांतच असतात. मधूनच दोघे एकमेकांकडे बघायचे आणि बघून स्मित हास्य द्यायचे. एखाद दुसरं वाक्य सोडून एकमेकांशी काहीच न बोलता दोघे विश्रामगृहात परत येतात. खोलीवर जाताना हर्षद म्हणतो, “उद्या मी इथेच बराच वेळ घालवणार आहे. इथे बाहेरच अगदी गंगेच्या जवळ आरामात बसणार आणि मग बघू कुठे बाहेर जायचं तर... आणि उद्याचा एकच दिवस आहे ना, उद्या परत ती पुरीभाजीही...” रश्मी यावर काहीच बोलत नाही आणि हसत बाय म्हणून आपल्या खोलीत जाते.

रात्र होते. झोपायची वेळ होते पण हर्षद आणि रश्मी आपापल्या खोल्यांमध्ये खिडकीत गंगेच्या प्रवाहाकडे एकटक बघत बसून असतात. पौर्णिमेची रात्र असल्याने चंद्राने गंगेवर शृंगार केलेला असतो आणि आधीच सुंदर, देखणी असणारी ऋषिकेशची गंगा त्या रात्री अजूनच लावण्यवती दिसत असते. तिचं ते लावण्य हे दोघे निरखत आपल्याच विचारात तिथे बसलेले असतात. रश्मी बेसावध वेळी निर्जन ठिकाणी आहे हे कळल्या कळल्या आपण तडक तिकडे गेलो आणि त्यावेळी आपल्या मनात फक्त माणुसकीचे विचार नव्हते, हे ही आपल्याला माहीत आहे. काल तिच्यासाठी आपण एक पातळी ओलांडून स्वागतकक्षापाशी वाद घातले. असं एकदा दोनदा नाही तर कित्येकदा हे असे प्रसंग आलेत, अगदी छोटेछोटेही.. हे असे बरेच विचार हर्षदच्या मनात येत असतात. आपल्याला वांद्रे टर्मिनसला भेटलेली रॅश आणि आज गंगा आरतीला आलेली रश्मी यात झालेलं खूप मोठं स्थित्यंतर हर्षदला जाणवत असतं. याच वेगवेगळ्या विचारात हर्षद आपल्या खोलीत बसून असतो. रश्मीच्या मनातलं वादळ तर खूप मोठं असतं. आळीचं फुलपाखरात रुपांतर व्हावं असा बदल तिच्यात झालेला असतो. रॅशचा रश्मीपर्यंत झालेला प्रवास आणि तो ही जेमतेम तीन चार दिवसात, आणि आज आलेला एवढा मोठा अनुभव... तिच्या मनात जणू विचारांचं वादळच आलेलं असतं. या विचारांमध्येच दोघांची रात्र संपते. दोघं दोन खोल्यांमध्ये बसून एकमेकांबद्दल विचार करत असतात पण या दोघांना साथ देणारा, त्यांचे विचार ऐकणारा एक समान दुवा असतो आणि तो म्हणजे समोर वाहणारी गंगा नदी.

दुसऱ्या दिवशीची सकाळ दोघांच्या खोलीत आरामात उगवते. दोघे सकाळी बाहेरच्या बाजूला येऊन गंगेच्या काठी एकत्रच चहा कॉफी, न्याहारी घेतात, बराच वेळ ते दोघे नदीच्या जवळ घालवतात, एकांतात. त्यांचा एकत्र असा हा वेळ कसा जातो हे त्यांचं त्यांनाही कळत नाही आणि जेवणाची वेळ उलटून जात असताना त्यांच्या लक्षात येतं की भूक लागलीय, जेवायला पाहिजे... लाघवी गप्पा सोडून जावसं वाटत नसतं पण दोघे जेवणासाठी बाहेर पडतात, यावेळची आता शेवटची पुरीभाजी म्हणत हर्षद उत्साही असतो. तिथे जातात तर हर्षद रश्मीला विचारतो...

हर्षद : तू काय कमी तेल तूप लावलेले परोठे खाणार का काय ?
रश्मी : ऑ... मी का परोठे खाऊ ! मी पण पुरीभाजी, गाजर हलवा, लस्सी हेच घेणार
हर्षद : जास्त तेल तूप असलेलं आणि तू !
रश्मी : खरं म्हणजे मला एक जाणवलं की इथे भूक फार लागते, कदाचित इथल्या हवेमुळे असेल आणि त्यामुळे जेवण पोटभरीचं हवं. तेल, तूप तसं इथे पचतं.

हर्षदला खूप आश्चर्य वाटतं. दोघे सगळ्या पदार्थांवर अगदी छान ताव मारतात. संध्याकाळ होते आणि यावेळच्या शेवटच्या गंगा आरतीला हर्षद निघतो. रश्मीही आवरून तयार असते. तिलाही आरतीला यायचं असतं. रश्मीचा हा आरतीचा उत्साह बघून हर्षदला आश्चर्य वाटतं. रश्मीचा हा उत्साह तर आहेच पण रश्मीतला अजून एक बदल त्याला त्या वेळी जाणवतो. आरतीला येताना रश्मीने सरळ साधा कुर्ता घातलेला असतो. एक अस्सल भारतीय पोशाख. एरवी अर्धवट केस बांधणाऱ्या किंवा पूर्ण मोकळे सोडणाऱ्या रश्मीने केस बांधलेले असतात आणि कपाळावर छोटीशी टिकलीही लावलेली असते. रश्मी यात फार छान आणि गोड दिसत असते. चार क्षण हर्षद तिच्याकडे बघतच बसतो. आधीच त्याचं मन रश्मीकडे ओढलं जात असतंच आणि आता त्यात अजूनच भर पडते. दोघे आरतीच्या ठिकाणी जातात. रश्मीने आधीच सांगितलेलं असतं की मी आरतीसाठी येणार आहे, लांब बसणार नाहीये. त्या आरतीला रश्मी अगदी मनोभावे हजेरी लावते. आरतीच्या वेळचे रश्मीच्या चेहऱ्यावरचे भक्तीभाव हर्षदपासून लपत नाहीत.

दोघे परत येतात आणि आता उद्या परत जायचं, त्यामुळे आता त्यांच्या गप्पा निरोपानिरोपीच्या असतात. म्हणजे हर्षदच जास्त बोलत असतो, रश्मी उगाच एखादं वाक्य मधूनच बोलत असते. वेळ खूप छान गेला. आता उद्या परत दिल्ली आणि मग मुंबई. हर्षद रश्मीला विचारतो, “तुझं काय आहे ? तू येत आहेस ना, उद्या परत ? मैत्रिणीला सांग की मी उद्या येत आहे म्हणून” रश्मी आपली हो-हो करते, ते ही काहीतरी बोलायला हवं म्हणून. तेवढ्यात हर्षद म्हणतो, “अरे हो... एक राहिलंच. उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत आपल्याला विश्रामगृह सोडायचं आहे. पण उद्या सकाळी सकाळी इथल्या एका प्राचीन मंदिरात जावं असं म्हणतोय. शंकराचं देऊळ आहे. थोडं वरती आहे, आपल्याला तिथे जायला वाहन मिळेल. मी कधीच गेलो नाहीये. उद्या अनायसे सोमवारही आहे तर उद्या सकाळी जावं म्हणतोय. तू येशील ? पण थोडं लवकर जाऊयात म्हणजे आरामात जाऊन येता येईल, घाईघाई होणार नाही.” रश्मी हो म्हणते. तो दिवस असाच संपतो. संध्याकाळपासूनच रश्मी बोलत कमी असते आणि कुठला तरी विचार जास्त करत असते, हर्षदच्या मात्र हे लक्षात येत नाही आणि रश्मीची ती रात्रही विचार करून करूनच संपते.

आता परतीचा दिवस उजाडतो. सकाळी ८ वाजता त्या दोघांचं देवळात जाण्यासाठी निघण्याचं ठरलेलं असतं. त्याप्रमाणे हर्षद बरोबर ८ वाजता खोलीच्या बाहेर येऊन रश्मीची वाट बघायला लागतो. दहा पंधरा मिनिटांत रश्मी तिच्या खोलीतून बाहेर येत “सॉरी सॉरी उशीर झाला मला, चल चल निघुयात” म्हणायला लागते. सुती कापडाचा लखनवी प्रकारचा पंजाबी ड्रेस तिने घातलेला असतो. त्या ड्रेसचा रंग तिला अगदी शोभून दिसत असतो. लांब केसांची वेणी, कपाळावर टिकली अशा अस्सल भारतीय रश्मीकडे हर्षद बघतच बसतो. रश्मी खूप सुरेख दिसत असते. तिच्यात तो रॅशचा आक्रस्ताळेपणा नसतो, खरं तर तिच्यातली रॅशच आता पूर्णपणे लोप पावलेली असते. हर्षद तिला विचारतो, “तू हे असे कपडेही घालतेस हे माहीत नव्हतं मला !” रश्मी म्हणते, “परवा थोडी खरेदी केली तेव्हा घेतलाय हा ड्रेस, टिकली, कानातलं, सगळं सगळं.. नाहीतर माझ्याकडे कुठे असायला हे.. कधीतरी हे कानात वगैरे घातलं असेन, कुठे लग्न वगैरे असेल तर..” हर्षद पुढे फार काही बोलत नाही, छान म्हणतो आणि गप्प बसतो. त्याच्या मनात अनेक भावना उचंबळून आलेल्या असतात पण त्या तो ओठांपर्यंत आणत नाही. दोघे त्या उंचावरच्या शंकराच्या मंदिराकडे जायला निघतात. जाताना दोघेही फारसं काही बोलत नाहीत. एकमेकांबद्दलच्या मनात निर्माण झालेल्या भावना आणि त्यातच निरोप घ्यायचा दिवस आल्याने दोघांनाही एकमेकांशी फार काही बोलवत नाही.

दोघे मंदिरात येऊन पोहोचतात. अतिशय सुंदर निसर्गाच्या सानिन्ध्यात ते मंदीर असतं आणि त्यात ते उंचावर असल्याने वरून दिसणारं दृश्य फार सुंदर असतं. निसर्ग सगळ्या दिशांनी मनसोक्त बघून झाल्यावर दोघे मंदिरात जातात आणि दर्शन घेऊन तिथेच मंदिराच्या बाहेरच बसतात. किती छान दर्शन झालं, परिसर किती सुंदर आहे, निसर्ग काय अप्रतिम आहे, इथून गंगा किती सुरेख दिसतेय, वगैरे बरंच बरंच हर्षद बडबड करत असतो आणि रश्मी हो...हो शिवाय फार काही बोलतच नसते. हर्षद तिला विचारतो, “का गं अचानक गप्प का झालीस...” रश्मी “कुठे काय काहीच नाही” करत विषय टाळायचा प्रयत्न करते. परत हर्षदची बडबड सुरु होते पण दोनेक मिनिटांत रश्मी म्हणते...

रश्मी : तुला एक सांगू हर्षद, मंदिरात बसले आहे... त्यामुळे खोटं बोलणार नाही
हर्षद : काय ? आणि असं का म्हणत आहेस ? परवानगी कसली मागतेस ?
रश्मी : मी रश्मी देसाई, मुंबईचे प्रसिद्ध देसाई व्यावसायिक तुला माहीत असतील कदाचित, मी त्यांची मुलगी
हर्षद : बरं मग ?
रश्मी : .......... (काहीच बोलत नाही)
हर्षद : (रश्मी एकदम गप्प झालेली बघून) मग त्याचं काय ? हे मध्येच आत्ता एकदम कुठून आलं ? आणि तू पुढे काही बोलत का नाहीस ?
रश्मी : मी जे सांगेन ते ऐकून तू प्लीज चिडू नकोस...

रश्मी : मी घरातून पळून आलेय. मला मुंबईपासून दूर जायचं होतं म्हणून मी दिल्लीला जायचं ठरवलं. दिल्लीला जाऊन काय करायचं काहीच माहीत नव्हतं. त्यातच तू मला भेटलास आणि तुझ्याकडे बघून वाटलं की याचं जग काहीतरी वेगळं आहे. मी ड्रिंक्स, पार्ट्या या विश्वातच वाढलेय आणि यातच रमलेय. आमच्याकडे सगळे असेच, अगदी आईही. लहानपणी आईचा ड्रिंक्स घेतल्यानंतर तोल जायचा तेव्हा मी कित्येकदा तिला आधार दिलाय. पुढे मी ही या सगळ्यालाच जवळ केलं. पहाटे ४ ला डिस्कमधून घरी येणं ही माझ्यासाठी अगदी सामान्य गोष्ट आहे कारण आमचं घरच तसं आहे. पण हळूहळू या सगळ्याचा मला वीट यायला लागला आणि वाटलं की, हे आपण जगतोय हे काय आयुष्य आहे ! ते घर, अगदी घरातलंही संपूर्ण व्यावसायिक वातावरण, कायम बिझनेस, डील्स तेच, या सगळ्याचा इतका उबग आला आणि वाटलं की यातच आपण रहायचं ! यांना नाती नाहीत फक्त व्यवसाय हवाय, मग विचार केला स्वतःला संपवून टाकावं, पण मग नंतर विचार केला, चायला मी का स्वतःला संपवू ! त्यापेक्षा मी हे घर सोडते कारण माझ्या घरातल्या लोकांना माझ्याबद्दल फार काही वाटत असावं असं मला वाटत नाही, त्यामुळे मी तिकडे असले काय आणि नसले काय त्यांना त्याचं काहीही सुखदुःख नाही. त्यांचा व्यवसाय, त्यांचे व्यावसायिक संबंध हेच त्यांच्यासाठी सगळं काही आहे. रक्ताच्या मुलीची त्यांना गरजच काय ? माझा संबध अव्यावसायिक आहे ना ! म्हणून मी कोणाला काहीही न सांगता घरातून निघाले. त्यांना माझा ठावठिकाणा सहज सापडू नये म्हणून मी माझा मोबईलही बरोबर आणलेला नाही. तू ऋषिकेशला जाणार म्हणालास, तेव्हा वाटलं की चला आपल्या विश्वापेक्षा वेगळ्या ठिकाणी जायला आपल्याला संधी आहे आणि शिवाय या तीन दिवसात विचार करूयात की पुढे काय करायचं ते... तडकाफडकी घर सोडल्याने पुढचा विचार मी फारसा केलेलाच नव्हता. म्हणून ऋषिकेशला येण्यासाठी तुझ्या इतकी मागे लागले. तुला आगगाडीत पाहिलं होतं, एकंदर अंदाज आला होता त्यामुळे तुझ्याबरोबर येण्यात मला कुठला धोका आढळला नाही.

हर्षद : (सगळं ऐकून झाल्यावर) आणि ते MBA ?
रश्मी : नाही ते खरं आहे. बाबांना मी बाहेर नोकरी करणं मान्य नव्हतं पण मला एकंदर घरातल्या वातावरणाचा उबग आल्याने मी त्यांच्या मनाविरुद्ध बाहेर नोकरी शोधली. फार नाही, दोन महिनेच झालेत.

हर्षद : (एकंदर सगळं ऐकून थोडा धक्का बसलेला, राग आलेला हर्षद बराच वेळ निःशब्द तिच्याकडे बघत राहतो. मग काही क्षणांनी) पळून आलीस..... पण मग आत्ताच का हे सगळं सांगत आहेस ? आता काही तासांत आपण वेगवेगळ्या दिशांना जाऊ, मग आता हे सगळं सांगायची काय गरज ? तीन दिवसांत काही सांगावंसं वाटलं नाही, मग आत्ताच का ? आता हे सांगून एवढा काय मोठा फरक पडणार आहे ?

रश्मी : मला आता परत त्या आयुष्यात परतायचं नाहीये
हर्षद : तुझी मर्जी
रश्मी : आणि घर सोडून पळालेल्या मला इकडे तिकडे भटकायचं पण नाहीये
हर्षद : मग ? हे आता मला का सांगत आहेस ?
रश्मी : मला मी सोडलेल्या आयुष्यात परत जायचं नाहीये आणि नवीन आयुष्याच्या वाटा शोधत फिरायचंही नाहीये कारण मला माझ्या आयुष्याची पुढची वाट तुझ्याबरोबर तुझ्या वाटेनं चालायची आहे. घेशील मला बरोबर ?

समोरून अचानक आलेला हा प्रश्न ऐकून हर्षद काहीच बोलत नाही. बराच वेळ शांत असतो. मग तिथून उठतो आणि इकडे तिकडे फेऱ्या मारायला लागतो. हर्षद काहीच बोलत नाहीये हे बघून रश्मी म्हणते, “सांग ना... काहीतरी बोल....” तरीही हर्षद काहीच बोलत नाही. थोड्यावेळाने हर्षद रश्मीजवळ येतो आणि म्हणतो, “आज आपण आपल्या दिशांनी जाणार हे कुठेतरी मनाला बोचत होतं पण तू सगळंच सोपं करून टाकलंस”. रश्मी चेहऱ्यावर आनंद फुलवत “म्हणजे...” असं म्हणते. हर्षद थोडा शांत होतो, त्याच्या चेहऱ्यावरही आनंद फुललेला असतो. तो पुढे म्हणतो...

हर्षद : पण... तुला आधी घरी जावं लागेल. त्याही आधी आत्ता घरी फोन करून तू कुठे आणि कशी आहेस हे सांगावं लागेल.
रश्मी : नाही... मी नाही फोन करणार
हर्षद : मग आपलं पुढे काहीही होऊ शकत नाही. (स्वतःचा मोबईल पुढे करत) हे घे आणि घरी फोन लाव.
रश्मी : (थोडी घाबरत) नाही
हर्षद : का गं... आता का घाबरतेस ? एवढं मोठं पाऊल उचलत घर सोडलंस तेव्हा नाही भीती वाटली ?
रश्मी : घरचे खूप चिडले असतील... माझ्यात नाही हिंमत...
हर्षद : फोन कर... आणि मी घरी येत आहे असं सांग

रश्मी घाबरत घरी फोन करते. तिच्या घरचे चिंतेत असतात. मुलगी सुखरूप आहे आणि आता घरी येत आहे हे बघून तिच्या घरच्यांची चिंता मिटते. हर्षद म्हणतो, “हे असं घर सोडून पळून आलेल्या मुलीबरोबर आयुष्यात पुढे जाणं मला कधीच जमलं नसतं आणि हे असं पळून वगैरे जाणं बरोबरही नाही. आता आपण परत जाऊ.. तुझ्या घरचे आपल्या नात्याला संमती देतील नाही देतील, ते पुढचं पुढे पण निदान जे काही घडेल ते सर्वांसमक्ष तरी घडेल...” रश्मी म्हणते, “ते मान्य करतील नाही करतील, पण मी आता माझा मार्ग निवडलाय आणि आता त्यावरच मी चालणार. यावर मी अगदी ठाम आहे.”

हर्षद छानसं हास्य चेहऱ्यावर फुलवत म्हणतो, “मी आहे तुझ्याबरोबर.... पण सध्या, चल आता या नव्या प्रवासाची सुरुवात महादेवांच्या दर्शनाने, त्यांच्या आशीर्वादाने करू...” दोघे परत एकदा आत देवळात जातात. पार्ट्यांच्या विश्वातली रश्मी आणि सोज्वळ, संस्कारी सरळ साधा हर्षद यांचं हे एक अजब कॉकटेल, नशिबाने जमवून आणलेली ही जोडी... रश्मी आणि हर्षद एकत्र जोडीने आत जाऊन शंकराचं दर्शन घेतात आणि आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करतात.      

समाप्त   

- मंजुषा जोगळेकर