Showing posts with label उरलं सुरलं. Show all posts
Showing posts with label उरलं सुरलं. Show all posts

Friday, 12 August 2016

शेणखत आणि आजोळ




शेणखत हा जो काही प्रकार आहे तो मला अतिशय आवडतो. झाडांसाठी हे एक उत्तम खत तर आहेच, पण या खताच्या नावातला जो "शेण" हा शब्द आहे तो माझ्या फार जिव्हाळ्याचा आहे.
 
मी जेव्हा जेव्हा झाडांना "शेणखत" घालते, तेव्हा तेव्हा मला असा भास होतो की मी जणू काही शेणातच हात घालत आहे. त्या खताला जो शेणाचा एक मस्त वास असतो किंवा सुगंध असतो, तोच मनाला फार फार भावणारा असतो. कितीही उंची अत्तरं या वासापुढे तोकडी पडतात.
 
या खताला मी जेव्हा हात लावते, तेव्हा मुंबईत बसून मी कुठल्यातरी खेड्याला जोडली जात आहे असा भास मला व्हायला लागतो आणि यात कुठलीही अतिशयोक्ती नाही.
 
माझं आजोळ खेड्यातलं, घरी भरपूर म्हशी, गायी, त्यामुळे शेण, त्याचा सुवास, गोवऱ्या यांचंच आजूबाजूला कायम हवंहवंसं वाटणारं वातावरण..

मी कधीही जेव्हा झाडांना शेणखत घालते तेव्हा त्या शेणाच्या सुवासाने सुरु झालेलं विचारचक्र मला शेवटी माझ्या आजोळी नेऊन सोडतं.
 
मुंबईहून शेणाच्या साथीने सुरु झालेला हा प्रवास काही सेकंदातच आजोळी पोहोचून संपतो..

निर्माल्य



मी घरचं निर्माल्य हल्ली घरच्या झाडांनाच वाहते. निर्माल्य नेहमी वाहत्या पाण्यात विसर्जित करावं पण विसर्जित केल्यावर त्याचं पुढे काय होईल हे काय माहीत आणि निर्माल्य कलशात निर्माल्य टाकावं तर त्या कलशात फक्त निर्माल्यच टाकायचं असतं याची अक्कल अजून तरी आपल्या लोकांना आलेली नाही...

म्हणून मी निर्माल्य घरच्या झाडांना घालते. निर्माल्यापासून नाहीतरी खतच बनवलं जातं...
हे निर्माल्य म्हणजे तरी काय तर घरच्याच झाडांची फुलं घरच्याच देवांच्या चरणी वास करून आलेली...
 
ज्या मातीतून ती उमलली त्याच मातीत मी त्या फुलांचा शेवट करते.. या घरच्या फुलांचं असं हे एक चक्र मीच पूर्ण करते... इतर फुलांना असतेच केराची टोपली पण, देवांच्या चरणी राहण्याचं भाग्य ज्यांना लाभलं त्यांचा शेवट मी हा असाच करते...

जेव्हा या वाळलेल्या फुलांना मी झाडांमध्ये टाकते, तेव्हा माझ्या मनाला एक वेगळीच अनुभूती येते. या झाडांचीच ही फुलं मी काही दिवसांपूर्वी तोडली होती आणि आज याच झाडांच्या मातीत मीच त्यांचा शेवट करत आहे...

आपलंही असंच आहे ना, पंचमहाभूतांपासून बनलेल्या या आपल्या शरीराचा शेवटही पंचमहाभूतांमध्येच होतो. पण हा, मधला प्रवास कसा करायचा.... देवाच्या चरणी वाहिलेल्या की पायदळी तुडवल्या जाणाऱ्या फुलांसारखा, हे मात्र आपल्याला ठरवायचं असतं....!

Friday, 1 July 2016

गुलमोहर



वसंत ऋतू जवळ आला किंवा थोडक्यात उन्हाळा जवळ आला, की सृष्टीत खूप बदल होताना दिसतात. त्यातला एक नेत्रसुखद बदल म्हणजे, ‘गुलमोहर’ या झाडाचं फुलणं.

गुलमोहर या शब्दाची फोड केली की, या झाडाची व्याख्याच स्पष्ट होते. गुल म्हणजे फुल आणि मोहर म्हणजे फुललेला पिसारा किंवा बहरलेला पिसारा. एरवी कधीही हे झाड आपलं लक्ष वेधून घेणार नाही. अक्षरशः हे झाड ओसाड पडलेलं असतं, पण उन्हाळा जवळ आला की या झाडाला पालवी फुटू लागते आणि उन्हाळ्याची चाहूल लागते. अशी खूप कमी झाडं असतील, ज्यात पानांची संख्या खूप कमी आणि फुलांची संख्या खूप जास्त, गुलमोहर हे एक त्यातलं उदाहरण.

वसंत ऋतू जवळ आला की या ओसाड झाडावर नवीन पालवी दिसायला लागते, हळूहळू एकदोन फुलं दिसायला लागतात आणि आठवडाभरात पूर्ण झाड बहरतं, झाडावर फक्त फुलं दिसतात, फुलांच्या रंगाचंच झाड होऊन जातं. हा असा या झाडात होणारा बदल खूप मनोहारी असतो. हे झाड मधमाशांसाठी पण खूप उपयुक्त आहे. गुलमोहराच्या फुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर मकरंद, म्हणजेच फुलांचा रस ज्यापासून मधमाशा मध तयार करतात, तो असतो. तसेच मधमाशांना मोठ्या प्रमाणावर परागकण ही या फुलांपासून मिळतात. या झाडाचं परागीकरण बहुतेक करून पक्षीच करतात. 

माणसाला कडक उन्हाळा सहन करावा लागतो. पण तो सुसह्य करण्यासाठी निसर्गाने आपल्याला किती मदत केली आहे ! यात मानवाचा पूर्ण विचार केलेला दिसून येतो. उन्हाळा सहन व्हावा, शरीराला गारवा मिळावा, म्हणून कैऱ्या ही अनमोल भेट जशी निसर्गाने मानवाला दिली तसाच विचार गुलमोहरामागे दिसून येतो. उन्हाळा नसताना या झाडाचं अस्तित्त्वही मानवाला जाणवत नाही पण उन्हाळा जवळ आला की हे झाड बहरू लागतं. बाहेर कितीही कडक ऊन असू देत, तापमान कितीही जास्त असू देत, हे झाड पूर्ण बहरणारच. ज्याप्रमाणे कैऱ्या शरीराला गारवा देतात, त्याप्रमाणेच अत्यंत कडक उन्हाळ्यात डोळ्याला दिलासा देण्याचं काम हे झाड करतं. एक नेत्रसुखद अनुभव हे झाड देतं.

जून-जुलै पर्यंत साधारण ही फुलं झाडावर असतात. तोपर्यंत पाऊसही सुरू होतो, हवेचं तापमान कमी होऊ लागतं. त्यानंतर ही फुलं गळू लागतात. तरी साधारण नोव्हेंबरपर्यंत आपण झाडावर फुलं बघू शकतो. जेव्हा फुलं झाडावर असतात, तेव्हा सुखद अनुभव मिळतोच, पण फुलांची गळती सुरु झाली की त्या त्या रस्त्याचं सौंदर्य खूप वाढतं. रस्त्यांवर फुलांच्या रंगाचा गालीचा बघायला मिळतो, आधीच पाऊस सुरु झाल्याने मन प्रफुल्लित असतं त्यात ह्या गालीच्यामुळे भरच पडते.

गुलमोहराच्या फुलांचा उपयोग श्रीकृष्णांच्या मुकुटाचा शृंगार करण्यासाठीही केला जातो. या झाडाच्या वैशिष्ट्यांमुळे या झाडाचं स्थान खूप वरचं आहे.