Sunday 21 August 2016

पावसाचे थेंब

आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचं नशीब वेगवेगळं असतं...

काही थेंब स्वच्छ रस्त्यावर पडतात तर काही माळरानावर तर काही थेट सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर
काही उघड्या गटारात तर काही उकिरड्यावर
काही समुद्रात तर काही खाड्यांत
काही नद्यांत तर काही खळखळणाऱ्या धबधब्यात तर काही तलावांत
काहींच्या नशिबात मात्र गंगा, यमुना, नर्मदा अशा पवित्र नद्यांशी एकजीव होत आपलं पृथ्वीवर येणं सार्थकी लावणं असतं...

काहींच्या नशिबात हिरव्या पल्लवींना भिजवणं असतं तर काहींच्या मात्र वाळलेल्या काटक्यांना..
काही श्रीमंतांच्या बंगल्यावर येऊन धडकतात तर काहींच्या नशिबी अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या झोपड्यांमध्ये थेट झिरपणंच असतं
 
अतिशय आनंदात असणाऱ्याचा आनंद द्विगुणीत करण्याचं नशीब काही थेंबांत असतं तर आपले अश्रू लपवणाऱ्यांचा आधार बनणं काहींच्या नशिबी असतं..

दोन प्रेमींच्या मनातले ते नाजूक बंध घट्ट करण्याचं काम काही थेंब करतात तर काही हे बंध तुटल्यानंतर होणारी वेदना कमी करण्यासाठी धावून येतात...

काय हा वैताग आहे म्हणून झिडकारून घेणं काहींच्या तर मुद्दामून भिजणाऱ्या जीवांना आनंद देण्याचं काहींच्या नशिबात असतं...

भरलेल्या घरातल्या मुलांना मज्जा म्हणून आनंद देणं तर त्याच वेळी डोक्यावर छप्पर नाही म्हणून भकास चेहऱ्याने रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना दुःख देणं काहींच्या नशिबात असतं...

एक ना दोन असं कितीतरी विविध प्रकारचं नशीब घेऊन आकाशातून पावसाचा थेंब पृथ्वीवर पडतो. हे अगदी माणसाच्या नशिबासारखंच आहे. तो परमेश्वर अनेक जीव जन्माला घालतो, पण प्रत्येकाचं नशीब वेगवेगळं.
 
प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत काही जीव आपलं नशीब बदलवून टाकतात, त्याचप्रमाणे खाचखळग्यातून वाहत पावसाचे काही थेंब मनुष्याला जीवन देणाऱ्या तलाव, नदीच्या पात्रापर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत आपलं पृथ्वीवर येणं सार्थकी ठरवतात...

....आणि पावसाचे किती थेंब धरण किंवा तलाव क्षेत्रापर्यंत येऊन पोहोचणार हे शेवटी मानवाच्या नशिबावर असतं..

पाऊस आणि वेधशाळा

स्थळ - वेधशाळा
साधारण मे महिन्याचा पहिला आठवडा
 
आता वेधशाळा मग ती कुठलीही घ्या, पुणे घ्या नाहीतर कुलाबा घ्या... सगळ्या डोंबलाच्या सारख्याच
 
वरून आदेश आलेला असतो की पावसाच्या अंदाजाचा रिपोर्ट चार दिवसात हवाय आणि त्यावरच अतिशय गांभीर्याने वेधशाळेत काम चालू असतं. पाच संशोधकांचा एक गट यावर काम करत असतो.
 
अरबी समुद्रात कुठे कमी दाबाचे पट्टे वगैरे तयार झालेत का किंवा अचानक कुठलं समुद्रात चक्री वगैरे वादळ आलंय का हे तपासणं चालू असतं.
 
काम चालू असतानाच

एक संशोधक दुसऱ्याला म्हणतो, काय रे काही दिसतंय का ? मला तरी काही वेगळं जाणवत नाहीये.
 
दुसरा : छे रे, काहीच नाही आणि जे दिसतंय त्यावरून पावसाचा अंदाज आत्ता तरी बांधता येणं कठीणच...पण आपल्याला काहीतरी खरडून द्यावं लागणार. नाहीतर बोंबाबोंब होईल सगळीकडे.
 
तेवढ्यात तिसरा येतो आणि म्हणतो, हो रे... आणि लोकं बिचारी आशेने वाट बघत असतात पावसाच्या अंदाजाची आणि शेतकरी.... त्याच्यासाठी फार वाईट वाटतं. आपण असाच एक अंदाज पाठवून देऊ.
 
आज उरलेले दोघे उशीरा येणार असतात म्हणून दुपारच्या जेवणानंतर काय ते ठरवण्यासाठी बैठक घेण्याचं ठरतं.
 
मस्तपैकी जेवण झाल्यावर पाचही जणं एकत्र जमतात.
 
एक म्हणतो, काय करूया ? गेली काही वर्षं पाऊस फारसा चांगला झाला नाही आणि उशीराही आलाय. यंदा परत लोकं आशेवर असतील.
 
दुसरा म्हणतो, एक काम करूया... यंदा पाऊस लवकर आहे आणि सरासरीपेक्षा जास्त आहे असं सांगून टाकूयात. तो पाऊस यायचा तेव्हा येईल आणि पडायचा तेवढा पडेल पण काही दिवस तरी लोकं खुश होतील.
 
यावर सगळ्यांची एकवाक्यता होते आणि ठरतं की जूनच्या तीन चार तारखेपर्यंत पाऊस येईल असं सांगून टाकू.
 
ठीक आहे... मे एंड, केरळमध्ये पाऊस, आणि तीन-चार जून पर्यंत महाराष्ट्रात पाऊस येईल हे नक्की करू. हा अंदाज तीन जणं मान्य करतात पण एक याला सहमती देत नाही. त्याचं म्हणणं असतं की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पाऊस महाराष्ट्रात येईल हा अंदाज बरोबर आहे. ३-४ तारीख म्हणजे जरा जास्तच फेकाफेकी वाटतीय...

मग ते पाच जणांमध्ये मतदान करायचं ठरवतात. ज्या अंदाजाला जास्त मतं, तो अंदाज म्हणून रिपोर्ट बनवायचा.
 
३-४ जून हा अंदाज नक्की होतो. पण रिपोर्टमध्ये असं लिहायचं ठरतं की, जूनच्या सुरुवातीला राज्यात मान्सूनचं आगमन होईल. वेधशाळेने ३-४ जून हा अंदाज वर्तवला आहे.
 
तेवढ्यात एक म्हणतो की, पाऊस आधी आला तर लोकं जास्त बोंब मारणार नाहीत पण जर पाऊस लांबला तर ?? 

तर काही नाही, कुठला तरी पट्टा तयार झालाय, समुद्रात चक्रीवादळ आलंय आणि त्यामुळे पाऊस लांबला आणि चक्रीवादळाचं एखादं विचित्र नाव बनवायचं की झालं. असं बाकीचे मिळून त्याला उत्तर देतात.
 
ठीक आहे मग ठरलं तर, असाच रिपोर्ट बनवूया आणि देऊ पाठवून. काही कमी जास्त झालं तर दरवर्षीप्रमाणे घेऊ सांभाळून... दरवर्षी नव्या आशेने आपल्याकडे बघणारी लोकं निदान आत्तातरी खुश होतील.

हा असा अहवाल बनवला जातो आणि तो पुढे पाठवला जातो. मग तोच अहवाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दूरदर्शन, वर्तमानपत्रे, वृत्त वाहिन्या यांच्यामार्फत आपल्यापर्यंत पोहोचतो. आपण आनंदी होतो की वा वा यंदा पाऊस जास्त आहे आणि लवकर आहे....

...आणि पुढे काय होतं हे वेगळं लिहिण्याची गरज आहे ??