स्थळ - वेधशाळा
साधारण मे महिन्याचा पहिला आठवडा
साधारण मे महिन्याचा पहिला आठवडा
आता वेधशाळा मग ती कुठलीही घ्या, पुणे घ्या नाहीतर कुलाबा घ्या... सगळ्या डोंबलाच्या सारख्याच
वरून आदेश आलेला असतो की पावसाच्या अंदाजाचा रिपोर्ट चार दिवसात हवाय आणि त्यावरच अतिशय गांभीर्याने
वेधशाळेत काम चालू असतं. पाच संशोधकांचा एक गट यावर काम करत असतो.
अरबी समुद्रात कुठे कमी दाबाचे पट्टे वगैरे तयार झालेत का किंवा
अचानक कुठलं समुद्रात चक्री वगैरे वादळ आलंय का हे तपासणं चालू असतं.
काम चालू असतानाच,
एक संशोधक दुसऱ्याला म्हणतो, काय रे काही दिसतंय का ? मला तरी काही वेगळं
जाणवत नाहीये.
दुसरा : छे रे, काहीच नाही आणि जे दिसतंय त्यावरून पावसाचा अंदाज आत्ता तरी बांधता येणं कठीणच...पण
आपल्याला काहीतरी खरडून द्यावं लागणार. नाहीतर बोंबाबोंब होईल सगळीकडे.
तेवढ्यात तिसरा येतो आणि म्हणतो, हो रे... आणि लोकं बिचारी आशेने वाट बघत असतात पावसाच्या अंदाजाची आणि
शेतकरी.... त्याच्यासाठी फार वाईट वाटतं. आपण असाच एक अंदाज पाठवून देऊ.
आज उरलेले दोघे उशीरा येणार असतात म्हणून दुपारच्या जेवणानंतर काय ते ठरवण्यासाठी
बैठक घेण्याचं ठरतं.
मस्तपैकी जेवण झाल्यावर पाचही जणं एकत्र जमतात.
एक म्हणतो, काय करूया ? गेली काही वर्षं पाऊस फारसा चांगला झाला नाही आणि उशीराही आलाय.
यंदा परत लोकं आशेवर असतील.
दुसरा म्हणतो, एक काम करूया... यंदा पाऊस लवकर आहे आणि सरासरीपेक्षा जास्त आहे असं सांगून टाकूयात.
तो पाऊस यायचा तेव्हा येईल आणि पडायचा तेवढा पडेल पण काही दिवस तरी लोकं
खुश होतील.
यावर सगळ्यांची एकवाक्यता होते आणि ठरतं की जूनच्या तीन चार तारखेपर्यंत पाऊस येईल
असं सांगून टाकू.
ठीक आहे... मे एंड, केरळमध्ये पाऊस, आणि तीन-चार जून पर्यंत महाराष्ट्रात पाऊस येईल हे नक्की
करू. हा अंदाज तीन जणं मान्य करतात पण एक याला सहमती देत नाही. त्याचं म्हणणं
असतं की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पाऊस महाराष्ट्रात
येईल हा अंदाज बरोबर आहे. ३-४ तारीख म्हणजे जरा जास्तच फेकाफेकी वाटतीय...
मग ते पाच जणांमध्ये मतदान करायचं ठरवतात. ज्या अंदाजाला जास्त मतं, तो अंदाज म्हणून रिपोर्ट
बनवायचा.
३-४ जून हा अंदाज नक्की होतो. पण रिपोर्टमध्ये असं लिहायचं ठरतं की, जूनच्या सुरुवातीला
राज्यात मान्सूनचं आगमन होईल. वेधशाळेने ३-४ जून हा अंदाज वर्तवला आहे.
तेवढ्यात एक म्हणतो की, पाऊस आधी आला तर लोकं जास्त बोंब मारणार नाहीत पण जर पाऊस लांबला
तर ??
तर काही नाही, कुठला तरी पट्टा तयार झालाय, समुद्रात चक्रीवादळ
आलंय आणि त्यामुळे पाऊस लांबला आणि चक्रीवादळाचं एखादं विचित्र नाव बनवायचं
की झालं. असं बाकीचे मिळून त्याला उत्तर देतात.
ठीक आहे मग ठरलं तर, असाच रिपोर्ट बनवूया आणि देऊ पाठवून. काही कमी जास्त झालं तर दरवर्षीप्रमाणे
घेऊ सांभाळून... दरवर्षी नव्या आशेने आपल्याकडे बघणारी लोकं निदान आत्तातरी खुश होतील.
हा असा अहवाल बनवला जातो आणि तो पुढे पाठवला जातो. मग तोच अहवाल मे महिन्याच्या
दुसऱ्या आठवड्यात दूरदर्शन, वर्तमानपत्रे, वृत्त वाहिन्या यांच्यामार्फत आपल्यापर्यंत पोहोचतो. आपण आनंदी होतो
की वा वा यंदा पाऊस जास्त आहे आणि लवकर आहे....
...आणि पुढे काय होतं हे वेगळं लिहिण्याची गरज आहे ??
No comments:
Post a Comment