आता किमान एक दिवस तरी पावसाने विश्रांती घ्यावी
तो ही दमत असेलच की....!
तो ही दमत असेलच की....!
आता किती दिवस झाले याची मोजदाद नाही, इतके दिवस रोज रोज पाऊस चालू आहे. येतो तोच मुळी जोरदार
कोसळण्यासाठी. आता श्रावणात कसं त्याने लाजत मुरडत हळुवार अलगद कोसळलं
पाहिजे. उन्हाशी त्याने पाठशिवणीचा खेळ खेळला पाहिजे. श्रावणातल्या पावसाला
नजाकत हवी, शर्म-हया वेशीवर टांगलेला आषाढातला पाऊस आता बास झाला...
एखादा दिवस तरी असा उजाडावा की त्या दिवशी आपण उठावं तर बाहेर शांतता अनुभवायला
मिळावी, फक्त पक्षांच्या किलबिलाटाला परवानगी. पावसाच्या भयावह आवाजपासून
२४ तास तरी सुटका हवी. झाडांची पानं ओली गिच्च नाहीत तर नुकतीच न्हाणं झाल्यावर
पंचाने टिपून कोरडी केल्यासारखी दिसावीत. दिवसा घरात नैसर्गिक उजेड
असावा, कृत्रिम प्रकाशाने घर उजळायची वेळ अजिबात येता कामा नये. किमान एक दिवस तरी कपडे काही तासात वाळावेत
आणि ते ही अगदी कोरडे, दमट नाहीत. कधीतरी घराच्या खिडक्या, ग्रिल कोरडे दिसावेत, घराच्या झाडांची एक
दिवस तरी नहाण्यापासून सुटका व्हावी.
बाहेर जायचं तर, नाही नाही आज पावसाची चिन्हं नाहीत, आज छत्री न्यायची गरज
नाही असा विचार करत बाहेर पडता यावं आणि आपण जसे बाहेर गेलो तसंच कोरडं
परतण्याचं भाग्य छत्री न नेताही किमान एक दिवस तरी लाभावं. रस्ते किमान
एक दिवस तरी छान कोरडे दिसावेत, चिखलाचं दर्शन किमान एक दिवस तरी चुकावं.
बाहेरून परतल्यावर किमान एक दिवस तरी आपल्या वहाणा कोरड्या, अगदी फार फार तर खालच्या
बाजूला जराशी माती लागून परत याव्यात. ओलेपणा आणि चिखल यांचं
सध्या असलेलं एकछत्री साम्राज्य किमान एक दिवस तरी रसातळाला जावं.
सगळे तलाव भरले, आता कशाला हवाय पाऊस ! असा विचार करणारे अरसिक आम्ही
नाही. बाहेर पाऊस पडत असताना तो बघत अगदी घरात बसूनच आत्म्याला चिंब भिजवण्याची
आवड आम्हाला आहे, तेवढी रसिकता नक्कीच बाळगून आहोत. पण, किमान एक दिवस तरी
सुट्टी दे रे या पावसापासून....! सूर्याची अगदी सौम्य अशी चार
किरणं क्वचित धाडस करत "मी येऊ का घरात", असं घाबरतच विचारतात. त्यांचं
स्वागत करत त्यांना घरात घेतोय न घेतोय तोवर त्यांना परत येण्याचं बोलावणं धाडलं
जातं आणि बिचारी परत जातात. एक दिवस तरी या किरणांना मोकळं सोडा
!
पावसामुळे येणारा गारवा किंवा अगदी क्वचित बोचरी थंडीही प्रत्येकाला
हवीशी वाटतेच, अगदी मुंबईकराला तर आधी....पण किमान एक दिवस जरा आता हवामानात बदल हवाय...
एक दिवस पावसापासून किंवा अगदी पावसाळी हवेपासूनही सुटका हवीय...
तेवढी तरी दे रे इंद्रदेवा....!
No comments:
Post a Comment