Showing posts with label गोळाबेरीज. Show all posts
Showing posts with label गोळाबेरीज. Show all posts

Friday, 12 August 2016

सह्याद्री वाहिनीवरील रविवारचे मराठी चित्रपट



रविवार, दुपारी ४ वाजून ०५ मिनिटे आमच्या घरी बऱ्याच वेळा टीव्ही लागायचा. तोपर्यंत अभ्यास पूर्ण करायचो आम्ही. आधी DD10 आणि नंतर DDसह्याद्री झालेल्या वाहिनीवर जुने मराठी चित्रपट लागायचे. त्या आधी सकाळी रंगोली, चंद्रकांता, रामायण वगैरे मालिका आणि मग मराठी सिनेमा. तसा आजही कदाचित त्याच वेळेला मराठी चित्रपट लागत असेल पण आता वाहिन्यांचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याला ठराविक दिवस आणि वेळेसाठी वाट पहावी लागत नाही पण पूर्वी पुण्यात एकच वाहिनी असायची, आलटून पालटून DD1 आणि DD10 वाहिन्या दाखवल्या जायच्या. तोच एक असा काळ होता त्यावेळी अतिशय दर्जेदार कार्यक्रम बघायला मिळायचे. भले तुमच्याकडे एकच वाहिनी असू देत पण ती आजच्या सगळ्या वाहिन्यांपेक्षा वरचढ होती. असो.... हा एक वेगळा विषय आहे आणि त्याबद्दल परत कधीतरी...
 
रविवारच्या या मराठी चित्रपटांनी मनावर एक प्रकारचे संस्कार अगदी लहान वयातच केले. कृष्ण-धवल चित्रपट, आपल्या मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ. हा काळ आमच्यासारख्या ८०च्या दशकात जन्मलेल्यांसाठी तसा जुनाच काळ. पण दूरदर्शननने हेच जुने सहजसुंदर, दर्जेदार सिनेमे दाखवून त्या सुवर्णकाळाशी अगदी छान ओळख करून दिली. त्यामुळे राजा परांजपे, व्ही. शांताराम, शरद तळवलकर, राजा गोसावी यांसारख्या कलाकारांचा चित्रपट प्रवास नवखा कधी वाटलाच नाही. या संस्कारांसाठी दूरदर्शनचे विशेष आभार..
 
आज गायिका मालती पांडे यांची जयंती. त्यांचं ते 'लाखाची गोष्ट' या चित्रपटातलं 'त्या तिथे पलीकडे' हे गाणं पटकन आठवलं आणि त्या निमित्ताने राजा परांजपे यांचा सरळ, साधा, सुंदर असा हा चित्रपटही आठवला.....कधीतरी असाच रविवारी दुपारी ४.०५ ला पाहिलेला.... आणि म्हणून हे सगळं लिहावसं वाटलं.
 
गदिमा-बाबुजी-मालती पांडे यांचं हे सुंदर गाणं, १९५२ साली जन्माला आलेलं पण आजही मनाला भावणारं...

Monday, 4 July 2016

मूकबधीर आईवडिलांची गोड गळ्याची लेक



फारसं नीट ऐकू न येणारे आणि नीट बोलता न येणारे, अगदी made for each other असे असणारे नवरा बायको, एक अतिशय गोंडस जोडी. त्यांची मुलगी, पण ती मात्र तुमच्या आमच्यासारखी. व्यवस्थित बोलू, ऐकू शकणारी. ही गोष्ट एकंदर सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाची गोष्ट, आईवडिलांचा दोष मुलीत नाही.

पण या मुलीचा आवाज खूप सुरेल आणि अतिशय गोड. फार सुंदर गाणं म्हणते ही मुलगी. तिचं गाणं ऐकणाऱ्यांकडून खूप वाहवा मिळवतं आणि प्रचंड टाळ्यांचा कडकडाटही.

पण ज्यांच्या कानातच दोष आहे, साधं बोललेलं ज्यांना नीट कळत नाही अशा त्या मुलीच्या आईवडिलांचा एकूणच गाणं या प्रकाराशीच फारसा संबंध नाही, मग आपल्या मुलीची ही कला, हे गुण तरी त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार ! लोकांनी गाण्याचं कौतुक केलं की हे दोघे खुश होतात.

काय म्हणावं तिघांच्या या नशिबाला ! आपलं गाणं आपलेच जन्मदात्रे नीट ऐकू शकत नाहीत आणि आपल्या मुलीचं गोड सुरेल गाणं, ज्याचं लोकं भरभरून कौतुक करतात आपल्याला काही नीट ऐकू येत नाही.

अशा या आईवडील आणि मुलीची मध्यंतरी भेट झाली. मुलीचा आवाज ऐकला. लोकांनी केलेलं कौतुक पाहिलं आणि या तिघांबद्दल खरंच वाईट वाटलं.

Wednesday, 29 June 2016

गांधी वध कट रचल्याचं ठिकाण



एखाद्या आवडत्या व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास ज्या वास्तूत घडतो, ती वास्तू त्या व्यक्तिमत्वाच्या चाहत्यांसाठी विशेष महत्त्वाची असते. त्या वास्तूसाठी ह्रदयात कुठेतरी विशेष स्थान असतं. "तेथे कर माझे जुळती" अशी भावना असते. मग असं व्यक्तिमत्व म्हणजे कलाकार, नेता, स्वातंत्र्य सैनिक, वगैरे कोणीही असू शकतं.
 
इतिहासात काही उल्लेखनीय घटना घडल्या आहेत, ज्यांचे दीर्घ परिणाम आपल्या मातृभूमीवर दिसले आहेत. काही परिणामांचे भोग लोकांना भोगावे लागले आहेत तर काही परिणामांची चांगली/वाईट फळं या देशाने चाखली आहेत. अशा अनेक घटना आहेत, त्यातली एक घटना 'गांधी वध'. गांधी वध आणि त्याचे परिणाम याबद्दल वेगळं लिहायची गरज नाही.
 
गांधी वध करण्यापूर्वी त्याचा कट रचला गेला. तो कसा करावा याबद्दल बरीच खलबतं झाली. गोडसे, आपटे सहीत चार हिंदूमहासभा सदस्य यांच्या छुप्या बैठकी व्हायच्या आणि त्या बैठकीत हा वधाचा कट रचला गेला. जिथे हा कट रचला गेला ती वास्तू खरंच महान म्हणायची, त्या जागी हे कटाचं कार्य घडलं !
 
माझं जे माहेर आहे, त्याच्या अगदी शेजारी ही वास्तू आहे, एकदम लागून. यासाठी मी स्वतःला नशिबवान समजते. लहानपणी आम्ही तिथे खेळायला जायचो. एवढंच नाही तिथे काही काळ राहण्याचं भाग्यही आम्हाला मिळालं. मूळ मालकांनी ते एक मजली घर दुसऱ्यांना विकलं. नवीन मालकांनी त्या घराच्या मूळ साच्यात काहीही बदल केला नाही. त्यामुळे आजही त्या घराच्या त्या खोल्या गोडसे, आपटे सहीत चौघांच्या त्या ऐतिहासिक कटाची साक्ष देतात.
 
मी याही बाबतीत स्वतःला नशिबवान मानते कारण आमचा वाडा शांत उभा राहून त्या चौघांना पहात होता, ऐकत होता...!