रविवार, दुपारी ४ वाजून ०५ मिनिटे आमच्या घरी बऱ्याच वेळा टीव्ही लागायचा. तोपर्यंत अभ्यास पूर्ण करायचो आम्ही. आधी DD10 आणि नंतर DDसह्याद्री
झालेल्या वाहिनीवर जुने मराठी चित्रपट लागायचे. त्या आधी सकाळी रंगोली, चंद्रकांता, रामायण वगैरे मालिका आणि मग मराठी सिनेमा. तसा आजही कदाचित त्याच वेळेला मराठी चित्रपट लागत असेल पण आता वाहिन्यांचे
असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याला ठराविक दिवस आणि वेळेसाठी
वाट पहावी लागत नाही पण पूर्वी पुण्यात एकच वाहिनी असायची, आलटून पालटून DD1 आणि DD10 वाहिन्या दाखवल्या
जायच्या. तोच एक असा काळ होता त्यावेळी अतिशय दर्जेदार कार्यक्रम बघायला मिळायचे. भले तुमच्याकडे एकच वाहिनी असू देत पण
ती आजच्या सगळ्या वाहिन्यांपेक्षा वरचढ होती. असो.... हा एक वेगळा विषय
आहे आणि त्याबद्दल परत कधीतरी...
रविवारच्या या मराठी चित्रपटांनी मनावर एक प्रकारचे संस्कार अगदी
लहान वयातच केले. कृष्ण-धवल चित्रपट, आपल्या
मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ. हा काळ आमच्यासारख्या
८०च्या दशकात जन्मलेल्यांसाठी तसा जुनाच काळ. पण दूरदर्शननने हेच जुने
सहजसुंदर, दर्जेदार सिनेमे दाखवून त्या सुवर्णकाळाशी अगदी छान ओळख करून दिली. त्यामुळे राजा परांजपे, व्ही. शांताराम, शरद तळवलकर, राजा गोसावी यांसारख्या कलाकारांचा चित्रपट प्रवास नवखा कधी
वाटलाच नाही. या संस्कारांसाठी दूरदर्शनचे विशेष आभार..
आज गायिका मालती पांडे यांची जयंती. त्यांचं ते 'लाखाची
गोष्ट' या चित्रपटातलं 'त्या तिथे
पलीकडे' हे गाणं पटकन आठवलं आणि त्या निमित्ताने राजा परांजपे
यांचा सरळ, साधा, सुंदर असा
हा चित्रपटही आठवला.....कधीतरी असाच रविवारी दुपारी ४.०५ ला पाहिलेला....
आणि म्हणून हे सगळं लिहावसं वाटलं.
गदिमा-बाबुजी-मालती पांडे
यांचं हे सुंदर गाणं, १९५२ साली जन्माला आलेलं पण आजही मनाला भावणारं...
No comments:
Post a Comment