Showing posts with label चित्रपटसृष्टीतील काही हिऱ्यांचं व्यक्तिचित्रण. Show all posts
Showing posts with label चित्रपटसृष्टीतील काही हिऱ्यांचं व्यक्तिचित्रण. Show all posts

Sunday, 21 August 2016

श्रेया घोषाल



घोषाल कुटुंब फाळणीनंतर पूर्व बंगालमधून पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झालं. हे एक हुशार कुटुंब. सगळे उच्च विद्याविभूषित. श्रेयाचे आईवडीलही चांगले शिकलेले आणि चांगली नोकरी असलेले. बंगालमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दोघे उत्साहाने सहभागी व्हायचे. या अशा कार्यक्रमांमध्ये श्रेयाची आई गाणं म्हणायची. या गाण्यांचा सराव करताना बाल श्रेया आईचं गाणं ऐकून तेच गाणं आपल्या बोबड्या आवाजात म्हणायचा प्रयत्न करायची. इथेच श्रेयाच्या संगीत शिक्षणाला सुरुवात झाली. तिची आई हाच तिचा पहिला गुरु. चार वर्षांची असताना श्रेयाने आईला हार्मोनियमवर साथ करायला सुरुवात केली.
 
अशा रितीने श्रेयाचं संगीत शिक्षण अगदी लहान वयातच सुरु झालं. संगीत तर तिच्या रक्तातच होतं पण योग्य वेळी योग्य गुरु तिला लाभले आणि तिच्या अंगभूत कलेला चांगली चालना मिळाली. एकीकडे एक बाल गायिका घडत असताना तिने तिच्या शालेय शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही.
अगदी लहान वयापासून व्यासपीठावर गाणी म्हणत म्हणत गाण्यांच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेत घेत श्रेयाने सारेगम या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेमुळे तिचं आयुष्यच बदलून गेलं.
 
संजय लीला भन्साळी देवदास सिनेमा बनवत होते. इस्माईल दरबार यांनी गाण्यांच्या गायिकाही नक्की केल्या होत्या. ऐश्वर्याच्या गाण्यांसाठी लताबाईंचं नाव नक्की झालं होतं. बैरी पिया हे गाणं, त्या गाण्यातले चढ उतार फक्त दिदीच म्हणू शकतात आणि ऐश्वर्याची गाणी ही देखील टिपीकल दिदींचीच गाणी असल्याने लताबाईंची निवड नक्की होती.
 
१९९९ साली श्रेया सारेगम या स्पर्धेत एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. असंच एकदा सारेगम बघत असताना श्रेयाचा आवाज संजय भन्साळीच्या आईने ऐकला आणि तिने लगेच आपल्या मुलाला बोलावलं आणि तिचा आवाज ऐकायला सांगितला. आणि इथेच त्याला पारोचा आवाज मिळाला. तिच्या आवाजातला निरागसपणा त्याला फार आवडला आणि पारोसाठी असाच निरागस आवाज हवा म्हणत त्याने पारोसाठी श्रेयाला घेण्याचं नक्की केलं.
 
सारेगमची महाअंतिम फेरी श्रेया जिंकली. परिक्षक म्हणून भारतीय संगीतातली दिग्गज मंडळी होती. श्रेयाने सगळ्यांची मनं जिंकली. त्या परिक्षकांमध्ये एक होते संगीतकार कल्याणजी. त्यांना तिच्यात उद्याची पार्श्वगायिका दिसत होती. त्यांनी तिच्या वडिलांना बंगाल सोडून मुंबईतच यायला सांगितलं. मुंबईतले तिचे पहिले गुरु कल्याणजीच.
 
वयाच्या सोळाव्या वर्षी बारावीची परिक्षा अगदी तोंडावर आलेली असताना तिने हिंदी चित्रपटांसाठीचं पहिलं 'बैरी पिया' हे गाणं ध्वनिमुद्रित केलं. देवदासच्या गाण्यांसाठी कुठलाही सराव तिने केला नाही कारण स्टुडिओतही ती अभ्यासच करायची. दिदींची गाणी भन्साळी मधून मधून तिच्याकडून गाऊन घ्यायचे आणि ऐश्वर्या त्या त्या गाण्यातले योग्य भाव तिच्या गळ्यातून उतरवण्यासाठी तिला मदत करायची. देवदासची गाणी खूप गाजली. बैरी पियासाठी श्रेयाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
 
आणि श्रेयाच्या कारकिर्दीची गाडी भरधाव वेगाने धावू लागली आणि तिने हे सांभाळत आपलं शिक्षणही व्यवस्थित पूर्ण केलं हे विशेष. श्रेया आपल्या यशाचं श्रेय तिला मिळालेल्या गाण्यांना देते. तिला गाणीच अतिशय चांगल्या दर्जाची मिळाली आणि म्हणून तिची कारकिर्द बहरली, असं तिचं म्हणणं आहे.
 
लता मंगेशकर यांचं एक असं अढळ स्थान आहे, त्या जागी पोहोचणं केवळ अशक्य पण काळ जो आहे तो कोणासाठीही थांबत नाही. त्यामुळे आता या नवीन काळात लता मंगेशकर यांच्यानंतर जर कोणी असेल तर श्रेया घोषालच. मधाळ आवाज आणि त्याला शास्त्रीय संगीताची जोड ही फक्त श्रेयाच्या आवाजातच ऐकायला मिळते.
 
आज असा एक दोन गायक-गायिकांचा काळ असं काही राहिलं नाही. एक सिनेमा आणि चार पाच गायिका असंही पहायला मिळतं. त्यामुळे श्रेया थोडी सध्या मागे पडली आहे असं वाटतं. तिला माझ्या शुभेच्छा...!
 
आज श्रेया घोषाल मुखोपाध्याय (मुखर्जी) हिचा वाढदिवस. तिला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तिच्याकडून अनेक उत्तमोत्तम गाणी रसिकांना ऐकायला मिळोत, यासाठीही शुभेच्छा...!



मदन मोहन

एखादा संगीतकार गुणी आहे की नाही हे कसं ठरवायचं ? त्याला मिळालेलं यश पाहून ? की त्याच्या संगीताचा दर्जा पाहून ? पण हा दर्जा ठरवणार कोण ? लोकं की critics ? mass की class ? समांतर चित्रपट, त्यांचं यश खूपच मर्यादीत असतं कारण ते चित्रपट पाहणारी लोकंच वेगळी असतात. झुंबडच्या झुंबड असे चित्रपट बघायला जात आहे असं या चित्रपटांच्या बाबतीत घडत नाही. मग मर्यादीत यश म्हणजे यश कमी म्हणजेच तो चित्रपट विशेष उल्लेखनीय नाही, असं आहे का ? हे झालं सिनेमांचं पण गाण्यांचं काय ? जर एखाद्या संगीतकाराला म्हणावं तेवढं यश मिळालं नाही तर तो गुणी संगीतकार नाही ? जर एखाद्या संगीतकाराला पुरस्कार मिळालेच नाहीत तर तो संगीतकार एक गुणी संगीतकार नाही ? 

प्रश्न खूप आहेत, प्रत्येकाची उत्तरंही वेगळी असतील पण यश आणि गुणवत्ता हे नेहमी हातात हात घालून उभे असतीलच असं मला वाटत नाही आणि याचं एक मोठं उदाहरण म्हणजे, महान संगीतकार ‘मदन मोहन कोहली’. अयशस्वी चित्रपटांची गाणी यशस्वी करणे, ही सोपी गोष्ट नाही. अयशस्वी चित्रपटांना यशस्वी गाणी देणारा संगीतकार म्हणून या संगीतकाराचा उल्लेख करणं योग्य ठरेल. हिंदी चित्रपटांचे संगीतकार अशी यादी करायला घेतली तर ती यादी ‘मदन मोहन’ या नावाशिवाय अपूर्ण असेल. मदन मोहन यांनी आपल्या कारकिर्दीत चित्रपटांना सर्व प्रकारचं संगीत दिलं पण आज लोकांना यांची उडत्या चालीची अशी कितीशी गाणी लक्षात आहेत ? लक्षात आहेत ती फक्त गंभीर गाणी किंवा गज़ल्स. हयात असताना या संगीतकाराला चाहत्यांचं प्रेम विशेष मिळालंच नाही पण आज या संगीतकाराचे असंख्य चाहते आहेत, पण हे चाहत्यांचं प्रेम पाहायला आज ‘मदन मोहन’ हयात नाहीत. संपूर्ण कारकिर्दीत केवळ एक फिल्मफेअर पुरस्कार मिळालेल्या या संगीतकाराचं नाव फिल्मफेअरने १०० वर्षातले ५ विशेष उल्लेखनीय संगीतकारांच्या यादीत समाविष्ट केलंय. पण हे पहायलाही मदन मोहन हयात नाही. अशा कितीतरी गोष्टी या महान संगीतकाराबद्दल उल्लेखण्यासारख्या आहेत कारण गुणवत्ता असूनही अपयश हेच या महान संगीतकाराचं जीवन होतं, असो......

दुसरं महायुद्ध चालू होतं, या युद्धात एक सैनिक लढत होता पण त्याचं मन आर्मीत रमत नव्हतं, त्याला अभिनेता व्हायचं होतं. महायुद्ध संपलं आणि हा सैनिक तडक मुंबईला आला. वडील रायबहादूर चुन्नीलाल कोहली म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक मोठं नाव पण आपल्या मुलाने या क्षेत्रात येण्याला त्यांचा विरोध होता. ह्या क्षेत्राचे बदलते रंग आपल्या मुलाच्या नशिबात नकोत म्हणूनच त्यांनी मुलाला आर्मीत पाठवलं होतं. वडिलांचा पाठींबा नसल्याने हिंदी चित्रपटसृष्टीत मुलाला खूप संघर्ष करावा लागला. अभिनेता म्हणून कारकीर्द सुरू केली पण त्याचं मन रमलं ते संगीतात. संगीताचं कुठलंही शास्त्रोक्त शिक्षण त्याने घेतलेलं नव्हतं. पण त्याच्या आईला असलेली संगीताची आवड कुठेतरी मुलात उतरली आणि मुलगा हिंदी चित्रपटसृष्टीचा एक महान संगीतकार बनला, नाव ‘मदन मोहन कोहली’.

त्यांनी बऱ्याच गायकांबरोबर गाणी केली पण लता मंगेशकर यांच्याबरोबरची त्यांची गाणी ही विशेष उल्लेखनीय आहेत. मदन मोहन-लता मंगेशकर अशी (मानलेल्या) बहीणभावाची जोडी हिंदी चित्रपट संगीतात प्रसिद्ध आहे. लता मंगेशकर यांच्या गळ्यातून मदन मोहन यांनी ‘बेस्ट’ बाहेर काढलं आणि त्याचा परिणाम म्हणजे दोघांची अवीट गोडीची गाणी आणि गज़ल्स. केवळ आपल्या भावाच्या प्रेमाखातर लताबाई ‘वीर ज़ारा’साठी गाणी म्हणायला तयार झाल्या होत्या.

मदन मोहन यांचं संगीत काळाच्या पुढचं होतं, त्यामुळे जे यश त्यांच्या गाण्यांना त्यांच्या हयातीत मिळायला हवं होतं ते यश त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर मिळालं. त्यांनी जितके वर्ष आपली कारकीर्द घडवली, त्यात अपवाद वगळता त्यांनी यश पाहिलं नाही. चित्रपटांची गाणी अप्रतिम पण चित्रपट फ्लॉप, त्यामुळे त्यांचं संगीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकलंच नाही. त्यामुळे आज लोकांना त्यांची सदाबहार गाणी लक्षात आहेत पण ती गाणी कोणत्या चित्रपटातली हे लक्षातही नाही.

मदन मोहन यांना ‘दस्तक’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आयुष्यभर ते पुरस्कारांची वाट पहात राहिले पण अपवाद वगळता त्यांच्या वाटेवर पुरस्कार कधी वळलेच नाहीत. संगीतकार नौशाद मदन मोहन यांना म्हणाले होते, माझी संपूर्ण संगीत कारकीर्द आणि तुझ्या ‘अनपढ़’ मधल्या दोन गज़ल्स यांची आपण अदलाबदल करूयात. नौशादसारख्या काही जोहरींनी या हिऱ्याची पारख केली, हे ही एखाद्या पुरस्कारापेक्षा नक्कीच कमी नाही.         

हिंदी चित्रपटसृष्टीत दुर्लक्षित राहिलेल्या एका महान संगीतकाराची त्याच्या जन्मदिवासाबद्दल काढलेली ही एक आठवण.