Sunday 25 September 2016

आमचा हुश्शार शेजारी कुत्रा



' कुत्र्या.........' ही शिवी मला स्वतःला अजिबात आवडत नाही .कुत्रा ही एक अतिशय प्रामाणिक जमात आणि आपण सरळ या जातीचा उल्लेख शिवीसाठी वापरतो हे मला पटत नाही.

तर ते असो......

आज सकाळी साधारण .३० च्या सुमारास आमच्या शेजारच्या इमारतीतल्या एका पाळीव कुत्र्याला जोरात पळत त्याच्या इमारतीत शिरताना मी पाहिलं .एरवी शांत दिसणारा हा कुत्रा असा एवढ्या वेगाने का पळत आलाय आणि कुठून, राहून राहून हेच प्रश्न सारखे मनात येत होते.

आत्ताच त्यांच्या शेजारी राहणा-या एक बाई भेटल्या होत्या .त्या सांगत होत्या -
 
golden retriever जातीचा हा देखणा कुत्रा रोज सकाळी त्या घरातल्या साधारण सत्तरीच्या यजमानांबरोबर फिरायला जातो .त्या शिरस्त्याप्रमाणे दोघे आजही सकाळी फिरायला गेले होते.

घरी परतत असताना त्या यजमानांना अचानक शक्तीपात झाल्या सारखं झालं आणि ते तिथेच एका दुकानाच्या बाहेर बसले. त्यांची शुद्ध हरपली .तसा हा कुत्रा जोरात पळत घरी आला .त्यांचा मुलगा ऑफिसला जाण्याच्या तयारीतच होता .तेवढ्यात त्या मुलाजवळ तो कुत्रा आला आणि त्या मुलाच्या अंगावर जोरात भुंकायला लागला .जिथे कारची किल्ली असते तिथे त्या मुलाला घेऊन गेला .त्याला किल्ली घ्यायला लावली आणि त्याच्या पॅंटला धरून ओढत ओढत घरातून बाहेर घेऊन जायला लागला.
हा एकटाच एवढा पळत कसा घरी आला आणि बाबा कुठे आहेत, या विचारांनी घरच्यांना काळजी वाटायला लागली .तेवढ्यात इमारतीचा वॉचमनही घरी आला .त्या दोघांना तो कुत्रा घेऊन त्याचे वडील जिथे बेशुद्ध पडले होते तिथे घेऊन गेला .डॉक्टरांचा सल्ला घेऊन लगेच ते दोघे वडिलांना हॉस्पिटलमधे घेऊन गेले.

मला तर हे सगळं ऐकून त्यांच्या कुत्र्याचं फार म्हणजे फारच कौतुक वाटलं .केवढी ही जागरुकता, समयसूचकता, प्रामाणिकपणा, हजरजबाबीपणा ! आज त्यांच्या कुत्र्याने अशी तत्परता दाखवली नसती तर कितीतरी वेळ ते वडील असेच रस्त्यात बेशुद्धावस्थेत पडून राहिले असते ! उशीरा वैद्यकीय उपचार मिळाल्याने कदाचित त्यांच्या आजारातली complications वाढली असती.

सकाळपासून त्यांच्या कुत्र्याने पाण्याच्या थेंबाला स्पर्श केला नाहीये .त्याच्या नेहमीच्या जागी उदास बसून आहे .आता प्रत्यक्ष त्या वडिलांना तो जोपर्यंत पहात नाही तोपर्यंत काही सहजासहजी हा अन्नाला शिवणार नाही.

खरंच great !!!!!!! अशा या श्वान जातीकडे पाहिलं की कधीकधी तर मानव जातच मला खुजी वाटू लागते.