Showing posts with label सनातन संस्कृती आणि परंपरा. Show all posts
Showing posts with label सनातन संस्कृती आणि परंपरा. Show all posts

Thursday, 11 August 2016

मोहिनी एकादशी



देवगण आणि राक्षस यांची अमृत मंथनाची तयारी सुरू होती. आपल्या क्षीरसागरात शेषनागावर बसलेले भगवान विष्णू थोडे चिंताग्रस्त होते. हे बघून देवी योगमायाने त्यांना विचारलं की तुम्ही कसे काय कुठल्या काळजीत असू शकता ? तुम्ही तर या सृष्टीचे पालक आहात मग तुमच्या चिंतेचं कारण काय ?

तेव्हा भगवंत म्हणाले, मला भविष्याची चिंता आहे. देवगणांची चिंता आहे आणि म्हणून थोडा काळजीत आहे. जर समुद्र मंथनातून अमृत निघालं तर राक्षस आपल्या मायावी विद्येने किंवा शारीरिक शक्तीने ते अमृत देवतांकडून हिसकावून घेतील आणि जर हे असं घडलं तर या समुद्र मंथनाला काय अर्थ उरणार ?  

हे ऐकून योगमाया म्हणाली, भगवंत तुम्ही अंतर्ज्ञानी आहात. तुम्हाला भविष्य काय आहे हे माहीत आहे. तुम्ही असताना देवतांचं वाईट कसं होईल ? आणि या त्रिलोकात मायावी विद्या आणि शक्ती यात तुम्हाला हारवू शकतील असं कोणी आहे का ?

तेव्हा विष्णू म्हणाले, ही एवढीच गोष्ट नाहीये. मला माझ्यात आकर्षण शक्ती निर्माण करावी लागेल तसेच सुंदर आणि तेवढीच चतुर असणाऱ्या स्त्रीचं रूप घ्यावं लागेल. त्यासाठीच काय करता येईल याचा विचार करत आहे.

हे ऐकल्यावर योगमाया म्हणाली, मी स्वतः महामोहिनीचं रूप घेऊन तुमच्या हृदयात जाऊन बसते. मग तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तुमच्या सगळ्याच चिंता मिटतील.

असं म्हणून देवी योगमाया मोहिनी रुपात प्रकट झाली. देवीचं रूप अद्भुत होतं. तिच्यासारखी सुंदर स्त्री तिन्ही लोकात कोणी नाही. या अद्भुत रुपात देवी विष्णूंच्या शरीरात शिरली.  

त्यानंतर काही दिवसांनी अमृत मंथन झालं आणि त्यातून अमृत निघालं. ते राक्षसांनी हिसकावून घेतलं. त्यावेळी भगवान विष्णूंनी योगमायेचं मोहिनी रूप धारण केलं. त्या दिवशी विष्णूंची आवडती तिथी एकादशी होती आणि म्हणून त्या एकादशीला म्हणजेच वैशाख शुद्ध एकादशीला “मोहिनी एकादशी” असं म्हटलं जातं.  

      

नर्मदा जयंती


एकदा शिव विंध्य पर्वतावर 'अमरकंटक' येथे तपस्या करत होते .तेव्हा विष्णू, ब्रह्मदेवांसकट सगळे देव त्यांचं दर्शन घेण्यासाठी अमरकंटक येथे आले आणि महादेवांनी दर्शन द्यावं म्हणून विनवणी करू लागले .सगळ्या प्रकारे प्रार्थना करून झाल्यावर महादेवांनी डोळे उघडले. तेव्हा सगळे देव सांगू लागले की अनेक राक्षसांचा वध केल्यामुळे आमची पापं खूप वाढली आहेत .तरी त्यांचं क्षालन करण्यासाठी कृपया काही मार्ग सुचवा.

तेवढ्यात महादेवांच्या कपाळावरून घामाचा एक तेजस्वी थेंब खाली पडला आणि तिथे एक कुंड तयार झालं .त्या कुंडात एक छोटी मुलगी, शंकरांची मानसकन्या निर्माण झाली .त्या मुलीचं नाव 'नर्मदा' ठेवण्यात आलं .शंकरांच्या तपसाधनेतून निर्माण झालेल्या घामाच्या थेंबातून तिचा जन्म झाल्याने ती मुलगी खूप तेजस्वी होती .तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्या देवांनी तिला योग्य ते आशीर्वाद दिले. अमरकंटक, हेच नर्मदा नदीचं उगमस्थान.

चंद्रवंशाचा राजा 'हिराण्यतेजा' एकदा आपल्या पितरांना शांती लाभावी म्हणून श्राद्ध करत होता. कितीही तर्पण केलं तरी त्याच्या पितरांना काही शांती लाभत नव्हती .म्हणून राजाने पितरांना प्रार्थना केली की माझ्याकडून काही चूक होत आहे का ? काही कमतरता आहे का ? मला मार्ग दाखवा .तेव्हा एका पूर्वजाने येऊन राजाला सांगितले की आमचं तर्पण नर्मदा नदीमध्ये कर .म्हणून राजाने शंकराची घोर तपश्चर्या केली आणि त्याचं फळ म्हणजे, पूर्वजांना शांती लाभावी म्हणून नर्मदा नदीला राजा हिरण्यतेजा पृथ्वीवर घेऊन आला .पृथ्वीवर जाण्यापूर्वी नर्मदेला आशीर्वाद देण्यात आले, तुझ्या मार्गात जे जे दगड येतील ते ते शिवलिंगासमान पूजले जातील. ज्याप्रमाणे उत्तरेकडे गंगेला स्थान आहे त्याप्रमाणेच पूजनीय स्थान तुझं दक्षिणेकडे असेल .महाप्रलयातही तुझ्या अस्तित्त्वाला धक्का लागणार नाही.  अशा प्रकारचे आशीर्वाद देऊन नर्मदेला पृथ्वीवर जाण्याचा आदेश महादेवांनी  दिला.

ज्या दिवशी नर्मदा नदी पृथ्वीवर आली तो दिवस होता 'माघ शुद्ध सप्तमी', साधारण मध्यान्हीचा काळ .हा दिवस नर्मदेच्या सर्व तीरांवर उत्साहाने 'नर्मदा जयंती' या नावाने साजरा केला जातो.

हिंदू धर्मात ही नदी अतिशय महत्त्वपूर्ण आहे .जगात हजारो नद्या आहेत पण फक्त आणि फक्त याच नदीला आपण प्रदक्षिणा घालू शकतो .'नर्मदा परिक्रमा' या नावाने असणारी ही प्रदक्षिणा खूप पुण्यवान समजली जाते .आत्तापर्यंत भगवान विष्णूंनी जेवढे अवतार घेतले आहेत, त्या सर्व अवतारांनी नर्मदा तीरावर येऊन नदीची पूजा केलेली आहे .आदिगुरू शंकराचार्यांसकट अनेक मोठ्या विभूतींनी या नदीच्या तीरावर येऊन साधना केली आहे .असं म्हटलं जातं की गंगा नदी बारा वर्षातून एकदा काळ्या गायीच्या रुपात येऊन नर्मदा स्नान करते, आपल्यामध्ये मिसळलेला पापाचा मळ स्वच्छ करून पांढऱ्या गायीच्या रुपात परतते .अशा या अतिशय पुण्यवान नदीचा जन्मोत्सव आजच्या दिवशी साजरा केला जातो.

पण आज वाढत्या प्रदुषणाने नर्मदा नदी दूषित झाली आहे .आजच्या दिवशी तिची  पूजा करताना तिला प्रदुषणमुक्त करण्याचा संकल्प करून तो अंमलात आणण्याची खरी आवश्यकता आहे           .
 .