Thursday, 11 August 2016

मोहिनी एकादशी



देवगण आणि राक्षस यांची अमृत मंथनाची तयारी सुरू होती. आपल्या क्षीरसागरात शेषनागावर बसलेले भगवान विष्णू थोडे चिंताग्रस्त होते. हे बघून देवी योगमायाने त्यांना विचारलं की तुम्ही कसे काय कुठल्या काळजीत असू शकता ? तुम्ही तर या सृष्टीचे पालक आहात मग तुमच्या चिंतेचं कारण काय ?

तेव्हा भगवंत म्हणाले, मला भविष्याची चिंता आहे. देवगणांची चिंता आहे आणि म्हणून थोडा काळजीत आहे. जर समुद्र मंथनातून अमृत निघालं तर राक्षस आपल्या मायावी विद्येने किंवा शारीरिक शक्तीने ते अमृत देवतांकडून हिसकावून घेतील आणि जर हे असं घडलं तर या समुद्र मंथनाला काय अर्थ उरणार ?  

हे ऐकून योगमाया म्हणाली, भगवंत तुम्ही अंतर्ज्ञानी आहात. तुम्हाला भविष्य काय आहे हे माहीत आहे. तुम्ही असताना देवतांचं वाईट कसं होईल ? आणि या त्रिलोकात मायावी विद्या आणि शक्ती यात तुम्हाला हारवू शकतील असं कोणी आहे का ?

तेव्हा विष्णू म्हणाले, ही एवढीच गोष्ट नाहीये. मला माझ्यात आकर्षण शक्ती निर्माण करावी लागेल तसेच सुंदर आणि तेवढीच चतुर असणाऱ्या स्त्रीचं रूप घ्यावं लागेल. त्यासाठीच काय करता येईल याचा विचार करत आहे.

हे ऐकल्यावर योगमाया म्हणाली, मी स्वतः महामोहिनीचं रूप घेऊन तुमच्या हृदयात जाऊन बसते. मग तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तुमच्या सगळ्याच चिंता मिटतील.

असं म्हणून देवी योगमाया मोहिनी रुपात प्रकट झाली. देवीचं रूप अद्भुत होतं. तिच्यासारखी सुंदर स्त्री तिन्ही लोकात कोणी नाही. या अद्भुत रुपात देवी विष्णूंच्या शरीरात शिरली.  

त्यानंतर काही दिवसांनी अमृत मंथन झालं आणि त्यातून अमृत निघालं. ते राक्षसांनी हिसकावून घेतलं. त्यावेळी भगवान विष्णूंनी योगमायेचं मोहिनी रूप धारण केलं. त्या दिवशी विष्णूंची आवडती तिथी एकादशी होती आणि म्हणून त्या एकादशीला म्हणजेच वैशाख शुद्ध एकादशीला “मोहिनी एकादशी” असं म्हटलं जातं.  

      

No comments:

Post a Comment