एखादा संगीतकार गुणी
आहे की नाही हे कसं ठरवायचं ? त्याला मिळालेलं यश पाहून ? की त्याच्या संगीताचा दर्जा
पाहून ? पण हा दर्जा ठरवणार कोण ? लोकं की critics ? mass की class ? समांतर चित्रपट,
त्यांचं यश खूपच मर्यादीत असतं कारण ते चित्रपट पाहणारी लोकंच वेगळी असतात. झुंबडच्या
झुंबड असे चित्रपट बघायला जात आहे असं या चित्रपटांच्या बाबतीत घडत नाही. मग मर्यादीत
यश म्हणजे यश कमी म्हणजेच तो चित्रपट विशेष उल्लेखनीय नाही, असं आहे का ? हे झालं सिनेमांचं
पण गाण्यांचं काय ? जर एखाद्या संगीतकाराला म्हणावं तेवढं यश मिळालं नाही तर तो गुणी
संगीतकार नाही ? जर एखाद्या संगीतकाराला पुरस्कार मिळालेच नाहीत तर तो संगीतकार एक
गुणी संगीतकार नाही ?
प्रश्न खूप आहेत,
प्रत्येकाची उत्तरंही वेगळी असतील पण यश आणि गुणवत्ता हे नेहमी हातात हात घालून उभे
असतीलच असं मला वाटत नाही आणि याचं एक मोठं उदाहरण म्हणजे, महान संगीतकार ‘मदन मोहन
कोहली’. अयशस्वी चित्रपटांची गाणी यशस्वी करणे, ही सोपी गोष्ट नाही. अयशस्वी चित्रपटांना
यशस्वी गाणी देणारा संगीतकार म्हणून या संगीतकाराचा उल्लेख करणं योग्य ठरेल. हिंदी
चित्रपटांचे संगीतकार अशी यादी करायला घेतली तर ती यादी ‘मदन मोहन’ या नावाशिवाय अपूर्ण
असेल. मदन मोहन यांनी आपल्या कारकिर्दीत चित्रपटांना सर्व प्रकारचं संगीत दिलं पण आज
लोकांना यांची उडत्या चालीची अशी कितीशी गाणी लक्षात आहेत ? लक्षात आहेत ती फक्त गंभीर
गाणी किंवा गज़ल्स. हयात असताना या संगीतकाराला चाहत्यांचं प्रेम विशेष मिळालंच नाही
पण आज या संगीतकाराचे असंख्य चाहते आहेत, पण हे चाहत्यांचं प्रेम पाहायला आज ‘मदन मोहन’
हयात नाहीत. संपूर्ण कारकिर्दीत केवळ एक फिल्मफेअर पुरस्कार मिळालेल्या या संगीतकाराचं
नाव फिल्मफेअरने १०० वर्षातले ५ विशेष उल्लेखनीय संगीतकारांच्या यादीत समाविष्ट केलंय.
पण हे पहायलाही मदन मोहन हयात नाही. अशा कितीतरी गोष्टी या महान संगीतकाराबद्दल उल्लेखण्यासारख्या
आहेत कारण गुणवत्ता असूनही अपयश हेच या महान संगीतकाराचं जीवन होतं, असो......
दुसरं महायुद्ध चालू
होतं, या युद्धात एक सैनिक लढत होता पण त्याचं मन आर्मीत रमत नव्हतं, त्याला अभिनेता
व्हायचं होतं. महायुद्ध संपलं आणि हा सैनिक तडक मुंबईला आला. वडील रायबहादूर चुन्नीलाल
कोहली म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक मोठं नाव पण आपल्या मुलाने या क्षेत्रात येण्याला
त्यांचा विरोध होता. ह्या क्षेत्राचे बदलते रंग आपल्या मुलाच्या नशिबात नकोत म्हणूनच
त्यांनी मुलाला आर्मीत पाठवलं होतं. वडिलांचा पाठींबा नसल्याने हिंदी चित्रपटसृष्टीत
मुलाला खूप संघर्ष करावा लागला. अभिनेता म्हणून कारकीर्द सुरू केली पण त्याचं मन रमलं
ते संगीतात. संगीताचं कुठलंही शास्त्रोक्त शिक्षण त्याने घेतलेलं नव्हतं. पण त्याच्या
आईला असलेली संगीताची आवड कुठेतरी मुलात उतरली आणि मुलगा हिंदी चित्रपटसृष्टीचा एक
महान संगीतकार बनला, नाव ‘मदन मोहन कोहली’.
त्यांनी बऱ्याच गायकांबरोबर
गाणी केली पण लता मंगेशकर यांच्याबरोबरची त्यांची गाणी ही विशेष उल्लेखनीय आहेत. मदन
मोहन-लता मंगेशकर अशी (मानलेल्या) बहीणभावाची जोडी हिंदी चित्रपट संगीतात प्रसिद्ध
आहे. लता मंगेशकर यांच्या गळ्यातून मदन मोहन यांनी ‘बेस्ट’ बाहेर काढलं आणि त्याचा
परिणाम म्हणजे दोघांची अवीट गोडीची गाणी आणि गज़ल्स. केवळ आपल्या भावाच्या प्रेमाखातर
लताबाई ‘वीर ज़ारा’साठी गाणी म्हणायला तयार झाल्या होत्या.
मदन मोहन यांचं संगीत
काळाच्या पुढचं होतं, त्यामुळे जे यश त्यांच्या गाण्यांना त्यांच्या हयातीत मिळायला
हवं होतं ते यश त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर मिळालं. त्यांनी जितके वर्ष आपली कारकीर्द
घडवली, त्यात अपवाद वगळता त्यांनी यश पाहिलं नाही. चित्रपटांची गाणी अप्रतिम पण चित्रपट
फ्लॉप, त्यामुळे त्यांचं संगीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकलंच नाही. त्यामुळे
आज लोकांना त्यांची सदाबहार गाणी लक्षात आहेत पण ती गाणी कोणत्या चित्रपटातली हे लक्षातही
नाही.
मदन मोहन यांना ‘दस्तक’
सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आयुष्यभर ते
पुरस्कारांची वाट पहात राहिले पण अपवाद वगळता त्यांच्या वाटेवर पुरस्कार कधी वळलेच
नाहीत. संगीतकार नौशाद मदन मोहन यांना म्हणाले होते, माझी संपूर्ण संगीत कारकीर्द आणि
तुझ्या ‘अनपढ़’ मधल्या दोन गज़ल्स यांची आपण अदलाबदल करूयात. नौशादसारख्या काही जोहरींनी
या हिऱ्याची पारख केली, हे ही एखाद्या पुरस्कारापेक्षा नक्कीच कमी नाही.
हिंदी चित्रपटसृष्टीत
दुर्लक्षित राहिलेल्या एका महान संगीतकाराची त्याच्या जन्मदिवासाबद्दल काढलेली ही एक
आठवण.

No comments:
Post a Comment