Sunday, 21 August 2016

प्राण



वयाच्या बाराव्या वर्षी सिगरेटचं व्यसन लागलं आणि मग पानपट्टीच्या दुकानावर वरचेवर येणं जाणं होऊ लागलं. एकदा एक पंजाबी चित्रपटांचा दिग्दर्शकही त्या दुकानात आला होता. या मुलाची सिगारेट ओढण्याची पद्धत, उभं राहण्याची स्टाईल, चेहऱ्यावरचे भाव हे सगळं तो दिग्दर्शक आपल्या डोळ्यांनी टिपत होता आणि त्याचवेळी त्याला आपल्या पंजाबी सिनेमासाठी कलाकार मिळाला. हा सिनेमाचा प्रस्ताव त्या मुलाने गांभीर्याने घेतला नाही पण त्या मुलाच्या मागे लागून दिग्दर्शकाने आपल्या चित्रपटात या मुलाकडून काम करून घेतलंच. हा पंजाबी चित्रपट चांगलाच यशस्वी झाला आणि "प्राण सिकंद" यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.
 
प्राण यांच्या भूमिकेचा पगडा लोकांच्या मनावर इतका जबरदस्त होता की खलनायकाची भूमिका असेल तर लोकं त्यांच्या भूमिकेला घाबरायचे आणि हाच अनुभव प्राण यांना त्यांच्या खऱ्या आयुष्यातही यायचा. लोकं त्यांना टरकून असायची. तसेच, प्राण यांची भूमिका चरित्र अभिनेत्याची असेल तर लोकं प्राण यांना पडद्यावर बघून भावुक बनायची.

कित्येक वेळा तर चित्रपटातल्या मुख्य कलाकारापेक्षा प्राण यांचं मानधन जास्त असायचं. चित्रपट लिहिणारे सिनेमाच्या कथेप्रमाणे नाही तर प्राण यांच्या अभिनय स्टाईलप्रमाणे प्राण यांची भूमिका लिहायचे.
 
संवाद, त्यांची पद्धत आणि अचूक संवादफेक हा प्राण यांच्या अभिनयाचा सर्वात महत्त्वाचा भाग आणि त्याच्या जोडीला धीरगंभीर, वजनदार आवाज आणि बोलका चेहरा या सगळ्याचं अचूक मिश्रण म्हणजेच पडद्यावरचे प्राणसाहेब. प्राण यांची प्रत्येक सिनेमात वेगवेगळी स्टाईल असायची आणि तेवढीच वेगळी पद्धत संवाद म्हणण्याचीही. ही विविधता ते आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांकडून आत्मसात करायचे. त्यांचे संवाद लोकप्रिय झालेले अनेक चित्रपट आहेत पण त्यांचा कित्येक चित्रपटांमधला गाजलेला संवाद म्हणजे " बरखुरदार "
 
मधुमती, ज़ंजीर, उपकार, अमर अकबर अँथनी, डॉन, कर्ज, नसीब, पूरब और पश्चिम अशा कितीतरी सिनेमातले प्राण यांचे संवाद अजरामर झाले.
 
उपकार - "भारत तू दुनिया की छोड़ पहले अपनी सोच. राम ने हर युग में जन्म लिया है लेकिन लक्षमण जैसा भाई दोबारा पैदा नहीं हुआ." "रेशन पर भाषण बहुत है पर भाषण पर कोई रेशन नहीं"
 
ज़ंजीर - "इस इलाके में नये आये हो बरखुरदार, वर्ना शेरखान को कौन नहीं जानता" "चिल्लाओ नहीं साहब, गला खराब हो जायेगा"....
 
अशा संवांदांची तर गणतीच नाही. हे असे संवाद हीच तर त्यांची ख्याती होती.
 
प्राण यांना त्यांच्या खलनायकी भूमिकेमुळे लोकं जरी घाबरून असायची, पण त्यांचा खरा स्वभाव खूप शांत आणि चांगला होता, अगदी पडद्यावरच्या त्यांच्या खलनायकापेक्षा एकदम विरुद्ध.



No comments:

Post a Comment