घोषाल कुटुंब फाळणीनंतर पूर्व बंगालमधून पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झालं. हे एक हुशार कुटुंब. सगळे उच्च विद्याविभूषित. श्रेयाचे आईवडीलही चांगले शिकलेले आणि चांगली नोकरी असलेले. बंगालमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दोघे उत्साहाने सहभागी व्हायचे. या अशा कार्यक्रमांमध्ये श्रेयाची आई गाणं म्हणायची. या गाण्यांचा सराव करताना बाल श्रेया आईचं गाणं ऐकून तेच गाणं आपल्या बोबड्या आवाजात म्हणायचा प्रयत्न करायची. इथेच श्रेयाच्या संगीत शिक्षणाला सुरुवात झाली. तिची आई हाच तिचा पहिला गुरु. चार वर्षांची असताना श्रेयाने आईला हार्मोनियमवर साथ करायला सुरुवात केली.
अशा रितीने श्रेयाचं संगीत शिक्षण अगदी लहान वयातच सुरु झालं. संगीत तर तिच्या रक्तातच होतं पण योग्य वेळी योग्य गुरु तिला लाभले आणि तिच्या अंगभूत कलेला चांगली चालना मिळाली. एकीकडे एक बाल गायिका घडत असताना तिने तिच्या शालेय शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही.
अगदी लहान वयापासून व्यासपीठावर गाणी म्हणत म्हणत गाण्यांच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेत घेत श्रेयाने सारेगम या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेमुळे तिचं आयुष्यच बदलून गेलं.
संजय लीला भन्साळी देवदास सिनेमा बनवत होते. इस्माईल दरबार यांनी गाण्यांच्या गायिकाही नक्की केल्या होत्या. ऐश्वर्याच्या गाण्यांसाठी लताबाईंचं नाव नक्की झालं होतं. बैरी पिया हे गाणं, त्या गाण्यातले चढ उतार फक्त दिदीच म्हणू शकतात आणि ऐश्वर्याची गाणी ही देखील टिपीकल दिदींचीच गाणी असल्याने लताबाईंची निवड नक्की होती.
१९९९ साली श्रेया सारेगम या स्पर्धेत एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. असंच एकदा सारेगम बघत असताना श्रेयाचा आवाज संजय भन्साळीच्या आईने ऐकला आणि तिने लगेच आपल्या मुलाला बोलावलं आणि तिचा आवाज ऐकायला सांगितला. आणि इथेच त्याला पारोचा आवाज मिळाला. तिच्या आवाजातला निरागसपणा त्याला फार आवडला आणि पारोसाठी असाच निरागस आवाज हवा म्हणत त्याने पारोसाठी श्रेयाला घेण्याचं नक्की केलं.
सारेगमची महाअंतिम फेरी श्रेया जिंकली. परिक्षक म्हणून भारतीय संगीतातली दिग्गज मंडळी होती. श्रेयाने सगळ्यांची मनं जिंकली. त्या परिक्षकांमध्ये एक होते संगीतकार कल्याणजी. त्यांना तिच्यात उद्याची पार्श्वगायिका दिसत होती. त्यांनी तिच्या वडिलांना बंगाल सोडून मुंबईतच यायला सांगितलं. मुंबईतले तिचे पहिले गुरु कल्याणजीच.
वयाच्या सोळाव्या वर्षी बारावीची परिक्षा अगदी तोंडावर आलेली असताना तिने हिंदी चित्रपटांसाठीचं पहिलं 'बैरी पिया' हे गाणं ध्वनिमुद्रित केलं. देवदासच्या गाण्यांसाठी कुठलाही सराव तिने केला नाही कारण स्टुडिओतही ती अभ्यासच करायची. दिदींची गाणी भन्साळी मधून मधून तिच्याकडून गाऊन घ्यायचे आणि ऐश्वर्या त्या त्या गाण्यातले योग्य भाव तिच्या गळ्यातून उतरवण्यासाठी तिला मदत करायची. देवदासची गाणी खूप गाजली. बैरी पियासाठी श्रेयाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
आणि श्रेयाच्या कारकिर्दीची गाडी भरधाव वेगाने धावू लागली आणि तिने हे सांभाळत आपलं शिक्षणही व्यवस्थित पूर्ण केलं हे विशेष. श्रेया आपल्या यशाचं श्रेय तिला मिळालेल्या गाण्यांना देते. तिला गाणीच अतिशय चांगल्या दर्जाची मिळाली आणि म्हणून तिची कारकिर्द बहरली, असं तिचं म्हणणं आहे.
लता मंगेशकर यांचं एक असं अढळ स्थान आहे, त्या जागी पोहोचणं केवळ अशक्य पण काळ जो आहे तो कोणासाठीही थांबत नाही. त्यामुळे आता या नवीन काळात लता मंगेशकर यांच्यानंतर जर कोणी असेल तर श्रेया घोषालच. मधाळ आवाज आणि त्याला शास्त्रीय संगीताची जोड ही फक्त श्रेयाच्या आवाजातच ऐकायला मिळते.
आज असा एक दोन गायक-गायिकांचा काळ असं काही राहिलं नाही. एक सिनेमा आणि चार पाच गायिका असंही पहायला मिळतं. त्यामुळे श्रेया थोडी सध्या मागे पडली आहे असं वाटतं. तिला माझ्या शुभेच्छा...!
आज श्रेया घोषाल मुखोपाध्याय (मुखर्जी) हिचा वाढदिवस. तिला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तिच्याकडून अनेक उत्तमोत्तम गाणी रसिकांना ऐकायला मिळोत, यासाठीही शुभेच्छा...!

No comments:
Post a Comment