Sunday, 21 August 2016

सुनील दत्त



...तो काळ असा होता की बायको यशस्वी आणि नवरा तिच्यापेक्षा कमी यश पाहिलेला किंवा अपयशी तर नवऱ्याला लोकांकडून बरंच काही ऐकून घ्यावं लागायचं, लोकांचे टोमणे ऐकून घ्यावे लागायचे आणि या अशाच काळात "मदर इंडिया" या सिनेमामुळे नवीन नवीन यशाची फळं चाखलेल्या सुनील दत्त यांनी एका प्रथितयश अभिनेत्रीबरोबर लग्न केलं.... याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी खऱ्याखुऱ्या आगीत अडकलेल्या नर्गिसला त्याने वाचवलं, स्वतः जखमी झाला आणि रुग्णालयातून परतल्यावर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. नर्गिसच्या आईने झालेल्या घटनेने प्रभावित होऊन आनंदाने दोघांचं लग्न लावून दिलं....

सुनील दत्त... यांचं खरं नाव बलराज दत्त आणि जन्म पंजाबच्या झेलम जिल्ह्यातल्या एका खेड्यातला. लहानपणापासूनच त्यांचं स्वप्न होतं, हिंदी सिनेमात चमकण्याचं.. अगदी लहान असतानाच वडील गेले. वयाच्या अठराव्या वर्षी देशाची फाळणी झाली. दत्त कुटुंब हिंदू आणि झेलम फाळणीत पाकिस्तानात गेलं, दंगलीत हे कुटुंब अडकलं. त्यांना भारतात यायचं होतं पण चिघळलेल्या दंगलीत त्यांना धड पाकिस्तानात राहताही येईना आणि भारतातही जाता येईना. त्यावेळी सुनीलच्या वडिलांच्या एका मुस्लिम मित्राने या संपूर्ण दत्त कुटुंबाला वाचवलं आणि शेवटी हे कुटुंब भारतातल्या पंजाबमध्ये यमुना नगरमध्ये येण्यात यशस्वी ठरलं. आता हा भाग हरियाणात आहे. इथे काही काळ घालवल्यानंतर लखनऊला वळसा घालत सुनील दत्त आपल्या स्वप्ननगरीत मुंबईत येऊन पोहोचले. मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी काही काळ बेस्टच्या बस डेपोत कंडक्टरची नोकरी केली...
 
...पण स्वप्न काही शांत बसू देत नव्हतं, हा स्टुडिओ ते तो स्टुडिओ अशा खेपा घालणं चालू झालं आणि तेव्हाच त्यांना रेडिओ सिलोनवर नोकरी मिळाली. ते मोठमोठ्या कलाकारांच्या मुलाखती घ्यायचे. त्यांचा हा कार्यक्रम आणि सुनील यांची शैली चांगलीच यशस्वी ठरली आणि, मुलाखतकार म्हणून सुनील यांचं नाव घराघरात पोहोचलं. मग मात्र त्यांनी आपल्या या लोकप्रियतेचा उपयोग करत हिंदी सिनेमात पाऊल ठेवण्याचं ठरवलं आणि १९५५ साली त्यांना पहिला सिनेमा मिळाला. बलराज साहनी यांचं एक मोठं नाव चित्रपटसृष्टीत होतं, म्हणून सुनील दत्त यांनी आपलं बलराज हे नाव बदललं. हा पहिला सिनेमा आपटला. पुढची दोन वर्ष ही अशीच गेली आणि १९५७ साली मदर इंडिया आला. त्याकाळची मोठी कलाकार असणाऱ्या नर्गिसच्या मुलाची भूमिका होती, राज कपूरने नाकारलेली... सिनेमा थेट ऑस्करपर्यंत गेला आणि सुनील स्टार बनला. इथून सुनील दत्तची कारकीर्द बहरत गेली. त्यांनी सगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. त्यांच्या भूमिकेत मध्यमवर्गीय माणूस स्वतःला बघायचा. अशी पात्रं जी आपल्या आजूबाजूला सहजपणे आढळतील अशा भूमिका त्यांनी केल्या. हिंदी चित्रपटांत काम करूनही त्यांनी आपल्या बोलीतला पंजाबी लहेजा कायम ठेवला, तो बदलायचा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही. "अँटी हिरो" ही संकल्पना हिंदी चित्रपटात सर्वप्रथम यांनीच रुजवली आणि मोठी केली.
 
चार ते पाच दशकं त्यांनी या सृष्टीत घालवली, यश पाहिलं. एक चांगल्या मनाचा सभ्य माणूस अशी त्यांची दखल या चित्रपटसृष्टीने घेतली. त्यांनी चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं. दरम्यान त्यांनी आपल्या पंजाबी चित्रपटांशी संबंधही कायम ठेवले होते. मुलगा संजयला त्यांनी स्वतःच्याच चित्रपटातून चित्रपटसृष्टीत आणलं. चित्रपट प्रदर्शित व्हायला चार दिवस असतानाच नर्गिस कर्करोगाने गेली. आपल्या मुलाच्या पहिल्या सिनेमाचा प्रीमियरही ती बघू शकली नाही. प्रीमियरच्या वेळी ती इथे आहे असं समजून तिच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवली गेली. सिनेमा अतिशय यशस्वी ठरला.
 
नर्गिसचं जाणं सुनील दत्तचं आयुष्य बदलवून गेलं. तिला समाजसेवेची आवड होती, म्हणून सुनील दत्तने आपला वेळ याच सेवेसाठी दिला. ती कर्करोगाने गेली म्हणून त्याने कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारासाठी, या रोगासाठी जनजागृती करण्यासाठी "नर्गिस दत्त फाऊंडेशन"ची स्थापना केली. ही समाजसेवा करता करता त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि या क्षेत्रातही आपली एक चांगली कारकीर्द घडवली.


No comments:

Post a Comment