वसंत ऋतू जवळ आला किंवा थोडक्यात उन्हाळा जवळ आला, की सृष्टीत खूप बदल होताना दिसतात.
त्यातला एक नेत्रसुखद बदल म्हणजे, ‘गुलमोहर’ या झाडाचं फुलणं.
गुलमोहर या शब्दाची फोड केली की, या झाडाची व्याख्याच स्पष्ट होते. गुल म्हणजे
फुल आणि मोहर म्हणजे फुललेला पिसारा किंवा बहरलेला पिसारा. एरवी कधीही हे झाड आपलं
लक्ष वेधून घेणार नाही. अक्षरशः हे झाड ओसाड पडलेलं असतं, पण उन्हाळा जवळ आला की या
झाडाला पालवी फुटू लागते आणि उन्हाळ्याची चाहूल लागते. अशी खूप कमी झाडं असतील, ज्यात
पानांची संख्या खूप कमी आणि फुलांची संख्या खूप जास्त, गुलमोहर हे एक त्यातलं उदाहरण.
वसंत ऋतू जवळ आला की या ओसाड झाडावर नवीन पालवी दिसायला लागते, हळूहळू एकदोन फुलं
दिसायला लागतात आणि आठवडाभरात पूर्ण झाड बहरतं, झाडावर फक्त फुलं दिसतात, फुलांच्या
रंगाचंच झाड होऊन जातं. हा असा या झाडात होणारा बदल खूप मनोहारी असतो. हे झाड मधमाशांसाठी
पण खूप उपयुक्त आहे. गुलमोहराच्या फुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर मकरंद, म्हणजेच फुलांचा
रस ज्यापासून मधमाशा मध तयार करतात, तो असतो. तसेच मधमाशांना मोठ्या प्रमाणावर परागकण
ही या फुलांपासून मिळतात. या झाडाचं परागीकरण बहुतेक करून पक्षीच करतात.
माणसाला कडक उन्हाळा सहन करावा लागतो. पण तो सुसह्य करण्यासाठी निसर्गाने आपल्याला
किती मदत केली आहे ! यात मानवाचा पूर्ण विचार केलेला दिसून येतो. उन्हाळा सहन व्हावा,
शरीराला गारवा मिळावा, म्हणून कैऱ्या ही अनमोल भेट जशी निसर्गाने मानवाला दिली तसाच
विचार गुलमोहरामागे दिसून येतो. उन्हाळा नसताना या झाडाचं अस्तित्त्वही मानवाला जाणवत
नाही पण उन्हाळा जवळ आला की हे झाड बहरू लागतं. बाहेर कितीही कडक ऊन असू देत, तापमान
कितीही जास्त असू देत, हे झाड पूर्ण बहरणारच. ज्याप्रमाणे कैऱ्या शरीराला गारवा देतात,
त्याप्रमाणेच अत्यंत कडक उन्हाळ्यात डोळ्याला दिलासा देण्याचं काम हे झाड करतं. एक
नेत्रसुखद अनुभव हे झाड देतं.
जून-जुलै पर्यंत साधारण ही फुलं झाडावर असतात. तोपर्यंत पाऊसही सुरू होतो, हवेचं
तापमान कमी होऊ लागतं. त्यानंतर ही फुलं गळू लागतात. तरी साधारण नोव्हेंबरपर्यंत आपण
झाडावर फुलं बघू शकतो. जेव्हा फुलं झाडावर असतात, तेव्हा सुखद अनुभव मिळतोच, पण फुलांची
गळती सुरु झाली की त्या त्या रस्त्याचं सौंदर्य खूप वाढतं. रस्त्यांवर फुलांच्या रंगाचा
गालीचा बघायला मिळतो, आधीच पाऊस सुरु झाल्याने मन प्रफुल्लित असतं त्यात ह्या गालीच्यामुळे
भरच पडते.
गुलमोहराच्या फुलांचा उपयोग श्रीकृष्णांच्या मुकुटाचा शृंगार करण्यासाठीही केला
जातो. या झाडाच्या वैशिष्ट्यांमुळे या झाडाचं स्थान खूप वरचं आहे.
No comments:
Post a Comment