Friday, 1 July 2016

तो.....दुःखी तंद्री लागलेला रिक्षावाला



आपण रिक्षा / टॅक्सीने प्रवास करतो. तेव्हा त्या चालकाकडून आपली एवढीच अपेक्षा असते की त्याने आपल्याला इच्छित स्थळी सुखरुप पोहोचवावं आणि योग्य ते भाडं आकारावं. बाकी आपला आणि त्या चालकाचा काहीच संबंध नाही. आपण जेव्हा या वाहनांमध्ये बसतो तेव्हा आपला विशिष्ट मूड असतो, चांगला वाईट. मूड खराब असेल तर उगाचच या चालकांच्या अंगावर ओरडतानाही मी लोकांना पाहिलंय, जे खरं तर चूक आहे. मग अशा वेळी बहुतेक करून हे चालक गप्प बसतात. दुर्लक्ष करतात.

पण या चालकांच्या मूडचं काय ? ते आपल्याशी बहुतेक करून काही बोलत नाहीत म्हणजे ते नेहमीच आनंदी, उत्साहीच असले पाहिजेत असं काही नाही. काही चालक तर नाईलाजाने हे काम करत असतात. गाडी चालवत असताना आपण छान मागे बसलो आहोत पण कुणास ठाऊक हा चालक कुठल्या परिस्थितीत गाडी चालवत असेल ! आपल्याला काहीच कळत नाही.

काल संध्याकाळी मी अशाच एका रिक्षेत बसले. संध्याकाळच्या वेळी ज्या ठिकाणाहून घरी येण्यासाठी मी रिक्षा शोधत होते, त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी मला क्वचित लवकर रिक्षा मिळते. फार फार त्रास होतो एक रिक्षा मिळण्यासाठी. तर काल मला लगेच रिक्षा मिळाली. मी हात केल्यावर या या ठिकाणी येणार का असं विचारल्यावर त्या रिक्षावाल्याने अतिशय बधीरपणे बसा या अर्थाने डावीकडे मान वळवली. त्याच्या बधीरपणाशी मला काहीच देणंघेणं नव्हतं. घर जवळ आल्यावर इथे अमुक बाजूला वळा असं त्याला सांगितलं. तो बधीरच, अंअंअं...... असं काहीतरी तो बडबडला. पण त्याला ते बहुतेक कळलं होतं. पण तरी मी त्याला हिंदीतही सांगितलं. जिथे थांबवायला सांगितली तिथे त्याने रिक्षा थांबवली. शांत, कुठलेही भाव चेहऱ्यावर नाहीत असा बसून राहिला. इतके झाले असं म्हणत, मीच त्याला मीटरप्रमाणे पैसे द्यायला लागले. नोटा दिल्या, मग म्हणाले, एक मिनीट हं वरचे पैसे देते. तो मख्खच. मीटरवर किती आकडा आहे हे त्याने न पाहता मीटर पाडूनही टाकला. मी वरची सुट्टी नाणी दिली. त्याने न मोजता ती खिशात टाकली. तेवढ्यात एक मुलगी आली. अमुक अमुक ठिकाणी येणार का, तिलाही मख्खपणे हो म्हणाला.

मी रिक्षेतून उतरले. मनात म्हटलं, काय हा असा ! ना मीटर पाहिला, ना पैसे मोजून घेतले ! त्याच्याकडे बघून मला वाटलं की हा बहुतेक जबरदस्त प्रॉब्लेममध्ये आहे. हा शरीराने रिक्षा चालवत आहे पण मनाने दुसरीकडेच आहे. रिक्षेवर पोट आहे, तेव्हा रिक्षा चालवायलाच हवी म्हणून हा रिक्षा चालवत आहे. असं काहीतरी मला त्याच्याकडे बघून वाटलं. दुसऱ्या क्षणी माझ्या मनात विचार आला, याचा जो काही प्रॉब्लेम असेल, त्यातून तो बाहेर पडू देत. अशा शुभेच्छा माझ्याकडून त्याला दिल्या गेल्या. माहीत नाही, मला जे वाटलं ते बरोबर की चूक पण काल त्या रिक्षावाल्याला आपण अचूक वाचलंय, असं मला तरी वाटतं.

काय माहीत माझ्या शुभेच्छा त्याला उपयोगी पडतीलही !

No comments:

Post a Comment