Friday, 1 July 2016

पाऊस सुरु होण्यापूर्वी...



आज ९ जून पण मान्सून सोडा, मान्सूनपूर्व पाऊसही बघायला मिळाला नाही. गेला पावसाळा जो पाऊस साथ सोडून गेला त्यानंतर त्याचं दर्शन नाही. त्यामुळे त्याचं एक ओझरतं दर्शन घेण्यासाठी मन आसुसलं आहे. डोक्यावर गरागरा फिरणारा पंखा आता नकोसा झालाय. हे सगळं जरी असलं तरी आता वातावरण बदललं आहे.

पूर्वीसारखं रखरखीत ऊन आता दिसत नाही. राकट, रांगड्या व्यक्तिमत्वाला प्रेमाचा पाझर फुटावा आणि त्या राकट व्यक्तिमत्वाचं मनही थोडं कोमल व्हावं त्याप्रमाणे आता ऊनही कुंद हवेमुळे थोडं कोमल झालंय. आकाशात दिसणारा पांढरा शुभ्र पिंजलेला कापूस इतके महिने असलेली निरभ्र आकाशाची एकछत्री राजवट संपुष्टात आणू पहात आहे. हिवाळा जेव्हा आपलं सामान बांधून इथून गेला तेव्हा जाताना गार वारं हा प्रकारही आपल्याबरोबर घेऊन गेला. मग त्यानंतर वारं सुटलं तर ते बहुतेक करून गरमच. पण सध्या बाहेर एकदम गार वारं सुटलंय. बाहेरची झाडंही त्या वाऱ्याच्या तालावर मोकळेपणाने डोलताना फारच छान वाटत आहेत. हवीहवीशी वाटणारी ती गार गार वाऱ्याची झुळूक अनुभवण्यासाठी मुद्दाम घरातला पंखाही बंदच ठेवलाय.

मध्येच क्षीण ऊन आणि मध्येच आभाळ, आकाशात जमलेले पिंजलेल्या पांढऱ्या कापसासारखे दिसणारे ढग आणि त्याच्या बदलत जाणाऱ्या निरनिराळ्या आकृती, थोडीशी कुंद हवा, सुटलेला गार वारा आणि त्यावर डोलणारी झाडं, त्याच वेळी या गार वाऱ्याच्या झुळकीमुळे प्रफुल्लित होणारं आपलं मन आणि शरीर. कडक उन्हाळ्यानंतर हे आहे निसर्गाचं बदललेलं रुप, पावसाळा सुरु होण्यापूर्वी धारण केलेलं. जणू काही पावसाळा येण्यासाठी निघालेला आहे असा निरोप घेऊन आलेलं. पण एक निसर्गाचं वेगळं रुप, स्वतःचं एक वेगळं सौंदर्य ल्यालेलं.

निसर्ग रौद्र रुपही दाखवतो, पण त्यात एक संदेश असतो...मानवासाठी दिलेला.

नाहीतर, निसर्ग हा निर्मळ, निरपेक्षच असतो. त्याचं प्रत्येक रुप हे सुंदरच असतं. प्रत्येक रुपात सौंदर्य दडलेलं असतं, फक्त ते सौंदर्य बघण्यासाठी तशी दृष्टी हवी.

No comments:

Post a Comment