सकाळी साधारण ७.१५ - ७.३०
ची गोष्ट. मी आमच्या इमारतीतून बाहेर पडून आमच्या
गृहसंकुलात होते. तेवढ्यात समोरून एक गाय येताना दिसली, एकदम अस्सल देशी गाय. एकदम उंच, धिप्पाड.
तिचे प्रत्येक आणि प्रत्येक अवयव एकदम भरलेले होते. एकदम
लख्ख पांढरी स्वच्छ, नुकतीच सर्फच्या पाण्याने घासून स्वच्छ केल्यासारखी. कांती एकदम तेजस्वी, अशा तेजस कांतीची गौ मी पहिल्यांदाच पाहिली. कालपासून पाऊस पडत आहे, रस्ते ओलेचिंबं आहेत. रस्त्यांवर पाणी साठलंय, चिखल झालाय
पण या गायीच्या अंगावर चिखलाचा एक पुसटसा डागही नाही. अगदी चारही
पाय एकदम स्वच्छ.
तिचा चेहरा... एखादी सुंदर लावण्यवती समोरुन येत आहे, असा एक
क्षणभर भास मला तिला पाहताच झाला. गाय, म्हैस हे प्राणी मला पहिल्यापासूनच आवडतात. अगदी काळ्या कुळकुळीत
म्हशीच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य मी सहजगत्या टिपू शकते आणि ही तर
साक्षात अप्रतिम लावण्य ल्यालेली सुंदर गाय होती. तिच्या चेहऱ्यावर एक
शान होती, शालीनतेचे भाव होते.
चांगला पौष्टीक आणि संतुलित आहार ज्याप्रमाणे आपली छाप एक प्रकारच्या
तेजाने मनुष्याच्या चेहऱ्यावर आपले रंग रेखाटतो, अगदी तसंच श्रीमंती तेज त्या गाईच्या चेहऱ्यावर होतं. डोळे अगदी
गडद काजळ लावल्यासारखे आणि मोहकही, निष्प्राण
नाही तर पाणीदार. अगदी अस्सल गाईच्या शिंगांचा
आकार पिरॅमिडसारखा असतो असं म्हणतात, एरवी हा
आकार बघायला मिळतोच असं नाही पण आज पाहिलेल्या लावण्यवतीची पिरॅमिडसारखी शिंगं
तिच्या एकूण सौंदर्यात भरच घालत होती. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात
ही अशी तेजस्वी गाय कधीही पाहिली नाही, ना शहरात
आणि ना खेड्यात. श्रीकृष्णाच्या बरोबर फोटोंमध्ये
ज्या गाई दाखवतात त्या असतात अशा तेजस्वी, पण त्याही
फोटोतच आपलं तेज दाखवणाऱ्या, प्रत्यक्षात
नाहीच.
नेहमीच्या गाईंपेक्षा उंच, तेजस्वी, भारदस्त
शरीरयष्टीची गाय आमच्या गृहसंकुलात ताडताड करत चालताना
मला दिसली. आपल्या आजूबाजूला कोण आहे याची तमा न बाळगता बेधडकपणे तिला येताना पाहून आधी तिच्या त्या गोमत्वाने(हा शब्द
'व्यक्तिमत्व' याप्रमाणे
घ्यावा) मला भारावून गेल्यासारखं झालं. सकाळी सकाळी या अशा अनुभूतीने
आलेलं भारावलेपण मनाला फारच सुखावणारं होतं. या अचंबितपणातून थोडं बाहेर
आल्यावर मला एक प्रश्न पडला, आमच्या घराच्या जवळपास कुठेही गाईम्हशींचा
गोठा नाही, एका मंदिराच्या बाहेर गाई बांधलेल्या असतात पण अशी ही अस्सल लावण्यवती तिथली तरी नक्कीच नाही. गाई आमच्या
इथल्या रस्त्यांवरही दिसत नाहीत मग ही गोमाता आली कुठून ? आणि चिखलात चालूनही ही एवढी स्वच्छ कशी ?
आपण आपल्या घरी परतावं तशीच
ती अगदी सहजगत्या आमच्या गृहसंकुलात शिरलेली होती. मी आणि अजून दोघे हे सगळं ऑ...
करत बघत होतो. माझ्या समोरुन ती आतल्या इमारतींकडे गेली आणि स्वतःच्या
घरी जावं अशी ती आमच्या शेजारच्याच इमारतीत शिरली. (इथे एक स्पष्ट करावंसं
वाटतं की आमच्या इथे कोणाच्याही घरी गाय नाही) ती दिसेनाशी होईपर्यंत मी
आणि ती दोन माणसं तिच्याकडे बघत होतो. ती कुठे जात आहे हे बघण्यासाठी तिचा
पाठलाग करण्याएवढा माझ्याकडे वेळ नव्हता. मी संकुलातून बाहेर पडले, त्यामुळे पुढे तिचं काय झालं हे
काही माहीत नाही आणि परतले तेव्हाही काही विशेष हालचाली त्या शेजारच्या
इमारतीत जाणवल्या नाहीत.
हिंदू गाईची पूजा करतात, तिला माता मानतात आणि आज अलौकिक अशी "गोमाता" आपल्याला
आज अचानक दिसली अशा भावनेने मी घरी तरी परतले पण डोक्यातून ते तेजःपुंज गोमत्व
काही जात नाहीये आणि कधी जाईल असं वाटतही नाहीये. दुःखी होण्यासारखं काही
आज घडलंय अशातला भाग नाही पण त्या मातेच्या दर्शनाने मन मात्र एकदम हलकं, प्रफुल्लित झालं आहे; कुठलीतरी अतिशय चांगली अनुभूती मिळाल्यासारखं....!
ती कोण होती आणि कुठून आली हे असे प्रश्न तर आहेतच पण या अशा
प्रश्नांपेक्षा तिने जो मानसिक अनुभव दिला तो जास्त महत्त्वाचा वाटतो.....!
॥ जय गोमाता ॥
॥ जय गोपाल ॥
॥ जय गोपाल ॥
No comments:
Post a Comment