Thursday, 16 June 2016

मुंबईतला सिग्नल आणि तो खारेदाणेवाला



कालची साधारण संध्याकाळची साडेपाचची वेळ असेल, मी बेस्टच्या AC बसमध्ये बसले होते. या बसेसच्या खिडक्यांमधून अगदी सगळं दूर दूर पर्यंत दिसतं. आमची बस एका सिग्नलला थांबली. भल्या मोठ्या वाहनांच्या रांगा आणि वाहनांनी गच्च भरलेला तो भला मोठा प्रशस्त रस्ता, त्यामुळे थोडा जास्त वेळ वाहनांच्या रांगेत थांबावं लागणार हे नक्की होतं. जिथे शक्य असेल तिथे माणसांचं निरीक्षण करायला मला फार आवडतं, कधी कधी तर या परक्या माणसांचं मनही वाचता येतं.
 
मग काय.....मी बसच्या खिडकीत आणि उंच बाकावर बसले होते, कानात माझा अतिशय आवडता रफी माझ्या मोबाईलमधून गात होता आणि मी बाहेर रहदारीत थांबलेल्या वाहनांना आणि लोकांना न्याहाळण्याच्या उद्देशाने खिडकीबाहेर बघू लागले.
 
तेवढ्यात एक मुलगा खाऱ्या दाण्यांच्या सुरनळी केलेल्या छोट्या पुड्या विकायला घेऊन आला, त्याच्या हातात भरपूर पुड्या. तसा लहान होता मुलगा आणि त्याचा हात एकदम गच्च भरेल एवढ्या सुरनळी केलेल्या पुड्या त्याच्या हातात... हा एका गाडीजवळ गेला, सर्रर्रर्रर्रकन् गाडीची काच खाली आली, आत दोन सुरनळ्या गेल्या, लगेच पैसे बाहेर आले आणि गाडीची काच बंद झाली...आणि हा पुढच्या गाडीकडे रवाना... प्रत्येक गाडीजवळ हेच, सर्रर्रर्रर्रकन् काच खाली, आत ३,,५ सुरनळ्या आणि पैशांची देवाणघेवाण, काच बंद.. पहिल्यांदा दिसला तेव्हा त्याच्या हातात त्या सुरनळ्या नीटश्या मावतही नव्हत्या, आणि आता त्याच्या हातात फक्त दोन सुरनळ्या उरल्या होत्या. पळापळ करून खारेदाणे विकले होते आणि जवळजवळ सगळे पुडे विकले गेले होते. तो मुलगा होताही खूप चपळच..
 
तो काही क्षण शांत उभा राहिला, त्याचा चेहरा खुलला होता. एक आनंद, एक समाधान होतं त्याच्या चेहऱ्यावर.. त्याने हातातल्या नोटा हळूच नीट घडी करून आपल्या जुनाट आणि जराश्या मळकट पँटच्या मागच्या खिशात ठेवल्या आणि हात बाहेर काढला पण लगेच परत त्याने हात त्याच खिशात घातला, कदाचित पैसे नीट ठेवले आहेत ना याची खात्री करत असावा... आणि काही क्षणात हात बाहेर काढला. मग त्याने आपला जुनाट, मळकटच शर्ट नीट पँटच्या खिशावर येत आहे ना आणि आपला पैशांचा खिसा झाकला जात आहे ना याची खात्री केली आणि निर्धास्त झाला. त्याने आपल्या हातातल्या उरलेल्या दोन सुरनळ्यांकडे बघितलं आणि एक दृष्टिक्षेप थांबलेल्या वाहनांकडे टाकला. एका गाडीकडे पळत गेला... परत तेच सर्रर्रर्रर्रकन् काच खाली आली, त्याने दोन पुडे आत दिले पण आत दोनपेक्षा जास्त पुडे हवे होते. त्याने लगेच एकाला हाक मारली. त्याच्यासारखाच सुरनळ्या विकणारा, मळकट कपडे घातलेला पण स्थूल शरीरयष्टीचा... परत पुडे आत गेले. पैसे बाहेर आले, काच बंद.
 
याचे उरलेले दोन्ही पुडे विकले गेले. त्याने आत्ता मिळालेले पैसे आपल्या मुठीत घट्ट पकडले, रस्ता ओलांडून पदपाथावर आला आणि सावकाश तिकडून जाऊ लागला आणि म्हणता म्हणता दृष्टीआडही झाला...
 
तो तिथे भरपूर सुरनळ्या घेऊन आला, काही मिनिटात चपळाईने त्याने त्या सगळ्या सुरनळ्या विकल्या आणि अतिशय शांतपणे तो तिकडून निघूनही गेला.
 
तुमच्याकडे कल्पकता हवी आणि जोडीला धडाडी आणि चिकाटी....मग तुम्ही मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातल्या एका सिग्नलला थांबलेल्या गाड्यांच्या गराड्यातही आपला खारेदाणे विकण्याचा व्यवसाय करू शकता आणि ते ही बहुतेक करून यशस्वीपणे... फक्त अंगात धमक हवी...

कदाचित म्हणूनच म्हणत असतील का की, मुंबई तिच्या कुशीत असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम हे देतेच देते...?

No comments:

Post a Comment