Friday, 5 May 2017

हिमाचल गाथा - भाग २



पहिल्यांदा रॉक गार्डनला जायला निघालो. हॉटेलपासून पुढे जात गाडी वळली तोच डाव्या हाताला असलेल्या आमराईने लक्ष वेधून घेतलं. ही आंब्याची कलमंही अगदी शिस्तीत लावलेली आणि तिथे कमालीची स्वच्छता. एक पान खाली पडलेलं दिसणार नाही. मोहोराने गच्च भरलेली ती झाडं डोळ्यांना अगदी सुखावह वाटत होती. रस्त्याच्या कडेला अगदी अरुंद पादचारी मार्ग आणि त्याला लागून ही आमराई. आपल्याकडे रस्त्याच्या कडेला दुकानं, हॉटेलं, वगैरे दिसतात तर इकडे ही आमराई. खरं तर कुठे शहराच्या बाहेर असायची, रस्ता चुकून शहरात आलीय की काय असं वाटावं अशी ही आमराई... त्या आमराईत कोणी नाही. टारगट, मस्तीखोर मुलं नाहीत की एकांताच्या शोधात असणाऱ्या जोड्याही नाहीत. कोणी कोणी नाही. आमची गाडी पुढे चालली होती पण ही आमराई काही संपत नव्हती, इतकी विशाल आणि सुंदर आमराई. तिला बघताना माझे डोळेही कदाचित म्हटले असतील, ही मंजुषा नक्की आलीय तरी कुठल्या शहरात... शहरात आणि एवढं सुखावह दृश्य ! संध्याकाळ होती आणि थंडी अजिबात नव्हती. म्हणायला उगीचच आपला गारवा.. पण या नसलेल्या थंडीतही हे चंदीगडवासी स्वेटर घालून बाहेर पडले होते. एक दोन नाही प्रत्येकाच्या अंगात स्वेटर किंवा गरम कपड्यांपैकी काहीतरी. मी खरं तर उष्ण शहरातून इथे आले होते, त्यामानाने मला थंडीची सवय नाही पण मला जिथे थंडीच जाणवत नव्हती तिथे हे लोक स्वेटर घालून फिरत होते. संध्याकाळ झाली होती आणि चंदीगडच्या रस्त्यांवर रहदारीच नाही. इतकी कमी रहदारी आणि ती ही राजधानीच्या शहरात मी कधीच पाहिली नव्हती, आणि ही तर दोन राज्यांची राजधानी. परत रहदारी ही सुस्तच, त्यावेळी ड्रायव्हरशी बोलताना आम्हाला समजलं की इथे प्रत्येक रस्त्यासाठी वेग मर्यादा आहे आणि ती मर्यादा ओलांडली तर दंड बसतो. ही अशी मर्यादा खरं तर आपल्याकडेही आहे पण कोणी जुमानतं ? तिकडे हे नियम कडकपणे राबवले जातात. त्यामुळे एवढे मोठाले रस्ते आणि हो सगळे रस्ते शिस्तीचे हं... तर एवढे मोठाले रस्ते पण त्यावर फारशी वाहनंच नाहीत. हॉर्न वाजवणे, करकचून ब्रेक दाबणे, नेहमीच पुढे जाण्याची घाई त्यामुळे आजूबाजूच्या वाहनांना मागे सारत नियमबाह्य असलं तरी डावीकडून आपल्या गाडी जबरदस्तीने पुढे नेणे म्हणजेच ओव्हरटेक करणे हे प्रकार नाहीतच; अहो डावीकडून काय घेऊन बसलात उजवीकडूनही ओव्हरटेक करण्याची प्रथा इथे नाही, तसेच घाईघाईत वाहन दामटवणे, यातलं काही काही तिकडे मला बघायला मिळालं नाही. सिग्नल्स होते, पण तिथेही ट्रॅफिक जॅम नाही. सगळं कसं शांत आणि शिस्तीचं. पादचारी मार्ग आहेत पण त्यावरून फारसं कोणी चालत नाही. चालत जाणारी लोकं तिकडे कमीच. पण मग सगळे गाड्यांमधून फिरतात म्हणावं तर शिस्तीच्या रस्त्यांवरही फारशी वाहनं नाहीत. आजूबाजूला रस्त्यांवर दुकानंच नाहीत. फार नाही, किराणामाल, औषधांची दुकानं ही तरी गरजेची दुकानं दिसायला हवीत, पण नाही ही दुकानंही नाहीत. असल्याच तर सरकारी इमारती. बाकी कुठली रोजगाराची साधनं दिसावीत, कुठल्या खाजगी कचेऱ्या वगैरे पण नाही, काहीच नाही. हे काही नाही पण दारूची दुकानं मात्र सहजपणे दृष्टीस पडणारी. त्यामुळे या शहराबद्दल नक्की काहीच समजेना. इथल्या लोकांचं उपजीविकेचं साधन काय हाच आधी पहिला प्रश्न. आम्ही याबद्दल विचारलं, आहे ना... हे आहे ते आहे असं उत्तर समोरून आलं पण आम्ही जेवढं शहर पाहिलं ते सगळं असंच... बहुदा, एकंदर तिकडे लोकसंख्याच कमी असावी आणि असलीच तर ती ही फक्त स्थानिकच, हरयाणा, पंजाब फार फार तर हिमाचली, इतर राज्यांतून लोंढेच्या लोंढे इथे येत असावेत असं वाटत नाही. त्यामुळे आपली एक पत, स्थानिक ओळख राखून असलेलं हे एक राजधानीचं शहर.

या अशा अती शांत शहराच्या रस्त्यांमधून आम्ही “रॉक गार्डन”ला पोहोचलो. तेव्हा साधारण साडेपाच झाले होते. गाडीतून उतरताना ड्रायव्हर म्हणायला लागला, ६ ला हे गार्डन आता बंद होईल. झालं.... वाटलं, तिकीट काढून मग आपण आत जाणार म्हणजे हातात अर्धा तास पण नाही. पण आता अगदी त्या गार्डनच्या बाहेरच आलोय तर आता आत जावंच आणि जेवढं शक्य असेल तेवढं बघावं म्हणून तिकीट खिडकीजवळ गेलो तर समजलं की ६ नाही तर ७ ला गार्डन बंद होतं. लगेच जीवात जीव आला. आता या गार्डनबद्दल मी काय लिहावं ! हे गार्डन कोणासाठी अनोळखी थोडीच आहे. नेक चंद यांची आश्चर्यकारक कलाकृती म्हणजे हे गार्डन... दुर्दैवाने आता आपल्यात नसणाऱ्या नेक चंद यांचा गार्डनच्या बाहेर पुतळा आहे. मी खूप पूर्वी या बागेत आले होते त्यामुळे त्या आठवणी ताज्या करण्याच्या उत्सुकतेने आम्ही ४० एकरपेक्षाही जास्त जागेत पसरलेल्या बागेत शिरलो. फारशी गर्दी नव्हतीच. बहुतेक करून तिथले स्थानिक किंवा आजूबाजूच्या भागातलेच लोकं बागेत दिसत होते. काच, चिनीमातीचे तुकडे, बांगड्या, दगड आणि अशा बऱ्याच प्रकारच्या टाकाऊ गोष्टीपासून बनवलेल्या वस्तू, प्राणी, माणसं आणि त्यांची वेगवेगळी संस्कृती, पक्षी या अशा गोष्टी तिथे उभ्या केलेल्या आहेत आणि ही कलाकृती मांडतानाही त्या बागेच्या निर्मात्याने कलात्मकता दाखवलेली आहे. 
खोलीवजा कप्पे आणि त्यातून पुढे जाण्यासाठी असणारे मार्ग. पण पुढे जाणारा मार्ग कुठला हे लोकांनी शोधून काढायचं. दिसायला दोन तीन रस्तेही दिसतील पण पुढे घेऊन जाणारा एकच रस्ता असेल. ही अशी रचना असल्याने त्या बागेत फिरायला आणि फिरत फिरत ती आश्चर्यकारक कलाकृती बघताना मजा येत होती. आजूबाजूची लोकं, ओळखीची ना पाळखीची पण ती आपल्याला मदत करत, नाही इकडे काही नाहीये असं एखाद्या पुढे जाऊन बंद होत असलेल्या रस्त्याबद्दल आपणहून सांगत किंवा कधी आपल्याला विचारत. एकंदर मस्त वाटत होतं. त्या बागेतही अगदी सुंदर स्वच्छता आणि टापटीप. कृत्रिमरीत्या इथे बरंच काही साकारलंय. एखादी गुहा असुदेत नाहीतर अगदी खिंडही नाहीतर अगदी कृत्रिम धबधबा आणि तलावही. आम्ही बघायला तर सुरुवात केली पण इथे फारसं खास काही बघायला आहे असं आम्हाला वाटलंच नाही. आम्ही पुढे पुढे जात राहिलो आणि हळूहळू या टाकाऊ गोष्टीतून बनवलेल्या या अफलातून कलाकृती आमच्या समोर येत गेल्या. जसजसं आम्ही आत आत जाऊ लागलो तसतसं त्या कलेचं सौंदर्य निखारून येऊ लागलं. काय सुंदर ! रॉक गार्डन कसं आहे ? खरं तर यावर उत्तर नाही. कलेची अफाट देणगी असलेल्या त्या जादुगारासमोर तुम्ही फक्त नतमस्तक होता. ही बाग तुम्हाला त्याच्या कलेच्या प्रेमात पाडते. तिथे निर्माण केलेली प्रत्येक कृत्रिम गोष्ट तुम्हाला आपलंसं करते. 
सिमेंटने तयार केलेली कृत्रिम मुळं
साधा धबधबा तो ही किती सुंदर ! तिथे एक भला मोठा झोपाळा आहे, गावांमध्ये दोन झाडांमध्ये बांधलेला असतो ना अगदी तसा; या बागेची शोभा वाढवण्यासाठी त्याने वेगवेगळ्या ठिकाणी झाडांच्या कृत्रिम मुळांचा वापरही अगदी कल्पकतेने केलेला आहे. काचेच्या फुटलेल्या बांगड्या, तुटलेले कप, साधे दगडगोटे यातून जे आश्चर्य जन्म घेतं त्याला म्हणतात नेक चंदचं रॉक गार्डन. या टाकाऊ गोष्टींसाठी या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य दिलं. या जागेत हे नेक चंद गुपचूप आपलं काम करत होते. १२ एकरांचं यांचं काम पूर्णही झालं पण तरी सरकारला याची कल्पनाही आली नाही. १८ वर्षांनंतर जेव्हा कळलं तेव्हा सरकारने त्यांना जास्तीची जमीन देऊ केली आणि महिन्याला पगारही सुरु केला. मी इथे फोटो काढायला लागले, पण किती आणि कुठले फोटो काढणार ! काही गोष्टी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी नसतात तर त्या फक्त डोळ्यांनी पहायच्या असतात आणि समजून घ्यायच्या असतात. समजून घ्यायचं असतं त्या कलेच्या मागचं समर्पण, ध्यास...

आम्ही तिथे फिरत होतो. मी नवऱ्याशी काहीतरी बोलत होते, तिथल्या कलाकृतींबद्दलच.. आणि तेवढ्यात आमच्या बोलण्यात मध्येच येऊन एक मुलगा आमच्याशी अगदी जाताजाता एक मराठी वाक्य बोलत गेला. जाताना म्हणाला मी नागपूरचा तुम्ही ? आम्ही म्हणालो मुंबई... ते ऐकून छानसं हसून तो तिथून निघूनही गेला. दुसऱ्या राज्यात आणि ते ही इतक्या लांब आपलं कोणी दिसलं की जो आनंद होतो तो त्याच्या त्या छानशा हसण्यात डोकावत होता. पंजाबी, तुरळक यूपी, बिहारी आणि परदेशी पर्यटकांच्या लोकांमध्ये आपल्याला आपला मराठी आवर्जून भेटून गेला याचं आम्हा दोघांनाही समाधान वाटलं. त्या बागेत दिशादर्शकाच्या पाट्या अगदी कमीच... बाहेर जायचा रस्ता कुठला हे दाखवणारी पाटी मात्र तिकडे होती. ही पाटी बघून आम्ही पुढचं बघयला गेलो. वेगवेगळ्या राज्यांमधली लोकं आणि परदेशी लोकं आमच्या आजूबाजूला होती. त्या लोकांमध्ये दोन आपले चेहरे दिसले, एक मध्यमवयीन जोडपं. त्या बाई गोऱ्या होत्या पण ते पंजाबी नाही मराठी गोरेपण होतं. त्या बाईंनी माझ्याकडे पाहिलं आणि एकटक बघायला लागल्या. वाटलं, याही कोणीतरी मराठी दिसतंय वाटतं, असं मनातल्या मनात म्हणत असाव्यात. मी जशी जवळ आले तशा मला मराठीत विचारू लागल्या, बाहेर जायचा रस्ता इकडे कुठे आहे का ? म्हणत त्यांनी एका दिशेकडे तर्जनी दाखवली. मी म्हणाले, नाही. इकडे या बाजूला आहे म्हणत ती दिशा त्यांना दाखवली आणि म्हणाले, तिकडे तसा फलकही लावला आहे. त्या माझ्याशी मराठीत बोलल्या हे बघून मला बरं वाटलं. कोणी अनोळखी मला मराठीही समजतं ! नाहीतर कित्येकदा अनोळखी मराठी मला पंजाबी समजतात आणि पंजाबी माझ्याशी मी पंजाबी आहे असं समजून पंजाबीत संभाषण सुरु करतात. हे तथ्य आहे आणि याचा प्रत्यय मला मुंबईत तर येतोच आणि तिकडे पंजाबातही आला. मी त्या बाईंना बाहेर जायचा रस्ता दाखवला आणि मी पुढे जायला लागले, माझ्या लक्षात आलं या कुठल्या एका तंद्रीत अजून माझ्याकडेच बघत आहेत. मला थोडं चमत्कारिक वाटलं, मी दुर्लक्ष करून पुढे जायला लागले. तेवढ्यात त्या बाई परत तीच तर्जनी पुढे करत माझ्या जवळ येत म्हणाल्या, तुम्ही मंजुषा का ? मंजुषा जोगळेकर ?

त्या बाईंचा तो प्रश्न ऐकून मला कमालीचं आश्चर्य वाटलं. मी त्यांना म्हटलं, आपण ओळखतो का एकमेकांना ? नाही, कारण मला आठवत नाहीये... त्यावर मला त्या म्हणतात. तुम्ही नाही ओळखत, पण मी चांगली ओळखते. मी तुमची एक वाचक आहे. तुमच्या फेसबुक पोस्ट्स मी अगदी आवर्जून वाचते. हे ऐकलं आणि मला ज्या प्रकारचा आश्चर्याचा धक्का बसला याचं वर्णन नाही करता येणार. त्या पुढे म्हणतात, मी नाहीये फेसबुकवर. पण माझा मुलगा आहे आणि रात्री तो ऑफिसमधून आला की मी तुमच्या पोस्ट्स वाचते. तो ही तुमचा एक वाचक आहे. मला फार आवडतं तुमचं लिखाण आणि तुम्हाला पाहिलं तेव्हाच वाटलं की या मंजुषा तर नाहीत ! तुम्हाला विचारावं की नाही हा विचार करत करत शेवटी तुमच्याशी बोलायला आले. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, अगदी अचानकच भेट झाली.

त्या बाई तिथून गेल्या आणि मी अवाक झाले. पुण्यामुंबईत कोणी भेटलं, समजू शकते. हे म्हणजे थेट चंदीगडला ! महाराष्ट्रापासून इतक्या दूरच्या भागात ! जेमतेम ११०० लोकं जिच्या फेसबुक मित्र यादीत आहेत आणि जी कुठल्या फेसबुक समूहात न रमता फक्त आपल्या फेसबुक भिंतीवरच असते, तिला तिच्या राहत्या मुंबईत कोणी असं भेटेल अशी अपेक्षा नसते आणि ही भेट तर थेट चंदीगडमध्ये ! हा असा सुखावह अनुभव घेत या नेक चंद यांना मनोमन सलाम ठोकत आम्ही या बागेतून बाहेर पडलो. एव्हाना अंधारून यायला लागलं होतं. बागेत प्रकाशव्यवस्था उत्तम असल्याने कमी होत चाललेला नैसर्गिक प्रकाश फारसा जाणवला नाही. इतके एकर फिरल्याने थोडे पाय भरून आले होते पण उत्साह मात्र अतिशय दांडगा होता.


आता आम्ही निघालो “रोझ गार्डन”कडे, सोबतीला तेच शिस्तीत उभे असलेले प्रशस्त पण सुस्त रस्ते. या गार्डनच्या पुसटश्या आठवणी माझ्या मनात होत्या, खूप सुंदर अशी ही गुलाबाची बाग... आता अंधार पडलेला असला तरी दिवे तर असतीलच, एवढी छान बाग म्हटल्यावर खास प्रकाशयोजनाही असेल असा विचार करून तिकडे गेलो. बाग बंद झालेली नव्हती आणि लोकांची ये-जा त्या बागेत दिसत होती. मुंबईत कसं आरेचं दुकान असतं तसं दुकान त्या बागेच्या बाहेर होतं, ते दुकान चालवणाऱ्या एका बाईला आम्ही या बागेच्या वेळेबद्दल विचारलं तर ती म्हणाली की बाग कधीच बंद होत नाही... तिच्याकडे आरेत कसं एनर्जी नावाचं पेय मिळतं तसंच एक पेय मिळत होतं. ते घेतलं, आणि मुंबईत आरेच्या खोक्याबाहेर उभं राहून एनर्जी चाखावं तसंच काहीसं तिथे उभं राहून वाटलं. त्या चंदीगडच्या गारव्यात ते थंडगार पेयही छान वाटलं.

आम्ही आत बागेत जायला लागलो तर आमचं स्वागत केलं एका लाल रंगाच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या गालिच्याने आणि तुटून खाली पडलेल्या जाड केशरी झेंडूच्या फुलांच्या माळेने.. ते सगळं इतकं पसरलेलं होतं की मनात जी या गुलाबाच्या बागेची प्रतिमा होती त्या प्रतिमेला तिथला तो पसरलेला परिसर छेद देऊ लागला. त्याच अस्ताव्यस्तपणातून मार्ग काढत आम्ही आत गेलो आणि बघतो तर समोर संपूर्ण काळोख. कुठे फिदी फिदी हसण्याचे आवाज येत आहेत तर कुठे काहीतरी बडबडीचे तर कुठे खूप लोकांनी एकत्र येत बडबड करत हसण्याचे... त्याच अंधारात लोकं त्या बागेत ये-जा करत होती. आम्हाला काहीच समजेनासं झालं, आम्ही पुढे पुढे चालत राहिलो. जेमतेम समोरचं दिसावं एवढाच चंद्रप्रकाश... बागेत आत तरी किती जाणार ! आणि त्याला अर्थ तरी काय ! मग आम्ही आमच्या मोबईलचा टॉर्च सुरु केला आणि त्या प्रकाशात काही गुलाबाची फुलं वगैरे काही दिसत आहेत का हे बघायला लागलो. पांढरट क्रीम रंगाचे गुलाब, अगदी छान भरगच्च असा भरलेला मोठा गुलाब आणि त्याचा ताटवा, त्या फुलाचं नावही तिथे लिहिलेलं. इतकं सुंदर फुल, वासही छान पण तो ताटवाही अस्ताव्यस्तच, त्याची देखरेख बऱ्याच दिवसात कोणी केली असेल असं वाटत नव्हतं. एखादा रेडा बागेत शिरला आणि त्याने त्या बागेची नासधूस करून टाकली तर कसं दृश्य दिसेल, तिथल्या त्या गुलाबांच्या ताटव्यांचं असं काहीतरी वाटत होतं. पुढचा ताटवा बघितला, त्याचीही हीच अवस्था मग आम्ही तिथे थांबलो नाही. या बागेच्या छान आठवणी मनात होत्या, त्या आठवणींना आलेले ओरखडे बघून मनाला वाईट वाटलं. आम्ही बाहेर पडत होतो पण एकट्या, दुकट्या, समूहात अशा प्रकारे लोकांची ये-जा तिथे चालूच होती. बाहेर आलो आणि आमच्या ड्रायव्हरला म्हटलं, काही नाहीये आत... साधे दिवेही नाहीत.. तर तो म्हणतो, हो ना तेच काही समजत नाहीये, इथे काहीतरी शुटींग होणार आहे असं म्हणत आहेत. कारणं काही का असेनात पण त्या बागेच्या आठवणींवर एकदा ओरखडा बसला तो बसलाच... शुटिंगसाठी एवढ्या चांगल्या बागेची नासधूस ? आम्ही काही असले प्रश्न विचारत बसलो नाही आणि पुढे निघालो. नेहमीच्या शांत रहदारीतून आमची गाडी चालली “सुखना लेक”कडे.. या तलावाबद्दल ऐकलं होतं की फार छान आहे, मोठा आहे. इथून सूर्यास्तही छान दिसतो. सूर्यास्त तर शक्य नव्हताच पण तलाव तरी बघावा म्हणून त्या तलावाच्या दिशेने चाललो. तलावाकडे जाण्यासाठी छान छान तयार होऊन मस्त स्वेटर, शाल पांघरून लोकं येत होती. नसलेल्या थंडीत ही लोकं स्वेटर का घालतात या प्रश्नाचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाहीये. का स्वेटर घालून बाहेर पडणे ही तिकडची पद्धतच आहे काय माहीत ! आम्ही स्वेटर न घातलेले चंदीगडचे पाहुणे त्या स्वेटर शालींच्या गर्दीत शिरलो. लहान मुलांसाठी एखादा खेळ, खाणं पिणं वगैरे लेकच्या तोंडाशीच... ते पार करून आम्ही तलावाच्या दिशेला गेलो. खाली बोटिंगची सोय होती आणि बाकी शांत पाणी. तलाव खूप मोठा पण पाणी शांत, स्तब्ध, सुस्त... या अशा तलावाच्या काठी पार बांधलाय अगदी मुंबईच्या मरीन ड्राईव्हला आहे तस्साच... तिथे येऊन लोकं बसत होती, गप्पा मारत होती, चालत होती. मला ते सगळं बघून मरीन ड्राईव्ह, वरळी सी फेस अशा मुंबईतल्या जागा आठवल्या आणि तिथे एक क्षणही थांबायची इच्छा झाली नाही.

मला तलाव नाही आवडत, मला आवडतो तो अफाट समुद्र. त्याचं मनसोक्त बागडणं, कुठलेही पाश नसलेलं असं मुक्त जगणं आणि हे असं जगताना त्याचा पूर्ण भरभरून आस्वाद घेणं हे मला आवडतं. आपल्या दृष्टीतही सामावणार नाही असा अवाढव्य समुद्र आणि त्याचं ते मनमुराद जगणं, बघण्यालाही वेड लावतं, जगण्याची नवी उमेद देतं. हे सगळं तलावाकडे नाही. अगदी छोट्या परिघात त्याची व्याप्ती आहे, जगणंही मुक्त नाही. तर एकदम शांत, सुस्त. ही सुस्तता मनात भरत नाही.

आम्ही सुखना तलावापाशी थांबलो नाही. परत आलो. ड्रायव्हर म्हणाला, आता कुठे जायचं ? मार्केटला जाऊयात ? सताराला जाऊयात ? पण तिकडे सगळं ब्रँडेड मिळणार तुम्हाला... त्याला विमानतळावरून येताना म्हणालो होतो की आम्हाला इथला बाजार बघायचा आहे. आम्ही निघालो. त्यानिमित्ताने, हे सुनियोजित शहर अजून जास्त बघण्याची संधी...

नियम म्हणजे नियम त्यामुळे हा आमचा ड्रायव्हर अगदी मर्यादित वेग ठेवून गाडी चालवत होता. काही तास या रस्त्यांवरून फिरल्याने या रस्त्यांची आम्हाला हळूहळू सवय होऊ लागली, काय सुस्त रस्ते आहेत असे कुठले विचारही मनात येणं कमी होऊ लागलं आणि म्हणता म्हणता आम्हा दोघांना आता हे चंदीगडचे रस्ते आवडायला लागले. मोठाले रस्ते आणि ते ही अतिशय सुनियोजितपणे बांधलेले, कुठे मध्येमध्ये गाडी घुसवणं नाही, हॉर्नचे आवाज नाहीत, कोणाला भराभरा पुढे जाण्याची घाई नाही, वाहन दामटवणे नाही, करकचून ब्रेक्सचे दाबण्याचे आवाज नाहीत, अगदी काही काही नाही. रस्त्यांवर गर्दी नाही, सगळं कसं सुटसुटीत... सगळं कसं अगदी मुंबईच्या विरुद्ध. का माहीत नाही मला अचानक जाणवलं की आपण जगतो ते कसलं आयुष्य ! तडजोडीचं... गर्दीतून वाट काढत जगणे हे काही आयुष्य झालं ? अशा बऱ्याच भावनांचं येणं जाणं त्यावेळी माझ्या मनात चालू होतं. थंडी या एका महत्त्वाच्या ऋतूला आपण मुकतो, थंडीचा आनंद घेणं मुंबईच्या नशिबात नाही. ही मनाला कायम बोचणारी सल त्यावेळी मनात ये-जा करणाऱ्या भावनांच्या रहदारीत आपलं अस्तित्व परत एकदा अधोरेखित करून गेली.

या विचारांच्या गर्दीत हरवलेले असतानाच सतारा आलं. सतारा म्हणजे सतरा, चंदीगडच्या सेक्टर क्रमांक १७ मधलं मार्केट. रस्त्याच्या तळमजल्यावर दोन्ही बाजूंना पसरलेली ऐटदार दुकानं, ही दुकानं कधी संपणार की नाही असा प्रश्न पडावा इतकं भलं मोठं आहे हे मार्केट... सहज दुकानांवर नजर टाकली तर क्रोमा, वूडलॅंड ही अशी दुकानं दिसली. मी ड्रायव्हरला म्हटलं, ही अशी दुकानं आमच्या इथे पण आहेत... दुसऱ्या क्षणाला तो म्हणाला, खूप मोठं आहे हे मार्केट. एक दिवस पुरणार नाही, एवढी दुकानं आहेत. लोकं खास या सतारासाठी येतात. मग विचार केला इथपर्यंत येऊन कुठे परत जा, थोडं फिरुयात सतारा मार्केटमध्ये म्हणून निघालो...

अतिशय जुनी दुकानं, दुकानांची धाटणी जुनी. भले तिथे तुम्हाला आजच्या काळातले ब्रँड्स दिसत असतील, आतून दुकानं आजच्या काळात शोभतील अशी चकाचक असतील पण दुकानांची ठेवण जुनीच. दुकानांची ही... मोठी उंचीच त्या दुकानांचा काळ सांगत होती. दुकानांचा गाभा तसाच जुना ठेवून ही दुकानं अद्ययावत केली होती. अशी दुकानं मला फार आवडतात. दक्षिण मुंबईत अशी जुनी दुकानं आजच्या काळासाठी सुसज्ज केलेली बघायला मिळतात. खरं तर फार उशीर झालेला नव्हता पण त्या सतारामध्ये तुरळक गर्दी होती. होते ते सगळे स्थानिकच आणि त्यात फक्त आम्हीच काय ते पर्यटक... खरेदीची ठिकाणं म्हटली की मुंबईत भयंकर गर्दी पण तिथे मात्र याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती. एकेक दुकानं बघू लागलो आणि हे सतारा बघण्यासाठी गाडीतून उतरलो हे बरंच झालं असं वाटू लागलं. काही दुकानं बाहेरून तर काही दुकानांमध्ये जाऊन विंडो शॉपिंग करत पुढे जाऊ लागलो. तिथले स्थानिक जसे कपडे वापरतात त्यांची इतकी सुंदर दुकानं ! अगदी वेड लागेल अशी. एक सुपर मार्केट दिसलं. रोज लागणाऱ्या किरकोळ गोष्टींची यांची ही दुकानं असतात तरी कशी बघुयात असा विचार करत आत दुकानात शिरलो. ऐटीत थाटलेलं एक छोटंसंच दुकान, अशी दुकानं गोव्यात हमखास बघायला मिळतात. आम्ही एक दोन गोष्टीही तिकडे खरेदी केल्या. तिथेच स्ट्रॉबेरी दिसली, लाल लाल चुटूक... वाटलं, कदाचित आंबट निघाली तर ! पण मोह आवरला नाही, मग तिथल्या स्ट्रॉबेरीचा एक छोटा डबाही घेतला. खरेदी केल्यावर घेतलेल्या गोष्टी प्लास्टिक नाही तर कापडी पिशवीत मिळाल्या. मग आठवलं, बरोबर... पंजाबात प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आहे म्हणजे आता येथून पुढे आपल्याला बहुतेक करून या अशाच पिशव्या मिळणार तर... असंच फिरत असताना त्याच दुकानांच्या रांगेत एक उपहारगृह दिसलं, अगदी जुन्या काळातलंच. इराण्याची हॉटेलं असतात ना, तसं... अगदी काही नाही तर तिथली कॉफी तरी घेऊ असा विचार करून एका मोकळ्या टेबलावर बसलो. टेबल चौकोनी नाही तर गोल, वर सनमायका लावलेलं. उपहारगृह पूर्ण भरलेलं... बसून बराच वेळ झाला पण कोणी फिरकलंही नाही. ना पाणी द्यायला आणि ना ऑर्डर घ्यायला. तो गल्ल्यावरचा माणूस आमच्याकडे बघत होता पण गिऱ्हाईक आलंय, त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये. याचं त्यालाही काही पडलेलं नव्हतं. इथे मुंबईत असतं तर, एका मिनिटाच्या आत टेबलावर पाणी असतं. निदान तो गल्ल्यावरचा माणूस तरी असाच बघत बसला नसता, ए *** टेबल नं.** पे पानी दो... करत पाणक्याला त्याने आमच्या टेबलाजवळ धाडलं असतं, वेटर पाणी द्यायला सांगून आमच्याजवळ आम्हाला काय हवंय हे विचारायला आला असता. पण इथे सगळंच निराळं... आजूबाजूला बघितलं, आमच्यासारखे असेच वाट बघत बसलेले बरेच लोक दिसले. खाणारे लोक आपसात गप्पा मारत खाण्याचा आनंद लुटत होते आणि वाट बघणारे वाट बघत होते पण इतर कोणी दिसेल तर शप्पथ...

तेवढ्यात मला एक वेटरसारखा कोणीतरी दिसला. गोगलगायीसारखा हळूहळू आणि हत्तीसारखा डुलत डुलत तो एका टेबलाजवळ आला आणि त्याने एका टेबलावर बिलातले उरलेले पैसे दिले. वेटर दिसला म्हणून त्या टेबलाजवळच्या दुसऱ्या टेबलावर बसलेली लोकं अगदी आशेने त्या वेटरकडे बघू लागली पण तो डुल्या मारुती जसा आला तसाच तिथून निघूनही गेला. त्याने तिकडे शेजारील आशेने बघणाऱ्या लोकांकडे साधं ढुंकूनही पाहिलं नाही. हे बघून वाटलं इथले फक्त रस्तेच सुस्त नाहीत तर इथली लोकंही त्या रस्त्यांसारखीच सुस्त असावीत. चपळपणा यांना माहीतच नाही. तिथला एकंदर रंग बघून आम्ही तिकडनं उठून गेलो. हवेत छानसा गारवा असल्याने कॉफी असलेली इच्छा बाहेरच एके ठिकाणी नेसकॉफीची मशीनची कॉफी पिऊन पूर्ण केली. इथला कॉफीवाला खास चंदीगड प्रकारातला नव्हता कारण आम्हाला ही कॉफी मात्र पटकन मिळाली.   

त्या सतारामध्ये आम्ही आता छानच रमलो. शॉपिंगची जागा होती पण गर्दी नव्हती, लोकांचं मोठमोठ्यांदा ओरडत बोलणं नव्हतं, छानसा गारवा, मस्त ऐटीत उभी असलेली ब्रँडेड दुकानं, त्यांचा तो जुना आब, सगळं कसं छान छान... चंदिगडमध्ये मॉल संस्कृती आल्यापासून इथली गर्दी कमी झाली असं म्हणतात पण तरीही एकंदर शहर पाहता मॉल येण्याच्या आधीही इथे गर्दी फारशी नसावीच. आम्ही एकदोन ठिकाणी किरकोळ खरेदीही केली आणि तेवढ्यात एके ठिकाणी मला भेळवाला दिसला. सुखना तलावाच्या इथेही भेळ विकणारे पाहिले होते आणि या भेळेत मक्याचे पोहेही घालतात हे मी तिकडे पाहिलं होतं. गुलाबाच्या बागेच्या बाहेर मुंबईची प्रसिद्ध भेळपुरी करत भेळ आणि अजून काही त्यातलेच प्रकार विकताना पाहिले होते. तर या सतारात एके ठिकाणी ही भेळ दिसली. एक सरदार कुटुंब तिकडे काय काय खात उभं होतं. चंदीगडची भेळ असते तरी कशी ही उत्सुकता असल्याने मी एक भेळ घेतली. चाट हा प्रकार पंजाबचा नाही, हा प्रांत उत्तर प्रदेशकडे त्यामुळे भेळ फार जबरदस्त वगैरे असेल अशी अपेक्षाच नव्हती. एक मुलगा होता भेळ विकणारा आणि हा खास चंदीगड स्टाईलचा. त्या सरदार कुटुंबाचा पैशाचा हिशोब चालू होता. त्या कुटुंबाने बंदे पैसे दिले होते आणि उरलेले पैसे या भेळवाल्याला परत द्यायचे होते आणि ते ही नोटांमध्ये... सुट्टी नाणी नाहीतच पण त्यातही त्या मुलाने इतका संथपणा दाखवला आणि ते सरदार कुटुंबही त्याच जातकुळीतलं. त्या भेळवाल्याचा संथपणा निर्विकारपणे बघत तिथेच शांतपणे उभं होतं, एक गोगलगाय आणि दुसरं गोगलगायीचं कुटुंब... त्यांचा हा हिशोब चालू असताना त्या मुलाला अचानक जाणीव झाली की अरेरे... एक गिऱ्हाईक भेळेसाठी उभं आहे ! मग त्याने भेळ करता करता हा हिशोब करायला सुरुवात केली. अतिशय आरामात, अगदी हळूहळू आम्हाला त्या रात्री ती भेळ मिळाली. सोयासॉस किंवा चायनीज भेळेत जी चटणी असते त्या चटणीच्या आसपास असणारी आंबटढाण चटणी त्या भेळेत घातलेली होती.

बराच वेळ झाला होता आम्ही तिथे भटकत होतो आणि तरीही बरंच मार्केट शिल्लक होतं. तसंही ते पूर्ण बघणं शक्यही नव्हतं. इथे जेवढे भटकलो तेवढा वेळ छानच गेला. एरवी गुजराथ्यांमध्ये असणारे आम्ही तिथे छानछोकीत राहणाऱ्या पंजाब्यांबरोबर होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आम्हाला हे चंदीगड सोडायचं होतं त्यामुळे आता फार वेळ घालवण्यापेक्षा परत हॉटेलवर जावं म्हणून आम्ही सतारामधून निघालो. सकाळी आम्ही मुंबई सोडलं आणि चंदीगडला आलो. थोडा वेळ हॉटेलवर घालवून जेवण घेऊन आम्ही चंदीगड बघायला बाहेर पडलो आणि रात्री आम्ही चंडीगडच्या बहुतांश महत्त्वाच्या स्थळांना भेट देऊन परत हॉटेलवर चाललो होतो. कुठे मुंबई आणि कुठे चंदीगड ! पण हवेच्या मार्गाने प्रवास केल्याने सगळं आरामात शक्य झालं. चंदीगड, एक शांत, अतिशय स्वच्छ, कमालीच्या शिस्तीचं असं सुनियोजित शहर. मी मुंबईसारख्या जलद गती असणाऱ्या शहराची त्यामुळे कदाचित हे शहर मला प्रमाणापेक्षा जास्तच संथ वाटलं. सतारात घेतलेली स्ट्रॉबेरी कमालीची गोड आणि चविष्ट होती, अशी स्ट्रॉबेरी महाबळेश्वरलाही मिळत नाही.

4 comments: