अकरा वर्षांपूर्वी एक भारतीय मुलगी चुकून पंजाब सीमा पार करून पाकिस्तानात गेली. या चित्रात दिसत आहे ती हीच मुलगी, जी आता एव्हाना सगळ्यांनाच माहीत झाली आहे. सीमा पार केल्यावर ही मुलगी पंजाब रेंजर्सना मिळाली, त्यांनी तिला एधी फाउंडेशनमध्ये आणून सोडलं. तिथे त्या मुलीने काही काळ घालवला. त्यानंतर तिला कराचीच्या एधी सेंटर या आश्रमात नेण्यात आलं. तेव्हा त्या मुलीचं वय ११ वर्षे होतं. एधी जोडपं हे आश्रम चालवतात. या मुलीला ऐकूही येत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं. ही मुलगी कोण कुठली काहीच माहीत नव्हतं. पण भारताच्या नकाशाकडे बोट दाखवून ती हसायची आणि टाळ्याही वाजवायची, त्यावरून त्यांना हे कळलं की ही भारतीय आहे. तिच्याशी जमेल तसा संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना कळलं की ही हिंदू आहे. हिचा धर्म कळताच श्री. एधी यांनी तिच्या कपाळावर जिथे नाम लावतात तिथे नाम लावण्याची आणि ओवाळण्याची कृती केली. हे त्या मुलीला फार आवडलं, मग त्या जोडप्यानेच तिचं नाव गीता ठेवलं आणि म्हणता म्हणता गीताचा त्यांना लळा लागला, एधी बाईंचा तर जास्तच. या आश्रमात सगळेच मुस्लिम, त्यामुळे तिथे मंदीर वगैरे असण्याची अजिबातच शक्यता नव्हती. पण केवळ या गीतासाठी त्या आश्रमाच्या तिसऱ्या मजल्यावर एक मंदीर बांधण्यात आलं म्हणजे गीताला काय देवाची प्रार्थना, पूजा वगैरे करायची असेल ती तिला करता येईल. ज्या आश्रमाचे सगळेच्या सगळे सदस्य मुस्लिम आहेत तिथेच ती एक संपूर्ण खोली म्हणजे गीताचं मंदीर आहे,. त्या मंदिराचं पावित्र्य राखण्याचाही प्रयत्न तिथल्या सगळ्या लोकांकडून केला जातो. घरातलं असूदेत नाहीतर बाहेरचं कोणालाही चप्पल बूट घालून आत मंदिरात यायला परवानगी नाही आणि जर कोणी चप्पल घालून आत यायचा प्रयत्न केलाच तर त्याला तिथेच अडवलं जातं, आधी चप्पल बाहेर काढून या, नाहीतर माझी मुलगी रागावेल हं. तिला चालत नाही.
फोटोत दिसत आहेत ते तेच श्री. एधी आहेत, ते आणि त्यांची बायको
तिला आपल्या मुलीसारखं सांभाळत आहेत. याबद्दल वाचलं तेव्हा डोळे पाणावले. ही आहे माणुसकी.
आतापर्यंत आपल्या भारतीयांना पाकिस्तानमध्ये जी अती आदराची वागणूक मिळते याचे बरेच
किस्से ऐकले, वाचले होते पण ही हिंदू भारतीय गीता आणि पाकिस्तानी एधी जोडप्याची गोष्ट
म्हणजे माणुसकीचा सर्वोच्च बिंदू आहे. या ऐकू न येणाऱ्या आणि बोलता न येणाऱ्या मुलीबरोबर
घडायला काहीही घडू शकलं असतं पण त्या देशात आज एक हिंदू भारतीय मुलगी सुरक्षित जगत
आहे. दोन देशांचं वैर आपल्या जागी आहेच पण या गीताच्या गोष्टीमुळे भारतात एक चांगला
संदेश पोहोचला आहे, हे नक्की.
सलमानला आणि त्याच्या बजरंगी भाईजानला बऱ्याच शिव्या घालण्यात
आल्या पण या शिव्या घालणाऱ्यांनी एक मान्यच केलं पाहिजे की या सिनेमामुळेच आज एक भारतीय
मुलगी पाकिस्तानातून तिच्या स्वतःच्या घरी येणार आहे. एका घराला आपली मुलगी परत मिळणार
आहे.

No comments:
Post a Comment