काल संध्याकाळी दोन चिमुरड्या ओंजळभर पिवळ्या चाफ्याची फुलं घेऊन आमच्या इमारतीच्या खाली बाकावर बसल्या होत्या. खाली पाण्यात फुलं पडू नयेत म्हणून त्यांनी मांडी घालून फ्रॉकमध्ये फुलं ठेवली. मग हाताचा मस्त वास घेत त्यांचं त्या फुलांशी खेळणं सुरू झालं. मधल्या जाड दांड्याला असणाऱ्या मंजिऱ्या फुल हलवत काढत होत्या. त्या मंजिऱ्यांचही त्यांना अप्रूप. मी आणि माझी मैत्रीण हे सगळं खूप कौतुकानं बघत होतो. तेव्हा ती म्हणाली नवऱ्याच्या काकांच्या घराच्या मागे खूप मोठं झाड आहे चाफ्याचं, आपण उद्या सकाळीच जाऊयात मस्त भरपूर फुलं काढू. हे ऐकलं आणि माझा आनंद अक्षरशः ओसंडून वाहू लागला.
चाफ्याची फुलं ही विशेष आवडीची फुलं .आमच्या पुण्यातल्या घराच्या जवळंच कोपऱ्यावर, पी. जोग क्लासच्या समोरच एक पांढऱ्या चाफ्याचं झाड आहे आणि तिथेच खाली एकदम छोटंसं शंकराचं देऊळ. त्या झाडाला भरपूर फुलं यायची आणि तिकडनं जातायेता आम्ही मैत्रिणी न चुकता ती फुलं वेचायचो. फार सुंदर वास असतो त्याचा .मग त्या फुलांच्या वेगवेगळ्या प्रकारे अंगठ्या बनवायच्या आणि त्या त्याच्या देठासकट, करंगळी आणि त्याच्या शेजारच्या बोटात धरायच्या, आम्हा मैत्रिणींचा लहानपणचा आवडता छंद .अंगठ्या कशा वेगवेगळया प्रकारे बनवता येतील यासाठी आम्ही आमची असेल नसेल तेवढी सगळी कुशलता पणाला लावायचो.
अजून एक आवडीचं चाफ्याचं फुल म्हणजे पिवळा चाफा किंवा सोनचाफा. आमच्या एका ओळखीच्या आजींकडे या चाफ्याचं झाड होतं. या दिवसात साधारण त्या रोज बोलवायच्या फुलं घेऊन जायला .मग नेहमीचा शिरस्ता, मी क्लासहून येताना ती फुलं नेहमी त्यांच्याकडून घेऊन यायचे. फार सुंदर वाटायची ती ताजी ताजी फुलं, थोडी पावसाच्या पाण्यानी भिजलेली असायची पण त्यामुळे त्या फुलांच्या सौंदर्यात भरच पडायची .थोडीशी जरी घरी आणली तरी घरभर त्याचा घमघमाट सुटायचा. मग काय श्रावणातल्या सणांपासून अगदी गौरी-गणपतीपर्यंत या फुलांना विशेष स्थान. मग शाळेत जाताना चाफ्याचं फुल डोक्यात घालणं ओघानं आलंच. त्यातही चाफ्याच्या छोट्याशा पानाबरोबर असलेलं फुल तर खास .ही फुलं शिळी झाली तरी सुगंध देतातच .अशा बऱ्याच आठवणी या चाफ्याबरोबर जोडल्या आहेत.
आज ठरलं होतं सकाळी फुलं काढायला जायचं. सकाळी ९ वाजताच मी तिच्या काकांच्या घरी गेले. काकू, काकांची सून, मी आणि माझी मैत्रीण वर गच्चीवर गेलो .काठीनी फुलं काढायचा प्रयत्न केला, पण फार सोपं नव्हतं ते. शेवटी खूप प्रयत्नांनी आम्ही चांगली भरपूर फुलं काढली. फुलं काढताना लहानपणच्याच आठवणी मनात रेंगाळत होत्या. खूप मस्त वाटत होतं. आपण परत आपलं बालपण जगत आहोत असाच भास होत होता. आमच्या तिघींचे ते फुललेले चेहरे आणि तो उत्साह बघून काकू म्हणाल्याच मला अगदी माझ्या लेकीचं लहानपण आठवतंय तुमच्याकडे बघून. फुलं घेऊन खाली आलो तर शेजारच्या दोघी तिघी आल्याच लगेच फुलं मागायला, आज भरपूर फुलं काढलीत की......व्वा काय छान वास सुटलाय करत....... मग काय तिथे शेजारीही भरपूर फुलं वाटली.
आजची सकाळ तर बालपण जगत खूपच सुंदर गेली .असेच आनंदी क्षण, प्रसंग वेचत वेचत आयुष्याच्या वाटेवर चालत रहायचं, ओंजळ भरून वाहू लागते एवढा आनंद हे आपलं आयुष्य आपल्याला देत असतं. आनंदी, समाधानी आयुष्य म्हणजे अजून वेगळं ते काय ? हेच की ते आनंदी, समाधानी आयुष्य .

No comments:
Post a Comment