Monday, 20 June 2016

संक्रांत


महाराष्ट्रातल्या काही घरात संक्रांतीच्या दिवशी 'संक्रांती देवी'ची स्थापना केली जाते. तिला हलव्याचे दागिने घातले जातात. या देवीच्या बाबतीत एक मान्यता आहे की या देवीची दृष्टी ज्या ज्या वस्तूंवर पडते त्या वस्तू महाग होतात तसेच ही देवी ज्या दिशेने गमन करते आणि ज्या दिशेला तिची दृष्टी पडते, त्या दिशेला कष्ट भोगावे लागतात.

संक्रांती देवीचं वाहन, उपवाहन, वस्त्र, आयुध, फल, जाती काय काय आहेत या सगळ्याची माहिती पंचांगात असते .तसेच येण्याचा दिवस आणि गमनाची दिशा याचीही  माहिती पंचांगात  नमूद केलेली असते.

संक्रांतीचा दुसरा दिवस 'किंक्रांत' म्हणून ओळखला जातो. संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या प्रजेला त्याच्या जाचातून मुक्त केले. म्हणून या दिवसाला किंक्रांत म्हणतात .या दिवसाला करिदिन असेही म्हणतात. आजचा दिवस शुभ कार्यांना वर्ज्य मानला आहे.

सदर चित्र महाराष्ट्रातील एका घरात स्थापित केलेल्या संक्रांती देवीचं ....


तामिळ लोकांचं नूतन वर्ष 'पोंगल'ला सुरू होतं. भोगीपासून सुरू होणारा पोंगल हा चार दिवसांचा मोठा उत्सव तामिळनाडूत साजरा होतो. आजचा तिसरा दिवस 'मुट्टू पोंगल' या नावाने साजरा केला जातो. ज्याप्रमाणे उत्तरेकडे गोवर्धन पूजा केली जाते तशीच पूजा आजच्या पोंगलच्या तिसऱ्या दिवशी केली जाते.

शेतात कष्ट करणारा बैल आणि हिंदू धर्मीयांची पूजनीय गोमाता आणि तिचा बछडा यांचा दिवस म्हणजे पोंगलचा तिसरा दिवस. आजच्या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्याना सजवलं जातं. शिंगांना बेगड लावून त्यांची सजावट केली जाते. गळ्यात फुलांच्या माळा घातल्या जातात. दुपारी खास या गुरांना गोडाधोडाचं जेवण खायला दिलं जातं. संध्याकाळी या गुरांची गावातून भव्य मिरवणूक काढली जाते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं .काही ठिकाणी या दिवसाला 'केनू पोंगल'ही म्हणतात .आजच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उत्तम भविष्यासाठी पूजा करते आणि भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो.

No comments:

Post a Comment