Monday, 20 June 2016

श्रावणोत्सव



श्रावण म्हणजे उल्हास, श्रावण म्हणजे आनंद, श्रावण म्हणजे उत्साह. श्रावण म्हणजे एक उत्सव.....श्रावणोत्सव. या श्रावणाला एवढं महत्त्व का ? श्रावणाचा पाऊस एवढा हवाहवासा का वाटतो ? का श्रावणात सृष्टीवर हिरवे गार गालिचे पांघरलेले असतात ? श्रावण आला की सृष्टीही आनंदून का जाते ?

श्रावण महिन्यातच देवगण आणि राक्षसगण यांच्यात ‘समुद्र मंथन’ केलं गेलं. त्यातून १४ रत्न बाहेर पडली. १३ रत्नांची वाटणी केली गेली. पण चौदावं रत्न म्हणून ‘विष’ समुद्रातून बाहेर आलं. आता विषाचं काय करायचं ? हा प्रश्न देवतांसमोर होता. कितीही विचार केला तरी या विषावर काहीच तोडगा निघत नव्हता. हळूहळू विष पृथ्वीवर पसरायला लागलं. त्याचे विपरीत परिणाम सृष्टीवर दिसायला लागले. तिचं अस्तित्त्वच धोक्यात येऊ लागलं. तेव्हा सगळे चिंतीत देव महादेवांकडे गेले आणि सृष्टीचं रक्षण करण्याची विनंती केली. सृष्टीचं रक्षण करण्यासाठी महादेवांनी ते विष आपल्या गळ्यात धारण केलं. साहजिकच त्यामुळे सृष्टीवरचा विषाचा प्रभाव नष्ट झाला.

सृष्टीचं रक्षण झाल्याने आनंदून इंद्रदेवांनी त्यावेळी पाऊस पाडला. पावसाच्या रुपात झालेलं पृथ्वी आणि आकाश यांचं मीलन खूपच मनोहारी होतं. या मिलनाच्या दृष्याने महादेव हर्षभरीत झाले आणि त्याचवेळी पृथ्वीवर श्रावणोत्सव साजरा होण्यास सुरुवात झाली. 

या पृथ्वी-आकाश मिलनाचा अनुभव पुनः पुनः घेण्यासाठी महादेव त्यांच्या लाडक्या श्रावण महिन्यात पृथ्वीवर येतात असं म्हटलं जातं. श्रावण - हवाहवासा पाऊस - सृष्टीने पांघरलेला हिरवा गालिचा - हर्षोल्हासाचं वातावरण आणि याचा अनुभव घेण्यासाठी पृथ्वीवर येणारे महादेव, हे समीकरण तेव्हापासून जे बनलं ते आजतागायत बनलेलं आहे. 

           

No comments:

Post a Comment