Monday, 20 June 2016

कुंभमेळा



एकंदर लोकांचा आवडता छंद असतो, हिंदू धर्मावर, त्यात सांगितलेल्या गोष्टींवर, त्यातील पौराणिक गोष्टींवर मनसोक्त टीका करायची, जुन्या देवदेवतांच्या गोष्टींची आत्ताच्या काळाशी सांगड घालून चिकित्सा करायची, आणि प्रत्येक गोष्ट चुकीचीच ठरवायची. हे असले प्रकार कायमच चालू असतात.  

त्यातलाच एक प्रकार गंगा नदीच्या पाण्यावर आणि गंगास्नानावर होणारी टीका. हो मान्य, बऱ्याच ठिकाणी गंगेचं पाणी खराब आहे. अतिधोक्याची पातळी पण पार केलेली आहे. त्याबद्दल वारंवार बातम्या दाखवल्या जातात. एवढंच काय पण डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफिक या वाहिन्यांवर पण त्याबद्दलचे प्रयोग दाखवलेले आहेत. हे सर्व मान्य, पण लोकांची श्रद्धा असते, मारतात लोकं डुबक्या गंगेच्या पाण्यात. आपल्याला पटत नाही तर आपण गप्प बसावं, तर ते नाही, तर टीकाकार टीका करायला पुढे.

तर आत्ता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे, प्रयाग मध्ये सुरु असलेला कुंभमेळा. तर हा जगातील सर्वात मोठा मेळा. आयोजक कोण ? निमंत्रण कोणी पाठवलं ? कोणाच्या आमंत्रणावरून एवढी कोट्यांनी लोकं तिथे जमतात ? अशा प्रश्नांची उत्तरंच नाहीत. आकाशात तशी ग्रहांची स्थिती निर्माण होते, आणि हा कुंभमेळा दर १२ वर्षांनी एका ठिकाणी, अशा ४ वेगवगळ्या ठिकाणी आयोजला जातो. तसेच ह्यांच्या जागाही मनुष्यानी ठरवलेल्या नाहीत. हे असं हजारो वर्षांपासून चालू आहे. म्हणजे सगळंच मनुष्याच्या आकलना पलीकडचं. त्यातील काही आखाडे तर आद्य श्री शंकराचार्यांनी स्थापित केलेत. तर आता ह्या कुंभमेळ्यावर टीका. काय तर म्हणे ही सगळी अंधश्रद्धा आहे.

आता श्रद्धेनी भाविक कुंभनगरी जमतात आणि स्नान करतात, तो त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. आता यात टीकाकारांनी का तोंड उघडावं ? कुंभमेळ्यात जे आखाडे आहेत, त्यातील एक आखाडा प्रमुख तर परदेशी गोरा आहे. तो म्हणतो, माझ्याकडे सगळं होतं पण तरी काहीतरी अपूर्ण असल्याची भावना मनात होती, त्यासाठी जगात भरपूर फिरलो, पण जे हवं होतं, ते इथे भारतात येऊन मिळालं. आणि आम्ही, इथलेच, इथेच जन्मलो, वाढलो, पण घालतोय शिव्या आमच्याच धर्माला. हा असा एकटाच परदेशी नाही, पहिल्या शाही स्नानात भाग घेणारे बरेच गोरे परदेशी नागरिक होते. जवळ जवळ २ लाख परदेशी नागरिक या मेळ्याला हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे, त्यात हॉलीवूड कलाकारही आहेत.

पण आम्ही म्हणतोय, कसल्या घाण पाण्यात डुबक्या मारतात, सगळी अंधश्रद्धा आहे, कोणीतरी या लोकांना हे समजावून सांगितलं पाहिजे. गंगेचं पाणी किती धोकादायक पातळीवर आहे, त्याने कसे त्वचारोग होऊ शकतात, याचे प्रयोग करणारे हेच गोरे परदेशी नागरिक आणि याच कुंभ मेळ्यात उत्साहानी पुढे असणारेही हेच गोरे परदेशी. शेवटी हा प्रश्न श्रद्धेचा आहे, आस्थेचा आहे. खरं तर समुद्रमंथनाच्या वेळी अमृतकलशातून ४ थेंब, एकेक थेंब ४ पवित्र नद्यांत पडले, १ थेंब तर गंगा, यमुना, सरस्वती संगमावर पडला आणि दर १२ वर्षांनी आकाशात तशी ग्रहस्थिती निर्माण झाली की हा कुंभमेळा असतो, ह्या गोष्टीशी या परदेशींना काय स्वारस्य असणार ? पण त्यांचीही आस्था आहे. पण आपल्याच लोकांचा हा असा दृष्टीकोण नक्कीच खटकतो.

आपला विश्वास नाही मग आपण निदान टीका करू नये, निदान अशा धार्मिक गोष्टींवर तरी, आपण कितीही वैज्ञानिक प्रगती केली तरीही जगात अशा काही अनाकलनीय गोष्टी आहेत, त्यांचं उत्तर या विज्ञानाकडे नाही. याचं भान कायम ठेवावं.

No comments:

Post a Comment