अगदी धरतीपर्यंत उतरलेलं नभ.
सुटलेला गार वारा. त्या वाऱ्यावर बेभान होऊन डोलणारे
वृक्ष. आकाशातून कोसळणाऱ्या सृष्टीला नखशिखांत भिजवून टाकणाऱ्या
जलधारा. त्या धारांनी मोहरून जाणारी, नवीन हिरवा
साज ल्यालेली सृष्टी. हवेत पसरलेला तनाबरोबरच मनालाही हवाहवासा वाटणारा
गारवा.
हळूहळू वेगळ्याच अवस्थेत शिरणारं
मन. हलक्या तसेच जोरदार सरींमुळे सुरु झालेला
मनाचा उत्सव. अचानक उघडले जाणारे मनातले भूतकाळी कप्पे आणि घातल्या जाणाऱ्या नवीन स्वप्नांच्या रांगोळ्या. परत एकदा जगलेले
तेच जुने आणि त्याचबरोबर रंगवलेले काही काल्पनिक क्षण. या मोहक तरंगांवर
रमणारं मन.
आणि त्याचबरोबर नकळत चेहऱ्यावर
उमटलेलं हसू....
असे हळूच क्षण जगता येणं, हेच काय ते सुख आणि हाच काय तो आनंद.
No comments:
Post a Comment