काल आमच्या अगदी जवळच्या नातेवाईकांकडे
(किंवा अगदी घरातल्याच म्हटलं तरी चालेल) मंगळागौरीसाठी गेले होते. मराठी नाटक, चित्रपट, मालिका
यात अभिनय करणारी प्रथितयश, कसदार आणि
अप्रतिम अभिनयाची, अतिशय गुणी आणि आजची आघाडीची
अशी अभिनेत्री आमच्या नात्यातली आहे. आता हे सगळं ती नात्यातली आहे म्हणून नाही तर एक सामान्य प्रेक्षक म्हणून मला जे तिच्याबद्दल
वाटतं त्यावरूनच लिहिलेलं आहे. एरवी मी तिचा उल्लेख कधीच कुठेच
केला नसता पण या पोस्टमध्ये थोडा उल्लेख करणं आवश्यक आहे म्हणून हे सगळं
लिहिलं.
आता घरचीच मंगळागौर
म्हटल्यावर तिची आई काल तिथे आलेली होती. नाटकांचे प्रयोग, चित्रीकरणं
वगैरे यामुळे कितीही इच्छा असली तरीही फार क्वचित वेळा तिला अशा कार्यक्रमांना
हजर राहणं शक्य होतं. त्यामुळे कालही तिची आई एकटीच कार्यक्रमाला
जातीनं हजर होती.
तिथे एकांना त्यांचा मोबाईल
क्रमांक हवा होता आणि त्या आडनावाच्या बऱ्याच जणांचे
क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह असल्याने त्या तिच्या आईला त्यांचं नाव विचारत होत्या. कित्येकदा आपण एखाद्यांना काकू, मामी, मावशी, आत्या असं म्हणतो
आणि तेच नाव दोन पिढ्या कायम राहतं. वडीलही मावशीच म्हणतात आणि मुलगाही मावशीच. त्यामुळे त्यांचं खरं नावही विसरायला
होतं.
तिची आई आपल्या मुलीचं नाव
घेत, ****ची आई
त्या बाई, अहो नाव सांगा ना...
मी त्यावेळी तिथेच होते. मी
त्या बाईंना म्हणाले की मी ही ****ची आई असंच सेव्ह केलंय
नाव, कारण तीच त्यांची ओळख जास्त लक्षात राहते.
माझ्या बोलण्यावर मान डोलवत तिच्या आई त्या बाईंना म्हणाल्या, तीच आमच्यासाठी मोठी अभिमानाची
गोष्ट आहे. त्यांनी पुढे एक इरावती कर्वे यांचा एक किस्सा सांगितला.
एकदा इरावती बाई आपल्या मुलाच्या शाळेत शाळेतल्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. एवढ्या मोठ्या लेखिका, विचारवंत वगैरे म्हटल्यावर जो तो येऊन त्यांचं कौतुक करायचा. अगदी कार्यक्रमातही त्यांचं
कौतुक झालं. पण तरीही त्या आनंदी नव्हत्या. समाधानी नव्हत्या. त्यांना
सारखं वाटत होतं की काहीतरी अपूर्ण आहे. तेवढ्यात त्यांना मागून हाक ऐकू आली
अमक्या अमक्याची आई.... त्यांना आनंद आणि वाटलं, आता कसं सगळं बरोबर आहे. शाळेत त्यांना लेखिका अशी ओळख नको होती तर आपल्या मुलाची आई ही ओळख त्यांना
हवी होती. त्यासाठी त्यांचं मन आसुसलं होतं.
हा किस्सा ****च्या आईने सांगितला
आणि माझं नाव ****ची आई हेच, यावर कायम रहात त्यांनी शेवटपर्यंत आपलं नाव काही सांगितलं
नाही.
आपल्या अपत्यामुळे आपल्याला
ओळखलं जावं ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असतेच पण
आपली स्वतःची ओळख पूर्णपणे पुसत आपल्या मुलीवरून होणारी आपली ओळख हीच आपली खरी ओळख असे समजणारी एक माता काल पाहिली आणि
मला खरोखर धन्य झालं. ही गोष्ट तशी दुर्मिळ आहे पण शेवटी त्या मातेची लेकही
आहेच ना तशीच !
आणि या अभिनेत्री कुटुंबाचं
आपल्याशी नातं आहे आणि तेवढाच जिव्हाळाही आहे यासाठी
मलाही काल खरोखर अभिमान वाटला. खरंच ही अशी लेकरं प्रत्येक घराला मिळोत...!
No comments:
Post a Comment