पाऊस जवळ आला की पक्षी झाडांवर घरटी बांधायला घेतात. वेधशाळा पाऊस कधी आहे हे एक वेळ अचूक सांगू शकणार नाही पण पक्षी मात्र घरटी बांधण्याच्या बाबतीत चुकत नाहीत. झाडावर घरटं बांधण्याची जागा, स्वरूप आणि वेळ ही अगदी बरोबरच असते आणि त्यावरून पावसाचा अंदाज बांधायला माणसाला मदत होते.
अशोकाच्या झाडावर कावळे घरटी बांधतात आणि आमच्या इमारतीच्या जवळ अशोकाची झाडं असल्याने कावळ्यांच्या ऋतुमानाप्रमाणे बदलणाऱ्या हालचाली अगदी नीट बघायला मिळतात. बाकी पक्षीही आजूबाजूला दिसत असले तरी सध्या बारीक लक्ष कावळ्यांवरच...
लग्नघरी मुलीकडच्यांकडे कशी धांदल उडालेली असते, अगदी तशीच धांदल सकाळी सकाळी लवकर गेली चार दिवस आमच्या इथल्या कावळ्यांची उडालेली दिसत आहे. इकडून तिकडे फिरत बसतील, आत झाडात जातील आणि लगेच बाहेर येतील आणि हे सगळं करताना त्यांचं जोरात कॅव कॅव ओरडणं... कधी फांदीच्या टोकाशी उभं राहून आकाशाकडे बघत तर कधी दुसऱ्या झाडांकडे बघत इतक्या जोरात आणि वेगात ओरडत बसतील की जणू हे कोणालातरी काहीतरी सांगत आहेत, किंवा मी आता घरटं बांधायला घेतोय हेच आपल्या समाजाला ओरडून सांगत असावेत असंच वाटतं. असू शकतं ना, त्यांचीही भाषा असते, संवाद असतो...
ही इकडून तिकडे ही जी त्यांची लगबग चालू असते, त्यात बऱ्याचदा घराट्यासाठी लागणारं सामान इकडून तिकडे नेलं जातं. सुतळी, वाळलेलं गवत, झाडाची हिरवी पानं, काटक्या, वायरी अशा प्रकारच्या सामानाची ने-आण सकाळी सकाळी केली जाते. कित्येकदा झाडाच्या एकन् एक भागाचं अवलोकन केलं जातं, झाडाचा वरचा भाग कावळे अक्षरशः पिंजून काढतात.
अजून तरी घरटं बांधायला सुरुवात झालेली नाही, म्हणजे निदान मला तरी घरटं बांधण्याची क्रिया दृष्टीस पडलेली नाही. पण लवकरच कावळे घरटी बांधायला घेतील अशी अपेक्षा आहे.
मग घरटं कसं, कुठे बांधत आहेत यावरून पावसाचा अंदाज बांधता येईलच आणि घरटं बांधण्याची क्रिया, त्यांचे श्रम सगळं जवळून बघता येईल ते वेगळंच 😊😊
चला आता निसर्गाची ही महत्त्वाची क्रिया बघण्याची संधी लवकरच मिळावी 😇
No comments:
Post a Comment