ज्यावेळी या जगात अधर्म आणि फक्त अधर्म असेल. धर्माचं राज्य पूर्णपणे संपुष्टात येईल. या जगावर फक्त राक्षसी अधर्मीयांचंच राज्य असेल; म्हणजेच या जगावर, या सृष्टीवर कली पूर्णपणे आधिपत्य गाजवेल, तेव्हा भगवान विष्णू ‘कल्की’ अवतार घेतील आणि जगाचं चक्र पूर्णपणे नष्ट करून एक नवीन सुरुवात करून देतील. हा कल्की अवतार कलियुगाच्या अंतिम चरणात आणि नवीन सत् युगाच्या सुरुवातीला होईल. कलीचं संपूर्ण उच्चाटन करणे आणि धर्माची पुनर्स्थापना करणे ही प्रमुख उद्दिष्टे या अवतारात भगवान विष्णूंची असतील.
या दहाव्या अवताराबद्दल मुख्यतः
श्रीमद्भागवत,
स्कंध पुराण
और कल्किपुराण या पुराणांमध्ये बरंच काही
लिहून ठेवलंय. पुराणांमध्ये कल्कीचा जन्म ‘श्रावण शुद्ध पंचमी’ या दिवशी होईल तसेच
उत्तर प्रदेशातील गंगा आणि रामगंगा यांच्यामध्ये मुरादाबादमधील ‘संभल’ या गावी कल्कीचा
जन्म होईल, असा उल्लेख आढळतो. एका विष्णूभक्त विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी
कल्की जन्म घेईल. त्याच्या आईचं नाव सुमती असेल. हा अवतार ६४ कलांमध्ये निपुण असेल.
कल्की ‘देवदत्त’ नावाच्या पांढऱ्या घोड्यावर बसून आणि हातात तलवार घेऊन या जगातून पाप
नष्ट करेल. भगवान परशुराम जे चिरंजीवी आहेत, ते या कल्की अवताराची आतुरतेने वाट पहात
आहेत आणि परशुरामच कल्कीचे गुरुही असतील.
उत्तर भारतात श्रावण शुद्ध
पंचमीला आणि पश्चिम भारतात श्रावण शुद्ध षष्ठीला ‘कल्की जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी
केली जाते. देशभर कल्कीची अनेक मंदिरे आहेत. त्यातलं एक प्रसिद्ध मंदीर जयपूरमध्ये
‘हवामहल’च्या समोर आहे, जे राजा सवाई जयसिंह द्वितीयने बांधलं होतं. या मंदिरात कल्कीच्या
मूर्तीबरोबरच त्यांच्या पांढऱ्या घोड्याची मूर्तीही स्थापित आहे. सगळ्या कल्की आणि
विष्णू मंदिरांमध्ये कल्की जन्मोत्सव साजरा केला जातो.
संभल गाव, ज्याचा उल्लेख कल्कीचं
जन्मगाव म्हणून केला आहे. त्या गावात कल्कीचं एक भव्य मंदीर आहे. या मंदिरात मोठ्या
उत्साहाने कल्की जयंती साजरी केली जाते. जयंतीसाठी मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते.
या दिवशी गावातून मोठी शोभा यात्रा, रथ यात्रा काढल्या जातात. कल्की भक्त अनवाणी हे
रथ आपल्या हातांनी ओढत संपूर्ण गावात फिरून ही यात्रा पूर्ण करतात. दुसऱ्या दिवशी महायज्ञ
आणि भंडाऱ्याचं आयोजन केलेलं असतं. एकंदर तिथले ग्रामस्थ हा जयंती महोत्सव जोरात साजरा
करतात.
संभल गावातल्या कल्की मंदिरातील
भगवान कल्की आणि त्यांची पत्नी पद्मादेवी यांच्या या मूर्ती. मागे पांढऱ्या घोड्याचीही
प्रतिमा आहे.

No comments:
Post a Comment