Monday, 4 July 2016

रंगभरी एकादशी


आज फाल्गुन शुक्ल एकादशी ............. वाराणसीमध्ये या एकादशीला 'रंगभरी एकादशी' या नावाने ओळखलं जातं.

असं म्हटलं जातं की, देवी पार्वतीबरोबर विवाहानिमित्त, वसंत पंचमीला महादेवांचा 'तिलक', महाशिवरात्रीला 'विवाह' आणि फाल्गुन शुक्ल एकादशीला 'शिव नगरी काशी' येथे विवाहानंतर पार्वतीसंग आगमन झालं होतं, म्हणजेच आजच्या दिवशी पार्वतीचा 'गृहप्रवेश' झाला होता .हा दिवस काशीत उत्साहाने साजरा केला जातो. आजपासून काशीमध्ये होळीला सुरुवात होते.

आज काशीतील बाबा विश्वनाथ यांचा विशेष शृंगार केला जातो. महादेवांच्या संपूर्ण परिवाराच्या मूर्ती काशी विश्वनाथ मंदिरात आणल्या जातात. मंगल सुरांच्या साथीने भक्तांना आशिर्वाद देण्यासाठी बाबा विश्वनाथ सपरिवार काशी भ्रमणासाठी निघतात.

आजचा दिवस देवी पार्वतीचा गृहप्रवेशाचा दिवस असल्याने आपला आनंद व्यक्त करण्या हेतू काशी जनता, गण यांच्याकडून गुलाल, रंग उडवण्याची प्रथा आहे. या मिरवणुकीचा शेवट काशी विश्वनाथ मंदिरात होतो. शिव परिवाराच्या मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात नेल्या जातात. तिथे या मूर्तींना रंग, गुलाल अर्पण केला जातो आणि मग त्यानंतर काशीमध्ये होळीला सुरुवात होते.

फाल्गुन शुक्ल एकादशीला 'आमलकी एकादशी'ही म्हणतात. सृष्टीची रचना करण्यासाठी विष्णूंनी जेव्हा ब्रह्मदेवांना उत्पन्न केलं तेव्हाच आवळ्याच्या वृक्षाचीही उत्पत्ती केली आणि या वृक्षाला 'आदी वृक्ष' म्हणून प्रतिष्ठापित केलं. आवळ्याचं झाड विष्णूंना विशेष प्रिय आहे. या झाडाच्या प्रत्येक भागात कोणत्या ना कोणत्या देवता निवास करतात असं म्हटलं जातं .त्यामुळे आवळ्याचा वृक्ष हा अतिशय पवित्र आणि पूजनीय मानला गेलाय.

पुराणांमध्ये भगवान विष्णूंनी सांगितलंय की, ज्या मनुष्याला स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा असेल त्याने फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे व्रत करावे .या व्रतामध्ये आवळ्याच्या वृक्षाचं विशेष पूजन केलं जातं म्हणून या एकादशीला 'आमलकी एकादशी' असं म्हणतात. मोक्षप्राप्तीसाठी हे व्रत विशेष महत्त्वपूर्ण आहे .





No comments:

Post a Comment