Thursday, 11 August 2016

बुरहान वाणी आणि जन्नत



एखाद्या महान शूरवीर योद्धयाला लढताना मरण आलं तर त्या योद्धयाच्या अंत्ययात्रेला ज्याप्रमाणे गर्दी होईल तशी गर्दी झाली होती "बुरहान वाणी"च्या अंत्ययात्रेला आणि तो ही यात्रा अगदी नीट पहात होता. त्याच्या मृत्यूनंतर जे जे काही घडलं ते ही त्याने पाहिलं होतंच आणि नंतर ही यात्रा. फार फार खुश होता तो आणि आपण किती महान कार्य केलंय याची स्वतःलाच खात्री देत तो स्वतःचीच पाठ थोपटत होता. आता त्याची उत्सुकता अजूनच वाढली आणि पुढे काय काय घडेल याची स्वप्नबांधणी तो आपल्या मनात करू लागला. लोकांनी त्याला हुतात्मा बनवलेलं पाहून त्याला वाटलं की चला आपण योग्य मार्गावर आहोत आणि आपण ज्यासाठी हे सगळं करत आहोत ते आपल्याला नक्कीच मिळणार...

मग त्याने विचार केला की चला जरा आजूबाजूला फेरफटका मारून येऊयात, आपल्यासारखे बरेच असतील. त्यांना जरा भेटूयात.. म्हणून हा तिथून निघाला. कोपऱ्यावरच त्याला तीन चार जणं भेटली. पाकिस्तानातली होती आणि भारतीय सैन्याने त्यांना मुक्ती दिली होती. त्यांना याच्याबद्दल कळलं होतं. तो त्यांना भेटायला गेला. त्यांनी याचं कौतुक करायला सुरुवात केली. आम्ही पण कुर्बानी दिली पण आमच्या नशिबात हे सगळं नव्हतं बुवा, जे तुझ्या आहे... मज्जाये... हे ऐकून तो पुढे गेला. तिथे त्याला अजून असेच काही जण भेटले आणि त्यांनीही याचं असंच कौतुक केलं.
 
आता मात्र याला गर्व वाटायला लागला आणि आता येणारा काळ किती सुखद असेल याची तो कल्पना करू लागला. असा साधारण दोन दिवस तो भटकला आणि या दोन दिवसात अती गर्वाने चांगलाच टुम्म फुगला. मग मात्र त्याच्या डोक्यात विचार यायला लागले की आता याने पुढे करायचं काय ? याने ज्यासाठी हे सगळं केलं ते याला कसं मिळणार आणि देणार कोण हे कसं कळणार

मग त्याने विचार केला की आपण याबद्दल जरा चौकशी करूयात म्हणून त्याने त्याच्यासारख्याच इतरांकडे याबद्दल विचारायला सुरुवात केली, तर कोणाकडेही याचं उत्तर नव्हतं. तो घाबरला, आता पुढचं कसं व्हायचं ? हे विचार त्याच्या डोक्यात येतच होते तितक्यात त्याच्या डोक्यात विचार आला की नाही नाही... आपल्याला आपल्या लोकांनी उगीच हुतात्मा नाही बनवलं. पाहतोय ना आपण सगळं, एवढं महत्त्व उगीच मिळेल का आपल्याला ! आपण ज्यासाठी हे सगळं केलं ते आपल्याला सगळं मिळणारच. हा विचार केला आणि त्याचं डोकं शांत झालं, मूडपण एकदम मस्त झाला. त्याने आता ठरवलं की कोणाला काहीही विचारायचं नाही आपण त्या सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत तेव्हा आता त्यांच्यात आपण जास्त मिसळायचंही नाही, असा विचार करत एकदम मस्त आनंदी चित्ताने तो पुढे जायला लागला.
 
तेवढ्यात त्याला रस्त्याच्या कडेला एक म्हातारा बसलेला दिसला. शरीराने वगैरे व्यवस्थित होता पण अगतिक होऊन मान खाली घालून बसला होता. तो थांबला. त्या म्हाताऱ्याकडे अगदी निरखून बघू लागला. हं... थेरडा... असं त्याने म्हणेपर्यंत त्या म्हाताऱ्याने डोकं वर केलं. म्हाताऱ्याला दाढी होती पण मिशी नव्हती. हे बघून तो त्या म्हाताऱ्याच्या जवळ गेला पण अंगातली रग तशीच घेऊन.
 
आपल्याजवळ कोणीतरी आलंय हे बघून म्हातारा हळूहळू उठून उभा राहिला आणि त्याला म्हणाला, बुरहान...
 
तो एकदम चमकला, त्याला वाटलं की याला आपलं नाव कसं काय माहीत ! कदाचित आपण गाजवलेला पराक्रम यांच्यापर्यंत पोहोचला असणार.... आता त्याची गुर्मी अजूनच वाढली.
 
तो म्हाताऱ्याला म्हणाला, आदाब... पण तुम्ही मला कसं काय ओळखलंत ? बरोबर... माझ्या शौर्याची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली असणार...
 
म्हातारा छद्मीपणे हसला आणि म्हणाला, हो सगळं समजलं मला..
 
म्हाताऱ्याचं छद्मी हास्य न आवडूनही तो गप्प बसला..

म्हातारा त्याला म्हणाला, आदाब...तू मनात माझ्याबद्दल काय विचार करत आहेस ते कळलंय मला आणि का ते ही...

तो म्हाताऱ्याकडे चमकून प्रश्नार्थक चेहऱ्याने बघू लागला.
 
म्हातारा पुढे म्हणाला, कधी काही महिन्यांपूर्वी मी ही तुझ्याच सारखा होतो, एकदम मस्त मौला इकडून तिकडे भटकायचो...
 
तेवढ्यात म्हातारा त्याचा प्रश्नांकित चेहरा परत एकदा बघतो आणि त्यालाच विचारतो, तू मला ओळखलं नाहीस ? ओळशील तरी कसा म्हणा... आत्ता तू एका मस्तीत आहेस, जसा कधी मी ही होतो. जन्नत, त्यात उंची दारू, ७२ कुमारिका आणि काय काय आणि लोकांनी हुतात्मा बनवलं ते ही, पण आता मस्ती उतरलीय माझी. मी याकुब मेमन... आता आठवलं कोण ते...

बुरहान याकुबकडे बघत बसला, थोडा वेळ तर त्याला काहीच सुचत नव्हतं. पण नंतर त्याने याकुबला विचारलं, का काय झालं ? हे सगळं का नाही मिळालं ? अल्लाहचा आदेश म्हणून तर सगळं आपण हे केलं ना आणि आपल्याला तर हुतात्मा म्हणून मानही मिळाला.
 
याकुब म्हणतो, का नाही मिळालं... याच उत्तराच्या शोधात इथे केव्हापासून बसलोय आणि आता हे उत्तरही मिळेल असं वाटत नाही. आता तर नवीन त्रास सुरु झालेत, असे त्रास की जे कधीच सहन केले नव्हते. असं वाटतं की हे त्रास म्हणजे कुठलीतरी मोठी शिक्षा असावी. आता तर मला पुढची वाट अती यातनांनी भरलेली असेल असंच वाटायला लागलंय, जहन्नुमच म्हण हवं तर.... आणि ते आपल्याला हुतात्मा बनवलं वगैरेचा या आपल्या नव्या जगाशी काही संबंध नाही.. असं म्हणत तो हळूहळू खाली बसू लागला.
 
हे सगळं ऐकून बुरहान वाणीची गुर्मी एका क्षणात गळून पडली, जन्नतची नशा एका सेकंदात उतरली आणि तो त्या थकलेल्या याकुबकडे कितीतरी वेळ बघत तिथेच उभा राहिला. त्यांनतर याकुबशी काहीच न बोलता, अगदी तिथून निघताना अल्लाह हाफिजही न बोलता सुन्न होत जड पावलांनी हळूहळू तिकडून निघून गेला....  

No comments:

Post a Comment