Thursday, 11 August 2016

बुरहान वाणी आणि त्याची बहीण



पंपोरमध्ये हजारोंच्या संख्येने लोकं जमली होती आणि बुरहान वाणीचा अब्बू व्यासपीठावर आला. त्याला बघून टाळ्यांचा एकंच कडकडाट झाला. त्याने जोरदार भाषण केलं, जिहाद आणि काश्मीरला स्वतंत्र करण्याची जिद्द त्याच्या बोलण्यातून जाणवत होती, आणि शेवटी त्याने जाहीर केलं की माझा मुलगा मेला नाही तर हुतात्मा झाला आणि आता त्याचं कार्य पुढे नेण्यासाठी माझ्या मुलीलाही मी जिहादसाठी अर्पण करत आहे. काश्मीर स्वतंत्र करण्यासाठी ती लढा देईल... एकंच टाळ्यांचा कडकडाट....

...या सगळ्या गर्दीत तो ही होता. तिथेच एका झाडावर बसला होता. संपूर्ण भाषण त्याने नीट ऐकलं आणि तो दुःखी झाला. टाळ्यांचा कडकडाट थांबल्यावर तो जोरात ओरडायला लागला की "नका असं करू... इरमला मरण्यासाठी पाठवू नका. आत्ता कुठे बारावी झालीय, तिला मरायला पाठवू नका. हे जिहाद वगैरे काही नाही, काही जन्नत आणि तिथली सुखं मिळत नाहीत. मी मूर्खपणा केला, पण तुम्ही तरी शहाणे व्हा....." पण कोणालाही त्याचं काहीही ऐकू येत नाही.
 
मग तो झाडावरून खाली उतरला आणि तिथे त्या गर्दीत फिरू लागला. त्याला काही ओळखीचे चेहरे दिसले. चचा... करत त्याने तेच सगळं त्या सगळ्यांना सांगितलं पण कोणीही ते ऐकलं नाही. मग तो हताश झाला आणि गर्दीतून बाहेर येत एका झाडाच्या पारावर येऊन बसला. एवढ्या आवाजात माझा आवाज नाही पोहोचला नाहीतर झाडावर बसून आपण खरं तर जोरात ओरडलो होतो... असा विचार करत त्याने विचार केला की सगळी लोकं जाऊ देत मग आपण आपल्याला सांगायचंय ते सांगूयात...
थोड्या वेळाने गर्दी कमी झाली आणि बुरहानचे वडील काही मोजक्या लोकांबरोबर एका खोलीत शिरले, तिकडेही त्यांची कुठली चर्चा चालू झाली. हा पारावरून उठला आणि त्या लोकांच्या मागोमाग त्या खोलीत गेला. बुरहानचे अब्बू आणि अजून एक माणूस तिथे त्याच्या ओळखीचे होते, त्याने तेच सगळं या दोघांना सांगितलं... पण कोणी काही ऐकलं नाही. कोणी ऐकत नाहीये म्हटल्यावर तो तिथेच कोपऱ्यात उभा राहिला.
 
ही चर्चा झाली. बुरहानचे अब्बू घरी जायला निघाले. हा ही लगेच त्याच्या पाठोपाठ जाऊ लागला. ते घरी पोहोचले. इरम घरी नव्हती, शेजारी एका आपाकडे गेली होती. त्याला बरं वाटलं, आता आपण तिला एकटं गाठुयात आणि तिला चांगलं समजावूयात. तो लगेच तिथून बाहेर पडला. वाटेत तिला इरम दिसली. त्याने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती थांबली नाही. हा इरम इरम करत राहिला पण तिने साधं ते ऐकलंही नाही. मग तोच तिच्याशी चालता चालता बोलायला लागला... इरम ऐक, जिहादच्या नादी लागू नकोस. ते सगळं खोटं आहे. काही जन्नत आणि तिथली सुखं मिळत नाहीत. ऐक माझं.... पण तिने काहीही ऐकलं नाही. ती घरी आली. अब्बू घरी आले होते, त्यांना आदाब करत तिथेच उभी राहिली. ते तिचे अब्बू घरच्यांना सांगायला लागले, आता इरमची पाळी, काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी लढण्याची... जिहाद आणि त्यानंतर येणारं वीरमरण ही भाग्याची गोष्ट आहे... हे सगळं तो ऐकत होता. भाग्याची गोष्ट आहे म्हटल्यावर तो ओरडू लागला, काही भाग्य नाही. काही जन्नत मिळत नाही. हे खूळ डोक्यातून काढा, अनुभवावरून सांगतोय.... पण कोणीही काहीही ऐकत नाही.
 
तो परत हताश होत घरातून बाहेर येतो. जरा लांबवर चालत येत, आपल्याच घराला लांबून बघत निराश भावनेने तिथेच उभा राहतो. बराच वेळ लांबून त्याला एक जण बघत असतो. तो इरमला समजावतो, घरी पोटतिडकीनं बोलतो.. हे अगदी सगळं सगळं त्याने लांबून बघितलेलं असतं. थोड्यावेळाने तो त्याच्या जवळ येत त्याच्यासमोर येऊन उभा राहतो.
 
हा एकदम चमकतो आणि म्हणतो, असिफ.... अरे असा एकदम आलास पट्कन कळलंच नाही.
हो मी असिफ... मी तुला बराच वेळ बघत होतो. इरमला भेटलास, मग घरी गेलास... सगळं...
तो म्हणतो, बघ ना रे... कोणी काही ऐकतच नाहीये. जिहाद एक थोतांड आहे हे सांगतोय पण कोणी लक्षच देत नाहीये माझ्या बोलण्याकडे...
 
असिफ म्हणतो, कसे लक्ष देतील बुरहान... तू जेव्हा जिहादसाठी लढण्याचं ठरवलंस तेव्हा मी ही तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता पण.... आता काही उपयोग नाही. आपलं कोणी काही ऐकणार नाही. एक दिवस तुझी बहीण अशीच कधीतरी तुला भेटेल, जसा आत्ता मी भेटलोय...

बुरहान एकदम चमकतो आणि त्याच्याकडे बघत बसतो.. मग आपल्या घराजवळ जातो. बहीण इरम आत कोणाबरोबर तरी हसत खिदळत असते. तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे तो काही क्षण बघतो, निराशेने मान हलवत तिकडून निघून जातो...

No comments:

Post a Comment