Thursday, 11 August 2016

शंकर - शंकर जयकिशन



...त्या दोघांनी एकमेकांना शब्द दिला होता की कुठलं गाणं कोणी बनवलंय हे कधीही कोणालाही सांगणार नाही. पण एकदा दोघातल्या एकाकडून चूक झाली आणि तो हा दिलेला शब्द विसरला...

भारतीय चित्रपट संगीतातली सर्वात लोकप्रिय संगीत दिग्दर्शकांची जोडी, ज्यांनी या संगीतसृष्टीवर काही दशकं अधिराज्य गाजवलं आणि आजही त्यांच्या संगीताची जादू कायम आहे. भारतीयांची संगीत आवड त्यांना बरोबर माहीत होती, ती आवड जाणत लोकांना त्यांच्या आवडीचं संगीत देण्यात आणि काळाबरोबर बदलणाऱ्या आवडीला आपल्या संगीतात उतरवत ही संगीतकार जोडी भयंकर यशस्वी ठरली. या जोडीची गाणी बहुतेक करून यशस्वी व्हायचीच आणि ते चित्रपटही धो धो चालायचे...

... ही जोडी होती अर्थातच शंकर-जयकिशन यांची

पण या जोडीचं एक ठरलं होतं की कोणी कुठलं गाणं बनवलंय ये कधीही कोणालाही सांगायचं नाही, पण एकदा जयकिशन हे विसरले आणि त्यांनी एका कार्यक्रमात सांगून टाकलं की संगम चित्रपटातलं, 'ये मेरा प्रेम पत्र पढ़कर' या गाण्याची धुन मी बनवली आहे, हे कळल्यावर शंकर खूप नाराज झाले. त्यांची नाराजगी पूर्णपणे काही गेली नाही पण थोडी कमी मात्र झाली, जेव्हा मूलतः मृदू स्वभावाच्या आणि या जोडीच्या आवडत्या गायकाने मोहम्मद रफी यांनी त्यांच्यात मध्यस्ती केली तेव्हा... दोघांमधले मतभेद तेव्हा रफींनी बऱ्यापैकी कमी केले.
 
शंकर सिंग रघुवंशी म्हणजेच संगीतकार शंकर यांनी लहानपणापासूनच संगीताचे शास्त्रोक्त धडे गिरवले होते. तबला हे वाद्य त्यांच्या विशेष आवडीचं, अगदी लहान असल्यापासून याच वाद्याच्या आवाजाकडे ते आकर्षित व्हायचे आणि हेच वाद्य त्यांना हैद्राबादहून मुंबईच्या पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरपर्यंत घेऊन आलं. मुंबईतच तबला वाजवणाऱ्या शंकर यांची ओळख हार्मोनियम वाजवणाऱ्या जयकिशन दयाभाई पांचाळ यांच्याशी झाली आणि पृथ्वी थिएटरमध्ये रिकामी असणारी हार्मोनियम वादकाची जागा शंकर यांच्यामुळे जयकिशन यांना मिळाली. शंकर यांनी बनवलेली एक धुन एकदा राज कपूर यांनी ऐकली आणि आपल्या 'बरसात'साठी शंकरला विचारलं. त्यावेळी शंकरने आपला साथीदार जयकिशनची ओळख राज कपूरला करून दिली, आणि हिंदी चित्रपटांना नवीन संगीतकार जोडी मिळाली. त्या दोघांची जरी जोडी असली तरी ते वेगवेगळं काम करत आणि दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करत नसत..
 
बरसातपासून सुरु झालेली यांची ही घोडदौड १९७१ साली जेव्हा लहान वयात जयकिशनचा मृत्यू झाला त्यानंतरही चालू होती. शंकर जयकिशन या नावाने शंकर संगीत देण्याचं काम करायचे.
 
या जोडीने हिंदी चित्रपट संगीताची दिशा बदलवली आणि आपलं एक नवीन युग सुरु केलं. शंकर पियानो वाजवण्यातही तरबेज होते. चित्रपटाचं पार्श्वसंगीत जयकिशन आणि गाण्यांचं संगीत शंकर ही अशी वाटणी या दोघांनी केली होती कारण त्या त्या क्षेत्रांत या दोघांचं विशेष कौशल्य होतं. गाण्यातल्या भावना अचूकपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑर्केस्ट्राचा प्रथम उपयोग करणारे हेच दोघे संगीतकार आणि यातही हे काम शंकर यांचंच. जयकिशनच्या गाण्यांसाठीही शंकरच ऑर्केस्ट्राची रचना करत.
 
शंकर जयकिशन यांची उदहरणासाठी म्हणून गाजलेली गाणी लिहिणंही शक्य नाही कारण कुठली गाणी निवडणार हाच मोठा प्रश्न, एवढं विशाल यश आहे यांच्या खात्यात...! यांनी कित्येक कलाकारांच्या कारकिर्दीला यशस्वी वळण दिलं. राज आणि शम्मी यांची गाणी म्हणजे हीच जोडी. तसेच यशस्वी गायक गायिकांनी जी यशाची फळं चाखली, त्यात मोठा हातभार या संगीतकार जोडीचा आहे.
 
१९८७ साली आजच्याच दिवशी शंकर यांच्या जाण्याने यशाचं अत्युच्च शिखर गाठलेल्या या संगीतकार जोडीचं युग संपलं. भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात या जोडीचं युग सर्वात यशस्वी मानलं जातं.
 
ज्या जोडीने आपणा हिंदी चित्रपट संगीतप्रेमींचा आयुष्याचा प्रवास त्यांच्या गाण्यांनी सुवासिक बनवला त्यातल्या शंकर यांची आज पुण्यतिथी... ही त्यांची एक छोटीशी आठवण......!!!!!

 

No comments:

Post a Comment