Thursday, 11 August 2016

सुरैया



गेल्या जमान्यातली गोड आणि सुरील्या गळ्याची प्रथितयश गायिका आणि त्याच वेळी एक गुणवान अभिनेत्री, सूर आणि सौंदर्याचा अनोखा संगम, सुरैया. आपल्या सुरांनी आणि सौंदर्याने अक्षरशः लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ‘सुरैया जमाल शेख’चा जन्म गुजरावाला लाहौर, पंजाब मधला. सुरैया अवघी एक वर्षाची असताना तिची आई तिला घेऊन मुंबईला आली आणि सुरैयाचं शिक्षण, पालन पोषण पुढे मुंबईतच झालं. 

गाण्याचं कुठलंही शास्त्रोक्त शिक्षण सुरैयाने घेतलेलं नव्हतं. तिच्या आईला भारतीय संगीताची फार आवड होती. त्या काळातल्या सगळ्या गायकांच्या ग्रामोफोन रेकॉर्ड्स आईने आवडीने जमा केल्या होत्या. आई आपली संगीत ऐकण्याची आवड जोपासत असतानाच दुसरीकडे छोटी सुरैया संगीतात तयार होत होती. नुसत्या रेकॉर्ड्स ऐकण्याचा त्या छोट्या मुलीवर एवढा प्रभाव पडला की अवघी ५ वर्षांची सुरैया सहगल, खुर्शीद बानो, कानन बाला अशा मोठ्या गायकांची गाणी अतिशय सुरात आणि गोड गळ्यात गाऊ लागली.

असं म्हटलं जातं की सुरैया जेव्हा आपल्या घरी गाण्याचा रियाझ करत असे तेव्हा तिच्या घरावरून येणारी जाणारी लोकंही तिचा गोड आवाज ऐकत तिच्या घराबाहेर तासन् तास उभी असायची. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची जादू तिच्या आवाजात जन्मतःच होती.

सुरैयाचे मामा सिनेमात खलनायकाची भूमिका करायचे. शाळेच्या सुट्टीत छोटी सुरैया आपल्या मामांबरोबर शूटिंग बघायला सेटवर जात असे. एकदा नानूनभाई वकील या निर्मात्याने सुरैयाला सेट वर पाहिलं. ते त्यावेळी ‘ताजमहल’ नावाचा सिनेमा बनवत होते. ते बाल ‘मुमताज़ महल’च्या भूमिकेसाठी एका योग्य बालिकेच्या शोधात होते. त्यावेळी बेबी सुरैयामध्ये त्यांना त्यांची बाल कलाकार दिसली आणि अशा रीतीने सुरैयाने अवघ्या १२ व्या वर्षी बाल कलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर काही बाल भूमिका केल्यानंतर लगेचच सुरैयाला पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर नायिकेची भूमिका मिळाली. नायिकेची भूमिका करत असतानाच सुरैया आपली गाणी स्वतःच गाऊ लागली.

राज कपूर सुरैयाचे बाल मित्र होते आणि मदन मोहन शेजारी. या दोघांच्या आग्रहाखातर सुरैया ‘ऑल इंडिया रेडियो’वर लहान मुलांच्या कार्यक्रमात गाऊ लागली. त्याच वेळी एकदा संगीतकार नौशाद यांनी तिचा आवाज रेडियोवर ऐकला आणि त्यांनी सुरैयाला आपल्या सिनेमात पार्श्वगायन करण्याची संधी दिली.

अशा रीतीने सुरैयाची अभिनेत्री आणि पार्श्वगायिका अशी कारकीर्द सुरू झाली. ४० आणि ५० चं दशक हे सुरैयाचं दशक म्हणून ओळखलं जातं. त्या दोन दशकात तिच्या समकालीन अभिनेत्रींपेक्षा सुरैया जास्त लोकप्रिय होती. लता मंगेशकर नावाचं एक वादळ हिंदी चित्रपटसृष्टीत आलं आणि त्याकाळच्या सगळ्या गायिकांना धुवून गेलं, असं म्हटलं जातं. पण सुरैया त्याला अपवाद ठरली. लता मंगेशकरच्या पदार्पणानंतरही सुरैयाने चित्रपटसृष्टीतलं आपलं स्थान कायम ठेवलं. १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली, फाळणीनंतर नूरजहॉं आणि खुर्शीद बानो पाकिस्तानात गेल्या, पण सुरैयाने भारतातच राहणं पसंत केलं. या दोन गायिकांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण झालेली पोकळी सुरैयाने भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्याकाळच्या सगळ्या मोठ्या गायकांबरोबर सुरैयाने गाणी म्हटली तसेच त्या काळच्या मोठ्या अभिनेत्यांबरोबर सुरैयाने चित्रपटांत अभिनय केला. तिच्या चित्रपटांना एवढं व्यावसायिक यश मिळायचं की नंतर नंतर निर्माते-दिग्दर्शक दुसऱ्या श्रेणीतल्या अभिनेत्यांना घेऊन केवळ सुरैया या नावावर चित्रपट बनवू लागले आणि ते चित्रपट यशस्वीही ठरायचे. एक काळ असा होता की बॉलीवूडमध्ये सुरैया सर्वात जास्त मानधन घेत असे.

स्टारडम काय असतं हे सुरैयाने खूप चांगलं अनुभवलं. चाहते अक्षरशः वेड लागल्यासारखे तिच्या मागे असायचे पण खऱ्या आयुष्यात तिला प्रेम मिळू शकलं नाही किंवा तिचं प्रेम यशस्वी होऊ शकलं नाही. जेव्हा सुरैया हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्धीच्या शिखरावर होती तेव्हाच ‘देव आनंद’ने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. जिथे ही एक यशस्वी तारका होती तिथे हा बॉलीवूडमध्ये चाचपडणारा कलाकार होता. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत असतानाच देव आनंदचा सुरैयाच्या आयुष्यातही प्रवेश झाला. ‘जीत’ सिनेमाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान सुरैयाची नाव नदीत बुडाली, त्यावेळी देव आनंदने सुरैयाला बुडण्यापासून वाचवले. याच सिनेमाच्या वेळी देवने आपल्या प्रेमाची कबुली सुरैयाकडे दिली आणि या नवीन नात्याला सुरुवात झाली. पण या नात्याचा शेवट गोड होऊ शकला नाही. दोघांनाही लग्न करायचं होतं, पण दोघांचे धर्म त्यांच्या लग्नाच्या आड आले. केवळ देव आनंद हिंदू आहे म्हणून सुरैयाची आजीने या लग्नाला विरोध केला. सुरैयानेही आजीच्या विरोधात जाऊन देवशी लग्न केलं नाही आणि सुरैया-देव यांचं नातं या वळणावर संपुष्टात आलं. पण हे नातं तुटण्याचा परिणाम सुरैयाच्या मनावर झाला आणि तिची तब्येत ढासळली. नागीन, देवदास, बैजू बावरा सारखे सिनेमे हातात असताना तिला या चित्रपटांबरोबरच चित्रपटसृष्टीपासून दूर जावं लागलं. सुरैया शेवटपर्यंत अविवाहीतच राहिली.

त्या काळच्या कलाकारांमधील अभिनय आणि पार्श्वगायन दोन्ही ताकदीने पेलणारी ‘सुरैया’ ही शेवटची कलाकार. पंडीत नेहरूंनी सुरैयाबद्दल म्हटलं होतं, ‘मिर्ज़ा ग़ालिब’ यांच्या शायरीला आपला आवाज देऊन सुरैयाने त्यांच्या आत्म्याला अमर बनवलं.

हा या महान अदाकाराच्या आठवणींना दिलेला एक उजाळा. 


No comments:

Post a Comment