खूप मोठा काळ लोटला होता, हवाबदलासाठी मुंबईपासून कुठे लांब गेलो नव्हतो. घड्याळावर
पळणाऱ्या या मुंबईच्या गर्दीतून विसावा घ्यावा अशी जोरदार इच्छा होती आणि हा बदल मुंबईच्या
परस्परविरोधीच असावा हे ही नक्की केलं होतं. परस्परविरोधाची अट असेल तर समुद्र किनारी
असणारी राज्यं रद्द होतात आणि खूप थोडा भारत शिल्लक राहतो. एकंदर सगळा विचार करून एका
राज्याचं नाव डोक्यात आलं आणि ते म्हणजे हिमाचल प्रदेश, मुंबईच्या अगदी विरुद्ध हवामान
असलेला प्रदेश... नावाप्रमाणेच हिमाची दुलई पांघरून निपचित पडणारा हा प्रदेश, त्यामुळे
हा प्रदेश निपचित पडलाय म्हणून आपणही हॉटेलच्या खोलीत शांत बसुया हे ही आम्हाला नको
होतं त्यामुळे हिमवर्षावाचा संभाव्य काळ सरला की तिकडे जाण्याची योजना बनवावी असं ठरलं
पण तिकडे पर्यटकांची गर्दी सुरु होण्यापूर्वी आपण परतावं हे ही नक्की केलं. त्यामुळे
फेब्रुवारी हा महिना बरा आहे तेव्हाच जाऊ असा विचार केला पण हिम वर्षावाची शक्यता कमी
असली तरी थंडी मात्र भयंकर असणार होती हे ही नक्की होतं. आम्हाला आरामाची सहल करायची
होती, चला आज इथे तर उद्या तिथे, परवा अजून कुठे आणि मग परत ही असली धावाधाव करण्याची
अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे फेब्रुवारीत त्यातल्या त्यात सुसह्य असेल अशा मनाली,
सिमला आणि त्यांच्या आजूबाजूचा भाग पाहून परत येऊ असं ठरवलं. बाकीचं अतिशय थंडी असणारं
हिमाचल परत कधीतरी... खरं तर हे बाकीचं हे नुसतं म्हणायला नाहीतर या “बाकीचं”मध्ये
बराच सुंदर हिमाचल दडलाय. तर आता हे नक्की झालं की कुठे कुठे जायचं ते, त्याप्रमाणे
तिथल्या हॉटेलांचं बुकिंग वगैरे केलं.
हिमाचल प्रदेश, खरं तर पंजाबचा एक भाग. फाळणीच्या वेळी ३/४ पंजाब पाकिस्तानमध्ये
गेलं आणि पंजाबची खरी संस्कृती, खरा मुळचा पंजाब भारताच्या हातातून गेला. पश्चिम पंजाब
जे आज आपल्याकडे नाही, तो हिंदू संस्कृतीचा एक महत्त्वाचा असा भाग तिकडे गेला आणि आपल्या
हातात राहिला पालापाचोळा. भारताच्या पंजाबला पालापाचोळा मी नाही तर फाळणीत पंजाबचे
तुकडे झाले आणि आपल्या प्रांताचा महत्त्वाचा भाग आपल्याकडून निसटला म्हणून हळहळणारे
पंजाबीच म्हणतात. पुढे कालांतराने भारताच्या पंजाबचेही तुकडे करण्यात आले, त्यातला
एक तुकडा झाला हरयाणा, दुसरा हिमाचल प्रदेश आणि तिसरा पंजाब. म्हणजे कधी काळी ग्रेटर
पंजाब असणारा हा प्रांत आज खूपच छोटासा झालाय. हे तीन भाग झाले आणि नंतर पंजाबमधलाच
डोंगराळ भाग हिमाचलमध्ये समाविष्ट करण्यात आला. हे असे बरेच बदल या प्रांतात करण्यात
आले. या लोकांची ओळख ही अशी बदलत राहिली किंवा म्हणा यांच्या ओळखीबरोबर हे असं खेळण्यात
आलं. पंजाब हे नावही खरं तर यांचं मूळ नाव नाही. या प्रदेशाचं पुरातन नाव सप्तसिंधू
आणि नंतर झालं पंचनद प्रदेश, पाच नद्यांचा प्रदेश आणि ज्याचंच पुढे नाव पंजाब झालं.
जसं प्रदेशाचं नाव पंजाब झालं तसंच या पाच नद्यांचं नावही बदललं. वितस्ता झाली झेलम,
असिक्नी किंवा चंद्रभागा झाली चिनाब, पृस्नी/इरावती झाली रावी, विपाशा/विशाखा
झाली व्यास/बियास आणि सतुद्री झाली सतलज.
आमचं हॉटेल बुकिंग झालं आणि आता जाण्यायेण्याचं काय ? रेल्वे म्हणजे ३-४ महिने
आधी आरक्षण आणि पोहोचायला बराच वेळ लागणार त्यामुळे हा पर्याय आमच्यासाठी नाहीच. उरला
फक्त विमानाचा पर्याय आणि इथे आमचा चित्पावनी स्वभाव उफाळून बाहेर आला. कुठून कसं गेलं
म्हणजे स्वस्तात आणि सोयीचं होईल हा विचार सुरु झाला. चंदीगडला जावं की हिमाचलच्या
कुठल्या विमानतळावर ? या विमान कंपनीबरोबर जावं की त्या ? या वेळी की त्यावेळी ? असा
बराच काथ्याकुट झाल्यानंतर आम्ही आमची मुंबई-चंदीगड, चंदीगड-मुंबई अशी विमान तिकिटे
आरक्षित केली.
आणि इथपासून सुरु झाला आमचा एक नवा खेळ. आज मनालीत किती तापमान आहे, सिमल्यात किती
आहे. आज -४ आहे, बापरे ! आता २ डिग्रीपर्यंत वाढलंय, हेच. माझ्या मनात यायचं की अरे
वाह बर्फवृष्टी बघायला मिळाली तर छान आहे. पण बर्फवृष्टी म्हणजे तुमची पर्यटनाची स्थळं
कमी... आपल्याकडे कसं अती पाऊस झाला की वीज पुरवठा खंडित करतात तसंच तिकडे बर्फवृष्टीचं
आहे आणि वीज नाही मग हीटरही नाही आणि मग हाल.... हॉटेलवाले गरम पाण्याच्या पिशव्या
गादीवर ठेवायला देतात आणि हाडं गोठवणाऱ्या थंडीत त्या पिशव्याच काय तो आपला आधार, हे
असं बरंच काही लोकांकडून कळायला लागलं. आमच्या आधी एक दोन आठवडे तिकडे जाऊन आलेले हे
असं सगळं सांगायला लागले... शेवटी ठरवलं, ऑफ सीझनला जायचं ठरवलंय ना... आता फार विचार
करायचा नाही, बिनधास्त जायचं... जे होईल ते होईल... पण गरम कपडे मात्र भरपूर घेऊन जायचे.
हा हा म्हणता जाण्याचा दिवस आला. विमान सकाळचंच होतं आणि आम्ही विमानाच्या वेळेच्या
दोन तास आधी तिथे पोहोचण्याचा हिशोबाने खूपच लवकर निघालो. सुट्टीचा दिवस नव्हता त्यामुळे
रस्त्यावर रहदारी मिळणार या विचाराने आम्ही अंमळ लवकरच निघालो. गाडी कुठेही रहदारीत
किंवा सिग्नलला थांबली की आमचा जीव वर खाली, मग तो गाडी चालक म्हणायचा अहो अजून भरपूर
अवकाश आहे आपण आरामात पोहोचू. कुठल्याही ठिकाणी वेळेच्या आधी हजर राहणे हा स्वभाव,
प्रवास करायचा असेल तर गाडीच्या वेळेच्या बरंच आधी जाऊन तिथे थांबायचं ही सवय आणि या
सवयीचे आम्ही गुलाम...
मुंबई विमानतळावर आम्ही खूपच लवकर पोहोचलो, विमानतळ झाडायलाच पोहोचलो असं म्हटलं
असतं खरं तर, पण मुंबई विमानतळावर विमानांची अव्याहतपणे ये-जा चालू असते त्यामुळे रिकामं
विमानतळ कधी दिसतच नाही. सगळे सोपस्कार पूर्ण केले आणि आमची विमानात चढण्याची वेळ कधी
येत आहे याची वाट बघत बसलो. मोबईलमध्ये कॅमेरा आला आणि कधीही कुठेही फोटो काढणं सोपं
झालं आणि विमानतळापासूनच माझीही फोटोग्राफी सुरु झाली.
आमच्यासारखे बरेच प्रवासी तिथे
बसलेले होते. काहींच्याकडे बघून कळत होतं की हे बहुदा पहिलाच विमान प्रवास करत असावेत.
तिथे असलेल्या प्रत्येक गोष्टींकडे ते डोळे फाडून ऑ... वासून बघत होते. त्या भागात
लावलेले भले मोठे जाहिरातींचे चकचकीत फलक, त्यापेक्षाही चकचकीत तिथली दुकानं, एकेका
डिपार्चर गेटच्या बाहेर फ्लॅश होणारी शहरांची नावं आणि यात कुठे आपल्याला जिथे जायचंय
त्या शहराचं नाव तर नाही ना... असा विचार करत वारंवार अस्वस्थ होणारे या प्रवाशांचे
हे चेहरे. हे असे बुजरे चेहरे दिसायचेच, प्रत्येक जणच कधी ना कधीतरी या अवस्थेतून गेलेला
असतोच. काही जणं हे चेहऱ्यावर दाखवतात तर काही नाही दाखवत. या नव्या लोकांच्याच जवळपास
वैतागलेले, कंटाळलेले चेहरेही होते. यांच्यासाठी हे इथलं वातावरण अजिबातच नवीन नाही
आणि कोणीतरी इथे त्यांना डांबून ठेवलंय आणि आपल्या सुटकेची वाट बघत बघत ही लोकं कंटाळलेली
आहेत असे चेहरेही तिथे होते. कुठेतरी मध्येच हळूच गालात हसत आणि गुलूगुलू काहीतरी पुटपुटत
आपल्या जोडीदाराबरोबर गप्पा मारण्यात तल्लीन अशा ललनाही तिथे दिसत होत्या. नवीन लग्न
झाल्याची खूण लग्नाची मेंदी त्यांच्या हातावर दिसत होती, एवढा मोठा भरलेला लग्नाचा
चुडा, छान मेकअप करून आपल्या जोडीदाराला खेटून बसलेल्या मुली आणि मी ही वरुण धवनपेक्षा
कमी नाही अशा थाटात आलेले त्यांचे नवरोबा असे अधूनमधून दिसत होते. पोह्यावर खोबरं कोथिंबीर
पेरावी तसे परदेशी पर्यटक या आपल्या भारतीय पर्यटकांमध्ये बसलेले दिसत होते, काही कुटुंब
कबिल्यासह आलेले तर काही एकटे दुकटे. कुठे चिमुरड्यांची इकडे तिकडे धावाधाव तर कुठे
काठीच्या आधाराने हळूहळू चालताना दिसणारे वयस्क. अगदी कुठल्याही एसटी स्थानकावर सहज
बघायला मिळेल असं दृश्य तिथे दिसत होतं... तेवढ्यात माझं लक्ष एका भगवी वस्त्रं धारण
केलेल्या जटाधारी साधूकडे गेलं.
त्याला हे इथे या लोकांमध्ये बसण्यात फारसा रस नसावा
कारण तो त्या डिपार्चर दरवाजांपाशीच येरझारा घालत होता. वाटलं, गंगेच्या काठी दिसणारे
साधू संन्यासी हे मुंबई विमानतळावर कुठे आले ! पण साधू संन्याशांनी विमानाने प्रवास
करूच नये असं कुठे लिहिलंय ! मग आम्हीही तिथल्या एका चकाचक दुकानातली कॉफी घेतली आणि तेवढ्यात दिसलं की हे पोह्यावर
छान पेरलेलं खोबरं कोथिंबीर गायब ! बघितलं तर गोव्याचं विमान निघण्यासाठी तयार होतं आणि हे खोबरं
कोथिंबीर अपेक्षितपणे त्या विमानात चढण्यासाठी रांगेत उभे होते. विमानतळावरच्या दुकानांवर
एक नजर टाकावी म्हणून एक फेरफटका मारायला निघालो. ही चकचकीत दुकानं फक्त बाहेरून कशाला
बघा म्हणून मी आणि नवऱ्याने तिथे छोटीशी खरेदीही केली. किंमत बाहेरच्यापेक्षा जास्त
होती किंवा काय माहीत नाही पण हे आपण चंदीगडला जाताना मुंबई विमानतळावर घेतलं होतं
ही एक आठवण म्हणून खरेदी केली.
गेला.... तिथल्या गोष्टींचं अवलोकन, खरेदी, कॉफी या गोष्टींमध्ये आता बराच वेळ
गेला. आता तिथे बसणाऱ्या लोकांमध्ये पंजाबींची संख्या नजरेत भरण्याइतकी दिसायला लागली.
आम्ही त्यांच्याच राज्यात चाललो होतो आणि ते सगळे आमचे सहप्रवासीच होते आणि एकदाचं
चंदीगड हे नाव तिथल्या एका डिपार्चर दरवाजावर झळकलं आणि आम्ही त्या तमाम पंजाबी लोकांच्या
साथीने विमानात जाण्यासाठी रांगेत उभे राहिलो. विमानतळाच्या बसने जात विमानात आमच्या
जागी जाऊन बसलो. विमान अपवाद वगळता सरदार, सरदारनी आणि एकंदर पंजाबी लोकांनी भरून गेलं.
त्यांचं ते पंजाबी लहेजातलं बोलणं कानी पडायला लागलं आणि या प्रवासाबरोबरच आमचा पंजाबी
संस्कृतीबरोबरचा प्रवास सुरु झाला...
विमानाने हवेत भरारी घेतली, आमच्या मुंबईला कुठल्या कुठे खाली ठेवत आकाशात अगदी
उंचावरून ते उडू लागलं आणि आम्हाला भेटले या प्रवासातले नवीन सोबती. हे सोबती अगदी
गंमतशीर होते. निळ्याशार आकाशात कापूस पिंजून हवेत सोडावा आणि त्या कापसाने वेगवेगळे
आकार घ्यावेत असे हे ढग होते आमचे प्रवासातले सोबती. एक ढग अनेक ढग. या ढगांमध्येही
कमालीची विविधता होती.
काही एकेकटे समूहापासून दूर तर काही फक्त समूहातच दिसणारे, काही
मात्र कुटुंब वत्सल, कुठे गटागटात बागडणारे तर कुठे रांगेत उभे राहून मस्ती करणारे.
या ढगांचं विश्वच और... या विश्वात मानवासारख्या आपमतलबी प्राण्याला जागाच नाही. इथे
सगळाच मुक्त, मोकळा, हवाहवासा, स्वच्छ कारभार अगदी स्वर्गात असेल तसाच... या अशा स्वर्गीय
दृश्यांमधून आम्ही जात होतो आणि मला अचानक वाटायला लागलं की हे ढगही आमच्या विमानाकडे
कुतूहलाने बघत आहेत.. अरेच्चा या आमच्या राज्यात हे असं अधूनमधून काय दिसत असतं ! एवढा
आवाज करत ही विचित्र आकाराची वस्तू जाते तरी कुठे आणि का ! या वस्तूला छोटे छोटे चौकोन
दिसत आहेत, काय आहेत बरं ते ! आणि या चौकोनातून काय बरं दिसतंय ! अरेच्चा ही एवढी लोकं
! ही एवढी मंडळी कोण बुवा ! आणि ही या यंत्राबरोबर का आणि कुठे बुवा जात आहेत ! असा
विचार करत हे सगळे ढग अतिशय निष्पाप अशा नवलाईने आमच्याकडेच बघत आहेत असा मला भास व्हायला
लागला. विमान दिसलं म्हणून काही लाजाळू अशा आमच्या या सोबतींनी बागडायचं थांबवलं असेल
आणि विमान पुढे निघून गेल्यावर हुश्श... गेलं बुवा एकदाचं म्हणत परत बागडायला सुरुवात
केली असेल... आमच्या एकांतात व्यत्यय आणणारं हे काय अधूनमधून इथे दिसत असतं म्हणत काही
ढग वैतागतही असतील...
![]() |
| विमानातून दिसणारं चंदीगड |
या नयनरम्य, जणू स्वर्गातूनच एक पक्षी बनत उडत प्रवास करावा असा हा प्रवास या ढगांच्या
साथीने खूप सुरेख पार पडला आणि या पिंजलेल्या कापसांच्या सानिंध्यात दोन तासांपेक्षाही
जास्तीचा प्रवास कधी घडून गेला हे आम्हाला कळलंही नाही. आता हळूहळू शेतं आणि इमारती
दिसायला लागल्या. मोहरीच्या त्या सोनेरी रंगांचं सौंदर्य विमानातूनही अलौकिक दिसत होतं.
इमारती मात्र एकदम शिस्तीच्या. एक साथ नमस्ते म्हणताच एकाच जागी ताठ उभ्या राहिलेल्या.
ना थोड्या डावीकडे सरकणार आणि ना उजवीकडे, अशा शिस्तीने उभ्या असलेल्या इमारती आम्हाला
विमानातून दिसायला लागल्या. बरोबरच चंदीगड आहेच प्लॅन्ड सिटी... सगळं कसं एकदम शिस्तीत,
जागा मिळेल तिथे इमारती, झोपड्या बांध...अंहं... असं अजिबात नाही. मनाली आणि सिमल्याबरोबरच
चंदीगडची या आधीही वारी झाल्याने हे शहर अगदीच अनोळखी नव्हतं...
हवाईसुंदरीने चंदीगडला उतरण्यापूर्वी सांगितलं की हे सैन्यबळाचं विमानतळ असल्याने
इथे फोटो घ्यायला एकदम मनाई आहे. मग काय इतका वेळ व्हिडीओ आणि फोटो घेणारा माझा मोबईल
कॅमेरा मी बंद केला. विमानातून बाहेर आलो आणि पहिल्यांदा दर्शन घडलं ते पंजाबीच्या
गुरमुखी लिपीचं, कुठलाही फलक असुदेत आधी पंजाबी भाषा आणि मग इंग्रजी, हिंदी... हे पाहिलं
आणि वाटलं, मुंबई विमानतळावर कुठेच मराठी नाही ! सुखावह वातानुकुलीत यंत्रणेत मुंबई
विमानतळाने आम्हाला निरोप दिला होता पण चंदीगडने स्वागत मात्र तसं उष्म्यातच केलं.
विमानतळावर इतर कर्मचारी विशेष दिसलेच नाहीत, पण आपले सैनिक मात्र अगदी सहज दृष्टीस
पडत होते. विमानतळ छोटं असल्याने बस वगैरे काही नाही चालतच आम्ही विमानतळाच्या इमारतीत
शिरलो आणि दर्शन घडलं श्रीकृष्णाकडून अर्जुन भगवद्गीता ऐकत असल्याचा प्रसंग कातरलेल्या
मोठ्या धातूच्या खूप जाडसर पत्र्यावर कोरलेल्या चित्राचं. बघून मस्त वाटलं, माझं हिंदू
मन अगदी सुखावलं आणि एका सेक्युलर देशात खलिस्तानींच्या सावटाखाली हे असं इथे कसं याचं
थोडं आश्चर्यही वाटलं.
विमानतळाच्या बाहेर आलो तर तिथे धिप्पाड हट्टे कट्टे लोक त्यांच्या प्रवाशांची
वाट बघत होते. अगदी ताठ उभे राहून आपल्या करड्या नजरेने ते येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला
न्याहाळत होते, सरळ साधा दृष्टीक्षेप, नाहीच.. आम्ही त्यांच्याकडे फारसं लक्ष न देता
बाहेर आलो आणि आमच्या ड्रायव्हरला फोन केला. चंदीगड विमानतळावरून आम्हाला घेऊन परतीच्या
प्रवासासाठी परत चंदीगड विमानतळावर आणून सोडण्यापर्यंत तो ड्रायव्हर आणि त्याची PB
01 वाली गाडी आमच्याबरोबरच असणार होते. त्याने तिथे बाहेरच असणाऱ्या तिरंग्याच्या खाली
यायला सांगितलं. तिथे गेलो तर केवढा तो प्रचंड मोठा आपल्या देशाचा झेंडा उंच आकाशात
अगदी डौलाने फडकत होता. त्याच्या खाली उभं राहिल्यावर मान उंच करून त्या आपल्या फडकत्या
झेंड्याकडे पाहताना अगदी ऊर भरून आल्यासारखं झालं. पंजाब आणि हरयाणा या दोन राज्यांच्या
राजधानीच्या आणि सैन्याच्या असलेल्या विमानतळाच्या बाहेरचा हा अजस्र असा मोठा फडकता
राष्ट्र ध्वज आणि त्याखाली आम्ही उभे, काहीतरी भन्नाटच वाटत होतं.
तिथल्याच पार्किंगच्या भागात आम्हाला आमचा तो ड्रायव्हर भेटला. हा ही टिपिकल पंजाबीच
पण त्या मगाचच्या लोकांसारखा ताठरता त्याच्याकडे नव्हता. आम्ही विमानतळावरून आमच्या
अगोदरच आरक्षित केलेल्या हॉटेलकडे निघालो. गाडी विमानतळातून बाहेर पडली आणि बघतो तर
काय ! हे विमानतळ अस्सल सोन्याच्या खाणीत बांधलेलं दिसलं. आजूबाजूला जिकडे बघू तिकडे
सोन्यासारखे सरसोंचे मस्त फुललेले बगीचे, आणि या सोन्यास चकाकी देण्यास उत्सुक असलेले
सूर्यदेव. आम्ही तिकडे पोहोचलो तेव्हा लख्ख ऊन पडलं होतं आणि त्या लखलखत्या उन्हात
ही मोहरीची शेतं अगदी मोहक दिसत होती. विमानतळ परिसर जाऊद्यात ही मोहरी अगदी रस्त्याच्या
कडेला जिथे तिथे अगदी सहजत्या दिसायला लागली. इथले रस्ते, विशाल, स्वच्छ आणि शिस्तीत
बांधलेले आणि त्यावर कमालीच्या शिस्तीत धावणारी वाहनं. खरं तर धावणारी कसली डुलत डुलत
पुढे सरकणारी वाहनं. रस्त्यावर फारशी वर्दळच नाही आणि जी होती ती अगदी सुस्त. आम्ही
याबद्दल विचारलंही तर तो म्हणतो, विमानतळ आता शहराबाहेर हलवला आहे म्हणून इकडे गर्दी
कमी. तर या सुस्त वर्दळीतून आम्ही हॉटेलवर पोहोचलो. चंदीगड कसं काय बघता येईल हे आम्ही
आधीच त्याला विचारून ठेवलं होतं पण शेवटी सगळं आमच्या इच्छेवर होतं. जरा हश्श हुश्श
केलं आणि संध्याकाळी वेळेवर बाहेर पडायचं असल्याने लगेचच जेवायला मागवलं. नेहमी आम्हा
दोघांत एक भाजी पुरते, त्यामुळे आम्ही त्याच हिशोबाने एका भाजीची ऑर्डर दिली. ऑर्डर
आली आणि बघतो तर काय मुंबईत नेहमी जेवढी भाजी असते त्याच्या जवळजवळ दीड पावणेदोन पट
भाजी जास्त आणि खास मसालेदार. मग माझ्या लक्षात आलं, पंजाबींचा आहार जास्त असतो आणि
जेवणही मसालेदार असतं. पुढे आता कसं काय घडणार याचा अंदाज चंदीगडला पोहोचल्या पोहोचल्या
एका तासातच आला. जेवण झाल्यावर ताटं घेऊन जायला आलेल्या माणसाला आम्ही याबद्दल विचारलं
तर तो आश्चर्याने आम्हालाच विचारतो, ही एवढी भाजी जास्त होती !
चंदीगडला बघायला फारसं काही नाही. ते एक अतिशय शिस्तीत बांधलेलं सुनियोजित शहर
आहे आणि हे नियोजनही तसं बघण्यासारखंच... सुप्रसिद्ध रॉक गार्डन आणि एक दोन ठिकाणं
यापेक्षा चंदीगड जास्त काही नाही. आमचं जेवण होऊन पुढे आराम करायला आमच्याकडे फारसा
वेळ नव्हता. प्रत्येक ठिकाण बंद होण्याच्या काही वेळा होत्या आणि त्या वेळेच्या आधी
तिथे पोहोचणं महत्त्वाचं होतं. गुगलमुळे हे एक फार बरं झालंय, तुम्हाला त्या त्या ठिकाणाची
पूर्ण माहिती मिळते आणि एवढंच नाही तर त्या त्या ठिकाणाबद्दलची लोकांची मतमतांतरंही
जाणून घेता येतात. मॅप्स हे ऍप अगदी आडनिड्या ठिकाणीही सहजपणे नेऊन सोडतं. हे जे काही
तंत्रज्ञान आपल्या हातात आलंय, त्याने अनोळखी ठिकाणी फिरणंही सोपं करून टाकलंय. कुठल्या
गाईडने आपल्याला काही दाखवलं नाही तर म्हणता येतं, काय रे हे नाही का रे दाखवणार !
या तंत्रज्ञानाने लोकांना परिपूर्ण केलेलं असल्याने पर्यटन हा व्यवसाय असणाऱ्या लोकांचीही
चांगली पंचाईतच झालीय. त्यांच्यापेक्षा जास्त माहिती त्या ठिकाणी पहिल्यांदाच येणाऱ्या
पर्यटकांनाही असू शकते.
साधारण संध्याकाळी ५.००-५.१५ च्या सुमारास आम्ही चंदीगड बघायला म्हणून बाहेर पडलो.
चंदीगड-मनाली हे अंतर खूप जास्त आणि कठीण असल्याने एक दिवस चंदीगडला राहणे ही आमची
फक्त एक सोय होती. पण संध्याकाळ हातात आहे तर चंदीगड बघावं आणि एकदा बघितलं असेल तर
पुसट झालेल्या आठवणी परत एकदा ताज्या कराव्यात म्हणून आम्ही निघालो. त्यानिमित्ताने
अजून एक शहर बघून होणार होतं. आता संपूर्ण सहलीत हा आमचा ड्रायव्हर आमच्या बरोबरच असणार
होता तेव्हा त्याचं आणि आमचं नातं थोडं सहज-सुलभ करणं गरजेचं होतं. तो भले गाडी चालवणारा
असुदेत, आम्ही सांगू त्याप्रमाणे आम्हाला फिरवणार असुदेत पण तो ही आमचा एक सहप्रवासी
आहे असं त्याला वाटणं गरजेचं होतं. आमच्यातली आणि त्याच्यातली दरी शक्य तेवढी कमी करणं
आवश्यक होतं, ते त्याच्यासाठी तर चांगलं होतंच पण आमच्यासाठी, आमच्या सहलीसाठीही महत्त्वाचं
होतं. हे एक सरळ साधं नातं त्या माणसाबरोबर निर्माण करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी
आमचाच पुढाकार अपेक्षित होता. हा पुढाकार अगदी नैसर्गिकपणे आमच्याकडून घेतला गेला,
चंदीगडपासूनच... आणि तो ही आमच्या नकळतच...






Manjusha, very nice style for travel blog! We just returned from a driving trip of Benelux countries. Offline Google maps navigation worked very well for us. To know a sight before you go there Google is fantastic. Agree with your approach of treating the driver as co-traveller.
ReplyDeleteतुमच्या अभिप्रायासाठी आभार 🙏
Deleteआणि हो google maps navigation चा आम्ही शक्य तिथे उपयोग करतोच करतो. हिमाचललाही केला. ड्रायव्हरच्या मुद्द्याबद्दल म्हणत असाल तर आपल्याकडे कितीही maps असले तरी काही स्थानिक गोष्टी सांगणं, दाखवणं हे तिथलीच लोकं करू शकतात. यामुळे आपल्याला तो भाग जास्त चांगल्या पद्धतीने कळू शकतो. स्थानिक माहितीही या लोकांकडेच असते. जी आपल्याला तो तो भाग जास्त चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत करते.
आणि शेवटी काय हो, तो एक ड्रायव्हरच होता पण १०-११ दिवस त्याला तू आमचा ड्रायव्हर म्हणत attitude दाखवण्यापेक्षा एक अंतर राखून थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा त्याच्याशी मारल्या तर फार कुठे बिघडणार आहे ?
ताई खुप छान लिहिले आहे ����
ReplyDeleteम्हणजे मी चंडीगड़ला आहे अस काहीसे जानवले..!!
पुढे लिहा अजुन..आता आमची सफ़र सुरु झाली ☺
धन्यवाद रोहित ��
Deleteमस्त
ReplyDeleteआभार
Deleteखुपच छान...
ReplyDeleteधन्यवाद
Delete