Tuesday 23 May 2017

हिमाचल गाथा - भाग १३



तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी काय बघावं हे नक्की नव्हतं. सिमला-कालका छोटी आगगाडी परत एकदा बघण्याची उत्सुकता होतीच आणि मुख्य म्हणजे सिमल्याचा माल रोडही राहिला होता. पण तो खोलीतून दिसणारा भलामोठा तिरंगा कुठला याची उत्सुकताही अजून तशीच होती. हॉटेलच्या स्वागत कक्षात याबद्दल विचारलं. ते म्हणाले की ते व्हाईसरॉय / राष्ट्रपती निवास आहे. बघून या. तिथेच सैन्याचं हेरीटेज वस्तुसंग्रहालयही आहे जवळच एनाडेल येथे ते ही बघा. आम्ही सिमला कालका टॉय ट्रेनने जाण्याचं रद्द केलं आणि निघालो व्हाईसरॉयच्या भवनाकडे. हे व्हाईसरिगल लॉज किंवा व्हाईसरॉय लॉज किंवा राष्ट्रपती निवास होतं सिमला शहरात आणि सिमल्यात रहदारीचे विचित्र नियम त्यामुळे आमचा ड्रायव्हर काळजीतच गाडी चालवायला लागला. मोबईल नकाशा बघत, वाहतूक पोलिसांना या रस्त्यावरून गाडी न्यायला परवानगी आहे ना हे विचारत विचारत आम्ही या इमारतीकडे चाललो. आमच्या खोलीतून जो तिरंगा दिसायचा तो याच इमारतीवरचा. या मार्गावरचे रस्ते भयंकर विचित्र. साध्या रहदारीचे रस्तेही भयानक उतार आणि चढ असलेले, आडमार्गाचे आणि अतिशय अरुंद. पण हे सगळे रस्ते पार करत आम्ही त्या राष्ट्रपती निवासाच्या ठिकाणी पोहोचलो. अतिशय शिस्तीचा असा तो भाग. तिथे एक कॅफे होता, हो कॅफे हेच नाव योग्य आहे कारण तो देशी नाही तर युरोपीय वाटावा असाच.
आम्ही हिमाचल प्रदेश या एका भारतीय राज्याच्या राजधानीत होतो पण त्या ठिकाणी भारतीय फारच कमी दिसत होते आणि आजूबाजूला होते सगळे परदेशी नागरीकच. ते ही बहुतांश ब्रिटीश. समोर ब्रिटिशांनी बांधलेली इमारत, ब्रिटीश राजवटीत असावा असा कॅफे, आजूबाजूला असलेले ब्रिटीश नागरीक, सिमल्याचा ढंगही तसा परदेशीच, तिथे जाणवणारी एक प्रकारची शिस्त त्यामुळे तिथे उभं राहिल्यावर असं वाटत होतं की आम्ही भारतात नाही तर ब्रिटनच्या कुठल्यातरी भागात उभे आहोत. आम्हीही त्या परदेशी बाजाच्या वातावरणाचा भाग बनत त्या परिसरात शिरलो. अधूनमधून भारतीयही दिसत होते. बहुतांश परदेशी कुठले कुठले गाईड घेऊन आले होते आणि त्या गाईडचं बोलणं ते अगदी तल्लीन होऊन ऐकत होते. समजून घेत होते. अडलं तर प्रश्न विचारत होते. यांना पुढे जाऊन या इमारतीवर कुठलीतरी परीक्षा द्यायची आहे असं वाटावं इतकं गंभीर वातावरण तिथे होतं. आम्हाला या इमारतीबद्दल काहीच माहीत नव्हतं. तो तिरंगा दिसला नसता तर कदाचित आम्ही इकडे आलोही नसतो त्यामुळे इथे नक्की करायचं काय हे ही आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही त्या राष्ट्रपती निवासाच्या दिशेने जाऊ लागलो आणि मध्येच तिथल्या रखवालदाराने आम्हाला थांबवलं. आम्हाला म्हणतो की इमारतीच्या आत जाऊन माहिती ऐकायची असेल तर प्रवेशाचं तिकीट घ्या. आवारात फिरण्यास कुठलंही शुल्क नाही. सगळीकडेच आम्ही पैसे भरून आत जात होतो. काढलं इथलंही तिकीट आणि त्याबरोबर आम्हाला एक वेळ मिळाली. त्याच वेळी आम्ही आत जायचं. आम्ही तिकीट काढलं पण आत काय ऐकायचंय बघायचंय हे आम्हाला अजूनही माहीत नव्हतं.

आमची वेळ यायला वेळ होता. तोपर्यंत आम्ही तिकडेच आवारात फिरायला लागलो. हे सिमल्याचं दुसऱ्या क्रमांकाचं उंच स्थान. पहिला जाखू पर्वत आणि दुसरं हे ठिकाण त्यामुळे इथून दरीत वसलेलं सिमला खूप सुंदर दिसतं. ब्रिटिशांनी बांधलेल्या इमारती मुंबईकरांसाठी कुठल्या नवीन ! त्यामुळे सुरुवातीला वाटलं, या इमारतीत काय एवढं विशेष ! यापेक्षाही भव्य इमारती मुंबईत आहेत. पण नीट पाहिल्यावर या इमारतीत असलेलं वेगळेपण लक्षात यायला लागलं. राखाडी आणि फिक्या निळ्या रंगातले दगड वापरून बांधलेल्या या इमारतीत फार सुंदर वेगळेपण होतं. इमारतीचे कठडे, खांब, कमानी सगळ्याचीच स्थापत्यकला अतिशय सुरेख. वेगवेगळ्या कोनातून ही इमारत वेगळी आणि तेवढीच सुंदर दिसते. हे सगळं पहातच होतो तेवढ्यात लोकांचा एक समूह इमारतीत जाताना दिसला. लवकर आत सोडायला लागले की काय म्हणून आम्ही आणि अजून काही त्या दिशेने जाऊ लागलो. तुम्हाला जी वेळ दिलीय त्याच वेळेला आत सोडण्यात येईल, या समूहाची वेळ आधीची आहे, हे असं तिथे आम्हाला ऐकायला मिळालं. हे ऐकल्यावरही आम्हाला आत जाऊन काय बघायचं आहे हेही माहीत नव्हतं. इमारतीच्या सर्व बाजूंनी हिरवळ आणि बाग फुलवली आहे. इमारतीच्या सौंदर्यात भर टाकणारे मोठे वृक्ष, तसेच छोटी झाडंही लावली आहेत आणि या सगळ्याची उत्तम निगा राखली जाते. हिरवळीवरून चालण्यास मनाई आहे. त्या हिरवळीत चालण्यासाठी छोट्या वाटा तयार केलेल्या आहेत. परिसर खूप मोठा आहे पण लोकांना फिरण्यासाठी काही भाग निषिद्ध आहे. परदेशी नागरीक हा सगळा परिसर अगदी रस घेऊन बघत होते.

शेवटी आमचीही आत जाण्याची वेळ आली. परदेशी नागरिकांच्या गराड्यात आम्ही मुठभर भारतीय त्या ब्रिटिशांनी बांधलेल्या इमारतीत शिरलो. इमारतीचा आतला भाग बाहेरच्या भागापेक्षाही कितीतरी भव्य... प्रचंड उंचीची ती अती विशाल खोली. वर जाण्यासाठी असलेला वळणदार असा विशाल आणि शानदार जिना. ही सगळी विशालता आणि तिचं सौंदर्य डोळ्यांनी टिपतच होते तोपर्यंत त्या इमारतीची माहिती सांगणाऱ्या गाईडने बोलायला सुरुवात केली. अतिशय शांत स्वरात, सुस्पष्ट आवाजात, सोप्या वाटणाऱ्या अशा अस्खलित इंग्रजीत तो गाईड माहिती सांगायला लागला आणि तशी तिथल्या ब्रिटीश लोकांची माहिती ऐकण्यातली तल्लीनता परत एकदा नजरेत भरायला लागली. दिल्लीच्या असह्य उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी तत्कालीन व्हाईसरॉयने ही इमारत बांधून घेतली. १८८४-१८८८ या काळात ही इमारत बांधून पूर्ण झाली. उन्हाळ्यात इंगज देशाचा कारभार सिमल्याच्या या इमारतीतून चालवायचे आणि त्यावेळी व्हाईसरॉय इथे राहण्यासाठी येत. ही इमारत अशा काळात बांधलीय की त्या काळी दळणवळणाची काहीही साधनं नव्हती. सिमला-कालका आगगाडीही खूप नंतर सुरु झाली आणि त्या काळात सिमल्याच्या जंगलातून, काश्मीरमधून कुठले दगड, लाकूड आणून ही इमारत बांधण्यात आली आणि ती ही इतक्या उंचीवर. हे त्या गाईडने सांगितलं आणि माझं डोकंच फिरलं. इंग्रजांनी इमारत बांधली काय लावलंय ? इतक्या लांबून इतक्या उंचीवर एवढे मोठाले दगड, लाकडाचे ओंडके कोणी पोहोचवले ? भारतीयांनी. इतका त्रास कोणी सहन केला इंग्रजांचे गुलाम असणाऱ्या भारतीयांनी. इंग्रजांनी हे कष्ट नाही घेतले. डोकं फिरलेलं असलं तरी मी त्याचं बोलणं ऐकत होते. तत्कालीन व्हाईसरॉय स्कॉटिश होता त्यामुळे या इमारतीची स्थापत्यकला स्कॉटची आहे. ज्या काळात सिमल्यात वीजही नव्हती तेव्हा या इमारतीत वातानुकुलीत यंत्रणा होती. या इमारतीची डागडुजी एकदाही करण्यात आलेली नाही आणि त्याकाळी जशी इमारत होती तशीच्या तशी इमारत आजही आहे. एका खोलीत त्याने आम्हाला छपराकडे बघायला सांगितलं. छप्पर काचेच्या छोट्या छोट्या चौकोनी तुकड्यांचं आणि त्याची चौकट लाकडी. या तुकड्यांना लाकडाशी मेणाने जोडलेलं आहे. त्या काचेच्या वर पाणी साठवून ठेवलेले आहे. आग लागली की त्या हवेच्या दाबाने त्या काचा फुटतात आणि पाणी खाली येतं. ही यंत्रणा त्या काळी बनवलेली आहे आणि ती अजूनही कार्यरत आहे. इंग्रजांच्या काळातल्या काही जुन्या वस्तूही इथे बघायला मिळतात.   

इमारत अशी बांधली आणि तशी बांधली यापुरती या इमारतीची महिमा नाही आणि उन्हाळ्यात इथे इंग्रज देशाचा कारभार चालवायचे इथपर्यंतही या इमारतीला सीमित करता येणार नाही. ही इमारत आहे अतिशय महत्वपूर्ण अशा ऐतिहासिक घटनांची साक्षीदार. भारताच्या इतिहासात या सर्व घटनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अखंड भारताच्या फाळणीच्या बाबतीतल्या सर्व घटनांची ही इमारत साक्षीदार आहे. फाळणीच्या वाटाघाटींसाठी १९४२ साली गांधी याच इमारतीत येऊन गेले. प्रत्यक्ष फाळणीच्या आधी ही फाळणी होऊ नये आणि भारत खंडीत न होता अखंडीत रहावा यासाठी तत्कालीन व्हाईसरॉय यांनी याच इमारतीत प्रयत्न केले होते आणि मुसलमानांनी ते फेटाळून लावले. आपण फाळणी थांबवू शकत नाही म्हणून त्या व्हाईसरॉयने आपल्या पदाचा राजीनामा दिला. फाळणीच्या कागदपत्रांवर नेहरू आणि जिन्ना यांनी याच इमारतीत स्वाक्षऱ्या केल्या होत्या. ती जागा, ते दोघे ज्या मेज आणि खुर्चीवर बसले ते सगळं त्या इमारतीत आजही आहे आणि ते या इमारतीला भेट देणाऱ्यांना हा माहिती सांगणारा गाईड दाखवतो.

१९४७ साली इंग्रज देशातून गेल्यावर या इमारतीला उन्हाळ्याच्या काळातील “राष्ट्रपती निवास” बनवण्यात आलं. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती या इमारतीत एकदा येऊन राहूनही गेले आणि त्यामुळे या इमारतीला राष्ट्रपती निवास म्हणून ओळख मिळाली. देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्यासाठी शिक्षणाचं महत्त्व खूप जास्त होतं. त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती बनल्यावर ही इमारत विद्यार्थ्यांसाठी खुली केली. विद्यावाचस्पती म्हणजेच पीएचडी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढचं शिक्षण घेण्यासाठी इथे संस्था स्थापन करण्यात आली. आता या इमारतीत विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या इमारतीत खरी खुरी शस्त्रं होती, इथे शिक्षणाची सोय करताना ही शस्त्रे इथून दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात हलवण्यात आली. तळमजल्यावरील तीन मोठ्या खोल्या या पर्यटकांसाठी, या इमारतीला भेट देण्यासाठी खुल्या केलेल्या आहेत. गाईड त्या त्या खोलीत जाऊन माहिती सांगतो. तिथल्या वस्तू दाखवतो. अतिशय दुर्मिळ फोटो तिथे आहेत, ते बघण्यासाठी लोकांना वेळ दिला जातो आणि लोकांना पुढच्या खोलीत नेलं की आधीच्या खोलीचा दरवाजा बंद होतो. अशा प्रकारे ही छोटीशी राष्ट्रपती निवास सहल इथे आयोजित केली जाते. या तीन खोल्या सोडल्या तर इमारतीच्या वरच्या मजल्यांसकट संपूर्ण इमारत तसेच इथला विपुल पुस्तक खजिना हा विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवलेला आहे.

आम्ही या इमारतीच्या परिसरात आलो तेव्हा इथे काय आहे हे ही आम्हाला माहीत नव्हतं. आमच्या हॉटेलच्या खोलीतून दिसणारा तिरंगा आम्हाला इथे घेऊन आला होता पण या इमारतीतून बाहेर पडताना आपण काहीतरी खास, महत्वपूर्ण असं बघून, जाणून बाहेर पडत असल्याच्या भावना मनात होत्या. हा आजचा दिवसच नाही तर सिमला भेटच आमची या राष्ट्रपती निवासात येऊन सफल झाली असं त्यावेळी त्या इमारतीतून बाहेर पडताना वाटलं. परदेशी नागरीक इथली बारीक आणि बारीक गोष्ट अतिशय मनापासून जाणून घेतात. आजच्या ब्रिटीश नागरिकांना या इमारतीत विशेष रस आहे. कारण माहीत नाही, आपण ही इमारत बांधली, आपलं इथे राज्य होतं, अशा काही भावना त्यांच्या मनात असाव्यात का ! ते माहीत नाही पण ब्रिटिशांना या इमारतीत विशेष रस आहे हे नक्की. आम्ही तिथल्या त्या बाहेरच्या कॅफेत कॉफी घेतली. या ऐतिहासिक इमारतीला न्याहाळत ही कॉफी पिताना वेगळंच वाटत होतं. आधी ही इमारत पाहिली तेव्हा ती फक्त इंग्रजांनी बांधलेली एक इमारत होती पण ती कॉफी पीत असताना त्या इमारतीकडे बघताना त्यात फाळणीचे गहिरे रंग मिसळलेले होते आणि त्या रंगांमध्ये ती इमारत आता वेगळीच भासत होती. आम्ही तिथून निघालो आणि आता आम्ही जाणार होतो “एनाडेल”कडे.

कैक वर्षे सिमल्याला येणाऱ्या आमच्या ड्रायव्हरला हे एनाडेल माहीत नव्हतं. आता सिमला कसं बदललं, पूर्वी इथे केवढा बर्फ पडायचा पण आता सिमेंटच्या इमारती मोठ्या प्रमाणावर वाढल्याने इथे कसा बर्फच पडत नाही हे सगळं याला अनुभवाने माहीत होतं. २५-२६ वर्षे हा पर्यटकांना घेऊन फिरतोय पण याला एनाडेल हा भाग ऐकूनही माहीत नव्हता. तो म्हणतो इकडे कोणी कधी येत नाही. या राष्ट्रपती निवासमध्ये क्वचित कोणी आलंय तरी पण या एनाडेलच्या आर्मीच्या वस्तुसंग्रहालयात मी कधीही आत्तापर्यंत आलेलो नाही की याबद्दल कधी ऐकलेलंही नाही. त्यामुळे मोबईलमधल्या नकाशाच्या आधारे वाहतूक पोलिसांना रस्त्यावरचे गाड्यांचे नियम विचारत विचारत आम्ही निघालो. अतिशय कठीण रस्ता. अगदी छोटा अरुंद रस्ता आणि उभा उतार आणि त्याचवेळी जीवघेणी वळणं यांना पार करत आम्ही निघालो. लांबूनच अतिशय विशाल आणि भव्य असं गोल्फचं हिरवं गार मैदान दिसायला लागलं. आणि उतार उतरत उतरत आम्ही या आर्मीच्या हेरीटेज वस्तुसंग्रहालयाशी येऊन पोहोचलो. भारतीय सैन्यबळ या संग्रहालयाची देखभाल करतं. या जागेला भेट देण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. अतिशय शांत, स्वच्छ, हिरव्या निसर्गाच्या कुशीतली ही जागा. भल्या मोठ्या लोखंडी मुख्य दरवाजातून आत शिरताच हे वस्तुसंग्रहालय तुमच्या मनाचा ठाव घ्यायला सुरुवात करतं.
एक छोटं स्मारक, तोफा, रणगाडे, सैन्य अधिकारी, सैनिक यांचे पुतळे यांनी या संग्रहालयाला सुरुवात होते आणि तुम्ही संग्रहालयाच्या छोट्याश्या इमारतीत शिरता. इथे मात्र तुमची भेट भारताच्या इतिहासाशी होते. भारताची आर्मी, सैन्यबळ हे आज दिसतं तेवढंच मर्यादित नाही. इतिहास जातो महाभारत काळात आणि तोच इतिहास या ठिकाणी बघायला मिळतो. श्रीकृष्ण युद्धभूमीत अर्जुनाला भगवद्गीता सांगत आहे, ते चित्र तिथे वेगवेगळ्या रुपात बघायला मिळतं, अगदी मूर्त रूपातही.
भगवद्गीता त्या संग्रहालयात बघायला मिळते, तिथल्या ध्वनिक्षेपकावरून गीतेची माहिती, श्लोकही ऐकवले जातात आणि इथून खऱ्या अर्थाने या हेरीटेज संग्रहालयाला सुरुवात होते. इथे इतिहास काळापासूनची सगळी शस्त्रे बघायला मिळतात. धनुष्यबाण, भाला, ढाल, पासून आजच्या शस्त्रांपर्यंत सर्व प्रकारची शस्त्रे इथे आहेत. भीमाची गदा इथे बघायला मिळते. मराठ्यांची कट्यार मिळते.
Daggers – used by Marathas म्हणत ठेवलेली कट्यार बघताना अभिमानाने माझी छाती रुंद झाली. इतिहासातील सैनिकांची शिरस्त्राणं, चिलखतं, त्यांचे कपडे बघायला मिळतात. इतिहासात होऊन गेलेल्या काही महान वीरांची माहिती इथे वाचायला मिळते. जसे, आपले महाराज, राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप वगैरे... प्राचीन काळात सैन्याची आखणी कुठल्या विचारातून, मानसिकतेतून व्हायची याची माहिती देणारे फलक, प्राचीन काळची युद्धनीती, चंद्रगुप्त मौर्य यांसारख्या प्राचीन सुवर्णकाळाची माहिती देणारे फलक, बुद्धिबळ हा खेळही कसा युद्धनीतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, गीता तसेच शंख यांची माहिती, महाभारतातली युद्धनीती, या अशा प्राचीन गोष्टींची पाळंमुळं कशी आजच्या काळातल्या युद्धनीतीत रुजलेली आहेत, हे या संग्रहालयात समजावून सांगण्यात आलेलं आहे. महाभारत युद्धाच्या काळात युद्ध सुरु होण्यापूर्वी, चालू असताना, आणि त्या दिवसाचं युद्ध संपताना वाद्यं वाजवली जात, याची माहितीही तिथे आहे. या प्राचीन काळापासून पुढे सरकत सरकत हे हेरीटेज संग्रहालय आजच्या काळापाशी येऊन थांबतं. १९७१ सालच्या युद्धाची चित्रफितही तिथे लावलेली दिसली. आर्मी निसर्गाच्या जवळ कशी आहे, फुलंपानं, प्राणी यांच्यासाठीही आर्मी काम करते. नैसर्गिक आपत्तीत देवदूत बनून येते. याचीही माहिती फोटोसहीत तिथे आहे.


या वस्तुसंग्रहालयाच्या भोवती छानशी बाग आहे आणि मागेच ते भलंमोठं पॅनोरमिक दृश्य असणारं गोल्फचं मैदान आहे. अतिशय सुंदर आणि तेवढंच विशाल. तिथेच एक छोटंसं खाण्याचे पदार्थ मिळणारं दुकानही आहे.
Panoramic view of Golf Club

कुठेतरी लपलेलं एखादं मौल्यवान, सुंदर रत्न असतं ना, याच्या अस्तित्वाची माहितीही कोणाला नसते अशी ही जागा म्हणजे एनाडेल आर्मी हेरीटेज वस्तुसंग्रहालय. देवदारच्या छत्रछायेत हिरव्यागार निसर्गाच्या गालिच्यावर शांत, मुग्ध हवेत ही जागा आहे. अतिशय सुंदर. इथे फारसं कोणी येत नाही कारण हे रत्न लपलेलं आहे. त्यामुळे हा परिसर शुद्ध वातावरणात आहे आणि त्याला आर्मीची देखरेख असल्याने या जागेचं व्यावसायिकीकरण झालेलं नाही. काहीतरी जबरदस्त बघायला मिळालं या भावनेने आम्ही तिथून बाहेर पडलो. आम्ही ज्या रस्त्याने आलो, त्या रस्त्याने परत जाताना जाऊ नका कारण तो धोकादायक आहे असं सांगत तिथल्याच आर्मीच्या लोकांनी आम्हाला दुसरा एक रस्ता सांगितला आणि त्याच रस्त्याने आम्ही परत जायला निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला देवदारचं जंगल पण आर्मीने त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कुंपण घातलंय. त्या रस्त्यावरून समजत होतं की या रस्त्यावरही आर्मीने बरंच काम केलेलं आहे. आता आम्ही निघालो होतो “संकट मोचन हनुमान” मंदिराकडे.

या मंदिराकडे पर्यटकांचा विशेष ओढा आणि या मंदिराचं कौतुक करण्यात हे पर्यटक अजिबात थकत नाहीत. मग आम्हीही चाललो या जुन्या मंदिराच्या दिशेने. सिमला-कालका रस्त्यावर हे मंदीर आहे. हे मंदीर कुठल्याही पौराणिक घटनेचं साक्षीदार नाही. कोणी ‘बाबा नीब करोरी महाराज’ म्हणून होते आणि ते १९५० साली या जागी आले. इथल्या शांत परिसराने त्यांना मोहून घेतलं आणि १९५६ साली त्यांनी या मंदिराची पहिली वीट ठेवली. नंतर या मंदिराचा विस्तार सिमला सरकारकडून करण्यात आला. चपला बूट काढायला इथे एक वेगळी खोली आहे कारण इथेही माकडांची दहशत आहेच. पण आम्हाला इथे माकडं दिसली नाहीत.
आवारात शिरताच पहिल्यांदा दर्शन होतं ते दक्षिण भारतीय स्थापत्यशैलीत बांधलेल्या “श्री षोडश गणपती मंदिरा”चं. गणपतीच्या सोळा रूपांचं इथे दर्शन होतं. हे मंदीर फार सुरेख आहे. मंदिरांच्या रंगांमधले गडद रंग अगदी उठून दिसतात. समोरच मंदीर आहे गणपतीच्या वडिलांचं. पुढे नवग्रह आणि नंतर राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्ती असलेलं रामाचं देऊळ. तिथेच आहे विशाल अशा हनुमानाचं देऊळ. इथे मंदीर बांधावं अशी इच्छा ज्यांच्या मनात आली त्यांचंही इथे मंदीर आहे. इथून सिमल्याचा अर्धगोलाकार नजारा बघता येतो. मनाला एक प्रकारची शांतता देणारी ही जागा फार सुरेख आहे. पर्यटकांना हे मंदीर का आकर्षित करून घेतं याचं उत्तर इथे आल्यावर मिळतं.
गणपती मंदीर

या मंदिराबरोबर आमची सिमला सहलही संपली आणि आम्ही परत जायला निघालो. आजचा दिवस अनपेक्षितरीत्या सार्थकी लागल्याचं एक समाधान मनाशी बाळगत असतानाच आम्हाला लांबून तो जाखू पर्वतावरचा उंच मारुती दिसला आणि तिथेच आमचं हॉटेलही होतं. सिमल्याच्या कानाकोपऱ्यातूनही हा उंच मारुती दिसतो पण आमच्या हॉटेलातून का बरं दिसत नाही याचं उत्तर आम्हाला त्यावेळी मिळालं. आमचं वास्तव्य मारुतीच्या पावन पायाखाली असल्यावर आम्हाला तो उंच मारुती कुठला दिसायला ! आमच्या हॉटेलच्या वरतीच ही मारुतीची अती उंच मूर्ती होती. नेहमीच्या जागी ड्रायव्हरने आम्हाला सोडलं आणि आम्ही निघालो सिमल्याच्या प्रसिद्ध “माल रोड”कडे. 
माल रोडवरून दिसणारा जाखू मारुती

आमच्या हॉटेलच्या अगदी जवळ हा रस्ता. या रस्त्यावर वाहनांना बंदी आहे त्यामुळे पादचारी मार्ग असुदेत नाहीतर मुख्य रस्ता यावर फक्त चालत फिरणारीच लोकं दिसणार. अतिशय सुरेख, आखीव रेखीव असा हा रस्ता. फार रुंद नाहीच पण त्याचं छोटेखानी सौंदर्यही मनात भरतं. हा रस्ता सखल नाहीये तर हा चढत वर जाणारा रस्ता आहे. त्यामुळे एका बाजूला सिमल्याची दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगरावर चढत जाणारी घरं, विश्रामगृहं, वगैरे... रस्त्याच्या दरीलगतच्या बाजूला छोटी दुकानं, खाण्यापिण्याची दुकानं. इथे अतिशय जुन्या काळातली रेस्टॉरंट्सही आहेत, अगदी ब्रिटीश कालीन आणि यांची ऐट काही वेगळीच. ही यांची ऐट त्या सौंदर्यात भरच घालते. स्वच्छ रस्ते इथेही लक्ष वेधून घेतात. इथलीही लोकं स्वच्छतेच्या दृष्टीने जागरूक. एकंदर कुठल्या युरोपातला रस्ता वाटावा असाच हा रस्ता. “जब वुई मेट”चं चित्रीकरण या रस्त्यावर झालेलं आहे. चित्रीकरण झालेले इतरही सिनेमे आहेत पण जब वुई मेटमध्ये पाहिलेला हा रस्ता लगेच आठवतो. इथे मध्ये मध्ये बसायला जागा केल्या आहेत आणि त्या ही या ऐटबाज रस्त्याला शोभतील अशाच. साधी दुकानंही आहेत पण रस्त्याच्या सौंदर्याची माती ही दुकानं करत नाहीत. इथे एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही इडली खाल्ली. छ्या छ्या छ्या इतकी बेक्कार की विचारू नका. इथेही पाणीपुरी शोधण्याचा मी प्रयत्न केला पण ती काही मिळाली नाही.
माल रोडवरून दिसणारी सिमला दरीतली घरं आणि दूर दिसणारा राष्ट्रपती निवास इथला तिरंगा
चंदीगडला चविष्ट स्ट्रॉबेरी खाल्ली होती आणि त्याची आठवण ताजी होती. इथल्या रस्त्यावरही स्ट्रॉबेरी दिसली आणि आम्ही ती घेतली पण ही स्ट्रॉबेरी अगदी बेक्कार निघाली.  

माणूस सवयीचा गुलाम असतो. या माल रस्त्यावर फिरताना दोन ठिकाणी तिथल्या दुकानदारांशी मी चक्क मराठीत बोलले. वाक्यं फार कठीण नव्हती, पण तिकडच्या स्थानिकांकडून अगदी सोपं मराठी कळण्याचीही अपेक्षा अजिबातच नाही. माझ्या तोंडून मराठी बाहेर पडलं. स्थानिक दुकानदाराने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि पुढे योग्य तीच कृती केली. काही खाण्याच्या गोष्टींबद्दल मराठीत विचारलं आणि समोरून बरोबर उत्तर आलं. हे माझ्यासाठी अनपेक्षित होतं. या रस्त्यावरून फिरताना मस्त वाटतं. माल रोडच्या पुढे “रिज” हा भाग लागतो. हा भाग तर अतिशय सुरेख, अतिशय भव्य, खूप रुंद रस्ता. तिथेच असलेलं जुनं चर्च त्या रस्त्याच्या सुरेखपणाला साजेसं. इथेही एक मोठा तिरंगा फडकत होता. ३ इडियट्स, जब वुई मेट सारख्या सिनेमात या रिजला पाहिलंय. मोकळा ढाकळा आणि त्यात उंचावर त्यामुळे इथे अतिशय छान वारं वाहत असतं आणि समोर सिमलाही सुंदर दिसतं. आरामात फिरण्यासाठी, दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी हा भाग अती उत्तम. तिथेच लक्कर बाजार आहे, नेहमीच्या छोट्या मोठ्या लाकडी वस्तू मिळण्याचं ठिकाण. असे फिरत फिरत आम्ही खूप दूरवर पोहोचलो.
सहल संपवून म्हणजेच माल रोडवरून परत जाताना
परत जाताना हे एवढं अंतर परत चालत जायचंय म्हणत परतीच्या मार्गाला लागलो. आता दुसऱ्या दिवसाचे वेध लागले होते. परत मुंबईला जाण्याचे वेध. जाऊन सामान बांधायचं, सकाळी लवकर उठायचंय याचे वेध. एवढ्या सुंदर हिमाचलात छानशा हवेत इतके दिवस काढल्यावर मुंबईला परतणं जीवावर आलं होतं. परत जाणार तर मुंबईच्या उकाड्यात. कुठे हिमाचलची थंडी आणि कुठे तो मुंबईचा चिकट उकाडा... या विचारानेच मन उदास झालं. एखाद्या चित्रात शोभेल अशा रेखीव रस्त्यावरून आम्ही परतत होतो. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, बायका-मुली माझ्या पायांकडे बघत आहेत. पाय कायम पाय मोजे आणि बुटात, याला कंटाळून त्या दिवशी मी साध्या चपला घातल्या होत्या आणि या चपला तिकडच्या महिलांसाठी कुतूहलाचा विषय होता. तिकडे चपला घालत नाहीत. थंडी नसली तरी सगळी बोटं झाकली जातील असे बूट तिकडे घालतात, त्यामुळे माझी चपलांमधली पावलं त्यांच्यासाठी काहीतरी वेगळा प्रकार होता. त्या दिवशी ती हॉटेलची टेकडी शेवटची चढली, हॉटेल खोलीतून दिसणारा सूर्यास्त शेवटचा बघून घेतला आणि लागलो सामानाची बांधाबांध करायला...

2 comments:

  1. अतिशय सुंदर, उत्कृष्ट लेख आहे. घर बसल्या "राष्ट्रपती निवास" सफर घडवून आणल्याची अनुभूती दिल्याबद्दल धन्यवाद ताई

    ReplyDelete