Monday, 22 May 2017

हिमाचल गाथा - भाग १२



दुसऱ्या दिवशी “कुफरी”ला जायचं होतं. कुफरी सिमल्याच्या जवळचं एक उंच स्थान. तिथे लोकं बर्फात खेळायला जातात. मनालीच्या सोलंगपेक्षाही कुफरी उंचावर आहे आणि एका ठराविक ठिकाणापासून वरती घोड्याने जावं लागतं. आदल्या दिवशीचा नाल्देहराचा घोडेस्वारीचा थरारक अनुभव होताच आणि कुफरीला घोड्याने करायचा प्रवास अजूनच कठीण आणि खूप जास्त मोठा होता. रस्ताची अवस्थाही खूप घाण. चिखल आणि घोड्यांची घाण याने बरबटलेला तो रस्ता. त्या घाणीतून कठीण रस्त्यावरून दिव्य पार करून वर जावं लागणार होतं. जर बर्फवृष्टी होत असेल तर कुफरी अतिशय सुंदर हे माहीत होतं पण आम्ही तिथे होतो तेव्हाचा तो काळ हा बर्फवृष्टीचा नव्हता आणि उलट असलेला बर्फच विरघळण्याचा होता. आदल्या दिवशी आमच्या ड्रायव्हरचं तिथल्याच एका दुसऱ्या ड्रायव्हरशी बोलणं झालेलं ऐकलं होतं की कुफरीला आत्ता बर्फ आहे, तरी पण काय करावं हा प्रश्न होताच. इंटरनेटवर लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया बऱ्याच वाचल्या. कुफरी म्हणजे केवळ पर्यटकांसाठी रचलेला एक सापळा आहे वगैरे. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया वाचल्या पण शेवटी निर्णय तर आम्हालाच घ्यायचा होता. कठीण आणि घाण रस्ता आणि वर असलेल्या बर्फात फारसा रस नसणे म्हणून आम्ही कुफरी रद्द केलं. मनालीच्या सोलंगला प्रचंड बर्फ पाहिला आणि त्यात मनसोक्त खेळून झालं होतं. मन अगदी भरलेलं होतं आणि आता दिव्य पार करून परत बर्फातच जायची अजिबात इच्छा नव्हती. कधी बर्फ्वृष्टीच्या वेळी इकडे येणं झालंच तर जाऊयात कुफरीला, त्यावेळी काहीतरी हवंच ना नवीन... असा विचार केला आणि कुफरीऐवजी आम्ही सिमल्याच्या जवळच असणाऱ्या “चैल”ला जाण्याचं ठरवलं.

सकाळी निघालो. सिमल्यात थंडी नाही थंडी नाही पण थंडी तरी चांगलीच होती. अगदी बोचरी थंडी. परत एकदा वळणावळणाचे रस्ते, परत एकदा डोलकर डोलकर... आम्ही देवदारच्या घनदाट जंगलातून निघालो. एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी आणि दोन्ही बाजूंना देवदारचं जंगल. त्या दाट जंगलातून हिमाचलच्या जंगलातली सुंदर सुंदर फुलं दिसायची. वेली फुलं, नुसतीच साधी फुलं. यातली काही फुलं आम्ही रोरिचच्या घरीही पाहिली होती आणि आम्हाला हळूहळू याक, घोडे कुठे कुठे पडलेले बर्फाचे खडक दिसायला लागले. कुफरी जवळ येत होतं. काय करावं हा विचार परत मनात यायला लागला. आपण परत इकडे येऊच याची काय शाश्वती ! एखादं चांगलं ठिकाण राहिलं असं वाटायला नको. पण मनात येणाऱ्या विचारांना मनातच ठेवलं आणि आम्ही कुफरीला नाकारलं. मनालीला बर्फात गेलो नसतो तर कदाचित कुफरीला गेलोही असतो. मनाली तुम्हाला भरभरून देऊ करते आणि ते सगळं अनुभवलं की त्यापुढे सिमला फारच खुजं वाटतं, कमी वाटतं, साधं वाटतं. मनालीपुढे सिमला तग धरू शकत नाही. म्हणूनच बहुतेक लोकं आधी सिमल्याला जातात आणि मग मनालीला, आम्हालाही हे असंच करायचं होतं पण आम्हाला हॉटेलचं बुकिंग मिळालं नाही. आम्ही आमच्या ड्रायव्हरला एवढं सांगितलं होतं की आम्हाला चैलला जायचं आहे पण कुफरीला थांबायचं नाहीये हे वेगळं बोललो नव्हतो. त्याला वाटलं की यांना कुफरी करायचं आहे. आम्ही जेव्हा त्याला कुफरीला जायचं नाहीये हे सांगितलं तेव्हा तो चाट पडला. वर बर्फ बराच आहे, सिनेमांच्या चित्रीकरणाच्याही जागा आहेत वगैरे वगैरे म्हणायला लागला आणि असं म्हणत गाडी न थांबवता त्याने गाडी चैलकडे नेली. रस्ता तर तोच होता. हे असंच देवदारचं जंगल आणि अतिशय वळणावळणाचे रस्ते यांना पार करत शेवटी चैलला आलो.



चैलला एक राजवाडा आहे. पटियाळाचे महाराज भूपिंदर सिंघ यांनी बांधलेला. ते उन्हाळ्यात इथे येऊन रहायचे. आता या राजवाड्यातल्या काही खोल्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये परिवर्तीत केल्या आहेत. इथे पर्यटकांना हा राजवाडा आतूनही पाहता येतो. नावाला थोडेफार बदल करून मूळ राजवाड्याची दगडी इमारत तशीच ठेवून आज हा राजवाडा उभा आहे. ३ इडियट्स या चित्रपटातलं रणछोडदासचं आलिशान घर म्हणजेच हा शाही राजवाडा. पुढची ती भलीमोठी हिरवळ आणि आतलं ते शाही घर या चित्रपटात टिपलेलं आहे. आम्ही आत शिरलो तोच एका शाही इमारतीने आमच्या मनाचा ठाव घेतला. इथल्या सगळ्या गोष्टींना एक शाही बाज. नुसते आरसे म्हटले तरी ते अगदी जुन्या काळातल्या बारीक कलाकुसरीचे. त्या राजवाड्यात शिरल्या शिरल्याच जाणीव होतेच की आपण एखाद्या राजाच्या राजवाड्यात आलो आहोत. तिथे एक खानावळही आहे. तिथे आम्ही कॉफी घेतली. राजवाड्यातल्या चुलीवरची कॉफी आणि नंतर बडीशेप, खडीसाखर, दात कोरण्याच्या काड्या यांचं तबक आमच्यासमोर आलं तेही अगदी बारीक कलाकुसरीचं.
तिथे महाराज, महाराणी, राजकुमारी यांच्या खोल्या आहेत. राजाच्या जेवणाची वेगळी खोली आहे. त्यांचा दिवाणखाना, मद्याची खोली, झुंबरं सगळंच आलिशान आणि राजेशाही थाटातलं. तिथल्या साध्या खिडक्या, त्यांची खुंटीही वेगळी. तिथे आत एक शाली, कपडे, खोटे दागदागिने यांचं ट्राईब्ज इंडियाचं एक दुकानही आहे. आम्ही तिथे खरेदी केली. त्याच राजवाड्याच्या खानावळीत आम्ही दुपारचं जेवणही घेतलं. कधी चैलच्या राजवाड्यात आम्ही जेवलो होतो, ही आठवण नेहमी स्मरणात राहील. राजवाड्याला माकडांची दहशत आहेच. त्यामुळे तिथले काही दरवाजे बंद ठेवले जातात. राजवाड्याच्या समोरची हिरवळ खूप मोठी आहे. जसा अलिशान राजवाडा अगदी तसंच हे लॉन. तिथे बसायला छानसे झोपाळे, बाकं आहेत. खूप वेगवेगळी फुलं आहेत. एकदम छान असा हा राजेशाही थाटातला राजवाडा, अगदी देवदारच्या जंगलातला. इथे बराच वेळ घालवून आम्ही परत निघालो. वाटेत परत कुफरी लागलं. अजूनही जाता येईल वर असं वाटलं पण आम्ही तिकडे फारसं लक्ष न देता परत फिरलो. वाटेत हवामानाने आपले रंग बदलले आणि अचानक पावसाळी वातावरण निर्माण झालं आणि पाऊसही सुरु झाला. सिमल्यातला पाऊस कसा असतो, पाऊस आला की सिमला कसं दिसतं ते बघतच आम्ही आमच्या हॉटेलचा डोंगर चढत आमच्या खोलीत आलो. आता या चढाचा त्रास वाटायचं केव्हाच बंद झालं होतं. त्यामुळे तो चढण्याचा वैताग आता नव्हता. सूर्यास्त व्हायचा होता आणि आता क्षितिजावर ढगांची गर्दी जास्त होती. या ढगांच्या गर्दीतून विसावणारा सूर्य त्या दिवशी बघायला मिळाला.










No comments:

Post a Comment