Saturday, 20 May 2017

हिमाचल गाथा - भाग ११


दुसऱ्या दिवशी उठून पहिल्यांदा सिमल्याची दरी डोळ्यांनी मनसोक्त बघितली. मुंबईला घेऊन येण्यासाठी कॅमेऱ्यात टिपून घेतली. संपूर्ण हिरवी हिरवी दरी आणि त्या हिरव्याच्या मध्ये मध्ये दिसणारी घरं, हॉटेलं, इमारती... सिमल्याला देवदार वृक्षांचा अनमोल आशीर्वाद लाभलाय. संपूर्ण दरीत, तुम्ही सिमल्यात जिथे कुठे असाल तिथे अवतीभवती हेच वृक्ष बघायला मिळतात. खिडकीतून दिसणारी दरी पार क्षितिजापर्यंत दिसत होती. लांब लांब दिसणारी शेतं, पिवळट हिरवी गव्हाची शेतं आणि पिवळी मोहरीची शेतं. दरीत सकाळी सकाळी कुठल्यातरी धुरकांड्यातून धूर येताना दिसत होता. थंडीतली ती स्वच्छ हवा, त्यामुळे धुराची ती रेष आणि पुढे पसरत जाणारा तो धूर डोळ्यांना अगदी स्पष्ट दिसत होता. दूर कुठल्यातरी रस्त्यावर वाहनांची ये-जा डोळ्यांना स्पष्ट दिसत होती आणि दिसत होती ती सिमल्याची डोंगराच्या उतारावर देवदारच्या छायेत बांधलेली बिस्किटांची घरं. अगदी खाली पाहिलं की खाली खाली उतरत जाणारे रस्ते दिसत होते. त्यातल्याच एका रस्त्याने आदल्या रात्री आम्ही वर आलो होतो. त्या रस्त्यांवर लगबगीने वर खाली करणारी लोकं दिसत होती. इथे वाहन बंदी त्यामुळे इथे पायीच काय ते वर खाली करायचं. जवळच उच्च न्यायालय होतं त्यामुळे या लोकांमध्ये काळे कोटवालेही दिसत होते. दूर पाहिलं तर देशाचा तिरंगा डौलाने फडकत होता, ते काय आहे ते काही कळत नव्हतं पण तिरंगा होता मात्र खूप मोठा. इथे एका पर्वतावर उंच मारुती बनवलाय. सिमल्यात कुठूनही तो सहजपणे दिसतो. त्या भल्यामोठ्या खिडकीतून बरंच शोधलं त्या पवनपुत्राला पण कुठेच दिसला नाही.



आता पर्यटनासाठी बाहेर पडायचं होतं. आमची गाडी जाणार होती डॉक्टरांकडे आणि आदल्या दिवशीच्या त्या न संपणाऱ्या प्रवासामुळे आरामात उठून अळम टळम करतच बाहेर पडलो. ती टेकडी उतरून खाली येऊ लागलो. सिमला एकदम ताजं तवानं वाटत होतं. सिमल्याला एक प्रकारचं वलय आहे. सिमल्याला एक प्रकारचा स्तर आहे. असायला देशात मोठमोठाली बरीच शहरं आहेत, अगदी श्रीमंतही. मुंबई आहे ना आपली सर्वात श्रीमंत. पण जो थाट सिमल्याचा तो आपल्या मुंबईचाही नाही. सिमल्याची भौगोलिक रचना आणि त्या भौगोलिक रचनेतून जमेल तसं वसवलेलं शहर. शहर म्हणावं का ? कारण सिमला खूप लहान आहे. साधी महानगरपालिकाही नाही सिमल्यात. नगरपालिका आहे. इथे सगळे श्रीमंत राहतात का ? नाही अजिबात नाही पण इथलं राहणीमान नीट नेटकं आणि व्यवस्थित. वावरणं, चालणं यात एक तरतरीतपणा. चंबूगबाळ्यासारखे कपडे इथे लोकांच्या अंगावर दिसणार नाहीत. गरीब असला तरी त्याच्या राहणीमानात नेटकेपणा असेल. अगदी साध्या शाळेतली मुलंही टाय कोटमध्ये दिसणार. इंग्रज जाताना नीटनेटकेपणा सिमल्याला देऊन गेलेत की काय असा प्रश्न पडतो. हे असे सिमल्याचे अनेक कंगोरे ती टेकडी उतरताना जाणवत होते. म्हणता म्हणता आम्ही टेकडी उतरून खाली आलो. त्या दिवशी गाडीचं डॉक्टरचं काम काही झालं नाही, त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी करून ड्रायव्हरने गाडी आणली होती. 


पहिल्यांदा आम्ही निघालो “नाल्देहरा”कडे. नाल्देहरा येथे खूप उंचावर गोल्फचं सुंदर मैदान आहे. हे मैदान आणि अजूनही काही गोष्टी बघण्यासाठी घोड्यावरून जावं लागतं. दोन्ही बाजूला दाटीवाटीने उभे असलेले देवदार आणि मध्ये रस्ता आणि त्या रस्त्यावरून आम्ही चाललो होतो. नाल्देहराच्या पायथ्याश आमची गाडी येऊन थांबली. आता इथून वरती घोड्याने जायचं. गाडीतून खाली उतरत नाही तोपर्यंत एक घोडेवाला पुढे आला, त्याच्याकडे लक्ष न देता आम्ही या घोड्यांचं सरकारी केंद्र जिथे होतं तिथे गेलो आणि घोडे नक्की केले. आम्ही दोघे दोन घोड्यांवर आणि त्या दोन घोड्यांना घेऊन जाणारा, आम्हाला नाल्देहरा दाखवणारा एक माणूस आमच्या बरोबर अशी आमची स्वारी निघाली.


घोडा फार तर चार पावलंच पुढे गेला असेल आणि समोर मोठा चढ आला, अगदी उभा. रस्ता अगदी अरुंद आणि पूर्ण खडकाळ. एकावेळी एका घोड्याला कसबसं वर जाता येईल एवढीच जागा. इथून आमचा भयानक प्रवास सुरु झाला. हे चढ उतार काही नवे नव्हते पण हा होता कठीण गडाचा भाग आणि तो ही घोड्यावरून. महाराष्ट्रात बरेच गड चढले उतरले पण ते पायी. हे असे घोड्यावरून नाहीत. मुंबईच्या जवळच असलेल्या साध्या माथेरानलाही मी कधी गेले नाही. अतिशय अरुंद कठीण खडकाळ चढ चढत घोडा जाऊ लागला. बरोबरचा माणूस म्हणायला लागला की या घोड्यांना अतिशय उत्तम प्रशिक्षण दिलंय तुम्ही घाबरू नका, वगैरे वगैरे... हे सगळं ठीक आहे पण जन्मात कधी घोड्यावर बसल्याचं आठवत नाही, कधी लहानपणी बसले असेल तर आणि हे इथे मात्र घोड्यावरून एकदम कठीण गडावर ! घोडा भयंकर पावलं टाकायचा. कधी उताराच्या अगदी टोकाशी तर कधी त्याचं शरीर वेडं वाकडं करत. समोर कठीण रस्ता आणि घोड्यावर बसल्याने तो जास्तच भयावह दिसायचा. पुढे पुढे जाऊ लागलो आणि रस्ता बराच कठीण होत गेला. कठीण रस्त्याची अगदी अरुंद कड, ती ही खडकाळ आणि खाली एकदम खोल दरी. आजूबाजूला असंख्य देवदार आणि त्यातून जाणारे आम्ही पाच. दोन घोडे आणि आम्ही तिघे. तो बरोबरचा माणूस आमच्याशी बऱ्याच गप्पा मारायला लागला, काही काही शब्दांना मराठीत काय म्हणतात हे ही विचारायचा तो, म्हणजे आमचं खास करून माझंच लक्ष दुसरीकडे जाईल. पण तरीही माझ्या तोंडून ऊई ऊई.... चालूच होतं. हा घोडा कुठल्याही अवस्थेत कुठेही थांबायचा. त्या जंगलात कुठे त्याला पाला खावासा वाटला तर किंवा तो खाल्लेला पाला कुठे शरीरातून बाहेर टाकावासा वाटला तर... कुठेतरी चढावर दोन पाय आणि खाली कुठल्या खड्ड्यात एक पाय, अगदी कसाही कुठेही हा थांबायचा. हा असा आम्ही त्या उंच गडाच्या कठीण मार्गावरून प्रवास केला. मग तो दाखवायचा, ते शिखर आहे ना तो कैलास आहे, ती आहे ना ती अमुक अमुक पर्वतरांग आहे. मग खाली कुठेतरी तो रस्ता आहे ना भारत-चीन यांना जोडणारा रस्ता आहे, मग त्या घोड्यावरूनच वाकून देवदारांच्या अधून मधून किंवा मान वर करून या सगळ्या गोष्टी बघायच्या. तेव्हा तुमचा तो घोडा कुठल्या कठीण ठिकाणी असेल माहीत नाही. या भागात कित्येक सिनेमांची चित्रीकरणं झाली. तो दाखवायचा, इथे ना या सिनेमाचं चित्रीकरण झालं. त्या मिथुनच्या प्यार झुकता नही या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी काढलेले ते हे दोन बदाम. मध्ये मध्ये थांबायचं असायचं, कुठलं मंदीर... छोटंसं मंदीर पण ते उतरून बघायचं. ते बंदच असायचं पण ते कुठलं जुनं मंदीर आणि मग कशी धार्मिकता हवी याचा धडा तो आम्हाला शिकवायचा. तुमचा विश्वास आहे का करत प्रश्न विचारायचा. हे असं मध्ये मध्ये थांबायचं पण त्यावेळी घोड्यावरून उतरायचं, आणि परत वर चढताना खूप मोठं दिव्य. हा हा पॉइंट तो तो पॉइंट. वर काही साहसी खेळही होते पण आम्हीच सध्या साहसी प्रवासावर निघालेलो असल्याने अजून कुठले साहसी खेळ खेळणार ! असं करत करत गोल्फ क्लब आला. पण फक्त क्लबच्या सभासदांना आत जाण्यास परवानगी. बाकीच्यांनी बाहेरूनच त्या क्लबला बघायचं. खरोखर अतिशय उंचीवर आणि कठीण रस्त्याने जात बघायला मिळतो तो सिमल्याचा खूप जुना गोल्फ क्लब. इंग्रजांनी बांधलेला. दीवानासकट कित्येक कित्येक सिनेमांची चित्रीकरणं इथे झालेली आहेत. तो बाहेरून पाहिला आणि परत फिरलो.
 
Golf Club, Naldehra


हा आता चढलेला अतिशय अरुंद चढ आता उतरायचा होता. ते दिव्य पार करून खाली आलो. लोकं घोड्यावरून जाताना दिसत होती पण त्यातली काही चार पाच मिनिटांतच आमच्याच आजूबाजूने परत येतानाही दिसली. तो कठीण अरुंद खडकाळ चढ घोड्यावरून चढायला घाबरली असावीत. आम्ही कसबसं ते दिव्य पार करून परतत होतो. मी आणि सागरमध्ये मी जास्त उई उई करत ओरडायचे पण तरीही तो माणूस म्हणतो की तुम्ही काहीच नाही एवढी लोकं घाबरतात, ओरडतात. आम्हाला महाराणा प्रताप आणि झाशीची राणी म्हणायचा, म्हणजे आम्ही घाबरू नये. आम्हाला मानसिक बळ यावं. तो कठीण उंच गड पाहिल्यावर वाटलं, आपल्याला हे साधं घोड्यावरून चढायला त्रास होत आहे आणि ते ही बरोबर तो घोडेवाला असताना, आपले महाराज तर अशा गडांवर लढाया लढत. हा गडावरच्या घोडेस्वारीचा अनुभव थरारक, सोबतीला देवदारचं जंगल. आता विचार केला की बाकी ज्या गोष्टी वर पाहिल्या त्या नंतर पण आधी ही घोडेस्वारी आठवते. आयुष्यात पहिल्यांदा घोडेस्वारी केली आणि ती ही सिमल्याच्या कठीण गडावर. वाह.... तिथून आम्ही गेलो मशोबराला. ओक आणि देवदारच्या झाडांचं जंगल आणि बाजूने जाणारा छोटासा रस्ता. जागा एकदम मस्त. सिमल्यातून फिरताना आपल्याला भास होतात की अरेच्चा इथे कुठल्यातरी चित्रपटाचं चित्रीकरण झालंय. एवढं एवढं सिमला या हिंदी चित्रपटांतून दाखवलं गेलंय. आता यापुढे जाता येईल असं कुठलं ठिकाण नव्हतं. आम्ही ज्या आरामासाठी मुंबईहून निघालो होतो तो आम्हाला सिमल्यात मिळणार होता कारण आम्ही सिमल्यात जरा जास्तच म्हणजे आख्खे तीन दिवस राहणार होतो. आम्ही आमच्या हॉटेलच्या बाजूला परतायला लागलो. हॉटेलपासून जवळच असलेल्या जाखू हनुमान मंदिरा”कडे आम्ही निघालो. जाखू पर्वत, सिमल्यातला सर्वात उंच पर्वत आणि त्या उंच पर्वतावर हे मंदीर.


नेहमीच्याच रस्त्यावरून चढून वर जायचं होतं, पण चढ अक्षरशः उभा. रस्ता छोटा आणि गाड्या दोन्ही बाजूने ये-जा करत असतात. रस्ता इतका अरुंद आहे की समोरून येणाऱ्या गाडीला रस्ता देण्यासाठी गाडी मागे घ्यावी लागते आणि ती ही या उभ्या चढ उतारावर. हे इथपर्यंत सगळं एक वेळ ठीक आहे. पर्वत म्हटल्यावर हे असे चढ उतार असायचेच पण इथे प्रचंड दहशत आहे माकडांची. टोळ्यांनी हिंडतात, एकटी दुकटीही फिरत असतात आणि कुठून कधी समोर येतील याचा नेम नाही. सिमल्यात बहुतेक करून सर्व ठिकाणी या अतिरेक्यांची दहशत आहे. रस्त्यावरच्या भिंतींवर माकड दिसलं तर काय करायचं आणि काय करायचं नाही याची माहितीही मोठ्या मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेली आहे. माकडांना खायला दिलं तर सिमल्यात दंड आहे. या माकडांच्या दहशतीत आम्ही गाडीने निघालो. वर जात त्याने एके ठिकाणी गाडी थांबवली. आता वरचा चढ खूपच कठीण आहे आणि हिचे आजारी ब्रेक्स आयत्यावेळी त्रास देऊ शकतात म्हणून मी आता हिला वर नेऊ शकणार नाही, नाहीतर हिला मला वरपर्यंत न्यायची होती. तुम्हाला आता इथून आपापलं जावं लागेल. इथल्या गाड्या घेऊन किंवा पायी. त्या ठिकाणाहून वर जाण्यासाठी गाड्या उपलब्ध होत्या. ड्रायव्हरने सकाळी कुठे कुठे माकडांचा त्रास आहे हे बोलण्याच्या ओघात सांगितलं होतं पण जाखूपाशी आल्यावर माकडांबद्दल सांगायला तो विसरला. आम्ही गाडीतून उतरलो आणि अजिबातच ध्यानीमनी नसताना गाडीतून बाहेर आल्यावर दुसऱ्या क्षणी आमच्यावर एका माकडाने अचानक हल्ला केला. बर्फात उन्हाचा डोळ्यांना त्रास होतो, त्यामुळे बर्फात जायचं तर डोळ्यांवर गॉगल हवा म्हणून सागरने नवीन गॉगल खरेदी केला होता. रे बॅनचा चांगल्यापैकी गॉगल नवऱ्याने केवळ हिमाचलसाठी खरेदी केला होता. मी माझा गॉगल गाडीतून उतरताना बरोबर घेतला नव्हता पण नवऱ्याने तो एकदम डोक्यावर वगैरे लावला होता आणि माकडाने अतिशय वेगात हल्ला करत तो गॉगल पळवला आणि आमच्यासमोर जाऊन बसलं. गॉगल नेला गॉगल नेला सुरु झाली जोरजोरात चर्चा. तेवढ्यात तिथे ज्या गाड्या उभ्या होत्या तिथला एक ड्रायव्हर पुढे आला आणि त्या माकडाला गॉगल दे दे करायला लागला. पण ते थोडीच ऐकणार होतं. आम्हाला म्हणाला की काही खायला असेल तर द्या त्याला, बिस्किटांचा पुडा वगैरे. देईल ते गॉगल परत. गरज लागली तर असावीत म्हणून आमच्याजवळ काही बिस्किटं होती, पतंजलीची. पतंजलीच्या दूध बिस्किटांचा पुडा त्याच्यासाठी घेऊन येत नाही तोपर्यंत दोन हातांनी हे दूध बिस्किट तोडून त्याचे दोन तुकडे करावेत असे आमच्यासमोर त्याने गॉगलच्या एका काडीचे दोन तुकडे केले. रे बॅनच्या गॉगलची काडी त्याने सहजपणे अश्शी तोडून टाकली. तो तिथला ड्रायव्हर म्हणतो की द्या ही बिस्किटं त्यांना, देईल ते गॉगल परत. पुडा फोडून त्या माकडासमोर बिस्किटं टाकली. तिथे अजून एक माकड होतं. ती पुढ्यातली बिस्किटं त्याने त्या दुसऱ्यानेच आधी उचलली आणि मग गॉगल पळवलेल्या माकडानेही बिस्कीट घेतलं, आणि आमचा गॉगल, ती तोडलेली काडी परत केली. अशा रीतीने रामदेव बाबांची बिस्किटं सिमल्याच्या माकडांनीही खाल्ली.
  
आता वर जायचं तर होतं पण समोर टोळ्यांनी माकडं दिसत होती. पुढचा रस्ता अजूनच कठीण होता. आम्ही सरळ तिथली गाडी केली आणि वर जायला निघालो. रस्ता खूपच कठीण आणि अंतर बरंच जास्त. वर पोहोचलो. गाडीचा ड्रायव्हर म्हणाला. वर दोन मंदिरं आहेत, एक मारुतीचं आणि दुसरं एका नाथांचं. चपला खोलीतल्या जाळीच्या कपाटातच काढा नाहीतर ही माकडं पळवतील. आम्ही निघालो. आत्ताचा अनुभव चांगलाच मिळाला होता. मोबईलही हातात ठेवला नाही. तिथेच बाहेर या दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्यासाठी काठ्याही मिळतात. आम्हाला थोड्या पायऱ्या चढून वर जायचं होतं. त्या पायऱ्यांच्या अवतीभवती होतेच हेच अतिरेकी. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या हाताकडे यांची बारीक नजर. आम्ही त्या पायऱ्या चढून वर आलो. यांची नजर चुकवून लोकं हळूच चपला काढायच्या खोलीत जाऊन चपला त्या जाळीच्या कापटात ठेवून बाहेर यायचे आणि सगळ्यांच्या तोंडी याच गप्पा. आमचं हे नेलं आणि ते नेलं. चालत्या गाडीत हात घालून लोकांचे गॉगल या अतिरेक्यांनी पळवले होते पण खायला दिल्यावर एकाच तुकड्यात परत दिले. आमच्यावरच बहुतेक त्या माकडाचं फार प्रेम म्हणून आम्हाला दोन तुकड्यात गॉगल परत मिळाला. इथे सगळीकडे माकडंच माकडं. पाणी पिण्याचे नळ सहजपणे उघडून मस्तपणे पाणी पीत बसतात. कधी कुठून माकड आपल्या पुढ्यात येईल हे प्रत्यक्षात ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. इथे यांची संख्या प्रचंड आहे आणि हे सगळे येणाऱ्या जाणाऱ्यांवर बारीक नजर ठेवून असतात. इथ येणारी लोकं भीत भीतच वावरतात.


या जाखू पर्वताचा आणि या मारुतीच्या देवळाचा एक इतिहास आहे आणि तो आपल्याला रामायण काळात घेऊन जातो. श्रीराम आणि रावण यांचं युद्ध चालू असताना मेघनादच्या बाणाने लक्ष्मण बेशुद्ध पडतो. त्यावेळी द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान हवेच्या मार्गाने द्रोणागिरीच्या दिशेला निघतो. त्याला हवेच्या मार्गात खाली एका पर्वतावर यक्ष ऋषी दिसतात. त्यांच्या दर्शनासाठी मारुती त्या पर्वतावर उतरतो. मारुती जेव्हा त्या पर्वतावर उतरतो तेव्हा तो पर्वत हनुमानाचं वजन पेलू शकत नाही आणि निम्म्यापेक्षा जास्त पर्वत जमिनीच्या आत रुततो. हाच तो जाखू पर्वत. हे जाखू नावही यक्ष ऋषींवरूनच पहिल्यांदा यक्षचं याक, याकचं याकू आणि मग याकू नावाचं बदलत जाखू झालं. हनुमान ऋषींना नमस्कार करतो आणि संजीवनी बुटीची त्यांच्याकडून माहिती घेतो. त्यांना वचन देतो की संजीवनी बुटी घेऊन परत जाताना मी तुमच्या आश्रमात नक्की येईन आणि द्रोणागिरी पर्वतावर जाण्यासाठी निघतो. वाटेत कालनेमी नावाचा राक्षस मारुतीचा रस्ता अडवतो. त्याच्याशी युद्ध करून त्याला मारण्यात मारुतीचा बराच वेळ जातो. हातात वेळ नाही म्हणून मारुती जाखूकडे न येता जवळच्या रस्त्याने अयोध्येला जात परत जातो. मारुती परत जाताना आला नाही हे बघून यक्ष ऋषींना खूप वाईट वाटतं. ऋषींना दिलेला शब्द पाळण्यासाठी मारुती नंतर या पर्वतावर प्रकट होत ऋषींना दर्शन देतो. तो ज्या जागी प्रकट होतो त्याच जागी नंतर एक स्वयंभू मूर्तीही प्रकट झाली. या मूर्तीसाठी यक्ष ऋषी तिथे देऊळ बांधतात. हीच ती जाखू मारुतीची स्वयंभू मूर्ती.

मंदिराच्या बाहेर या अतिरेक्यांना लोकं खायला देत होती. तिथे बसलेल्या एका विक्रेत्याकडे यांचं खाद्य होतं. या भुकेल्या जीवांना आम्हीही खायला दिलं. अतिशय छान वातावरणात आणि सिमल्याच्या सर्वात उंच ठिकाणी हे मंदीर आहे. स्वच्छ, शुद्ध आणि गार गार हवा, सोबतीला सिमल्याचा निसर्ग. इतक्या उंच ठिकाणाहून सिमल्याची दरी अतिशय सुंदर दिसते.
इथेच या सिमल्याच्या अत्युच्च ठिकाणी आहे हनुमानाची १०८ फुटी मूर्ती. ही मूर्ती अशा ठिकाणी बांधली आहे की सिमल्याच्या कुठल्याही ठिकाणाहून ही मूर्ती दिसू शकते, जणू काही मारुतीचं संपूर्ण सिमल्याकडे लक्ष आहे ! या मूर्तीच्या जवळ जायचं तरी भीतीच होती कारण या मूर्तीच्या आसपास होते असंख्य अतिरेकी. एक तर जवळून ही मुर्तीही नीट दिसणार नाही आणि विषाची परीक्षा घ्यायला जाणार कोण, त्यामुळे सगळी लोकं लांबूनच ती भलीमोठी मूर्ती बघत होते. आम्हीही लांबूनच त्या मूर्तीला पाहिलं आणि त्या अतिरेक्यांची नजर चुकवून हळूच मूर्तीचे फोटो काढून घेतले. तिथून नाथ मंदिरात गेलो आणि मग तिथून परत फिरलो. खाली गाडी होतीच. पर्वत उतरून हॉटेलकडे निघालो.

हॉटेलकडे जायचा गड चढत वर हॉटेलकडे जाऊ लागलो. संध्याकाळ झालेली होती. काही कचेऱ्याही सुटल्या होत्या, लोकं घरी जाताना दिसत होते. स्वेटर, जर्किन, पायात बूट वगैरे घालून लोकं छान थाटात परत चालली होती. सिमल्याला थंडी नाही थंडी नाही पण सिमल्यालाही चांगलीच थंडी होती आणि या थंडीत हु हु करत आम्ही हॉटेलच्या खोलीत पोहोचलो. खोलीच्या त्या भल्यामोठ्या खिडकीतून सूर्यास्त बघायचा होता. मुंबईतही सूर्यास्त दिसतो. सूर्याचा तो लालबुंद गोळा समुद्रात जाताना फार सुंदर दिसतो. त्यावेळी आकाश पटावर जी रंगांची उधळण होते ती केवळ शांतपणे बघण्यासारखी, अनुभवण्यासारखी. हे आम्ही समुद्रकिनारी बसून बघतो पण आज हा असाच सूर्यास्त बघण्यासाठी आम्ही कुठल्या सार्वजनिक ठिकाणी नाही तर हॉटेलच्या खोलीत बसून बघणार होतो. सूर्यास्ताला थोडा वेळ होता आणि त्या आधी समोरच्या क्षितिजावर असंख्य तेजस्वी रंग उधळलेले दिसत होते. कुठे दूर एखादा ढग दिसायचा, मुक्तपणे आपल्याला हवा तसा पसरलेला आणि मग ते रंग ढगांच्या अंगाखांद्यावर बागडत कुठल्या वेगळ्याच रंगछटांना जन्म द्यायचे. या मुक्त रंगपंचमीत तो तेजस्वी लाल गोळा समोरच्या डोंगराच्या मागे जाऊन विसावला आणि या क्षितिजावरचे ते तेजस्वी रंग एकाकी झाले आणि हळूहळू मंद होत जात ते ही शांत झाले. त्या दिवशी त्या समोरच्या क्षितिजावर सूर्यास्ताचे अनेकविध तेजस्वी रंग पाहिले. त्या लाल बुंद गोळ्याला या तेजस्वी रंगांमधून क्षितिजाच्या पलीकडे जाताना पाहिलं आणि त्या तेजस्वी रंगांचं तेज डोळ्यांसमोर शांत होतानाही दिसलं. सूर्यास्त आणि त्याच्या रंग छटा ही एक रोजचीच घटना पण त्या दिवशी त्या सिमल्याच्या क्षितिजावर ती नव्याने पहायला, अनुभवायला मिळाली.




No comments:

Post a Comment