दुसऱ्या दिवशी सकाळी
लवकरच आम्ही सिमल्यासाठी निघालो. मनाली-सिमला हे अंतरही खूप जास्त आहे आणि रस्त्यात
बऱ्याच ठिकाणी काम चालू असल्याने प्रवासाचा वेळ वाढणार होता. मनाली सोडून जाताना
जड वाटत होतं पण कधी ना कधीतरी परत जावंच लागणार होतं. मनाली, तिथली गोड स्वभावाची
लोकं मनाला फार भावली. या लोकांनी आपलं आयुष्य एका कोशात गुरफटून टाकलंय. त्या
कोशात जगणं त्यांना जमतं पण कधी त्या कोशाच्या बाहेर पाऊल टाकायची वेळ आली तर ते
या लोकांना जड जाईल. आम्हाला गाडी चढावर हाकता येते, त्यात आम्ही तरबेज आहोत पण
तिथेच उतारावर गाडी न्यायची म्हटलं तर आम्हाला भीती वाटणार, अशी काहीशी ही लोकं
आहेत. पण आहेत छान आहेत. कुत्सित, हेकट अशी नाहीत. ताठर नाहीत, मृदू आहेत. २० अंश
वगैरे तापमान झालं की यांना वाटणार काय गरम होतं आहे, हे २० अंश सेल्सियसही त्यांच्यासाठी
खूप जास्त. यांना खालच्या भागात जाऊन कुठलं काम उरकायचं असेल तर ही लोकं थंडीच्या
दिवसातच जाणार कारण त्याच काळात खाली त्यांना सोसवणारं हवामान असणार. यापेक्षा
जास्त तापमानाशी जुळवून घेणं यांना जमणारच नाही आणि ते जमवून घ्यायचा प्रयत्न
करण्याच्या फंदातही कधी पडणार नाहीत कारण त्यांनीच विणलेल्या कोशात जास्त तापमान
बसत नाही. मनालीत हवा किती स्वच्छ आणि प्रदूषण विरहीत आहे याचा अंदाज तिथलं आकाश
पाहून येतो. आकाश छान निळं दिसतं. ढगांचा पांढरा रंगही छान शुभ्र दिसतो. हे असे
रंग विमानात बसून ढगांमधून उडायला लागलं की दिसतात. तिथे स्वच्छ हवा असते आणि हे
असेच रंग मनालीतही दिसले पण आपल्याकडे धूळ आणि प्रदूषणामुळे आकाश एवढं स्वच्छ दिसत
नाही.
आता मनालीबरोबर तिथल्या
निसर्गाला आणि थंडीलाही सोडून जायचं होतं. बियास नदी, बियास दरी आणि तिथल्या
हिमशिखरांनाही सोडून जायचं होतं. सिमल्याला थंडी कमी आणि आधारस्तंभासारखी ताठ
मानेने उभी असणारी हिमाच्छादित शिखरंही सिमल्याला नाहीत. दररोज न चुकता मायेचा हात
डोक्यावरून फिरवणारी बियास नदीही तिकडे नाही आणि ती नाही तर तिचा तो मायेचा पदर
तिची व्हॅलीही नाही. सकाळी सकाळी निघालो. पहिल्यांदा निरोप घेतला तो
आधारस्तंभांचा, हिमशिखरांचा. पाच दिवस आम्ही कुठेही गेलो तरी त्यांचा भक्कम आधार
पाठीशी असायचा. त्यांच्या नुसत्या दर्शनाने, त्यांच्या असण्यामुळे रोजच्या चढ
उताराचा थकवा कधीच जाणवला नाही. आमच्या आधाराला मागे ठेवून आम्ही पुढे आलो पण
मायेची बियास आमच्याबरोबर होती. मध्येच पार्वती नदीही दिसली. बियास आणि पार्वती
यांची एके ठिकाणी झालेली भेटही दिसली. अगदी गळाभेट. पण ही या दोघींची भेट आता
सिमल्याला दिसणार नव्हती. पुढे कुल्लू आलं. कुल्लूची दरी दिसली. आमचा निरोप
घेण्यासाठी आतुर होती. तिचा निरोप घेत पुढे जातच होतो. तोपर्यंत एका देवीचं देऊळ
आलं. आम्ही मनालीला जाताना तिचं गाडीतून दर्शन घेतलं होतं. ड्रायव्हरने इथे गाडी
थांबवली. त्यालाही दर्शन घ्यायचं होतं. रोज इतकी देवळं पाहिली आणि इतक्या वेळेला पायातले
बूट काढले होते की आता साधे बूट काढायचाही कंटाळा आला होता आणि त्यात मनालीला
सोडून चाललो होतो. इच्छाच नव्हती. सागर आणि ड्रायव्हर गेले देवीजवळ. मी बाहेरून
दर्शन घेतलं. मंदीर रस्त्यावरच असल्याने माझंही छानच दर्शन झालं. तिथून निघालो, अगदी थोड्या वेळासाठी बियास दिसली. तिच्यावर बांधलेलं ते मोठं धरण त्याचे फोटो
काढण्यासाठी गाडी थांबवली.
आम्ही येताना एक छोटा पूल दिसला होता. कुठल्याही
आधाराशिवाय बांधलेला, छोटासाच. परत जाताना त्या पुलावरही जाऊन आलो, फोटो काढले.
सगळ्यांचाच निरोप घेणं चालू होतं. याच रस्त्यावरून आम्ही उत्साहाने मनालीला गेलो
होतो पण आता परत जाताना मन थोडं उदास होतं. पुढे मंडी आलं. इथली पावसाळी हवा छान
अनुभवली होती. आता या मंडीचाही निरोप घ्यायचा होता. जाताना ज्या हॉटेलमध्ये
जेवायला थांबलो होतो, त्याच हॉटेलमध्ये परत उतरलो. पण मनालीला जाताना जी भावना
होती, ती परत जाताना नव्हती. सगळ्यांचा निरोप घेत आम्ही आता वेगळ्याच रस्त्याला
लागलो. आता आमच्या सहलीचा नवा कोरा भाग सुरु झाला होता जो आम्हाला सिमल्याला घेऊन
जाणार होता. या नवीन भागाबरोबरच आम्ही थंडीलाही निरोप दिला. बाहेरचा रस्त्यावरचा
हिमाचली हिरवाईचा निसर्ग आता कमी कमी होत चालला होता आणि काम चालू असलेल्या रस्त्यावर
आमची गाडी आली. बाहेर सगळीकडे धूळ आणि मातीचंच राज्य, त्यामुळे भकास वातावरण. थंडी
नाही, सूर्य डोक्यावर उभा आणि बाहेर मातीचा उडणारा धुरळा, यामुळे आम्हाला गाडीची
वातानुकुलीत यंत्रणा सुरु करावी लागली. आम्ही मनालीत हीटरने उबदार झालेलं वातावरण
अनुभवलं होतं आणि आता तर चक्क वातानुकुलीत यंत्रणा.... सिमल्याला सकाळी व रात्री
थंडी आणि एरवी गरमच होणार, असं ड्रायव्हरकडून ऐकलं. म्हणजे आता सगळं इतकं बदलणार
होतं.
![]() |
| बियासवर बांधलेलं पंडोह धरण |
या रुक्ष अशा
रस्त्यावरून आमचा कधीही न संपणारा प्रवास सुरु झाला. हा प्रवास कधी संपतोय की नाही
असं वाटण्याइतका वेळ सिमल्याने दर्शन द्यायला लावला. सिमला पर्वतावर नटलेलं एक
छोटं शहर आहे त्यामुळे गाडीने डोंगर चढणे उतरणे या प्रवासातही चालूच होतं पण बाहेर
मायाळू निसर्ग फारसा नाही आणि थोडाफार जो काही दिसायचा तो स्वभावाने रुक्ष वाटायचा
आणि हळूच आम्हाला देवदार वृक्ष दिसायला लागले. हे देवदार आता आमचे सिमल्यातले
आधारस्तंभ असणार होते. हे वृक्ष दिसायला लागले तसं मनाला बरं वाटलं. चला, खास
हिमाचली असं काहीतरी तरी दिसायला लागलं ! या डोंगरावरही रस्ता मोठा करण्याचं काम
चालू आहे आणि ते ही खूप जास्त लांबीच्या रस्त्याचं. हळूहळू का होईना निसर्गावर
आक्रमण करणं चालू आहे. ते बघून मनाला खूप वाईट वाटलं. आमचा न संपणारा प्रवास चालू
असताना अचानक मागून जोरजोरात हॉर्नचे आवाज येऊ लागले. आमच्या ड्रायव्हरने गाडी
थोडी बाजूला केली. गाड्यांचा एक मोठा ताफा सिमल्याच्या दिशेने चालला होता. कुठल्या
तरी मंत्र्याचा ताफा होता, सिमला राजधानी ना पण त्या ताफ्यात रुग्णवाहिकाही.
कुठल्या मंत्र्याच्या ताफ्यात गरज लागली तर म्हणून रुग्णवाहिकाही असू शकते हे मला
त्यावेळी कळलं. आमच्या वाटेवर लागणाऱ्या भागांमध्ये काही औद्योगिक प्रकल्पही होते
त्यामुळे रस्त्यावर ट्रकही दिसायला लागले. नाहीतर इतके दिवस ट्रक या वाहनाला
बघण्याची संधी आम्हाला कधीच लाभली नव्हती. आता औद्योगिकीकरणापासून, शहरीकरणापासून
दूर, अलिप्त असा खरा शुद्ध निसर्ग आम्ही केव्हाच मागे सोडून आलो होतो त्यामुळे हे
असे ट्रक दिसणं, यात काय ते नवल !
सिमला जवळ आलं, हे आलं
असं वाटूनही सिमला काही येत नव्हतं आणि त्यातच आमच्या गाडीत बिघाड झाला. गाडी बंद
पडली नाही पण वेळेवर जर बिघाड दुरुस्त केला नाही तर गाडीच्या ब्रेक दाबण्यावर
मर्यादा येऊ शकणार होत्या आणि या डोंगराळ भागात हे परवडणारं नव्हतं. त्यामुळे आमचा
ड्रायव्हर म्हणाला, उद्या आपण जरा उशिरा निघू. मी गाडी दुरुस्त करून आणतो.
सिमल्यात आहे सोय. तसंही या न संपणाऱ्या प्रवासामुळे कंटाळा आलाच होता. मी लगेच
हो.... म्हटलं. प्रवास संपत नाही असं वाटेपर्यंत आम्ही सिमल्याच्या बाहेरच्या
भागात आलो. छोटी छोटी दुकानं, घरं, दिसायला लागली. मनालीत फारशी दुकानं दिसायची
नाहीत आणि असलीच तरी खायची किंवा शालींची वगैरे पण इथे मात्र वेगवेगळ्या प्रकारची
दुकानं दिसायला लागली. सिमला शेवटी राजधानी आहे, फरक तर पडणारच. मुख्य सिमला कधी
येत आहे याची वाट पाहतच होतो आणि आम्ही सिमल्यात शिरलो. माल रोड दिसला. हा रस्ता
एकापेक्षा जास्त मजल्यांचा आहे आणि वरखाली करण्यासाठी सार्वजनिक लिफ्टही उपलब्ध
आहे. एका वेगळ्या ढंगाच्या शहरात आलोय असं वाटत असतानाच आमच्या ड्रायव्हरने
आमच्यावर एक मोठा बॉम्ब टाकला. तुमचं हॉटेल व्हीआयपी भागात आहे आणि तिकडे
गाड्यांना जायला बंदी आहे. तिकडे गाडी दिसली तर २००० रुपयांचा दंड आहे. गाडी खालीच
थांबणार, तुम्हाला रोज खाली यावं लागेल. आमचं हॉटेल वरती होतं, टेकडीवर असावं ना
तसं. इतके दिवस आम्ही रोज चढण चढत होतो, उतरत होतो. हवाबदल, आरामासाठी आलेलो आम्ही
रोज हे असे किल्ले, डोंगर चढत पायपीट करत होतो. आराम तर नव्हताच पण तो निसर्ग इतका
सुंदर होता की या चढण्या उतरण्याचा त्रास कधीच झाला नाही. एवढं सगळं असलं तरी
आमच्या हॉटेलच्या बाहेर आमची गाडी येत होती. पण इथे सिमल्यात, आमचं हॉटेलच
टेकडीवर. हा तर सगळ्यात मोठा कहर होता. म्हणजे रोज आम्हाला ही टेकडी उतरून खाली
यावं लागणार आणि परत जाताना चढून जावं लागणार.... इथे म्हणे रस्त्यावर वाहतुकीचे
नियम हे असेच. कधी कुठला रस्ता रहदारीसाठी बंद करतील याचा नेम नाही. इथे गाडी
चालवायची तर जपून आणि काळजीनेच चालवावी लागते कारण कधी कुठला पोलीस दंडासाठी पावती
फाडेल याचा नेम नाही. पण आमच्या हॉटेलचा भाग मात्र कायमचाच खासगी वाहनांसाठी बंद.
बाहेर आता सिमला छानपैकी
दिसायला लागलं. ती उतारावरची बिस्किटांची घरं. छोटेसेच पण ऐटदार रस्ते. हे सगळं
दिसायला लागलं पण माझ्या मनात तेच की आपलं हॉटेल आहे टेकडीवर, रोजचा चढण्या
उतरण्याचा वैताग... हॉटेल बदलुयात एवढंही म्हणाले मी नवऱ्याला... याच विचारात
असताना आमची गाडी थांबली. त्याच्यापुढे जाण्यास तिला मनाई होती. हॉटेल कुठे दिसतंय
हे बघण्यासाठी मी मान वर केली तर माझी मान मागे पाठीला टेकली आणि पुढच्या कल्पनेने
जबरदस्त वैतागायला झालं. आमच्या समोर जो रस्ता होता तो अगदी उभं चढण असलेला...
नवऱ्याने हॉटेलमध्ये फोन केला. सामान आणायला माणसाला खाली पाठवत असल्याचं समोरून
सांगण्यात आलं. तेवढंच हायसं वाटलं. इथे हीच पद्धत, रस्त्यावर वाहनं कमीच दिसतात.
हे असे कुलीच सामानाची ने आण करतात. अतिशय जड समान नेतानाही मी या कुलींना इथे
पाहिलं. रस्ते सरळ नाहीतच. सामान घेऊन चढ उतार हे कुलीच करतात. रस्ते छोटे आहेत
आणि त्यात राजधानी मग गाड्यांची गर्दी होणार किंवा निसर्गाला धोकादायक असणारं
प्रदूषण नको, या वाहतुकीच्या सोयींमध्ये सिमला इतकं मागास असण्याचं कारण काय, काही
माहीत नाही. कुली खाली आला आणि आम्ही टेकडी चढून वर जाऊ लागलो. जबरदस्त चढ. मी
वैतागतच चालत होते. पुढे एक छोटा रस्ता लागला, तिथपासून तर एवढा कठीण चढ की माझा
पारा अजूनच चढला. तिथे बसायला बाकांची सोयही होती म्हणजे हा चढ किती कठीण आहे हे
त्यांनाही माहीत होतं. एकदाचे आम्ही त्या हॉटेलमध्ये पोहोचलो. तिथून लिफ्टने चौथा
मजला. चौथ्या मजल्यावर छानशी बाग दिसली. बागेच्या हिरवळीवर पाऊल ठेवता येईल एवढे छोटे
छोटे दगड बसवले होते आणि त्या दगडांवर पावलं ठेवत आम्ही त्या हॉटेलच्या
स्वागतकक्षात येऊन पोहोचलो. इथूनही एक मजला जिन्याने चढून वर गेलो तेव्हा आमचा
चढणे हा प्रकार संपला. तीन दिवस इथे आहोत, रोज काय आणि कसं सहन करावं लागणार या
वैतागवाण्या विचारातच हॉटेलच्या खोलीत शिरले. हॉटेलचा माणूस काय काय दाखवत होता.
हीटर आहे पण आता काय उकाडा सुरु झालाय तेव्हा तुम्हाला हीटर फारसा लागणार नाही,
इति तो हॉटेलवाला आणि तेव्हा आम्ही अक्षरशः थंडीने कुडकुडत होतो. तो ही अशी बडबड
करत असतानाच त्याने त्या खोलीचा पडदा उघडला आणि मला अक्षरशः अहाहाहा झालं.
मी फक्त
अवाक् होऊन काचेने बंद केलेल्या त्या भल्यामोठ्या खिडकीतून बाहेर बघत होते. पुढे
तो हॉटेलवाला काय बोलला किंवा काही बोलला की नाही हे मला माहीतही नाही. इथून
सूर्यास्त दिसतो, सनसेट पॉइंट एवढं काहीतरी म्हटल्याचं मला समजलं बाकी काही नाही.
एवढा त्रास सहन करून वर आलो आणि तो सगळा त्रास एका क्षणात नाहीसा झाला. रोज वरखाली
करावं लागणार हा वैतागही कुठल्या कुठे पळाला. त्या भल्यामोठ्या खिडकीतून दूर
क्षितिजावर आकाशात तीन चार रंगांनी ओढलेली रेष दिसत होती आणि खाली दिसत होते
असंख्य काजवे, लुकलुकणारे... एखाद्या यक्षाने आकाशात उभं राहून असंख्य काजवे खाली
सिमल्याच्या अंगाखांद्यावर फेकावेत असं काहीतरी दिसत होतं ते. काही काजवे दूर
रस्त्यावरून पळताना दिसत होते. एक काजवा पळाला म्हणेपर्यंत दुसऱ्यानेही त्याच्या
पाठोपाठ पाळायला सुरुवात केली. ही काजव्यांची गंमत जंमत मला तिथेच उभे असलेले
देवदार वृक्ष दाखवत होते. माझे सिमल्यातले आधारस्तंभ त्या आमच्या हॉटेलच्या अगदी
बाहेर मला आधार देण्यासाठी उभे होते. हे बघून वाटलं, एवढा त्रास सहन केल्याचं चीज
झालं ! सिमल्याला डोंगरांची राणी, Queen of Hills म्हटलं जातं आणि आमचं हॉटेल जवळजवळ
त्या डोंगर रांगांच्या सर्वात वरच्या स्थानी होतं. त्या भल्यामोठ्या खिडकीचं तोंड
होतं सिमल्याच्या दरीकडे. त्यामुळे या दरीत वसलेल्या या छोट्याश्या शहरातले दिवे,
रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्या त्या रात्रीच्या काळोखात मला लुकलुकणाऱ्या
काजव्यांप्रमाणे दिसत होत्या. या हॉटेलच्या खानावळीच्या खिडक्याही या मिणमिणत्या दरीच्या
दिशेलाच, त्यामुळे जेवणखाण करतानाही हे चमकणारे काजवे बघताना अप्रतिम वाटायचं.
No comments:
Post a Comment