नग्गरमध्ये काही मंदिरं
होती आणि ती आमच्या ड्रायव्हरला माहीत नव्हती. कॅसलच्या समोरच एक मंदीर होतं पण ते
नेहमीप्रमाणे जाळीदार दरवाजा लावून बंद केलेलं. ड्रायव्हर म्हणतो आधी आर्ट गॅलरी
तर बघा, तिकडे उशीर होईल. आम्ही आर्ट गॅलरीच्या दिशेने निघालो. कुठली ही आर्ट
गॅलरी किंवा काय हे आम्हाला माहीत नाही. या आर्ट गॅलरीचं नाव माहीत होतं पण ते नाव
कसं उच्चारतात हेही धड आम्हाला माहीत नव्हतं आणि आम्ही या संपूर्णपणे अनभिज्ञ अशा
ठिकाणी चाललो होतो. ज्याचं साधं नाव काय आहे हेच माहीत नाही, त्याच्याबद्दल
आम्हाला काय माहिती असणार ? शून्य. आम्ही निघालो रोरिच आर्ट गॅलरीकडे. गाडी
पायथ्याशी थांबली आणि आम्ही पायी वर चढत जायला लागलो. रस्ता व्यवस्थित होता पण
शेवटी तो एक किल्लाच त्यामुळे चढण हे आलंच. आम्ही जसजसे वर वर जायला लागलो तसं
आमचं स्वागत केलं या रोरिचच्या विचारांनी, त्याच्या वचनांनी. हा काय प्रकार आहे,
हा रोरिच कोण काहीच कल्पना नाही. या रस्त्यावर लावलेल्या फलकांवरून आम्हाला एवढं
कळलं की हा एक विचारवंत आहे आणि एक पेंटरही आहे. खरं तर पेंटर हीच त्याची खरी ओळख,
एवढंच काय ते माहीत. या अशाच मनःस्थितीत आम्ही एका खूप जुन्या घरात किंवा बंगल्यात
प्रवेश केला. पुढे आमच्यासाठी काय वाढून ठेवलंय याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती.
पण आमच्या पुढ्यात जे काही येणार होतं त्याचा परिणाम आमच्यावर चिरकाळ होणार होता.
आम्ही त्या घरात प्रवेश केला तर पहिल्यांदा आम्हाला घराची बाग दिसली. सगळी
हिमालयीन झाडं आणि फुलांची बाग. कुठल्याही बंगल्याच्या बाहेर बाग असेल तशीच पण
स्वच्छ आणि चांगल्या देखरेखीतली. सगळी लोकं ज्या दिशेने जात होते त्याच दिशेने
आम्हीही जाऊ लागलो आणि घराच्या तळमजल्यावर येऊन पोहोचलो. सगळी लोकं पायातले बूट
काढताना दिसले. एका आर्ट गॅलरीत जाण्यासाठी बूट काढायची काय गरज ? ते मंदीर थोडीच
आहे ! पण सगळ्यांनी काढले म्हणून आम्हीही पायातले बूट काढले. घराच्या इमारतीत
प्रवेश केला. जमीन प्रचंड गार. पण काय करणार नाईलाज... असा विचार मनात येईपर्यंत
तिथे बसलेल्या एका माणसाने आम्हाला बोटानेच तिथे असलेल्या सपाता किंवा तिकडच्या
शैलीत बनवलेल्या घरातल्या जाड लोकरीच्या चपला घालायला सांगितल्या. महिलांसाठी आणि
पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या या खास तिकडच्या स्लीपर्स... आर्ट गॅलरी बघायला
येणाऱ्या लोकांची एवढी काळजी तिथली लोकं घेत आहेत हे असं पहिल्यांदाच पाहिलं.
निकोलस रोरिच हा एक रंगीत चित्रकार, पेंटर. त्याची लाहौल स्पिती, कुल्लू या
भागातली पेंटिंग्ज तिथे ठेवलेली होती. संध्याकाळच्या वेळेला, सकाळी अगदी
उजाडायच्या वेळेला दिसणारा हिमालय त्याच्या डोळ्यातून तिथे जिवंतपणे बघायला मिळतो,
एवढी सुंदर पेंटिंग्ज... सूर्याची किरणं एखाद्या शिखरावर पडताना, शिखरांच्या
रांगांवर पडताना, पावसाळ्याच्या काळात बदलणाऱ्या छटा, ही किरणं कधी सौम्य,
हळुवारपणे पडणारी तर कधी बर्फाच्या शिखरांना भेदत जाणारी, किती आणि काय... संपूर्ण
हिमालयाला आपल्या चित्रातून जिवंत करणाऱ्या चित्रकाराची चित्रं बघून थक्क व्हायला
झालं. त्या घराच्या तळमजल्यावर आम्ही एका महान चित्रकाराच्या डोळ्यांतून हिमालयाला
पाहिलं. तिथून बाहेर आलो. घराचं ठिकाण अतिशय सुंदर ठिकाणी. हा एक किल्ला आणि या
किल्ल्याचा हा वरचा भाग, हवा स्वच्छ आणि अतिशय शुद्ध, वातावरण प्रसन्न, अतिशय
शांतता, समोर साक्षात हिमालयाची लखलखणारी हिमशिखरं, खालून मुक्तपणे वाहणारी बियास
आणि एका अतिशय जुन्या लाकडी घराच्या पुढ्यात आम्ही उभे.
आम्ही त्या घरातून बाहेर
आलो तर तिथेच उजवीकडे या निकोलसची कार दिसली. तशीच्या तशी जपून ठेवलेली. १९३० ची
ही शानदार पुरातन गाडी काचेतून बघता येते. तिथेच काही अतिशय जुन्या मूर्तीही जतन
करून ठेवल्या आहेत.
![]() |
| निकोलसची चार चाकी गाडी |
तिथेच पहिल्या मजल्यावर
याचं घर आहे. ते बघण्यासाठी वरच्या मजल्यावर गेलो. संपूर्ण घर बंद आणि बंद घराच्या
काचेच्या खिडक्यातून डोकावून बघत त्याचं घर बघायचं. त्याचं ग्रंथालय, दिवाणखाना,
जेवणाचं टेबल, झोपण्याची खोली, बायकोचं कार्यालय, अशा बऱ्याच खोल्या आपल्याला बंद
खिडकीतून बघता येतात. ही खोली कुठली हे ही तिथे लिहिलेलं आहे. मेज, खुर्च्या,
दिवाण, पलंग, पडदे, सगळं सगळं जुनं आणि नंतर अगदी नीट सांभाळून ठेवलेलं. पहिल्या
मजल्यावरून समोर बघावं तर हा पुढ्यात हिमालय आणि जिथे तुम्ही उभे आहात ते इतकं
जुनं आणि सुंदर लाकडी घर, नैसर्गिक वातावरण तर अक्षरशः दैवी म्हणावं असं... हे
सगळं अनुभवत पहात असताना तुम्ही या जागेच्या प्रेमात पडायला लागता. ही जागा
तुमच्या मनात घर करायला लागते. त्या त्याच्या घरात उभी असताना माझ्या मनात विचार
आला या क्षणी मला कोणी सांगितलं की महाराष्ट्राला सोडून इथे या अशा निसर्गात
रहायला ये. जिथे समोर हिमालय असेल, खालून बियास वाहत असेल, पक्षांचे आवाज सोडून
इतर कुठलेही आवाज तुम्हाला ऐकू येणार नाहीत, प्राणवायू काठोकाठ भरलेली इथली हवा
असेल तर या अशा हिमालयाच्या कुशीत रहायला मी एका पायावर तयार झाले असते.
महाराष्ट्र मला अती प्रिय पण तरीही मी इथल्या या ईश्वरी निसर्गात रहायला एका
क्षणाचाही विचार न करता तयार झाले असते. इथे महाराष्ट्रापासून इतकं लांब राहून मी
माझ्या मायमराठीची सेवा केली असती. इथलं वातावरण इतकं सुंदर की माझ्याकडून
घडलेल्या या सेवेची म्हणजेच लेखनाची दखल सरकारने नक्कीच घेतली असती, नव्हे मी ती
घ्यायला भाग पाडली असती. ते वातावरणच तसं, तिथे माणूस एक तर कुठल्यातरी कलेत
पारंगत असणारा कलाकार होणार नाहीतर लेखक. आपण ज्या स्थानी आहोत त्या स्थानाच्या,
तिथल्या वातावरणाच्या स्पर्शाने मन अक्षरशः प्रचंड मानसिक समाधानाने बेभान झालं
होतं. ते घर इकडून तिकडून बघितलं आणि आम्ही परत खाली तळमजल्यावर आलो. तिथे एक बाण
दाखवला होता. या निकोलसची समाधी कुठे आहे आणि ती किती लांब आहे हे सांगणारा तो बाण
होता. तिथे पुढे जाऊन पाहिलं तर पुढचं काहीच दिसेना. हा बाण नक्की चाललाय कुठे हे
समजावं म्हणून अजून थोडं पुढे गेल्यावर कळलं की खाली जबरदस्त उतार आहे आणि हा थेट
उतार एकदम उभा असल्याने तो लांबून दिसतच नव्हता. कच्चा असला तरी चालत जाण्यासाठी
रस्ता चांगला होता पण कितीही खाली बघितलं तरी समाधी दिसेना. हा रस्ता वळत इकडून
तिकडे जात होता पण त्याचा शेवट काही दिसेना. काय करावं कळेना. तिथे त्या बाणापाशी
बसलेल्या माणसाला विचारलं की खालच्या खालून जाता येईल का वर यावं लागेल ? तर तो
म्हणतो, नाही वर यावं लागेल आणि तशीही तुमची गाडी तर वरच असेल ना... काय करावं
कळेना कारण एवढं उतरत जायचं म्हणजे येताना हे चढण चढत यायचं. हा रस्ता छोटा आणि
शेजारी हजारो फुटांची दरी आणि समाधी म्हणजे असून असून काय असेल... काहीतरी
स्मृतीप्रित्यर्थ बांधलं असेल किंवा त्याला तिथे पुरलं असेल. मग कशाला जा एवढं
खाली ! पण तरीही वाटलं थोडं जाऊन बघावं.
निघालो जायला... कमालीचा
उतार, घोंघावणारं अतिशय गार वारं आणि एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला दरी
नसली तरी खोल जागा. मधूनच या उताराबरोबर एखादं सर्रकन वळण यायचं. मनात एकदम धडकी
भरायची. आम्ही आलो होतो आराम करायला आणि आमच्या नशिबात होता रोजचा चढ उतार. हा चढ
उतार इतके दिवस चांगल्या पक्क्या रस्त्यावरून चालू होता, पण हा इथला तर छोट्याश्या
कच्च्या रस्त्यावरून आणि दरीच्या सोबत. मधूनच मुख्य रस्त्याला बगल देत आडमार्गाने
खाली आलो, तिथे आम्हाला एक खोली दिसली. तिथे होतं निकोलस रोरिकच्या छायाचित्रांचं
प्रदर्शन. हा रोरिक रशियन. १९१५च्या रशियन क्रांतीच्या वेळी त्याने त्याचा देश
सोडला आणि अमेरिकेत गेला, चीनला गेला, तिबेट, मध्य आशियात इकडून तिकडे भटकला. तो
जेव्हा तिबेटमध्ये गेला तेव्हा तिबेट परदेशी नागरिकांसाठी प्रचंड धोकादायक होतं.
तेव्हा स्वतःचे कसेबसे प्राण वाचवत १९२७ मध्ये तो भारतात आला, हिमालयाच्या
कुशीतल्या या जागी त्याने निवास करण्याचा निर्णय घेतला. १९४७ साली तो हे जग सोडून
गेला, तोपर्यंत तो इथेच नग्गरमध्ये त्याच्या या घरीच वास्तव्याला होता. त्याच्या
या प्रदर्शनात त्याचे अनेक फोटो दिसले. तो, त्याची बायको, दोन मुलगे आणि त्याची
सून देविका राणी. हिंदी सिनेमाची पहिली ड्रीम गर्ल म्हणवली गेलेली देविका राणी
त्याची सून. तो जिथे जिथे गेला तिथले सगळे फोटो तिथे बघायला मिळतात. फोटोत तो
बौद्ध वेशात दिसतो, तो ख्रिश्चन क्रॉस घेऊनही दिसतो, तो एखाद्या हिंदू मंदिरातही
दिसतो. कुठल्याही धर्माच्या कट्टरतेशी त्याचा संबंध नसावा असं त्याचे फोटो बघून
वाटलं. जवाहरलाल नेहरू आणि अगदी कोवळी इंदिरा गांधी हे दोघे तिथे बऱ्याच फोटोत
दिसले. नेहरू, इंदिरा आणि निकोलस यांचे घट्ट संबंध होते. आठआठ दिवस मुलीला घेऊन
नेहरू इथे रहायला येत. देविका राणी आणि सगळ्या कुटुंबाबरोबरचे फोटोही बरेच आहेत,
माहितीही आहे. त्या फोटोंवरून या माणसाचा आवाका लक्षात येतो. हे फोटो तर बघितले पण
समाधी कुठे आहे ? तिथेच एक वाट खाली समाधीकडे जात होती पण वरून समाधीतला स ही
दिसायला तयार नाही. परत प्रश्न काय करावं ? असं आपण किती खाली जाणार ? हे फोटो
बघून बरीच लोकं परत जात होते. अपवादानेच लोकं समाधीकडे जाताना दिसले. परत तोच
विचार केला. चला थोडं खाली जाऊन बघुयात आणि निघालो.
परत तसाच रस्ता, खोल
दरीच्या साथीने खाली जाणारा. जाऊदेत नकोच पुढे जायला असा विचार करूनही खाली जात
राहिलो आणि थेट उतार उतरत शेवटी ती समाधी दिसली. अशीच अतिशय शांत, सुंदर अशा
निसर्गाच्या ठिकाणी. तो ख्रिश्चन होता पण त्याच्यावर शेवटचे संस्कार अग्निसंस्कार
केले होते आणि जिथे हे संस्कार केले तिथेच ही समाधी बांधलीय. तिच्या पायाशी होती
ती बोदी फुलं.
समाधीपाशी सगळीकडे हीच फुलं. तिथेच बसण्यासाठी बाकांची सोय केलेली
आहे. त्या सुंदर निसर्गात, शांत वातावरणात त्या बाकांवर चार क्षण टेकल्यावर मन हळूहळू
या रशियन बहुगुणी माणसाच्या काळात जायला लागतं. आत्ता ही जागा एवढी सुंदर आहे,
त्या काळी जेव्हा तो इथे रहात होता तेव्हा किती सुंदर आणि शुद्ध असेल ही जागा !
आम्ही तिकडून निघालो. मगाशी जो उतार होता, तो आता चढायचा होता. अगदी सरळ चढण पण हे
चढण आता त्रासदायक वाटत नव्हतं. हिमालयाच्या जवळच्या कुठल्यातरी भन्नाट ठिकाणी आपण
आलोय याचं अतिशय समाधान मनाला मिळालेलं होतं. वर आलो परत एकदा त्याच्या घराकडे,
बागेकडे नजर टाकून तिकडून जाऊ लागलो. तर घराबाहेरच एक नकाशा होता आणि या रशियन
माणसाचा हा अलौकिक ठेवा कुठेकुठे ठेवलेला आहे ते या नकाशात दर्शवलेलं होतं. त्यात
एका प्रयोगशाळेचा उल्लेख होता. हा माणूस महान चित्रकार तसेच लेखक, कवी, तत्वज्ञानी
होता. पण इथे आता प्रयोगशाळेचा याच्याशी काय संबंध ? ती प्रयोगशाळा अजून चढण चढून
वर होती. हा रस्ता म्हणजे अक्षरशः उभं चढण. त्या प्रयोगशाळेच्या फाटकापाशी आलो.
प्रयोगशाळा किती लांब आहे हे दाखवणारा एक बाण तिथे होता आणि तो बाण उभा होता. हे
चढण भयंकर कठीण होतं. काय करावं कळेना. तिकडून एक जोडपं येताना दिसलं. कसं काय आहे
त्यांना विचारलं. ते म्हणाले, असंच फोटो वगैरे आहे पण वरून हिमालयाचा जबरदस्त देखावा
बघायला मिळतो. आम्ही जायचं ठरवलं. हळूहळू जायचं वरती असं ठरवलं आणि निघालो. आमच्या
पुढे पिळदार शरीरयष्टीचे तीन तरुण होते. त्यातला एक सुरुवातीलाच तिथे बाकावर बसला.
म्हटलं, यालाही जड जातंय ! पण आम्ही पुढे जात राहिलो. वाटेत बसायला बाकडी होती.
त्यांनाही कल्पना होती की हा रस्ता चढत जाणं खूप कठीण काम आहे. रस्ता छोटा आणि
कच्चा, लोकं घसरणार नाहीत या काळजीने बांधलेला, खाली दोन्ही बाजूला सहजपणे दृष्टीस
पडणारी बोदी फुलं. एका बाजूला किल्ल्याचा भाग, दुसऱ्या बाजूला दरी आणि समोर बियास
दरी आणि तिची तेजस्वी किनार बनून स्फटिकाप्रमाणे चमकणारा हिमालय. रस्ता चढायला
कठीण होता पण मला ते वातावरण फार आवडलं. कानात घोंघावणारं ते हिमालयाला स्पर्शून
येणारं गार गार वारं मन मोहरून टाकत होतं.
![]() |
| रोरिचच्या समाधीजवळची ही ती हिमाचलची "बोदी" फुलं |
तिथे चढताना वाटलं की
हिमालयाच्या कुशीत जर कुठली आर्ट गॅलरी हवी तर ही अशीच हवी, तुम्हाला हिमशिखरांच्या
साथीने डोंगर चढायला, उतरायला लावणारी. कधी चढ तर कधी उतार आणि हा चढ उतार साधा
सुधा नसावाच, कठीणच असावा. या चढ उतारातच तुम्हाला त्या महान कलाकाराच्या कलेचे
कंगोरे हळुवारपणे उलगडून बघण्याची संधी देणारी अशीच ही हिमालयीन आर्ट गॅलरी हवी.
ज्याचं कार्य या हिमालयाच्या भागातलं, जो इथेच राहिला, त्याची आर्ट गॅलरी सरळ
साध्या पठारावर ? यात काही मजा नाही.
हश्श हुश्श करत वरती
पोहोचलो. दोन इमारतींमध्ये त्याची ही प्रयोगशाळा व्यापलेली होती. तिथे गेल्यावर
लक्षात आलं हा माणूस खाली त्याच्या घरात भेटला एवढाच मर्यादित नव्हता. त्याने
कित्येक पुरातन गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत, त्यावर अभ्यास केलाय. तिथे
संशोधनाची यंत्रं दिसली. त्याकाळच्या सगळ्या शास्त्रज्ञांबरोबर त्याने काम केलंय.
आईनस्टाईनसह सर्व समकालीन शास्त्रज्ञ त्याच्या या प्रयोगशाळेत येऊन गेलेत. नेहरू,
तरुण इंदिरा गांधी यांच्याबरोबरचे फोटो इथेही होते. टागोरही इथल्या फोटोंमध्ये
दिसले. त्याकाळी घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू तिथे होत्या. पीठ दळायचं जातं, सूप,
हिमालयात आढळणारे पक्षीही तिथे बघायला मिळतात. निकोलस आणि त्याची पत्नी हेलेना या
दोघांनी “अग्नी योग” या योगचा शोध लावला होता.
तिथून परत फिरलो. इथे
आलो तेव्हा हा रोरिक कोण हे ही माहीत नव्हतं पण जाताना या महान माणसासमोर नतमस्तक
होत हिमालायाच्या कुशीत शोभेल अशी आर्ट गॅलरी बघून परत चाललो होतो. आयुष्यात काही
गोष्टी माणूस कधीच विसरत नाही. कितीही काळ लोटू देत एखादी गोष्ट कालच घडली असावी
इतकी सुस्पष्टपणे ती तुमच्या स्मरणात चिरंतन राहते. त्यातलीच ही एक गोष्ट असेल,
“रोरिक आर्ट गॅलरी”ला दिलेली भेट. रोरिकच्या मृत्युनंतर त्याच्या मुलाने ही आर्ट
गॅलरी बनवली आणि आपल्या वडिलांचं कार्य, त्यांचं व्यक्तिमत्त्व लोकांपर्यंत
पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या आर्ट गॅलरीसाठी विश्वस्त संस्थेची स्थापना केली.
हिमाचल प्रदेश सरकार आणि रशियन सरकार या संस्थेचं काम बघतात. भारताचे पंतप्रधान या
संस्थेचे प्रमुख असतात. रशियात या रोरिकचे बरेच चाहते आहेत, ते केवळ या आर्ट
गॅलरीला भेट देण्यासाठी म्हणून भारतात येतात.
या रोरिकच्या घरात पाऊल
टाकताना संपूर्ण अंधारात प्रवेश करतोय अशी परिस्थिती होती पण आता तिथून परत जाताना
एका तेजस्वी व्यक्तिमत्त्वाला आणि त्याच्या हिमालयीन आर्ट गॅलरीला भेट दिल्याचं
अतिशय समाधान बरोबर घेऊन चाललो होतो. आम्ही रस्ता उतरत आमच्या गाडीकडे चाललोच
होतो.
तर समोरून एक मुलगी येताना दिसली. छोटीच होती. एका लहान मुलाला तिने कडेवर
घेतलं होतं. खेड्यांमध्ये कमरेच्या एका बाजूच्या पोकळीत लहान मुलांना बसवतात ना,
तसं. दिसायला अतिशय सुरेख, बबलगमचा फुगा जबरदस्त अॅटिट्युडमध्ये फोडत ती चालली
होती. त्या अतिशय गोड मुलीला पाहिलं आणि वाटलं की मोठेपणी जर ही सिनेमात दिसली तर
अजिबात नवल वाटणार नाही. तिच्याकडे बघत जात असतानाच ती तिथून निघूनही गेली. आम्ही
तिथेच एके ठिकाणी चहा घेतला, तिथली चिक्की घेतली आणि परतच चाललो होतो तोपर्यंत ती
परत दिसली, भावाला कडेवर घेतलेली. तिला विचारलं तुमचा फोटो काढू ? लगेच तयार झाली.
भावाला फार रस दिसला नाही. तिने मात्र हौसेने फोटो काढून घेतला.
आम्ही तिकडून निघालो.
रोरिक आणि त्याच्या आर्ट गॅलरीने मनावर गारुड घातलेलं होतं आणि त्यातच आमचा
ड्रायव्हर म्हणाला की हे बघा एक मंदीर. हे ही खूप प्राचीन आहे. तुम्हाला हवं होतं,
त्यातलंच एक असेल बघा... ते “त्रिपुरा सुंदरी”चं देऊळ आहे असं आम्हाला आमच्या
मोबईलमधला नकाशा म्हणाला. खूप मोठा उतार उतरून जायचं होतं. म्हणजे परत चढणं आलंच.
त्यावेळी खरं तर मन त्या आर्ट गॅलरीच्या अवतीभवतीच होतं, त्या गॅलरीने मुग्ध झालेल्या
मनाला त्या क्षणी कुठल्याही देवळात जाण्याचा फार उत्साह नव्हता पण तिथेच आलो आहोत
मग बघून घेऊया मंदीर आणि काय हे चढणं उतरणं रोजचंच झालंय आता... चला जाऊयात म्हणून
निघालो. कुठलीतरी शाळा नुकतीच सुटली होती. आमच्याबरोबर तो उतार उतरायला शाळेतली
बरीच मुलं आमच्या अवतीभवती होती. उतार उतरल्यावर पुढे वस्ती होती. तिकडे ती सगळी
मुलं जात होती. मध्येच उजवीकडे या देवीचं देऊळ होतं. आम्ही तिकडे गेलो. पॅगोडा
शैलीत बांधलेलं अतिशय जुनं मंदीर. मंदिराचं आवार खूप मोठं आणि छोटी छोटी बरीच
मंदिरं त्या आवारात बांधलेली. देवीचं देऊळ नेहमीप्रमाणे बंदच होतं. जाळीच्या
दरवाजातून आम्ही नमस्कार केला आणि निघालो. आमच्या पाठोपाठच एक छोटा मुलगा
मंदिराच्या आवारात शिरला होता. शाळेतून घरी येत लगेच हात पाय तोंड धुवून केसाचा
भांग पाडून मित्राकडे खेळायला जावं तसा हा आवरून या मंदिरात आला होता. इथे येण्याचा
त्याचा नेहमीचा शिरस्ता असावा असा तो तिथे वावरत होता. एकेका मंदिराची कडी
उघडायचा, नमस्कार करायचा, कडी लावयचा आणि पुढच्या मंदिराकडे वळायचा. आमच्यासमोर
त्याने तिथल्या सगळ्या देवांचं दर्शन घेतलं आणि आमच्यासमोरून तो निघूनही गेला. मला
त्याला बघून मजा वाटली आणि कौतुकही वाटलं. परत तो चढ चढून आम्ही आमच्या हॉटेलकडे
परत फिरलो. आता उद्या मनाली सोडायचं पण आम्ही अजूनही मनालीचा माल रोड पाहिला
नव्हता. तिथलाच सियाली महादेवही राहिला होता. पण रोज रोज दिवसभर त्या गाडीतून
ड्रायव्हरबरोबर फिरण्याचा भयंकर कंटाळा आला होता. आपल्याबरोबर कायम कोणीतरी आहे ही
भावना नकोशीच वाटत होती. आमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणी अंगरक्षक असावा असं
काहीतरी वाटत होतं. मग आम्ही ठरवलं की आपण आपापलं माल रोडला जावं, रिक्षेने...
हॉटेलच्या स्वागत कक्षात रिक्षेबद्दल सांगितलं. अनायसे रिक्षा हॉटेलच्या बाहेर आलेली
होती. हॉटेलवाल्यांनी तिला थांबवली आणि आम्हाला बोलावलं. इतके दिवस बंद गाडीतून
हिंडत होतो, त्यामुळे थंडीचा त्रास फार झाला नाही. पण आता उघड्या रिक्षेतून जायचं
आणि त्यात परतायला रात्र होणार म्हणून जास्तीचे गरम कपडे घेतले आणि निघालो.
हॉटेलच्या खालीच आमच्या ड्रायव्हरची गाडी आणि तो स्वतः दोघेही होते आणि आम्ही
त्याच्या समोर भराभरा रिक्षेत बसून निघालो. घरातून पळून जाणे हा उद्योग आयुष्यात
कधी केला नाही पण त्या वेळी त्याच्या समोरून असं जाताना हे असंच काहीतरी करत
असल्याचं वाटलं. जबरदस्त मजा आली.
आधी आम्ही गेलो सियालीला.
हिडींबाच्या जवळच हे मंदीर. अतिशय प्राचीन. आम्ही तिकडे गेलो म्हणून त्या
मंदिरातल्या बाईने मंदीर बंद केलं नाही, नाहीतर मंदीर बंद करून ती चाललीच होती. आत
गाभाऱ्यापर्यंत जाता येत नाही आणि मंदिराच्या आतही जाता येत नाही. जाळीच्या
दरवाजातून काय ते बघायचं. आत शिव परिवाराच्या प्राचीन मूर्ती आणि बाहेर भला मोठा
उभा नंदी.
आदल्या दिवशी महाशिवरात्रीनिमित्त बाहेरचा दरवाजा उघडला होता असं ती
म्हणाली. या मंदिराची स्थापत्यकला जबरदस्त. ४-५००० वर्षांपूर्वीचं मंदीर बघण्याचा
धावता का होईना योग होता. मंदिरात तुम्ही कुठून आलात हा नेहमीचा प्रश्न आणि ती
लोकं महाराष्ट्रात आली असतील तर त्याबद्दल ती आवर्जून सांगायची. या बाईनेही
विचारलं. महाराष्ट्र म्हणून ऐकल्यावर लगेच म्हणाली मी आले आहे नाशिकला. फार सुंदर
जागा म्हणत तिने नाशिकचं, तिथल्या पवित्र धार्मिक वातावरणाचं मनापासून कौतुक केलं.
![]() |
| सियाली महादेव मंदिराच्या बाहेरचा नंदी |
आम्ही तिकडून माल रोडला
आलो. तिथे रिक्षा सोडली. थंडी चांगलीच वाजत होती. तिथे भटकलो. पाणीपुरी खाण्याची
हिंमत तिथेही झाली नाहीच. तिथे फारसं काही चांगलं खायला मिळालं नाहीच आणि जे काही
मिळालं ते भयंकर महाग. तिथे भटकलो आणि रिक्षेने परत फिरलो. बियासवरचा छोटा पूल पार
करून आम्ही आलो होतो. हा पूल फारच अरुंद, एका वेळी एका बाजूने एकच गाडी जाऊ शकेल
एवढीच जागा. आम्हाला पुढे जायचंय म्हणत इथे लोकं आपल्या गाड्या दामटवत नाहीत,
मध्ये घुसवत नाहीत. एका साध्या रिक्षेसाठीही भली मोठी श्रीमंत गाडी थांबते. आम्ही
श्रीमंत, आम्ही फुटकळ रिक्षेसाठी का थांबावं ? हा माज तिथे नाही. आपल्याकडे म्हणजे
सगळ्यांनाच पुढे जायचं असतं त्यामुळे गाड्या घुसवण्यात सगळेच पुढे. मनालीतली ही
शिस्तही वाखाणण्याजोगी. जाता येता रिक्षेने केलेल्या प्रवासात या शिस्तीचा आम्ही
चांगलाच अनुभव घेतला आणि ही लोकं या बाबतीतही मनाला भावली.




No comments:
Post a Comment