आम्ही जेवढं मनालीत हिंडलो,
सगळीकडे कमालीची स्वच्छता. ही स्वच्छता तिथल्या सफाई कामगारांनी केलेली नाही तर ही
स्वच्छता तिथल्या लोकांच्या अंगात भिनलेली. रस्त्यावर केरकचरा टाकायचा नाही म्हणजे
नाही. आम्ही गेलो ती वेळ त्या मानाने कमी गर्दीची, पण जर ऐन पर्यटन मौसमात जर तिथे
कुठे घाण दिसलीच तर ती बेशिस्त पर्यटकांनी येऊन केलेली आहे असं खुशाल समजावं. बियासमध्ये
कागदाचा एक चिठोरा कधी दिसला नाही, प्लास्टिक तर दूरची गोष्ट. एक तर स्थानिकांची शिस्त
आणि तिथले कडक नियम यामुळे तिथल्या नद्या मुक्तपणे वाहत आहेत. एके ठिकाणी बियासमध्ये
उतरायला जागा होती आणि तिथेच एक आलू चाट, चना मसाला वाला आपली गाडी लावून उभा होता.
फार चविष्ट आलू चाट खाल्लं आम्ही तिथे. एक परदेशी जोडपं अगदी उत्साहाने हे घाल ते घाल
करून चाट बनवून घेत होतं. तो मुलगा एकेक जिन्नस सांगायचा आणि तो परदेशी माणूस अगदी
चवीने हु हु करायचा. आपल्या इथे कशी भेळ-पाणीपुरीची गाडी असते तशीच ही गाडी पण तिथे
त्या गाडीच्या आजूबाजूला किंचितही कुठे कचरा दिसला नाही. तिथे ठेवलेल्या पत्र्याच्या
डब्यात लोकांनी कागद, चमचे टाकलेले दिसत होते आणि आपल्याकडे पाणीपुरी खाल्ली की तो
बाऊल तिथेच टाकण्यात धन्यता मानली जाते. तुम्ही मोठ्या शहरात रहात आहात म्हणजे कुठे
कसं वागायचं याची अक्कल तुम्हाला असते ही एक भ्रामक कल्पना आहे असं माझं स्पष्ट मत
आहे.
चौथ्या दिवशी सकाळी निघालो
नग्गरला. हे नग्गर म्हणजे कुल्लू आणि मनालीच्या मधला एक छोटासा भाग. नग्गरमध्ये
“जगतसुख” मंदीर हा एक नितांतसुंदर भाग आहे. बाहेरून समजतही नाही की इथे आत अशी कुठली
सुंदर जागा असेल ! ओळीने हॉटेलं, दुकानं असलेल्या भागात आम्ही गाडीतून खाली उतरलो.
आम्हाला आमच्या ड्रायव्हरने कुठे आत जा हे सांगितलं नसतं तर इथे आत कुठली छानशी जागा
आहे हे बाहेरून नक्कीच समजलं नसतं. एका छोट्याशा चिंचोळ्या भागातून आत गेलो तिथे या
मंदिराच्या नावाचे बाण दाखवले होते आणि तिथेच मागे अजून एक मंदीर दिसत होतं. जगतसुखच्या
बरोब्बर मागे अजून एक मंदीर. सकाळची वेळ आणि संपूर्ण परिसरात मन हलकं करणारी एक प्रकारची
शांतता.
![]() |
| गायत्री मंदीर, जगतसुख |
![]() |
| शंकराचं देऊळ |
आम्ही नग्गरच्या किल्ल्यावर
बनवलेल्या “नग्गर कॅसल”ला भेट द्यायला आलो. नग्गर ही कुल्लूची राजधानी होती. कुल्लूचा
राजा सिद्धी सिंघ याने या कॅसलची निर्मिती केली. देवदारचे वृक्ष आणि दगड यांचा वापर
करून हे कॅसल बांधलं गेलंय. आख्खाच्या आख्खा देवदार वृक्ष यासाठी वापरला गेलाय. या
कॅसलमध्ये धातूचा वापर अजिबात केलेला नाही. कॅसलची स्थापत्यकला अफलातून आहे. काही काळानंतर
राजधानी कुल्लूला हलवण्यात आली पण उन्हाळ्यात राज परिवार या कॅसलमध्ये रहायला येई.
नंतर इंग्रजांनी एकेक भाग आपल्या हातात घेण्यास सुरुवात केली तेव्हा केवळ एका बंदुकीच्या
बदल्यात त्या काळच्या राजाने ही हवेली एका इंग्रजाला देऊन टाकली. त्या इंग्रजाने या
हवेलीत थोडेफार बदल केले आणि युरोपीय लोकांना राहण्यायोग्य या हवेलीला बनवलं, अशा प्रकारे
हा किल्ला देशी आणि इंग्रज पद्धत यांच्या मिश्रणाने बनलेली हवेली बनला. या इंग्रजाने
नंतर हा किल्ला म्हणजेच हे कॅसल इंग्रज सरकारला विकून टाकलं. इंग्रज सरकारचं उन्हाळ्यात
येथे न्यायालयीन कामकाज चाले. १९४७ साली इंग्रज येथून गेले आणि मग हा किल्ला एक प्रेक्षणीय
स्थळ बनून राहिला, इथे लोकांची राहण्याची सोयही होऊ लागली. पण नंतर रीतसर या हवेलीला
हिमाचल प्रदेशच्या पर्यटन विभागाकडे सुपूर्द केलं गेलं. हा पर्यटन विभाग आता या हवेलीची
देखरेख करतो. या हवेलीतल्या खोल्या हॉटेलच्या स्वरुपात बनवून इथे पर्यटकांच्या राहण्याची
सोयही करण्यात आली आहे. इथे एक खानावळही चालवली जाते. पर्यटकांना हा किल्ला बघण्यासाठीही
उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या कॅसलने कित्येक नैसर्गिक संकटं झेलली पण ते तसंच
ताठ उभं राहिलं. १९०५ साली आलेल्या महाभयंकर भूकंपात जिथे मणिकर्णचं शंकराचं देऊळ एका
बाजूला कललं तिथेच या कॅसलचं कणमात्रही नुकसान झालं नाही. या हवेलीची गरजेप्रमाणे पर्यटन
विभागाकडून डागडुजीही केली जाते पण ती करताना हवेलीच्या मुख्य ढाच्याला अजिबात धक्का
लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात येते.
मध्ययुगीन भारतीय स्थापत्यकलेचा
एक अद्वितीय अविष्कार म्हणजे हे कॅसल. दगड आणि लाकूड यांच्या संयोगाने बनवण्यात येणाऱ्या
हिमालयीन “काष्ठकुणी” वास्तुकलेचं अफलातून दर्शन म्हणजे ही नग्गरची हवेली. ही हवेली
अतिशय उत्तम स्थितीत आहे. एवढी जुनी कलाकृती कुठेही ढासळलेली दिसत नाही. कलेचा एक आणि
एक भाग, बारीक बारीक कलाकुसर जशीच्या तशी आहे. हवेली खूप मोठी नाही पण तिचा राजेशाही
बाज बघता क्षणी नजरेत भरतो. आत एक वस्तुसंग्रहालय आहे. काही खोल्या आहेत, ज्या बघण्यासाठी
उपलब्ध आहेत.
हवेलीच्या एका बाजूला बियास व्हॅलीचं विहंगम दर्शन घडतं आणि तिथूनच खालून बियास नदीही वाहते. हे विहंगम दर्शन या कॅसलला अजूनच भव्य बनवतं. या हवेलीची अजून एक ओळख म्हणजे इथे बऱ्याच चित्रपटांचं तसेच मालिकांचं चित्रीकरण होतं. माचीस सिनेमात ही हवेली होती. असे अजूनही सिनेमे आहेत पण सगळ्यात ठळक उदाहरण द्यायचं तर “जब वुई मेट” या चित्रपटातलं “ये इश्क़ हाये” या गाण्याचं चित्रीकरण इथे झालेलं आहे. तिथेच आवारात एक शाली आणि स्थानिक कशिदा केलेल्या कपड्यांचं दुकानही आहे.
हवेलीच्या एका बाजूला बियास व्हॅलीचं विहंगम दर्शन घडतं आणि तिथूनच खालून बियास नदीही वाहते. हे विहंगम दर्शन या कॅसलला अजूनच भव्य बनवतं. या हवेलीची अजून एक ओळख म्हणजे इथे बऱ्याच चित्रपटांचं तसेच मालिकांचं चित्रीकरण होतं. माचीस सिनेमात ही हवेली होती. असे अजूनही सिनेमे आहेत पण सगळ्यात ठळक उदाहरण द्यायचं तर “जब वुई मेट” या चित्रपटातलं “ये इश्क़ हाये” या गाण्याचं चित्रीकरण इथे झालेलं आहे. तिथेच आवारात एक शाली आणि स्थानिक कशिदा केलेल्या कपड्यांचं दुकानही आहे.
![]() |
| जगतीपट मंदीर |
![]() |
| मंदिराच्या आतील स्थानिकांसाठी पूजनीय असा दगड |
याच कॅसलमध्ये खानावळ आहे.
कॅसलच्या पहिल्या मजल्यावर बियास नदी आणि तिच्या दरीचं विहंगम दृश्य न्याहाळत लोकांना
जेवणखाण करता यावं म्हणून तिथल्या व्हरांड्यात तशी सोय केलेली आहे. आम्ही थंडीत, गार
वारं सुटलेलं असताना त्या शाही कॅसलमध्ये विहंगम दृश्याच्या साथीने जेवणाचा आस्वाद
घेतला. आपण कधी राजांच्या हवेलीत बसून समोरचं सृष्टीसौंदर्य न्याहाळत जेवण जेवलो होतो
ही एक आठवण...
![]() |
| ही कॅसल परिसरातली एक इमारत. तिथली घरं, या अशा कचेऱ्या यांच्या उतरत्या छपरांना अशाच फरश्या लावलेल्या असतात |








No comments:
Post a Comment