मणिकर्ण मनालीपासून लांब
आहे. मनालीपासून आधी कुल्लूला आलो. वाटेत बियासबरोबरच एक पार्वती नावाची नदी दिसायला
लागली. एके ठिकाणी या दोघींचा संगमही बघायला मिळाला. आता आम्ही बियासपासून दूर जात
या पार्वती नदीबरोबर निघालो होतो. छोटे आणि ते ही वळणावळणाचे रस्ते. वळणं इतकी
कठीण आणि त्यात रस्ता अगदी छोटा. मध्येच डोंगर चढायचा मध्येच थोडा उतरायचा आणि आता
सोबतीला होती पार्वती दरी. इथे काही बर्फ वगैरे काही नाही पण त्याची माती मात्र
छान पांढरी. या मातीचं सौंदर्य अजूनच वेगळं. इथे हमखास बघायला मिळत होती ती इथल्या
लोकांनी सामान या डोंगरापासून त्या डोंगरावर पाठवण्यासाठी केलेली सोय. दोन डोंगर
तारांनी जोडून त्यावर झोपाळे बांधले होते. हे असे कित्येक झोपाळे आम्हाला इथे
पहायला मिळाले. कुल्लू असुदेत नाहीतर बियास नाहीतर पार्वती या सगळ्या दऱ्यांचं एक
वैशिष्ट्य, या सगळ्या छान हिरव्या दऱ्या.
हा एक मोठा प्रवास चालू
असताना कसोल नावाचं गाव लागलं. कसोल ही एक दरीही आहे आणि इथून पार्वती नदी वाहते.
हे कसोल चरससाठी प्रसिद्ध आहे. इथल्या चरससाठी परदेशातून लोकं येतात. या गावात
आम्हाला परदेशी पर्यटक दिसले. इथे या कसोलमध्ये काही भाग असे आहेत तिथे खुद्द
भारतीयांनाही प्रवेश नाही. फक्त आणि फक्त परदेशी लोकांसाठी ते भाग आरक्षित आहेत.
हे कसोल एक पर्यटन स्थळ म्हणूनही पुढे येत आहे. पार्वती नदीमुळे काही छान छान जागा
तिथे बघायला मिळतात. त्या चरसवाल्या गावात आम्ही काही गेलो नाही, गाडीतूनच पाहत
पुढे निघालो. असं करत करत हा असा बऱ्याच वेळापासून चाललेला प्रवास शेवटी एकदाचा
गंतव्य स्थानी येऊन संपला.
मणिकर्णला गाडीतून
उतरताना न विसरता छोटी शाल घेतली. तिथे एक प्रसिद्ध गुरुद्वाराही आहे आणि तिथे
जायचं तर डोकं झाकायला हवं. आपण कुठल्या कार्यक्रमाला गेलो तर त्या कार्यक्रमाचे
यजमान लगेच आपल्या स्वागताला पुढे येतात. अगदी तसंच आम्ही गाडीतून उतरून पुढे आलो
तर एक शीख पुढे आला. आम्ही त्याला म्हणालो, शिव मंदीर... त्याने लगेच आम्हाला
कुठल्या दिशेला जा हे दाखवलं आणि ते ही अगदी अगत्याने...
मणिकर्ण, ज्याप्रमाणे या
जागेचं नाव तशीच इथली गोष्ट. एकदा भ्रमण करत असताना शंकर आणि पार्वती या जागी आले
आणि त्यांना ही जागा फार आवडली. त्या दोघांनी इथे तब्बल ११०० वर्षे तपश्चर्या करत
निवास केला. एके दिवशी इथल्या पार्वती नदीत अंघोळ करत असताना पार्वतीच्या एका
कानातल्याचा मणी तिथे त्या पाण्यात पडला आणि पाताळात गेला. शंकर यांनी आपल्या
गणांना हा हरवलेला मणी शोधण्यासाठी पाठवलं. खूप शोधूनही काही मणी मिळाला नाही
म्हटल्यावर शंकर खूप चिडले आणि त्यांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला. हे पाहून सृष्टी
थरथर कापायला लागली, सगळे देव खूप घाबरले. शंकरांनी तिसरा डोळा उघडल्यावर तिथे एक
शक्ती प्रकट झाली आणि तिने नैणादेवीचं रूप घेतलं. या देवीचं मंदीर मणिकर्ण येथे
आहे आणि या मणिकर्णलाच या देवीचं जन्मस्थानही म्हटलं जातं. मणी आणण्यासाठी ही नैणा
देवी पाताळात गेली आणि शेषनागाला हा मणी द्यायला सांगितला. त्यावेळी शेषनागाने खूप
जोरात फुत्कार मारला आणि त्याबरोबर पृथ्वीतून गरम पाण्याची धार जोरात वहायला
लागली. या गरम धारेतून पार्वतीच्या मणीबरोबरच बरेच मणी बाहेर आले. पार्वतीने आपला
मणी घेतला आणि बाकीच्या मण्यांना दगड करून टाकलं. मणी मिळाल्यावर शंकराचा राग शांत
झाला आणि या जागेचं नाव मणिकर्ण असं पडलं. या जागेचा उल्लेख पुराणांमध्येही आहे
तसेच महाभारतातही या जागेचा उल्लेख आढळतो. इंद्राने अर्जुनाला दिलेल्या
पाशुपतास्त्राची परीक्षा शंकर भिल्लाचं रूप धारण करून इथेच घेतात आणि अर्जुनाला
इथेच वर देतात. ही मणिकर्ण जागा शंकराला इतकी प्रिय की आपल्या काशी नगरीत त्यांनी
एका घाटाचं नाव मणिकर्णिका घाट असं ठेवलं. हा वेगवान गरम पाण्याचा प्रवाह आजही
तिथे अखंड वाहत आहे. या गरम पाण्याच्या झऱ्याचं प्रचंड गरम (८४ ते ९४ अंश
सेल्सियस) पाणी आणि या पार्वती नदीचं प्रचंड गार पाणी असं एकाच जागी बघायला
मिळतं.
आम्ही शिव मंदिराच्या
दिशेने जाऊ लागलो. मुद्दाम ठरवून नाही पण योगायोगाने त्या दिवशी महाशिवरात्र होती.
तिथल्या बाजारात आणि गरम पाण्याच्या त्या प्रचंड मोठ्या धारेवर बांधलेलं हे
शंकराचं देऊळ. पार्वती नदीचा समोरून येणारा मन थक्क करून टाकणारा जोरदार प्रवाह
आणि खाली प्रचंड वेगाने येणाऱ्या त्या गरम पाण्याच्या वाफा. हा थरार अनुभवायचा तर
हे मंदीर ही एक अतिशय योग्य जागा. मंदिरात शिरलो तर समोर शंकराची हातात त्रिशूळ
घेतलेली एक खूप मोठी मूर्ती आणि तिच्या समोरच ते अती गरम पाण्याचं कुंड. त्या
भयंकर गरम पाण्याच्या मोठ्याल्या वाफा अव्याहत वर येत असतात आणि बहुतांश वेळेला ती
शंकराची मूर्ती आपल्याला नीट दिसतही नाही. पण त्या एवढ्या मोठ्या शंकराच्या
मुर्तीसामोरच जमिनीतून वर येणाऱ्या वाफा पाहणं हा ही एक थरारक अनुभवच.
या गरम पाण्याच्या कुंडात अन्नही शिजवलं जातं. या पाण्यात गंधक असल्याने हे पाणी औषधी आहे. तिथे छोट्या कापडी पिशव्यांत तांदूळ मिळतात आणि लोकं ते तांदूळ त्या पाण्यात शिजवतात. दहा एक मिनिटात आरामात भात शिजतो. आपल्या नवीन संसारात स्वयंपाक करायला सुरुवात म्हणून नवीन लग्न झालेली जोडपी इथे हा तांदूळ शिजवून भात तयार करतात. त्या खळखळ उकळणाऱ्या कुंडात चहाही बनवला जातो, या चहाची चव आम्ही तिथे चाखली.
या शंकराच्या चिकटूनच मूर्तीला मागे शिव पार्वतीचं देऊळ आहे. छोटंसंच आहे, आतल्या मूर्ती अतिशय सुरेख.
![]() |
| शंकराच्या मूर्तीसमोरचं गरम पाण्याचं कुंड |
या गरम पाण्याच्या कुंडात अन्नही शिजवलं जातं. या पाण्यात गंधक असल्याने हे पाणी औषधी आहे. तिथे छोट्या कापडी पिशव्यांत तांदूळ मिळतात आणि लोकं ते तांदूळ त्या पाण्यात शिजवतात. दहा एक मिनिटात आरामात भात शिजतो. आपल्या नवीन संसारात स्वयंपाक करायला सुरुवात म्हणून नवीन लग्न झालेली जोडपी इथे हा तांदूळ शिजवून भात तयार करतात. त्या खळखळ उकळणाऱ्या कुंडात चहाही बनवला जातो, या चहाची चव आम्ही तिथे चाखली.
या शंकराच्या चिकटूनच मूर्तीला मागे शिव पार्वतीचं देऊळ आहे. छोटंसंच आहे, आतल्या मूर्ती अतिशय सुरेख.
तिथेच शेजारी आणि गरम
पाण्याच्या प्रचंड वेगवान धारेवरच शंकराची पिंडी आहे. समोर मोठा नंदी. या मंदिरात
प्रसाद म्हणून फळांचा ढीग होता आणि एकेक मूठ फळं प्रसाद म्हणून वाटली जात होती. या
पिंडीच्या प्रदक्षिणा भागातून पार्वती नदी आणि ती जमिनीतून येणाऱ्या त्या
वाफाळत्या वेगवान गरम पाण्याची धार अगदी छान बघता येते.
आम्ही तिथे गेलो तो दिवस
महाशिवरात्रीचा असूनही मंदिरात फार धक्काबुक्कीसारखी गर्दी नव्हती. लोकं शांतपणे
रांगा लावून दर्शन घेत होते. दोन्ही मंदिरं फार मोठी नाहीत पण तरीही कुठलाही गोंधळ
तिथे दिसत नव्हता. वातावरण फारच सुंदर, मनाला गोंजारणारं असं होतं आणि त्याला
अध्यात्मिक किनार होती तिथे लावलेल्या शंकराच्या भजनाची. हिंदीतल्या एका प्रसिद्ध
भजन गायकाचा तो आवाज त्या वातावरणाला अध्यात्मिकतेच्या एका उच्च स्थानावर नेऊन
ठेवत होता. तिथून लगेच जावंसं वाटलं नाही म्हणून थोडावेळ तिथेच बसलो.
लोकांची ती
दर्शनाची लगबग, कोणी हात जोडतंय तर कोणी काहीतरी तोंडाने पुटपुटतंय, इकडे कोणाचे
तांदूळ शिजत आहेत आणि कान तृप्त करायला ते भजनाचे स्वर... या स्वरांना
पार्श्वसंगीत होतं जोरात वाहणाऱ्या पार्वती नदीचं आणि त्या धाडधाड जमिनीतून
येणाऱ्या गरम पाण्याच्या प्रवाहाचं. बसल्या बसल्या प्रसाद खाल्ला, त्या गंधकाच्या
पाण्यात बनवलेला चहाही घेतला. त्या मंदिराच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात थांबत
थांबत फिरून झालं. महिला तिथे त्यांनी शिजवलेला भात आपणहून दाखवायच्या तोही बघून
झाला. इच्छा नव्हती पण बसून तरी किती वेळ बसणार ! मग तिथून निघालो. तिथे अजून ३-४
प्राचीन मंदिरं आहेत, ती पहायची होती. तिथे बाहेरच असलेल्या बाजारातून निघालो. हे
असे छोटे छोटे स्थानिक बाजार बघायला मला फार आवडतं. तिथल्या लोकांनी बनवलेल्या
वस्तू बघत बघत पुढे जातच होते आणि तिथे एका घराने किंवा म्हणा घराच्या बाहेरच्या
दरवाजाने मला तिथे थांबवून ठेवलं.
![]() |
| शंकर-पार्वती मंदीर |
![]() |
| शंकराची पिंडी |
![]() |
| मंदिराबाहेरील नंदी |
![]() |
| मंदिरातून दिसणारी पार्वती नदी आणि उजवीकडे गरम पाण्याच्या भूमिगत धारेच्या वाफा |
![]() |
| दरवाजाचं सगळं लाकडी काम फोटोत येऊ शकलं नाही |
![]() |
| नैणा देवी, मणिकर्ण |
हिमाचलात प्रसाद म्हणून
एक वेगळ्या प्रकारचे साखरफुटाणे दिले जातात. चवीला छान असतात. तिकडे बाहेरच एके
ठिकाणी त्याचं एक पाकीट आम्ही विकत घेऊन मुंबईला आणलंय. पाकीट घेतलं की आपल्याकडे
प्लास्टिकच्या पिशवीत लगेच ते दिलं जातं पण इथे प्लास्टिक बंदी असल्याने आम्हाला
वर्तमानपत्राच्या बनवलेल्या छोट्या पिशवीत ते पाकीट मिळालं, त्या पिशवीला बंद
नव्हते पण रस्त्यावरच्या अगदी छोट्या दुकानातही या अशा कागदी पिशव्या दिल्या
जातात. या प्लास्टिक बंदीमुळे दिसणारी स्वच्छता आणि नद्यांची स्वच्छ पात्रं तिकडे
बघायला मिळतात. अर्थात स्वच्छता हा गुण तिकडच्या लोकांनी अंगी बाणवून घेतलाय, आमचं
घोडं नेमकं इथेच अडतं. असो...
इथे एका अमृतसर दा
ढाबामध्ये शिरलो. आत कोणीही नाही. गिऱ्हाईक आलं म्हटल्यावर तिथला सरदार आणि त्याची
सरदारनी एकदम खुश झाले. एक आलू पराठा खाऊन बघुयात म्हणून एक आलू पराठा सांगितला.
सरदारनी उत्साहात परोठा बनवायला लागली. तिचा उत्साह जरा जास्त होता की तिला
स्वतःच्या पाककलेची इतकी खात्री होती ते माहीत नाही, तिने दोन परोठे बनवले. परोठा
इतका जबरदस्त होता की “पण आम्ही एकच सांगितला होता” म्हणणारे आम्ही दुसरा पराठा
मागून घेतला. आमच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी घडते. आम्ही दोघे जिथे जिथे जातो तिथे
तिथे गर्दी आमच्या मागोमाग येते. खोटं नाही अगदी खरं. पाणीपुरी खायला गेलो की
आठदहा जणं आमच्या मागोमाग येतात. आधी कोणीही नसतं. एखाद्या हॉटेलात गेलो आणि हॉटेल
बऱ्यापैकी रिकामं असेल तर आम्ही तिकडे गेल्यावर हॉटेल पूर्ण भरून जातं. हे एकदोनदा
नही तर बहुतेक करून नेहमी घडतं. आमचं वैयक्तिक नशीब कसं का असेना पण आम्ही
इतरांसाठी चांगलेच नशीबवान आहोत. तिकडे त्या ढाब्यावरही हेच घडलं. आम्ही गेलो
तेव्हा तिथे कोणीही नव्हतं. ती सरदारनी गिऱ्हाईक नाही म्हणून वैतागलेली दिसत होती
पण आम्ही तिकडे परोठा खायला सुरुवात केली आणि तिथे दोन मोठी कुटुंबं आली आणि तिचा
ढाबा पूर्ण भरून गेला. त्या ढाब्याची अवस्था अशी होती की लस्सीसाठी त्यांच्याकडे
दहीही नव्हतं. आम्ही लस्सी मागितली म्हटल्यावर त्या सरदाराने लस्सी... म्हणत
आमच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं. नसेल तर राहूदेत असं आम्ही म्हटल्यावर
त्याने कोणालातरी दही आणायला पाठवलं. लस्सीही भन्नाट होती. परोठा, लस्सी घेऊन
आम्ही तिथून बाहेर पडलो. ढाब्यात शिरलो तेव्हा आत चिटपाखरू नव्हतं आणि ढाब्याबाहेर
पडलो तेव्हा ढाबा भरलेला होता. गिऱ्हाईक नाही म्हणून शांत बसलेली सरदारनी आणि तिथे
काम करणारी मुलं यांच्या हाताला आम्ही बाहेर पडलो तेव्हा काम मिळालं होतं. काहीही
म्हणा, बाहेर पडताना एकदम मस्त वाटलं.
तिकडे डोक्यावर हिमाचली
टोपी घालून हिमाचली फिरताना दिसत होते. त्या बाजारात या अशा टोप्या बऱ्याच दिसत
होत्या आणि दिसत होती त्या टोप्यांमध्ये ठेवलेली तिथली स्थानिक फुलं. म्हणायला
यांना जस्मिन म्हणतात. जस्मिन हे इंग्रजी नाव आणि या जस्मिन वर्गात बरीच सुवासिक
फुलं येतात. आपल्याकडे या सगळ्यांची वेगवेगळी नावं आहेत आणि हिमाचलच्या स्थानिक
फुलाचं नाव आहे, “बोदी”. आपण कशी केसात फुलं माळतो तशी अगदी छानपैकी हे हिमाचली ही
बोदी फुलं त्यांच्या टोपीत घालतात. या फुलांना त्यांच्या देवांच्या दरबारातही
विशेष स्थान. प्रत्येक देवाला ही फुलं वाहिलेली दिसत होती. आपल्याकडे कसं प्रसाद म्हणून
देवाच्या चरणी वाहिलेलं फुल देतात तसंच इथे ही बोदी फुलं देतात. ही बोदी फुलं
अतिशय नाजूक आणि दिसायला अगदी गोड. पांढरट मोती रंगाच्या पाकळ्या आणि मध्ये छान
पिवळाधमक रंग. दोनच परागकण पराग तंतूंनी फुलाला जोडलेले आणि त्याच्या भोवती
फुलाच्या मध्यभागी गोल फेरा घेतलेला हा पिवळाधमक भाग उभा राहिलेला. पाकळ्या पसरट
आणि हा गोल पिवळा भाग दोन पराग तंतूसह ताठ उभा. जमिनीत ही फुलं बारीक गवताच्या
पातीला धरून वाढतात. यांचं झाड नाही तर झुडपं असतात. गवतीचहा जमिनीतून कसा वाढतो
अगदी तशीच या बोदी फुलांची पातीच्या आकाराची ही झुडपं वाढतात. आपल्याकडे कसे गुलाब
बागांमध्ये लावले जातात. तशी ही बोदी फुलं इथे जागोजागी लावलेली दिसतात. हे यांचं
क्षेत्रीय फुल, या फुलाएवढं महत्त्व हिमाचलमध्ये बाकी कुठल्याही फुलाला नही. हे
फुल अतिशय सुवासिक, अतिशय मोहक वासाचं. वाटत होतं यांना मुंबईला घेऊन यावं, पण
मुंबईची हवा इथल्या हवेच्या परास्परभिन्न. या नाजूक मोहक फुलाला मुंबई कुठे
मानवणार ! हा हिमालयाचा ठेवा थंडगार हिमाचलमध्ये फुलणार... या बोदी फुलांना मी
कॅमेऱ्यातून मुंबईला घेऊन आलेय... तोकडे जेव्हा जेव्हा ही फुलं बघायला मिळाली
तेव्हा ती डोळे भरून पाहून घेतली आणि कुठे कुठल्या मंदिरात मिळाली तर मन भरून
त्याचा सुवास छातीत भरून घेतला. बाकी ज्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या
प्रदेशात रहावं.
ही सगळी मंदिरं बघून
परतत असताना बाजारात आम्हाला अजून एक शंकराचं मंदीर लागलं, त्या पहिल्या शिव
मंदिराच्या जवळच. मंदिराची जागा छोटी असल्याने मंदिरातली गर्दी जाणवत होती आणि
तिथे मंदिराच्या परिसरात बाहेरच एक शीख माणूस आणि एक छोटा शीख मुलगा द्रोणातून खीर
आणि बटाट्याची ओलसर भाजी प्रसाद म्हणून वाटत होते. खीर खायला अगदी चमचा वगैरेही.
यांची खीर तांदुळाची असते. फार चविष्ट. लोकं येत आहेत हे दोघं त्यांना खायला देत
आहेत. लोकांची गर्दी रोडावत नाही आणि हे दोघे यांना खीर, भाजी देण्याचं काही
थांबवत नाहीत. डबे आणि प्लास्टिकच्या पिशव्या भरभरून लोकं खीर मागत आहेत आणि हे
दोघे सरदार घ्या घ्या करत देत आहेत. यांची पातेली रिकामी झाली की आतून मंदिरातून
अजून आणत आहेत. कशाला काही अंत नाही. ते पाहताना मला कट्टरपंथी खलिस्तानी आठवत
होते. आणि त्यामुळे आमच्यासमोरच शंकराच्या मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी या
सरदार लोकांचं अन्नदानाचं कार्य बघून अगदी छान वाटलं. आमची तिथली सगळी मंदिरं बघून
झाली होती आणि आता फक्त तिथला एक गुरुद्वारा राहिला होता. या भागात बरेच शीख
पर्यटकांना रस्ता सांगण्यासाठी बसलेले असतात. पार्वती नदीला वरून पाहिलं पण तिच्या
काठी एकदा जावं असं खूप वाटत होतं म्हणून त्या मार्केटमधल्या एका शीख दुकानदाराला
विचारलं. तो म्हणतो, नदीला वरूनच बघायचं, नदीवर जायला मनाई आहे. मग काय आम्ही सरळ
गुरुद्वाराचा रस्ता धरला. डोक्यावर ती बरोबर घेतलेली शाल गुंडाळली आणि निघालो.
गुरुद्वाराच्या प्रवेशाच्या ठिकाणीच वर शुभ दीपावलीचा स्टीकर चिकटवलेला दिसला.
लगेच मनात आलं, अरे वाह.... आत गेलो तर गुरुद्वाराच्या प्रत्येक खांबावर आपल्या
देवीदेवतांचे फोटो लावलेले दिसले. ते पाहिलं आणि खरोखर मस्त वाटलं. हे असं सगळीकडे
बघायला मिळत नाही आणि ते ही कुठल्या महत्त्वाच्या किंवा प्रसिद्ध धार्मिक स्थळी तर
अजिबात नाही पण देवभूमी हिमाचलच्या धार्मिक वातावरणाचा रंग यांच्यावरही चढलेला
दिसला. आमच्या या मणिकर्ण सहलीचा शेवट हा असा छान झाला. हा गुरुद्वारा या
शिखांसाठी खूप मोठं श्रद्धेचं स्थान. पंजाबच्या अगदी कानाकोपऱ्यातून लोकं इथे
दर्शनासाठी येतात.
आमचा परतीचा प्रवासही
असाच मोठा होता पण परत जाताना काही ठिकाणी थांबून जायचं होतं. कसोल तर गाडीतून दिसेल
तेवढंच पाहिलं आणि आम्ही कुल्लूच्या दिशेने निघालो. छोट्या छोट्या वळणावळणाच्या
दाट झाडीच्या रस्त्यावरून जाऊ लागलो आणि वाटेत आम्ही थांबलो वैष्णौ देवीच्या
दर्शनासाठी. कुल्लूत अगदी रस्त्यावरच हे ठिकाण आहे. समोर बियास वाहत आहे आणि
तिच्या एका बाजूला हे ठिकाण. एकूण आठ मजल्यांचं हे ठिकाण आणि प्रत्येक मजल्यावर
वेगवेगळ्या देवांचं मंदीर. तिथे धार्मिक, अध्यात्मिक पुस्तकंही मिळतात. एके ठिकाणी
शंख, जपमाळसारख्या धार्मिक गोष्टीही मिळतात. इथेच वैष्णौ देवीची गुहा तयार केली
आहे. सरपटत आत जावं लागतं. इथे आम्ही काही बरोबर घेऊन गेलो नव्हतो पण देवीच्या
देवळात मला लाल बांगड्या, लाल रिबीन आणि लाल टिकल्या या अशा सुहागनच्या वस्तू
मिळाल्या. यांच्याकडे सवाष्णीसाठी लाल रंगाचं महत्त्व. महाशिवरात्र असल्याने या
मंदिरातही गर्दी होती. इथून आम्हाला जायचं होतं सशांच्या शेतात म्हणजेच रॅबिट फार्ममध्ये.
आम्ही मोबईल मॅप्समध्ये
बरंच शोधलं पण ती जागा काही मिळेना. मोबाईलमध्ये नकाशा या इथे म्हणून बाण दाखवत
आहे पण ती जागा काही दिसेना. पुढे गेलेली गाडी मागे घे करत आम्ही तिथे हे शेत बरंच
शोध शोध शोधलं. शेवटी तो बाण जिथे दाखवत होता तिथे आम्ही गाडीतून उतरलो. लोकांच्या
घरांमध्ये तो नकाशा दिशा दाखवत होता. आम्ही आत त्या स्थानिक वस्तीत शिरलो.
खेड्यांमध्ये असतात ना तशी घरं. एवढंच काय शेणाचाही वास येत होता. इकडे तिकडे
पाहिलं कोणी नाही. लोकांची घरं दिसत आहेत पण कोणीही बाहेर दिसेना आणि कुठे हे
ससेही दिसेनात. एका घराचं दार अर्धवट उघडं होतं आणि बाहेर दोन चपलांचे जोड दिसत
होते. आतून टीव्हीचा आवाजही येत होता पण आम्ही तिथे इतकं इकडून तिकडे केलं पण
कोणीही बाहेर डोकावायला आलं नाही. तिथेच वरच्या मजल्यावर जाऊन पाहिलं, काही कोणी
नाही. काय करावं कळेना. नवरा म्हणाला, जाऊदेत परत जाऊ. मी म्हणाले, थांब कोणीतरी
दिसेल. मी तिथेच इकडून तिकडे कोणी दिसतंय का बघू लागले. तेवढ्यात एक माणूस दिसला.
आम्ही लगेच त्याला सशांबद्दल विचारलं. तो म्हणाला, बघायचे आहेत ? चला...
आम्ही त्याच्या मागोमाग
त्याच्या सशांच्या शेतात जायला लागलो. छोट्या बागेतून आम्ही सशांपाशी जाऊन
पोहोचलो. हे ससे अगदी वेगळे. जाडजूड, धष्टपुष्ट. त्यांच्या अंगावरचे केस एकदम
लांब. आम्ही दिसलो म्हटल्यावर सगळे एकदम आक्रमक झाले. सशांची जी एक प्रतिमा मनात
होती त्याला एकदम छेद देणारे हे ससे. पांढरे, काळे, काही पांढरे काळे संमिश्र. त्यांना
पिंजऱ्यात ठेवलं होतं आणि सगळे ससे एकजात धाड धाड पिंजरे वाजवत होते. पिंजऱ्याच्या
आत होते म्हणून, मोकळे असते तर ते सगळे आमच्यावर चालून आले असते. मगाशी जो शेणाचा
वास आला होता, तो इथूनच आला होता. जरा त्यातल्या त्यात शांत कुठला दिसतोय का हे
बघतो म्हणत त्याने एका सशाला बाहेर काढलं आणि आमच्या हातात दिलं. यांना मुद्दाम
पाळलं जातं. यांचे केस तिकडे गरम कपडे बनवण्यासाठी वापरले जातात. फार मऊ, मुलायम
केस आणि त्याच वेळी उबदार. हिडींबा, वशिष्ठ इथेही ससे होते. हातात धरण्यासाठी
बायका यांना घेऊन उभ्या होत्या. पण ते ससे शांत, माना टाकलेले, निपचित बसणारे आणि
अगदी बारीक पण हे ससे त्यांच्या एकदम विरुद्ध. याबद्दल विचारल्यावर तो म्हणतो, या
बायका इथूनच ससे घेऊन जातात पण त्या यांना खायला देत नाहीत म्हणून ते ससे बारीक
आणि शांत असतात. मी पण वशिष्ठला एका सशाला हातात धरलं होतं. आम्ही न सांगता दोन
बायकांनी दोन ससे माझ्या खांद्यावरही आणून ठेवले होते. मी धरलेला ससा मान टाकून
बसला होता. मला वाटलं होतं की त्याला झोप आली असेल, दमला असेल. पण ते खरं कारण
त्या माणसाकडून समजलं. आधी माहीत असतं तर कदाचित त्या एका सशालाही हातात धरलं
नसतं... ते
मस्त मस्त ससे बघून आम्ही परत फिरलो. आता एक शेवटचा दिवस उरला होता मनालीतला. तो
झाला की मनालीचा निरोप घ्यायचा होता.












No comments:
Post a Comment