मनालीचा गावभाग किंवा स्थानिक
मनाली खूप उत्तमरीत्या पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी निघालो सोलंगला. सोलंग व्हॅली.
सोलंग दरी. मनालीला आमच्या अंगावर कमीत कमी दोन ते तीन थर गरम कपड्यांचेच असायचे. तरीही
थंडी वाजायची पण हु हु... काय मस्त थंडी आहे करत मी ती थंडी सहन करायचे. सोलंगला जातानाही
आम्ही असे एकावर एक असे तीन गरम कपडे घालून निघालो. सोलंग ही बर्फाची दरी आहे. प्रचंड
मोठ्या अशा या दरीत लोकं मनसोक्त बर्फात खेळण्यासाठी येतात. फेब्रुवारीच्या तिसऱ्या
चौथ्या आठवड्यात आम्ही तिकडे हिमाचलला होतो. त्यावेळी जर बर्फ बघायचा तर तो सोलंगलाच
कारण इतक्या लवकर रोहतांगला जाणारा रस्ता मोकळा होत नाही. तर या सोलंगला जायचं तर तिकडचे
खास गरम कपडे भाड्याने घ्यावे लागतात. हे कपडे सक्तीचे नाहीत पण एक खबरदारी म्हणून
हे कपडे घेणं बरं असतं. आम्ही आधीच एवढे कपडे अंगावर घातले होते ते कमी म्हणून अजून
कपडे घालण्यासाठी एका तंबूत गेलो. इथे अशी बरीच तंबूवजा दुकानं आहेत आणि इथल्या कपड्यांचे
दर हिमाचल सरकारने ठरवून दिलेले आहेत. मी दिसले म्हणून दोन हिमाचली बायका भराभरा पुढे
आल्या. इतक्या सुरेख बायका.. त्यातली एक तर इतकी गोड होती दिसायला ! हिमाचलच्या बायका-मुली
दिसायला अतिशय गोड. हसतमुख आणि चेहऱ्यावर सौम्यपणा, खुनशीपणा नाही. सरळ साध्या गोंडस
बायका. तिथे फिरताना हे प्रकर्षाने जाणवलं. पण इथली लोकंच एकंदर सरळसाधी. आहे त्यात
आनंदी राहणारी. कुठला अन्याय होत आहे, आपला कुठला हक्क हिरावून घेतला जात आहे म्हणून
पेटून उठणाऱ्यांपैकी ही लोकं नाहीत. हक्कांसाठी न भांडता, जेवढं आहे त्यात राहुयात
असा विचार करणारी ही लोकं. या अशा स्वभावामुळे या लोकांवर कित्येकदा अन्याय झालाय...
पण शेवटी स्वभावच असा, काय करणार !
ही इथली ती गोड बाई मला फारच
आवडली आणि हिचा एक फोटो काढावा असं मनात आलं. त्यावेळी मी काही बोलले नाही. नाही नाही
म्हणता हातात, पायात, अंगावर हे सगळे कपडे घातले आणि आम्ही सोलंगला जाण्यासाठी निघालो.
आधीच माझी उंची फार नाही आणि अंगकाठीही अगदी सडपातळ नाही, त्यामुळे आधीचे आमचे कपडे
आणि वर अजून हे कपडे यामुळे मी बॉम्ब निकामी करण्यासाठी येणारी लोकं किंवा चंद्रावर
उतरणारे चांद्रवीर कसे दिसतात तसे काहीतरी आपण दिसतोय असं मला वाटायला लागलं. पण आता
काय....
हळूहळू आम्ही सोलंगच्या दिशेने जायला लागलो आणि जो बर्फ आम्ही लांबून पाहायचो
तो आता हळूहळू आमच्या जवळ जवळ येऊ लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फच बर्फ आणि
कशाबशा मोकळ्या झालेल्या रस्त्यावरून आमची गाडी पुढे जात होती. बर्फाचे ते डोंगर आता
आजूबाजूला दिसायला लागले. सगळ्या बाजूंनी बर्फाचे डोंगर, मध्ये रस्ता, रस्त्याच्या
दोन्ही बाजूला बर्फच बर्फ आणि त्यातून जाणारी आमची गाडी. असं मजल दरमजल करत आम्ही बर्फाच्या
राज्यात सोलंगला येऊन पोहोचलो. बर्फात वाढणारे ओकसारखे वृक्ष त्या बर्फाच्या साम्राज्यात
अगदी उठून दिसत होते. नुसताच बर्फ असता तर कसलं आलंय सौंदर्य ! पण या सौंदर्यात कुठलीही
कमतरता नको म्हणूनच कदाचित हे असे वृक्ष विधात्याने निर्माण केले असावेत. वाटलं होतं
तोबा गर्दी असेल, वाहनांची रहदारीही खूप असेल पण असं काहीच तिकडे नव्हतं. ही एवढी विशाल
सोलंग दरी, त्यामानाने तेवढी गर्दी नव्हतीच. हिमाचलचा पर्यटन काळ सुरु होण्यास बराच
वेळ असल्याने तोबा म्हणावी अशी गर्दी आम्हाला कुठेच कधीच लागली नाही, ही एक सुखावह
बाब.
खूप उंचावर असला तरी अथांग
पसरलेला तो सखल भाग आणि त्यावर दृष्टी जिथे जिथे पोहोचेल तिथे फक्त बर्फ, अगदी जमिनीवरही.
तिथे काही खेळ चालू होते, पॅराग्लायडिंग वगैरे. काही लोकं बर्फात मनसोक्त खेळत होती,
मोठी लोकंही अगदी लहान बनून गेली होती. या सगळ्यांना मागे ठेवत आम्ही मुख्य दरीच्या
दिशेने निघालो. तिथेही आमच्या आजूबाजूला बरेच मराठी. विद्युत शक्तीवर चालणारा आपल्याला
उंचावर घेऊन जाणारा झोपाळा म्हणजेच ट्रॉली आम्हाला तिथून कित्येक मीटर वर नेत सोलंग
दरीत घेऊन जाणार होती. आम्ही या ट्रॉलीने निघालो आणि सुरु झाला आमचा चित्तथरारक प्रवास.
ही ट्रॉली सगळीकडून पारदर्शक त्यामुळे त्या बर्फाच्या साम्राज्यातून वर जातानाचा थरार
जरा जास्तच जाणवत होता. वरती पोहोचल्यावर जे काही होतं ते फक्त अनुभवण्यासारखं. सगळीकडे
फक्त आणि फक्त बर्फ.
एक छोटं खाण्यापिण्याचं दुकान कसबसं दिसत होतं. त्याच्या छपरावर,
इकडे तिकडे बर्फच बर्फ होता. इथे आम्हाला परदेशी पर्यटक दिसले. सूर्य चांगलाच तळपत
होता आणि त्यामुळे आजूबाजूला असणारा बर्फ, त्याचे डोंगर स्फटिकाप्रमाणे चमकत होते.
या चमकणाऱ्या डोंगरांची शोभा वाढवण्यासाठी तिथे ओक वृक्ष होते पण ते ही बर्फाने माखलेले...
दहापैकी नऊ दिशांना भुरभुरीत पांढरा शुभ्र बर्फ आणि त्यात खेळायला आलेले आमच्यासारखे
पर्यटक. आता थोडं वर चढून बर्फात जायचं होतं. लोकं घसरत होती, आम्ही स्वतःला सांभाळत
वर चढून गेलो. आमच्याबरोबर एक मोठा मराठी समूह होताच. त्यातले तरुण आपल्या मागच्या
पिढीतल्या लोकांची अगदी छान काळजी घेत होते. बर्फातून चढून वर जाताना इथे पाय ठेवू
नका इथे घसरडं आहे, तिथे ठेवा... हे असं सांगत सगळ्यांना बर्फातून वर घेऊन जात होते.
बघून खूप छान वाटलं.
![]() |
| हेच ते दुकान |
आम्ही बर्फात मनसोक्त बागडलो,
लोळलो, झोपलो, घसरगुंडी केली. मस्त गेला हा वेळ. हातातले हातमोजेही काढून टाकले. खोटं
वाटेल पण त्या एवढ्या बर्फात गरम होत होतं. अगदी मन भरेपर्यंत खेळून झाल्यावर तिथून
निघालो. ट्रॉलीने तोच थरार अनुभवत खाली आलो.
ट्रॉलीतून उतरताना एक हसतमुख चेहरा जणू
आमच्या स्वागताला हजर होता, तिथेच काम करणारी एक मुलगी... फोटोसाठी लगेच तयार झाली.
तिथून बाहेर बर्फात आलो. एवढ्या त्या बर्फातही तिथे मंदिरं आहेत. आता तो खालच्या सखल
भागातला बर्फही आमच्यासाठी नवीन राहिला नाही. त्या खालच्या बर्फातही मनसोक्त थांबून
आम्ही तिकडून निघालो. निदान या हिमाचल सहलीसाठी आम्ही पूर्णपणे बर्फाचा आनंद उपभोगला
होता. मुंबईच्या समुद्राच्या वाळूतून चालताना आम्हाला आता फार काही वाटत नाही कारण
हा समुद्र आणि त्याची वाळू आमच्यासाठी नवीन नाही. असंच काहीसं आता त्या बर्फात वाटू
लागलं होतं. असा हा बर्फाचा संपूर्ण आनंद लुटल्यावर आम्ही तिकडून निघालो. तिथून बाहेर
आलो आणि आमच्या गाडीची वाट पाहू लागलो आणि थंडी वाजायला लागली. मगाशी वरती त्या बर्फाच्या
सोलंग दरीत हातमोजे काढूनही गरम होत होतं आणि इथे खाली आल्यावर रस्त्यावर हातमोजे घालूनही
थंडी वाजायला लागली. तिथे त्या एवढ्या बर्फातही आम्हाला कुत्रं दिसलं, अगदी छान धष्टपुष्ट...
रोहतांगला जाता येत नाही
कारण रस्ता बंद. पण जेवढं त्या रोहतांगच्या जवळ जाता येईल तेवढं जावं म्हणून गाडीने
निघालो. अतिशय शांत रस्ता. सोलंगवरून रोहतांगला फार कोणी जाताना दिसत नव्हतं पण आम्ही
चाललो होतो. आजूबाजूला शांतता, स्वच्छ हवा, बर्फ आणि बर्फ वितळल्याने तयार झालेला रस्ता.
या रस्त्यावरचं प्रत्येक दृश्य अगदी छायाचित्रीत करावं असं. आजूबाजूला किरकोळ हॉटेलं
दिसत होती पण ती ही बर्फाने माखलेली. घर, हॉटेल, परिसर सगळीकडे बर्फच बर्फ. तिथले स्थानिक
बर्फाला कुदळीने खणत बाजूला करताना दिसत होते. कारण त्यांचं रोजचं आयुष्य जगणंही या
बर्फाने कठीण केलं होतं. तेव्हा वाटलं, मस्त निसर्ग, हवा असा विचार आपल्या मनात येतो
पण हे पहाडी जीवन फार खडतर... डोंगरावरून बर्फाचं पाणी वितळत असल्याने छोटे छोटे धबधबे
तयार झाले होते. त्यांचा तो निर्मळ खळखळ आवाज छान वाटत होता. थोडक्यात बर्फाच्या साम्राज्यात
मानवाने गरजेपुरती जागा बर्फ बाजूला करून स्वच्छ केली होती नाहीतर त्या भागात होतं
बर्फाचं एकछत्री राज्य. रोहतांग रस्त्यावर सोलंगच्या पुढे असलेल्या कोठीच्या रस्त्यावरही
आम्ही हे बर्फाचं साम्राज्य पायी हिंडून अनुभवलं, अगदी मन भरेपर्यंत... कोठीला मागे
सारत आम्ही रोहतांगच्या दिशेने निघालो. तिथे मानवाची हालचाल शून्य. जर कोणी तिथे होतं
तर तो फक्त निसर्ग. तिथे घरं नाहीत, हॉटेलं नाहीत, कुठल्या इमारती नाहीत की काही नाही.
तिथे होता तो फक्त संपूर्ण निसर्ग... स्वच्छ, सुंदर, निर्मळ... बर्फाने रस्ता बंद केलेला
दिसला आणि आम्ही परत फिरलो... फक्त रोहतांगच नाही पण एकूणच बर्फामुळे बंद, अजून रस्ता
मोकळा झाला नाही, आत्ता याचा काळ नाही अशा कारणांसाठी आम्हाला हिमाचलची काही ठिकाणं
बघता आली नाहीत.
हा आमचा केवळ दुसरा दिवस
होता पण पहिल्या दिवसापासूनच मुंबईचा, तिकडच्या आयुष्याचा संपूर्ण विसर पडला होता.
मुंबई ??? हे कुठलं ठिकाण ? माहीत नाही बुवा... ही अशी अवस्था अगदी पहिल्या दिवसाच्या
सकाळपासूनच झाली होती. आणि त्याचं सर्वोच्च टोक होतं रोहतांग आणि त्याचा मनुष्य विरहीत
परिसर. ही केवळ हिमालयाची सुरुवात आणि एवढं सुंदर, स्वच्छ वातावरण, प्रत्यक्ष हिमालयाचा
अनुभव काय असेल !
आम्ही रोहतांगपासून कोठी,
सोलंग करत मनालीत आलो. वाटेत नेहरू कुंड नावाची जागा लागली. एका डोंगरातून येणारा पाण्याचा
नैसर्गिक झरा आणि त्याचं तयार झालेलं कुंड, नेहरू कुंड. नेहरूंनी या जागेला भेट दिली
होती म्हणून याला त्यांचं नाव देण्यात आलं. एक उल्लेख असाही आढळतो की ते जेव्हा इकडे
यायचे तेव्हा ते फक्त या कुंडाचंच पाणी प्यायचे. या झऱ्याचं पाणी औषधी आहे असं म्हणतात.
पोटाला हे पाणी फार चांगलं. लोकं तिथे कॅनच्या कॅन भरून नेत होते. आमच्या ड्रायव्हरलाही
हे पाणी बाटलीत भरून हवं होतं. आम्हीही एका छोट्या बाटलीत पाणी भरून घेतलं. पण औषध
म्हणून त्याचा वापर न करता घरी परतल्यावर तहान लागल्यावर ते पाणी पिऊन संपवून टाकलं
ही गोष्ट वेगळी.
तिथेच जवळ एक एस्सेल वर्डसारखं
काहीतरी होतं. तेवढं मोठं नाही पण तसेच खेळ वगैरे... पण आता ते अंतराळ वीर किंवा बॉम्ब
निकामी पथकाचे सदस्य म्हणून वावरायला नको वाटत होतं. बर्फासाठी भाड्याने घेतलेले कपडे
शरीराची हालचाल मुक्त होऊ देत नव्हते. तेव्हा आधी ते कपडे परत करण्यासाठी गेलो. तिथे
ती सकाळची गोड बाई होती. आम्ही आलो म्हटल्यावर हसत हसत पुढे आली. तिला म्हटलं, तुमचा
फोटो काढते. लगेच तयार झाली.
त्या हिमाच्छादित डोंगरांच्या
दरीत बनवलेल्या छोट्या एस्सेल वर्डमध्ये गेलो. बोटिंग, साहसी खेळांसकट वेगवेगळ्या प्रकारचे
खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, वगैरे याचा छोटा भाग होता तो, तिथे थोडा वेळ घालवला आणि
आजच्या दिवसाचं पर्यटन आटपून परत फिरलो. पुढच्या दिवशी मणिकर्णला जायचा बेत होता.











No comments:
Post a Comment